Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

वेगळी अनुभूती जागवणारी कलाकृती

- अर्जुन डांगळे

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या वतीने माणगावजवळील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात २०-२१ डिसेंबर रोजी संपन्न झालेला आंतरभारती साहित्य संवाद - २००२ हा अनेक घटनांनी लक्षात राहील. पहिल्या दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात जे नाटक सादर करण्यात आलं त्या नाटकाने प्रेक्षकांना शंभर मिनिट जागेवर खिळवून ठेवल होत. आनंदओवरी हे नाटक दि. बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. विजय तेंडुलकर यांनी संकलन आणि नाटरूपांतर केल आहे. संकल्पना-दिग्दर्शन हे अतुल पेठे यांनी केलेल आहे. तर या एकपात्री नाटकातील कलावंत आहेत किशोर कदम.महाराष्ट्रातील सामजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेत संतकवींना विशिष्ट असं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाने विठ्ठलभक्तीच्या रूपाने जी आध्यात्मिक वाट चोखाळली, त्या वाटचालीतील एक महत्त्वाचा संत म्हणजे तुकाराम होय. एक बंडखोर कवी म्हणून तुकारामाकडे पाहण्याचा आणि त्यांच्या अभंगाद्वारे व्यक्त झालेल्या वाङ्‍मयी‌न गुणाचा म्हणजे अस्सल कवित्वाचा शोध दिलीप चित्रेंसारखे समीक्षक घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सामाजिक - धार्मिक दंभाविरुध्द विषमतेविरुध्द आवाज उठवणारा विद्रोही म्हणून आ. ह. साळुंखेंसारखे विचारवंत तुकाराम चित्रित करत आहे. एकूणच तुकारामांच व्यक्तिमत्त्व हे इतकं विलक्षण आहे की सर्वच पातळयांवर तुकारामांच शोध घेण्याचे प्रयत्न होत आहेत.आनंदओवरी या नाटकात मात्र तुकारामाचा शोध घेण्याचा एक वेगळाच प्रयत्न आहे. तो साहित्यिक वाङ्‍मयी‌न पातळीवर नाही सामाजिक पातळीवर नाही. खरं म्हणजे तुकारामांच्या जीवनाशी संबंधित अशी संहिता असली तरी प्रत्यक्ष तुकारामांच पात्र नाही. कान्होबा हा तुकारामांचा धाकटा भाऊ. हा कान्होबा तुकारामांच व्यक्तिगत आयुष्य कौटुंबिक आयुष्य आणि त्याची विठ्ठलाप्रती असलेली श्रध्दा कथन करतो. त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगतो. वर म्हंटल्याप्रमाणे हा जरी सामाजिक-वाङ्मयीन पातळीवरचा तुकारामाचा शोध नसला तरी कान्होबांच्या निवेदनातून ते काही संदर्भ येतात ते अतिशय सहजस्वाभाविक आहेत. त्यामुळे याला एक वेगळंच सामाजिक परिमाण लाभतं आणि या पार्श्वभूमीवर तुकारामाच्या व्यक्तिगत आयुष्याचे विशेष उलगडत जातात.

ओवरी म्हणजे घरासमोरील अंगण किंवा मोकळी जागा. तुकाराम ज्या ओवरीवर बसून आपले अभंग रचीतआपल्या सहकाऱ्यांशी विठ्ठलभक्तीत रंगून जात तिला आनंदओवरी असं म्हणत. याच आनंदओवरी वरून तुकारामाचा धाकटा भाऊ कान्होबा तुकारामाचं जीवन कथन करतो म्हणजे तोही काही प्रश्न स्वतःला विचारत असतो. घरचा व्यापारउदिम सांभाळणाराव्यवहारी असणारा तुकाराम हा विठ्ठभक्तीत वेडापिसा का होतो आपल्या कुटुंबावरभावंडांवर प्रेम करणारा कुटुंबवत्सल तुकाराम हा परागंदा का होतो परोपकारी वृत्ती जपणाऱ्यालोकांमध्ये मिसळणाऱ्या तुकारामालां एकाकीपणा का जाणवतोहे प्रश्न उपस्थित करत असतानाच बालपणापासून घडत गेलेलाआयुष्यातील अनेक वाकडी वळणं ओलांडून साकार झालेला तुकाराम कान्होबा आपल्या आठवणींद्वारे उभा करतो.

हे नाटक म्हणजे कान्होबाने तुकारामांशी केलेला संवादस्वतःच्या मनाशी केलेला संवाद आणि प्रेक्षकांशी केलेला संवाद होय. या संवादातून कान्होबा कधी तुकारामांच्या आठवणींनी गहिवरून जातोमोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडली नाही म्हणून चिडतोरागावतोतर कधी विठ्ठलभक्तीत अभंगाद्वारे खिळवून ठेवणाऱ्या तुकारामां पुढे लीननतमस्तक होतो. नदीच्या बाजूला असलेल्या कातळावर बसून तुकाराम समोरच्या निसर्गाशी जे तादात्म्य साधतो त्याचं वर्णन तो करतो. तर दुष्काळात झालेली झालेली सबंध कुटुंबाची परवड तो सांगतो. तुकारामांचा मोठा भाऊ सावजी असाच विठ्ठलभक्तीपायी परागंदा झालेला असतो. भरल्या संसारातून उठून जातो. तुकारामही त्याच मार्गाने जात असतो. म्हणून कान्होबा विठ्ठलावर रागावलेला दिसतो. त्याला जाब विचारताना दिसतो. या सगळया प्रक्रियेत त्याच्या कुटुंबातील स्त्रियांचीपोराबाळांची कशी परवड होत गेली हे सांगतो. तर कधी तुकाराम आपली अभंगरचना कशी करायचा हे सांगतो.

     घरप्रपंच सोडून अचानक रानावनातडोंगरदऱ्यात जाऊन विठ्ठलनामाचं चितंन करण्यासाठी गायब होण्याचे प्रसंग तुकारामांच्या जीवनात आहेत. अशाच एका प्रसंगाने नाटकाची सुरुवात होते. नेहमीप्रमाणे कान्होबा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. कान्होबाला वाटतं तुकाराम नेहमीप्रमाणे कुठेतरी सापडेल पण शोध लागत नाही. ज्या नदीच्या कातळावर बसून तुकाराम चिंतन करायचा तिथे तो नसतोच. डोंगरदऱ्यांत कपारीत नसतो. कुणी सांगतो विमान आल होत ते तुकारामाला घेऊन गेल. गुराख्याच पोर सांगततुकारामाला सुसरीने ओढून नेताना पाहिल. तुकारामाच्या मृत्यूने अस्वस्थ आणि हतबल झालेला कान्होबा मृत्यू म्हणजे काय याविषयी भाष्य करतो आणि शेवटी तोही विठ्ठलापुढे लीन होऊन तुकारामांच्या भक्तिमार्गाची कास धरतो.

सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आनंदओवरी या नाटकाने प्रेक्षकांना शंभर मिनिट खिळवून ठेवलं होत. आणि हे खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य होतं ते किशोर कदम याच्या अभिजात अभिनयात. कान्होबांसारख्या अपरिचित पात्राच्या माध्यमातून तुकाराम उभा करणं म्हणजे एक आव्हान होतं. अनेकपात्री नाटकातून सादर केली जाणारी नाटकृती आणि एकपात्री नाटकृती यात मूलभूत फरक आहे. अनेकपात्री नाटकात संवादघटनाअभिनय यांच्यातील तोल सांभाळला जाऊ शकतो. पण एकपात्री नाटक म्हणजे एकूण त्या नटाचा-कलाकाराचा व्यक्तिमत्त्वाचा कस असतो. किशोर कदमसारखा तरुण कलावंत या कसाला उतरलेला दिसतो. विशेषतः विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या किंवा पारंपरिक नेपथ्याचा डोलारा उभा करून किंवा निवेदनाद्वारे सादर केलेल्या मनोरंजनप्रधान एकपात्री प्रयोगात अनेक गोष्टी खपून जातात. पण आनंदओवरी सारख्या गंभीर नाटकृतीत ज्यात भावभावनांचेमनोव्यापाराचे अनेक चढउतार आहेत ते केवळ अभिनयाद्वारे सजीव करणं ही साधी गोष्ट नाही. प्रेक्षक आणि रंगमंच यांच्यातील क्षणभराचाही विसंवाद नाटकृती अनुभवताना विक्षेप निर्माण करू शकतो. पण या नाटकात कान्होबाच्या भूमिकेत असणारा किशोर कदम आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयाने प्रेक्षकांशी भावनिक नात जोडतो.

किशोर कदमचा अभिनय हा अभिजात आणि प्रतिभासंपन्न आहे तो यासाठी कीनाटकाला नेपथ्य असं नाही. एक साधं जुनंदोन खणांचं घर. पुढे ओवरी आणि त्यावर असलेली खाटरंगमंचाच्या डाव्या बाजूला प्रेक्षकांना न दिसणारा पण प्रकाश योजनेच्याद्वारे उभा केलेला छोटासा देव्हाराया नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर हातात असलेल्या एका शेल्याच्या माध्यमाचा वापर करून तो वातावरणनिर्मिती करतो. एखादा नवीन प्रसंग सांगताना तो शेला तो डोक्याला मुंडास म्हणून गुंडाळतो. तर हा शेला अवघड आणीबाणीच्या प्रसंगी हाताला गुंडाळतो. तर चित्तवृत्ती स्थिर असताना तो गळयात उपरणं म्हणून घालतो. त्या शेल्याचा वापर करताना त्याच्या चेहऱ्यावरच्या भावछटात्या वेळच्या भाववृत्ती इतक्या अनुरूप असतात की वाटतंकिशोर अभिनय करत नाही तर कान्होबाच त्याच्या अंगात संचारला आहे. भूमिकेशी तादात्म पावणं किंवा एकरूप होणं म्हणजे काय असतंहे या नाटकात दिसतं.

केवळ चेहऱ्यावरचे हावभाव बदलण किंवा हातवारे करत संवाद फेकण म्हणजे भूमिका पार पाडण नव्हे. तर संपूर्ण रंगमंचावर चपखलपणे वावर करूनत्यावर हुकूमत मिळवून अभिनयाबरोबरसंवादाबरोबर त्यातही जिवंतपणा आणण हे सगळयांनाच जमतं असं नाही. पण या नाटकात किशोर कदमसारखा कलावंत प्रेक्षकांचा ताबा तर घेतोपण संपूर्ण रंगमंचाचादेखील ताबा घेतो. यात शारीरिक चापल्य असलं तरी एकूण नाटप्रक्रियेशी असलेली बांधिलकीही दिसून येते. या प्रक्रियेतच रंगमंचाचा संपूर्ण आवाका लक्षात येतो. एकपात्रीनेपथ्यही नाटकात याला महत्त्व असत कारण प्रसंगानुरूप परिणामकारक दृश्य उभ करण्याच सामर्थ्य या हालचालीत असतं. उदाहरणार्थ तुकाराम जेव्हा गायब होतो त्याला शोधण्यासाठी कान्होबा बाहेर पडतो तेव्हा त्याला तो रस्त्यावर गावात नदीकाठी झाडीझुडपात डोंगर कपारीत कसा असहाय्य आणि वणवण फिरत असताना दिसतो याच अत्यंत प्रत्ययकारी दर्शन किशोर कदमने आपल्या या हालचालीतून घडवल आहे. विशेषतः वेडा जन्याशी त्याचा रस्त्यावरचा संवाद तर मनाचा ठाव घेतो.

     किशोरला आवाजाची देन आहे. या कविमनाच्या संवेदनशील कलावंताच्या आवाजात जो आर्त पण धारदार असा कंप आहे तो केवळ कानापर्यंतच पोहोचते नाहीतर काळजापर्यंत पोहोचतो. तुकारामाला शोधताना तो ज्या अगतिकपणे तुकातुकोबातुक्या अशा हाका मारत रानोमाळ भटकतो त्या वेळच्या त्याच्या अभिनयाने आणि आवाजाने प्रेक्षक स्वतः हरवतात.किशोर हा प्रतिभासंपन्न असा कलावंत आहे याचं आणखी एक प्रत्यंतर म्हणजे त्याने फेकलेले नाटकातील संवाद होय. शंभर मिनिटांच हे नाटक आहे. मध्यंतर नाही. या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण संवाद न अडखळता न थांबता त्यातील चढ उताराचा आलेख सांभाळून सादर करण्याची सर्वच पातळयांवरची किशोरची क्षमता ही खरोखरच कौतुकास्पद आहे.

हा संपूर्ण नाट्यानुभव घेत असताना एका गोष्टीचा अभाव मात्र जाणवला आणि तो म्हणजे कान्होबाच्या भाषेचं वळण होय. वास्तविक कान्होबा हा मावळहवेली या ग्रामीण परिसरात वाढलेला जगलेला. नाटकातील कान्होबाच्या भाषेला हे ग्रामीण वळण किंवा डूब नाही किशोर कदम यांचं मराठी वळण हे शहरी मध्यमवर्गीय आहे. मध्येमध्ये काही ठिकाणी वळण बदलण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. या संदर्भात नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांची देवकीनंदन गोपाला तील गाडगेबाबांची भूमिका आठवते. त्यातीत त्यांचं वऱ्हाडी भाषेचं वळण हे मोहवणारं आहे. अर्थात सिनेमात हे शक्य करता येतं. कारण सिनेमा आणि नाटक यांच्या तंत्रातच मूलभूत फरक आहे.

      अतुल पेठे या तरुण दिग्दर्शकाचा या नाटकाच्या यशात मोठा वाटा जाणवतो. सूर्य पाहिलेला माणूसउजळल्या दिशा यासारखी नावीन्यपूर्ण आणि वेगळया आशयाचीधाटणीची नाटकं त्यांनी रंगभूमीवर सादर केली आहेत. आनंदओवरी या नाटकाची रंगावृत्तीसंगीत संकल्पना आणि दिग्दर्शन त्यांनी केलेल आहे. त्यांच्या दिग्दर्शनाची सामर्थ्यस्थळ नाटकात प्रकर्षाने जाणवतात. प्रकाशयोजनेचा उचित आणि परिणामकारक वापर केलेला आहे. विशेष म्हणजे संगीताचा वापरम्हणजे ढोलकी आणि टाळ याचा वापर फारच सूचक आणि परिणामकारक केलेला आहे. आनंद गायकवाड हे ढोलकीवादक आहेत. अतुल पेठे यांचं वैशिष्ट हे की तुकारामाचे अभंग गेय स्वरुपातटाळ-मृदुंगाच्या गजरात सादर करून नाटकाचं साधारणीकरण न करता म्हणजे संगीत नाटक करण्याचं कटाक्षाने टाळलं आहे. अर्थात मूळ संहितेत हे नसेल. पण अनेक दिग्दर्शक प्रेक्षकांशी तडजोड करताना मूळ संहितेत बदल करतात. अतुल पेठे यांचं दिग्दर्शन आणि किशोर कदम यांचा अभिनय यामुळे या नाटकाच्या सादरीकरणाला एक उंची आणि कलामूल्य लाभलं आहे. दि. बा. मोकाशी आणि विजय तेंडुलकर यांच्यासारख्या साहित्यक्षेत्रातील दिग्गजांचा वाटादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. एकूण आनंदओवरीहा नाट्यानुभव हा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा आहे. विषयात नावीन्य तर आहेचपण वेगळी अनुभूती जागवणारी कलाकृती आहे. या नाटकाच्या प्रयोगानंतर माझा सहकारी सुनील कदम याला मी प्रतिक्रिया विचारली. त्याने एका वाक्यात उत्तर दिल किशोर कदम हा उद्याचा श्रीराम लागू आहे.

सौजन्य : आपल महानगर, ३०डिसेंबर, २००२.