"मुंबईहून
ता. ११/१२/१९५३ रोजी मी तुकाराम महाराजांचे वशंज ह.भ.प. श्रीधरबुवा गोसावी देहूकर
यांना पाठविलेल्या पत्रात ते लिहितात - "ता. २०/२२ नंतर आम्हास कोर्टास सुट्टी आहे.
तेव्हा प्रश्न असा आहे की, श्री. ह.भ.प. बाबासाहेब यांस देहूचे आसपास मोटार घेऊन
रोज दुपारी १ वाजता बाहेर पडून ६ वाजेपर्यंत हिंडता येईल का ? ते काम एकवार केले
पाहिजे इत्यादी."
यावरून
ता. २२ ला नाताळच्या सुट्टीत श्रीतुकोबारायांच्या अप्रसिध्द लिखाणाच्या शोधार्थ ते
हिंडायला निघणार होते. परंतु अकस्मात् त्यांचे देहावसान झाल्याने त्या कार्याची
अपरिमित हानि झाली आहे.पूर्वीपासून ते संशोधन कार्यात होतेच. "English
Records on Shivaji" ग्रंथ
शिवचरित्र कार्यालयाने १९३१ त प्रसिध्द केला. तो त्यांच्या परिश्रमाचेच फळ होय, व
त्यांच्या विद्वत्तेची साक्ष त्या ग्रथांची विस्तृत प्रस्तावनाच देते. कै. दादा
महाराज सातारकर यांच्या संगतीत त्यांना संतवाङ्मयाची गोडी लागली व त्यांच्या
प्रेरणेने त्यांनी तुकोबारायांच्या अभंगवाणीचा ध्यास घेतला.
देहूस जाऊन वारंवार गाथ्याची पारायणे केली. अभंग संशोधनर्थ अनेक गावीं जातीने ते
हिंडले. अनेक वर्षें घालविल्यावर देहूस श्री. बाबासाहेब यांचेकडे असलेल्या श्री.
तुकोबारायांच्या हातच्या वहीचे संपादन करून ती प्रसिध्द करण्याचे श्रेय संपादिले.
तुकोबारायांच्या शिकवणुकीचे व त्यांच्या अभंवाणीतून प्रत्ययास येणाऱ्या क्रममालिकेचे
दिग्दर्शन करणारी त्यांची प्रस्तावना प्रत्येक अभ्यासकाने मनन केले पाहिजे. हा
ग्रंथ प्रसिध्द झाल्यावर त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. संताजीच्या वहीचे योग्य
मूल्यमापन करणे, ज्ञानेश्वरीची पाठभेदावर उत्तम आवृत्ती तयार करणे इत्यादी कामे
करण्यास त्यांनी कंबर कसली होती व अशा स्थितीतच ते इहलोक सोडून गेले.
श्री
दादा महाराज सातारकर यांच्या हातून माळ धारण करणारे ते शेवटचे वारकरी होते.आषाढी,
कार्तिकीस पंढरीस व कार्तिकीस आळंदीस ते नेमनिष्ठेने येत. गेल्या आषाढीस त्यांचे
वडील वारल्यास २-३ झाले असताच ते पंढरीस गेले व वारी चुकू दिली नाही ! शेवटी त्या
निष्ठेनेच ते श्री तुकाराम चरणी विलीन झाले.
**********************
पोष्ट श्रीपूर तालुका माळशिरस
येथे रहाणारे बॅ. परांजपे यांचे बंधु श्री.गोविंद गनेश परांजपे यांनी बॅ. परांजपे
यांच्याबद्दल खालील माहिती पाठविली आहे.
बॅ. परांजपे यांचे संपूर्ण नाव श्री. बाबाजी गणेश परांजपे असे असून ते मु. पापडी
ता. वसई जि. ठाणे येथे ता.२० जुलै १८८९ रोजी जन्मले. इतिहास प्रसिध्द चिमाजी अप्पा
पेशवे यांनी वसई प्रांत काबीज केल्यानंतर त्या प्रांतातील कामीण भागाची देशमुखी
परांजपे यांच्या घराण्यात होती. पण इंग्रजांनी ते हक्क मान्य केले नाहीत व परांजपे
घराण्याकडे तिकडे काही घरें व शेती फक्त उरली होती.
सरकारी
नोकरीनिमित्त बॅ. परांजपे यांचे वडिलांची बदली पुण्यास झाल्यामुळे बॅ. परांजपे यांचे
इंग्रजी शिक्षण नूतन मराठी विद्यालयात होऊन ते मॅट्रिकची परीक्षा ऊत्तम रीतीने पास
झाले. त्यावेळचे त्यांचे सहाध्यायी महामहोपाध्याय पोतदार, श्री. ह.वी. तुळपुळे व
सरदार मेहेंदळे इत्यादि होते. बॅ. मेहेंदळे यांचा विशेष परिचय झाल्याने कै.
तात्यासाहेब मेहेंदळे यांच्याबरोबर इतिहास संशोधनाचे बाबतीत बरेच मार्गदर्शन झाले.
मॅट्रिकनंतर १९२७ साली ते
विलायतेस बॅ. मेहेंदळे यांच्यासह जाऊन सन १९२९ साली बॅरिस्टर झाले व १९३० पासून ते
मुंबई हायकोर्टात काम करू लागले. विलायतेत असतांना इण्डिया ऑफिस मधील रॅंग्लर
परांजपे यांच्या सहाय्याने ईस्ट इण्डिया कंपनीच्या दप्तरातील ऐतिहासिक कागदपत्र
मिळवून ते "English Records on
Shivaji" म्हणून
प्रसिध्द करण्यास मदत केली.
सन १९२३ सालापासून
श्रीदादामहाराज सातारकर यांचा सहवास त्यांना लाभला, व त्यामुळे मूळच्या ऐतिहासिक
संशोधक दृष्टीचा ओघ श्रीतुकोबारायांच्या वाङ्मयाकडे वळला. या संशोधनात त्यांनी
केसरी, प्रेमबोध आदि नियतकालिकांत अनेक लेख लिहिले.
पहाटे ५ वाजतां उठून
श्रीतुकाराम महाराजांचे अभंग वाचीत बसणे हा त्यांचा नित्यक्रम गेली २० वर्षे तरी
चालू होता. त्यांची प्रकृति अतिशय निरोगी असे त्यामुळे त्यांना हे देवाघरचे आकस्मिक
बोलावणे येईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. बॅ. परांजपे हे राजकारणात लोकमान्य टिळक
यांचे अनुयायी होते. त्यांचा स्वभाव फारच प्रेमळ व हळवा होता. त्यांचे निर्याण ता.
२१ डिसेंबर १९५३ रोजी मुंबईस झाले.
प्रेमबोध, जानेवारी १९५४. |