पक्षी
अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका । हो का लोका निर्द्वंद्व ॥२॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥३॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
छायाचित्र : विलास आंब्रे
अभंग निरुपण: प्रल्हाद नरहर जोशी
शब्दार्थ: भूते - प्राणीमात्र, सर्व जीव
निर्द्वंद्व- सुखदु:ख, यशापयश, आशा निराशा इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे .
अर्थ:- सर्व जीवांच्या ठिकाणी एकाच हरीच्या रुपाची प्रचीती साम्यत्वाने मला कधी येइल काय ? अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.॥१॥
माझी भीती कुणालाही वाटू नये. माझ्याविषयी सर्व विश्वाने सुखदु:ख, भीती, आशानिराशा इत्यादी बाबतीत निर्द्वंद्व व्हावे. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.॥२॥
तुकोबा म्हणतात “जो जो प्राणी मला भेटेल ते ते माझेच रुप आहे, असे वाटावे. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.”॥३॥
विवरण:- तुकोबांच्या आत्मानुभूतीचा एक सर्वोत्तम आविष्कार या तत्त्वदर्शी अभंगात झालेला दिसतो. सर्वत्र एकच चैतन्यतत्त्व व्यापकपणे भरुन राहिल्याचा अनुभव आपणांस यावा अशी तीव्र उत्कांठाही या अभंगात आहे. या अभंगामागे तुकोबांच्या आयुष्यातील एक लहानसा पण महत्त्वाचा प्रसंग सांगितला जातो. एकदा एकादशीच्या निमित्ताने तुकोबा आळंदीस श्रीज्ञानेश्वरांच्या दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावर त्यांनी प्रदक्षिणेस प्रारंभ केला. वाटेतील शेतात कणसे डौलाने डुलत होती. त्यावर पाखरांचा थवा मनसोक्तपणे दाणे टिपीत होता. तुकोबांना पाहाताच पक्षी उडून गेले. एक साधी घटना. पण आपल्या जाणिवेने पक्षी उडाल्याचे पाहून तुकोबा मनात चरकले. त्यांच्या मनात शंका चाटून गेली. या पाखरांना आपले भय वाटले ? ते तसे का वाटावे ? आपण चैतन्यमय, पाखरे चैतन्याचा नाजुक व सहजसुंदर आविष्कार ! जोंधळ्याची ताटेही एका बीजाच्या पोटीच फुलून आलेली ! असे असताना चैतन्याची ओळख चैतन्याला वाटावी ? की परस्परांबद्दल भय निर्माण व्हावे ? की आपल्या चैतन्यप्रतीतीमध्ये काही कमतरता आहे ? या प्रश्नांनी तुकोबांचे अंत:करण हेलावून गेले. साऱ्या विश्वातील चराचर सृष्टीत एकाच चैतन्याचा धागा अनुभविणारा हा सत्पुरुष कळवळून गेला. या साम्यत्वाची वा चैतन्यानुभूतीची प्रचीती त्वरेने यावी म्हणून तुकोबा पांडूरंगाचा धावा करु लागले. “अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती” अशी एक तत्त्वदर्शी ओळ त्यांच्या मुखातून स्त्रवली. आपली भीती कुणासच वाटू नये, एकच चैतन्यस्वरुप असणारे सर्व भूतमात्र साम्यत्वाने आपणांस अनुभवास यावेत, जे जे आपणांस भेटेल ते ते स्वत:प्रमाणेच वाटावे, अशी फार मोठी झेप तुकाबांच्या मनाने या अभंगात घेतली आहे. पांडूरंगाची पूर्ण कृपा झाली. चैतन्यानुभूतीचा आविष्कार रोमरोमांत थबथबून गेला. निर्भयता प्रगटली. मग पूर्वी भीतीने उडून गेलेली पाखरे तुकोबांच्या अंगाखांद्यावर निर्भयपणे खेळू लागली ! तुकोबांच्या नामस्मरणात सामील झाली. द्वंद्वातीत अवस्थेत तुकोबा रमून गेले.
तुकोबांच्या अभंगात खालील पक्ष्यांचा समावेश आहे. अभंग क्रमाने वाचण्याकरिता पुढील अभंग वर click करणे किंवा खाली दिलेल्या सूचीत पक्षी वर click करणे.
१. कावळा - crow
२. कोकिळ - koel
३. कोंबडा - rooster
४. घार - kite
५. घुबड - owl
६. चकोर - chukar partridge
७. चातक - pied cuckoo
८. तित्तीर - francolin
९. पारवा - blue rock pigeon
१०. पोपट - parrot
११. बगळा - egret
१२. भोरड्या - rosy starling
१३. मोर - peacock
१४. ससाणा - falcon
१५. सारस - grus antigone
१६. साळुंकी - myna
१७. हंस - geese
१८. राजहंस - swan