दिलीप चित्रे
यांनी तुकोबांचे अनुवाद केलेले खालील ९ अभंगचा समावेश
विश्व साहित्य कोश मध्ये केला आहे .
नामदेव व पांडुरंग यांनी स्वप्नांत येऊन स्वामींस आज्ञा
केली कीं कवित्व करणें ते अभंग
१
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें
येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको
॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको
॥धृ॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका
॥३॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको
॥धृ॥
|
|
.
|
२
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन
॥२॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं
राहिलासे ॥३॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
३
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥३॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
४
पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥१॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
५
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें
॥धृ॥
बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं
॥२॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें
॥धृ॥
तुका म्हणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें
वित्त उगें ॥३॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें
॥धृ॥
६
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची
॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो
॥२॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥३॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे
स्वामिसत्ता ॥४॥
तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे
॥५॥
७
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों
॥धृ॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं
॥२॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों
॥धृ॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों
॥धृ॥
८
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
९
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं
॥२॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया
॥३॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न
अन्न करितां मेली॥४॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां
॥५॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें
करावेंसें ॥६॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं
॥७॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें
करोनियां ॥८॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुध्द
करोनियां ॥9॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली
॥१0॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि
॥११॥
वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला
॥१२॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां
॥१३॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं
॥१४॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं
विठोबाचे ॥१५॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें
॥१६॥
बुडविल्या वहया बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१७॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१८॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१९॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें
॥२०॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२१॥
|
The Longman Anthology
World Literature
David Damrosch
General Editor
Volume C
The Early Modern Period
Jane Tylus
David Damrosch
with contributions by
Pauline Yu
and
Sheldon Pollock |
|
तुकोबांची
गाथा ही वाङ्मयीन महाकृती आहे आणि म्हणून मानवाच्या
वैश्विक वाङ्मयीन वारशाचा एक भाग आहे. मराठी संस्कृतीत,
मराठी भाषेत, एका विशिष्ट कालखंडात तुकोबांची गाथा निर्माण
झाली असली तरी तिचा संदर्भ वैश्विक आणि मानवी आहे. कारण
तुकोबा स्वत:चे अनुभव वैश्विक परिप्रेक्ष्यात किंवा
सार्वभौम मानवी पातळीवरच मांडतात.
- दिलीप
पुरुषोत्तम चित्रे ( पुन्हा तुकाराम) |
|