तुकोबारायांची शब्दसृष्टि पढिक विद्वानाची
नव्हती. त्यांनीं विश्वासानें, आदरानें-जीं कांहीं संतांची वचनें पाठ केलीं होतीं,
तेवढींच त्यांचीं शब्दसृष्टि ! ती संतांचीं वचनें कानांत विसावून मनांत परिपाक होऊन
त्यांच्या अंतरांत जेव्हां सुखाचा झरा लागला, आनंदाला पूर आला तेव्हां प्रेमामृतानें
ओलावलेल्या, हरिगुणगानानें गोडावलेल्या, विठ्ठल गजरानें पिकलेल्या वाचेच्याद्वारां
तो प्रेमाचा पूर-तो सुखाचा झरा-वाट काढूं लागला; तेव्हां त्या निःशब्दाचे शब्दांनीं
आळें करून परब्रह्म कवळावें अशी स्थिति झाली. प्रत्येक शब्द हा अरवस्थेच्या
प्रतीतीनें स्थानापन्न असल्यामुळें तो ज्या कळकळीनें उच्चारला जाई तेवढया च आर्ततेनें
त्या समोरच्या श्रोत्यांच्या आर्त मनोभूमींत रुजे. त्यामुळें तुकोबांचें कीर्तन वा
भजन परिणामकारक होई. अगदी बालपणांत च शिव छत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या
प्रभावांत सांपडले. त्यांनीं इतर उपदेशकांनीं सांगितल्याप्रमाणें सर्वसंग परित्याग
करून भजन पूजन कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरू केला.
तुकोबांस ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या कामावर रहा आम्ही भजन
कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत रवीचा प्रकाश
पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा त-हेनें त्यांच्या
विचारांच दिशा बदलविण्याच्या कामावर राहूं असें आपण एकमेक एकमेकांस सहाय्य करूं व
सर्व जण सुपंथ धरतील असें वागूं; असें म्हणून तुमच्या कार्याच्या पाठीशीं मी आहें
याची खूण म्हणून तुमच्या सहका-यांना प्रसाद म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग
आहेत. आज जरी स्वराज्य आहे तरी सध्याचे सरकार त्या अभंगांचें निरूपण पटवून घेऊन
पचवितील अशी मला खात्री देववत नाहीं. असो, तात्पर्य काय, कीं अभंगवाणी ही फार
प्रतापवंत व प्रभावी होती. याची साक्ष रामेश्वर भटाची फिर्याद, व ''गुरुत्व गेले
नीच याती'' अशी रामदासांची पोटदुखी, मंबाजीबोवांचा तडफडाट, व चिंतामणी देवांची
परीक्षा अशा गोष्टी देत आहेत. अशीं आणखी हि कांहीं उदाहरणें झालीं असतील. पण अशा
अडथळयांस न जुमानतां देवा हातीं रूप धरवूं आकार नेदु निराकार होऊं त्यासी । या
बाण्यानें तुकाराम महाराज वागत होते.
शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग
महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें.
त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. |