Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

नाटकाविषयी

 
 

लेखक - दि. बा मोकाशी

संकलन - विजय तेंडुलकर

रंगावृत्ती, संगीत संकल्पना आणि दिग्दर्शन - अतुल पेठे

नेपथ्य - मकरंद साठे

संगीत - अशोक गायकवाड

प्रकाशयोजना - श्रीकांत एकबोटे , शिवाजी बर्वे

वेशभूषा - श्याम भूतकर

वादक - अशोक गायकवाड, उपेंद्र आरेकर, अतुल पेठे

निर्मिती सहाय्य - आनंद कानेटकर, अश्विनी परांजपे , प्रतिक खरवलीकर, धनेश जोशी, कौस्तुभ

अक्षरसुलेखन आणि छायाचित्रण - कुमार गोखले

विशेष आभार - डॉ. सदानंद मोरे , गजानन परांजपे, मेघना पेठे, जागर नाटसंस्था, समन्वय नाटसंस्था.

निर्मितीप्रमुख - धीरेश जोशी

सूत्रधार - प्रसाद वनारसे

निर्मिती - अभिजात रंगभूमी, पुणे

कलाकार - किशोर कदम

नाटक कालावधी - सलग पावणे दोन तास .

    दि. बा. मोकाशी या मराठीतील मान्यवर लेखकाची आनंदओवरी कादंबरी महत्वाची मानली जाते. आनंदओवरी म्हणजे संत तुकारामांच्या श्रीविठ्ठल देवळातील ओवरी. या जागेवर बसून तुकोबांनी अभंग रचले. ही ओवरी कवीराय संतशिरोमणी तुकोबांच्या आयुष्याची साक्षीदार आहे. अनेक घटना तिने अनुभवल्या आहेत.

कान्होबा हा तुकोबांचे लहान भाऊ. नाटकात त्यांना तुकोबांविषयीच्या सर्व आठवणी दाटून येतात. तुकोबा नेहमीप्रमाणेच अचानक कोठेतरी हरवले आहेत. दरवेळी ते इंद्रायणी काठी नाहीतर त्यांच्या आवडत्या भामनाथ - भंडारा डोंगरावर तरी सापडतातच. पण यावेळी मात्र ते शोधून सापडत नाहीत. कान्होबांच्या मनात आता अशूभ शंका येतात. उत्कटतेने ते आपल्या भावाचा शोध घेत रहातात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे तुकोबांच्या आठवणी दाटून येतात. ही कहाणी सांगताना शोधाचे रूप बदलते. आपल्या परिवर्तनशील, बंडखोर, संवेदनशील कवीवृत्तीच्या स्वतःच्या भावाची ही कहाणी कान्होबा सांगत जातात. त्यांनी अनुभवलेला तुकोबांचा तीव्र कल्लोळ ते आपल्या समोर अलगद उलगडवतात.

तुकोबांच्या जीवनपटातील पारदर्शी कथा कान्होबा सांगत असतानाच ते स्वतःचा , स्वतःच्या कुटूंबाचा, समाजाचा वेध घेतात. त्याचबरोबर सर्जनशील माणसाची घालमेल आणि त्यातून निर्माण होणारे एकूण जीवनविषयक प्रश्न ते आपल्यापुढे ठेवतात. माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा आणि उलघाल आपल्याला मग अस्वस्थ करते. कान्होबाच्या शोधाचे प्रश्न मग आपल्यालाही स्पर्श करतात. आपल्या जगण्यालाही अर्थपूर्णतेकडे नेतात.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
 

दिग्दर्शकाचे विधान -

आनंदओवरी हे नाटक माझ्या मानगुटीवर गेले तेरा वर्ष घट्ट बसून होते. संत तुकारामाची कथा अगदी वेगळया तऱ्हेने या नाटकात कथन केली आहे. हा तुकोबा आधीच्या सर्व तुकोबांच्या वर्णनाहून निराळा आहे. त्याचा माणूस म्हणून शोध तर यात
आहेच पण सर्जनशील माणसाची उलघाल फार उत्कट आहे. भावाने भावाचा घेतलेला हा भावपूर्ण शोध आहे. हा शोध अनेक पातळयांना स्पर्श करतो.

 सर्वाहून निराळा तुका इथे आपल्याला भेटतो, जो अत्यंत मानवीय, संवेदनशील आणि भावस्पर्शी आहे. असा तुकोबा आणि त्याचा भाऊ कान्होबा यांच्याशी आपण सहज आपलेही नाते जोडू शकतो.

      या नाटकातले आपल्या जगण्यातले अनेक प्रश्न उभे राहतात. ते आपल्याला अंतर्मूख करतात. एका तळमळीचा, उलघालीचा आणि वेदनेचा तो शोध आहे. तुकोबा हे आपल्या चारचौघांसारखेच असणारे गृहस्थ होते पण जीवनातल्या सुख-दुखाःच्या दर्शनानंतर त्यांच्यात नितांत बदल होत जातो. तुकोबा सर्वांत असूनही सर्वाहून निराळे होतात. माणसाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याचा ते शोध घेतात. हा सगळाच भाग मला नेहमीच प्रेरणा देत आला आहे.

आनंदओवरी हे कान्होबाचे आत्मनिवेदन आहे, कथन आहे. मूळ कादंबरीची भाषा अत्यंत तरल, उत्कट आहे. ती रंगमंचस्थ करणे हे अवघड आव्हान होते. सतत प्रत्यक्ष जरी एकच पात्र बोलत असले तरी अनेक पात्रांशी तो संवाद आहे, आत्मसंवाद आहे. कधी वर्तमानात तर कधी खोल भूतकाळात असा त्यांचा प्रवास चालतो. या सर्व प्रसंगातून मूलभूत तात्विक प्रश्न पुढे येतात. ते महत्त्वाचे वाटले. इथे तुकाराम हे अध्यात्मिक बुवा, अवतारी पुरूष वगैरे न राहता माणूस म्हणून प्रगल्भ होत जाताना दिसतात. आताच्या गुंतागुंतीच्या आणि असहिष्णु कालखंडात तुकोबा आणि त्यांचे सामाजिक तत्त्वज्ञान या निमित्ताने तपासायला मिळाले.

           ह्या नाटकात आपल्याला निसर्ग भेटतो, अवकाश भेटते. उघडा माळ, नदी, तिचे पात्र, भंडारा डोंगर, जाळी, जंगल, शेत, देऊळ भेटते. त्याचबरोबर पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र, अपरात्र अनुभवायला येते. कडकडीत उन्हाळा, पावसाळा, दुष्काळही भेटतो. हे नाटकातले सर्व वर्णन अस्सल मराठी मातीचे गंध, रूप ल्यायलेली आहे. या सगळयातून काळातून प्रतीत होणारे अवकाश मला नाटक करताना दिसत होते, जे आम्ही नेपथ्यातून, संगीतातून, प्रकाशयोजनेतून व्यक्त केले आहे. हे अवकाश नातेसंबंधातही गहिरे होताना दिसते.

      माझ्या आधीच्या सर्व नाटकांप्रमाणेच या नाटकातले माणसांचे जगणे आणि त्यांचे प्रश्न या नाटकातही मला उभे करता आले. त्यात मानवीय उत्कट संबंधांची गहरी छटा अनुभवायला मिळाली. एका ऐतिहासिक व्यक्तीरेखेचे नाते सरळ आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांशी भिडवता आले. अशा वेळी हे नाटक तुकारामाबाबत बोलत असले तरी ते खोलवर आपल्याच जगण्याविषयी बोलताना आढळते.