Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

अंतर्मुख करणारी आनंदओवरी

- वि. भा. देशपांडे

 

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात ज्यांनी जाणतेपणाने सर्जनशील स्तरावरचे कथा कादंबरी लेखन केले आहे त्यामध्ये दि. बा. मोकाशी हे अग्रेसर नाव आहे. त्यांनी आनंदओवरी नामक लघू कादंबरी लिहिली. एखादी लघुकादंबरी किती आशयद्दन असू शकते याचा तो वस्तुपाठच आहे. या कादंबरीला नाटरूप किंवा रंगमंचीय रूप द्यावे असे काही वर्षे निरनिराळे लोक बोलत होते. तर काहींनी त्याची तयारीही केलेली होती. काहीना काही कारणांनी ते राहात गेले. पण आता अतुल पेठे या धाडशी प्रयोगशील वृत्तीच्या दिग्दर्शक निर्मात्याने ही ओवरी रंगमंचावर आणून एक उत्तम कामगिरी केलेली आहे.

आनंदओवरी या शीर्षकाला अनेक पदर आहेत. तुकाराम महाराज ज्या घरात (देहू गावात) राहात होते, त्या घरात जिथे तुकोबांनी बसून विठ्ठलभक्ती आळवली ती जागा, ती ओवरी ! पण हा वाच्यार्थ झाला. या नाटगत लेखनाचे आशयसूत्र आणखी खोलवरचे आहे. तुकाराम महाराजांचा धाकटा भाऊ कान्होबा हा आपल्या भावाचा शोध घेतोय. तुकाराम नेहमीप्रमाणे विठ्ठलशोधासाठी घर सोडून गेले आहेत. त्यांना शेतात, नदीवर, डोंगरावर आणखी कोठे कोठे शोधणे चालू आहे. त्या शोधातून तुकारामांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरांवरचे अनेक पदर उलगडत जातात. एरवी आपल्या परिचयाचे तुकाराम त्यात थोडे आहेत. त्यांच्या जीवनातील साधक, वंचित आणि पर्यायाने आपल्या मनात साकार होत जातात. कान्होबाने तुकोबाचा घेतलेला शोध हा लौकिकाने अलौकिकाचा घेतलेला वेध आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसासारखा वाटणारा हा तुकाराम अध्यात्म्याच्या पायरीपर्यंत कसा गेला असेल त्याचे हे विदारक, अस्वस्थ करणारे चित्रण आहे. कान्होबाने एका अर्थाने स्वतःचाही शोध घेतला. नंतर आपणही त्यात सामील होतो आणि स्वतःला त्यात पाहायला लागतो, इतकी जबरदस्त ताकद मूळच्या लेखनात आहे.

        मोकाशींचे मूळचे लेखन नाटकाच्या माध्यमासाठी नाही हे दर्शनी ध्यानात येते. पण त्याचवेळी हे नाटात्मक स्वरूपाचे एक दीर्घ स्वगत आहे, म्हणूनच ते आवाहक आणि आव्हानात्मक आहे ! ते नाटात्मक स्वरूप किंवा आशय-अंतरंग शोधून त्याला रंगमंचीय रूप द्यावे असा निर्धार अतुल पेठेने केला. त्याने रंगावृत्ती तयार केली, संगीत संकल्पन आणि दिग्दर्शन संकल्पना ही दुहेरी जबाबदारी स्वीकारली. अतिशय अवघड अशी

 ही जबाबदारी होती ती त्याने सार्थपणाने पार पाडली याबद्दल त्याचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करायला हवे. एक वेगळा प्रयोग पेश करणे हे तर याचे कारण आहेच, पण तिच्यात चैतन्य निर्माण करण्याचे काम असे प्रयोग करीत असतात त्यासाठीचे श्रेय त्याला द्यायला हवे. श्रयनामावलीत संकलन विजय तेंडुलकर असे म्हटले आहे. ते नेमके काय आहे हे मूळ संहिता तपासून मगच सांगता येईल. प्रयोग पाहताना तरी नेमका तो परिणामांच्या संदर्भात करून दिली असावी !

अतुल पेठेने रंगमंच अवकाशाचा केलेला वापर आणि त्यासाठी मकरंद साठेने केलेली नेपथ्यरचना हा प्रयोगाच्या यशाचा आणखी एक मानबिंदू ठरेल इतक्या मोलाचा आहे. स्तरानिविष्ट नेपथ्य आणि त्यावर काळया-निळया गडदतेने निर्माण केलेले वातावरण, श्रीकांत एकबोटे यांनी केलेल्या प्रकाशयोजनाची साथ यामुळे नाटसंहितेतील विविध स्थळ -काळाची विश्वासार्हता निर्माण झाली. ती विश्वाहार्यताच प्रयोगाची गुणवत्ता वाढवीत होती. या साऱ्या प्रयोगतंत्राचा, साधनांचा वापर करताना दिग्दर्शक म्हणून अतुलने कान्होबाच्या रंगमंचीय हालचाली, त्यातून निर्माण होणाऱ्या विरचना किंवा आकृतीबंध तितकेच महत्त्वपूर्ण होते. दिग्दर्शक नाटसंहितेचा स्वरूप निर्णय कसा करतो आणि त्यातून एका प्रयोगाला मूर्त रूप कसे लाभले याचा अनुभव हा प्रयोग पाहताना येत होता. अतुलने या प्रयोग निर्मितीची प्रक्रिया एकदा सविस्तरपणाने लिहावी. ती पुढिलांना अथवा विद्यमान प्रेक्षकांनाही उपयोगी ठरणारी असेल. तूर्तास त्याने एक टिपण - विधान लेखन केलेले आहे. त्याचा सोदाहरण विस्तार करावा. कारण या संहितेत प्रयोग रीतींच्या आणखीही काही शक्यता संभवतात.

संहितेची निवड, संकलन, संपादन आणि स्वरूप निर्णय ही जितकी आव्हानाची गोष्ट आहे, तितकीच किंबहुना दशांगुळाने अधिक असणारी कान्होबा ही व्यक्तिरेखा रंगमंचावर साकारणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. ती महत्त्वाची कामगिरी किशोर कदम या गुणी कलावंताने चोखपणाने पार पाडली. त्याच्यावर दुहेरी जबाबदारी होती. एकतर तुकोबाचा लहानगा भाऊ कान्होबा उभा करणे. तो कोण, काय, कसा, याचा पत्ता सर्वसामान्य प्रेक्षकाला माहीत नसल्याने सारे पहिल्या पासून आकाराला आणणे. दुसरी जबाबदारी होती ती म्हणजे आपल्या सगळया बोलण्यातून, वावरण्यातून, अस्तित्वातून प्रत्यक्ष रंगमंचावर समोर नसलेला संतश्रेष्ठ तुकाराम उभा करणे. या संताची घडण कशी झाली. सामान्य व्यवहारी, कुटुंबप्रेमी, जनसामान्यात राहणारा माणूस वैकुंठाला कसा गेला, त्याचा हा लौकिक - अलौकिक प्रवास सांगणे. ह्या दोन्ही व्यक्तीरेखा (कान्होबा , तुकोबा) किशोरने समर्थपणाने उभ्या केल्या. अनुषंगिक काही पूरक व्यक्तीरेखाही होत्याच. हे सारे एका माणसाने सादर करून नाटानुभावाच्या स्तरावर नेण्याचे अवघड काम किशोर कदमने केले. त्याची भूमिका पाहताना प्रथम दर्शनीच जाणवत राहिले की, त्याने जो कान्होबा उभा केलाय तो हाच आहे अशी आश्वासकता अधिक अधोरेखित करीत जातो. त्याचबरोबरीने आपल्या देहबोलीने त्याचा प्रत्यय तो देत राहतो. तो स्वतः उत्तम कवी असल्याने आणि साहित्य जाणकार असल्याने त्याच्या अभिनयाची घनता वाढती राहते. जस जसे प्रयोग संख्येने अधिक होतील तसतशी कान्होबाच्या व्यक्तिरेखेची आणि पर्यायाने मूळ संहितेतील आणखी जाग त्याला सापडत जातील. सध्या रंगमंचावर मराठी शब्द - संवादांचे परिणामवारी उच्चारण झाले की मन सुखावते. असा आनंद देणारे विद्यमान रंगभूमीत जे मोजके गद्य कलाकार आहेत त्यामध्ये किशोर कदम हा एक आहे. त्याच्या नाट - चित्रपट वाटचालीतील कान्होबाची व्यक्तिरेखा किंवा ही आनंदओवरी ही एक महत्त्वाची रंगखूण ठरेल असा विश्वास वाटतो.

      या प्रयोगाला अशोक गायकवाड यांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रयोगात एकजीव झाल्याने अर्थपूर्ण वाटले. मोजक्या वाद्यांच्या साह्याने आणि साथीने अशी अर्थपूर्णता आणता येते हेही ध्यानात येत गेले. दि. बा. मोकाशी यांची एक अलक्षित, सार्थ संहिता प्रयोगारूपाने सर्वांना भावेल अशा ताकदीने पेश केल्याबद्दल किशोर कदम, अतुल पेठे यांच्या बरोबरीनेच धीरेज जोशी (निर्माता), प्रसाद वनारसे (सुत्रधार) आदींचे मनःपूर्वक अभिनंदन. हा प्रयोग मराठी बरोबरच हिन्दीत करून महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करावा. एक प्रयोग म्हणून तर याचे महत्त्व आहेच, पण अ-मराठी मंडळींना तुकाराम महाराज काही प्रमाणात कळायला मदत होईल. तसेच उपेक्षित दि. बा. मोकाशीही महाराष्ट्राबाहेर थोडे माहीत होतील. तसे घडो !