Font Problem

पक्षी

काउळा, काग
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥

काय उंदीर नाही धांवी । राख लावी गाढव ॥२॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥

तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥

छायाचित्र : ©  उमंग दत्त

***

वसने थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥

फुगाते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे ॥२॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥

गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥

मुलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ॥४॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥

***
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

काउळे ढोपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

***

लाडाच्या उत्तरी वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥

कवतुके घ्यावे लेकराचे बोल । साहिलिया मोल ऐसे नाही ॥२॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥

तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खते धुंडी ॥३॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥

***

आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥

नाकेविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥

हुकुमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका ॥३॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥

***

जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥

गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥

प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥

तुका म्हणे तैसी हरि । कीरव्या नावडे कस्तुरी॥४
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥

***
कावळयाच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥२॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥३॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वाया सीण करू नये ॥४॥
***
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठे चराचरी त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखे भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥२॥
कागाचिये विष्ठे जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहाता दोष ॥३॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामे नाश पातकासि ॥४॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहाता विचार पिंगळेचा ॥५॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । याचे पूर्व शुध्द काय आहे ॥६॥
न व्हावी ती जाली कर्मे नरनारी । अनुतापे हरि स्मरता मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरि । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥

***
जातीचे ते चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥

शिकविले ते सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥२॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥

तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नारी नव्हती ॥३॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥

***
परस्त्रीते म्हणता माता । चित्त लाजविते चित्ता ॥१॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥

धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टया हाते नुडवी काग ॥२॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥

जे जे कर्म वसे अंगी । ते ते आठवे प्रसंगी ॥३॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥

बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥

***
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ?
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ?
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ?
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी ?

***
पावलो हा देह कागतालिन्याये । न घडे उपाये घडो आले ॥१॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥

अंधळयाचे पाठी धनाची चरवी । अघटित तेवि घडो आले ॥२॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥

तुका म्हणे योग घडला बरवा । आता कास देवा न सोडी मी ॥३॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥
***
 
छायाचित्र : ©  विलियम व्हॅन

रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचे ॥१॥
निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागी तैसा शास्त्रबोध ॥धृ॥
दास तुका म्हणे विठ्ठल उदारे । अज्ञान अंधारे दूरी केले ॥२॥

मागील अभंग

पुढील अभंग

सूची