Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

धरणेकऱ्याचे अभंग

- बाबाजी णेश परांजपे

    भगवद्‌भक्तशिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांच्या कवित्वाबद्दल प्रत्येक लेखकानें कांहीं तरी बाहेरच्या कल्पना उसन्या आणून त्या झरोक्यांतून अभंगाकडे पाहिलेलें आढळतें, पण कोणाहि लेखकानें महाराजांनीं स्वतः आपल्या कवित्वाबद्दल काय लिहिलें किंवा म्हटलें आहे हें फारसें लक्ष्यात घेतलेलें दिसत नाहीं. याती शुद्र वंश या अभंगांत कवित्वस्फूर्ति  केव्हां  झाली तें दिलें आहे.  श्रीपंढरीनाथ व

 

नामदेवराय यांनी स्वप्नांत जागे करून नामदेवांचे अपुरे राहिलेलें काम तडीस लावण्याचें महाराजांवर सोपविलें असें वृत्त दुसऱ्या दोन अभंगांत सांगितलें आहे. तेव्हां हे अभंग अपक्व स्थितींतील वगैरे म्हणणें अज्ञानाचें द्योतक आहे. प्रसंगोपात स्वतःच्या कवित्त्वाबद्दल महाराजांचे काय उद्गार होते हें वरवर पाहिलें तरी नित्याचे चरित्र व काव्यविवेचनाचे नियम या उद्गारांस लावतां येणार नाहींत येवढें कोणासहि कबूल करावें लागेल.

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥

काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥

निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हें स्वामिसत्ता ॥

  *****

प्रसादाचि वाणी वदे ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥

    *****

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥

साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥

तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ॥

    *****

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥

वाचेचा चालक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥

*****

कृपा या केली संतजनीं । माझी अलंकारिली वाणी ॥

*****

विठ्ठलाचे नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥

  *****

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥

हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप  अमृताचें जळ ॥

तुका म्हणे थोर पुण्यें । ओघ आला पंथे येणें ॥

*****

  फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥

*****

  निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥

*****

तूं बोलसी माझे मुखें । मी तो तुजमाजी सुखें ॥

    वर जे थोडेसेच उद्गार दिले आहेत त्यांवरून आपल्या मुखाचा उपयोग करून श्रीहरीच बोलत आहे अशी महाराजांची स्वत:ची प्रचिती होती. आपल्या वाचेस संतवचनांचा अलंकार झाला आहे व नामघोषानें वाचा गोडावली आहे अशी त्यांची प्रचिती होती. अशी ही संतवचनांनी अलंकारिलेली, नामघोषानें गोडावलेली वाचा हरिगुणगान करण्यांत तल्लीन होई, तेव्हां हरिनाम वेलीस भक्तिप्रेसुखाचीं जीं फळें लागत ते हे अभंग होत, हे अभंग महाराज कीर्तनांत सहज स्फृर्तीनें म्हणत किंवा अगोदरं अभंग रचिलेले असून पुढें कीर्तनांत विषय प्रतिपादन करित असतांना तो विषय स्पष्ट व्हावा, श्रोत्यांस लक्ष्यांत ठेवण्याची सोय व्हावी म्हणून अभंगांत गोवीत हें समजण्यास सध्यां तरी कांहीं साधन नाहीं. तसेंच कोणत्या अभंगानंतर कोणता अभंग रचला गेला हें समजण्यासहि कांहीं साधन नाहीं. तसेंच बहुतेक अभंग सुट्टे सुट्टे असल्यामुळें महाराजांची कीर्तनाची रीती काय होती, ते रसपरिपोष, विषयप्रतिपादन कसें करीत, श्रोत्यांस एखादा विषय समजावून कसा देत हें समजण्यास आज साधन नाहीं. नाहीं म्हणावयास (1) वह्या बुडविल्या व तरल्या त्यावेळचे अभंग (2) श्रीपंढरीरायास पाठविलेलें पत्र; ज्यांच्याबरोबर पत्र पाठविलें त्यांची वाट पाहणें; ते आल्याचा आनंद (3) निर्याणाचे अभंग (4) चिंचवडच्या देवाकडे गेले त्यावेळचे अभंग (5) स्त्रीभ्रतार संवाद (6) धरणेकऱ्याचे अभंग अशीं कांही प्रासंगिक प्रकरणें प्रचलित गाथ्यांतून उपलब्ध आहेत; त्यांवर सध्यां तरी आपण आपली जिज्ञासा तृप्त करुन घेतली पाहिजे.

धरणेंकऱ्याचे अभंग

      हें प्रासंगिक प्रकरणांपैकींच एकतीस अभंगांचें एक अपूर्व व अमूल्य असें रत्न आहे. संत व भक्त चरित्रकार महिपीबोवा यानीं या प्रकरणाची थोडी पूर्वपिठीका दिलेली आहे. ती अशी :- एकदां बीड परगण्याचा ब्राह्मण देशपांडे पंढरीस पुराण व्युत्पत्ति प्राप्त व्हावी म्हणून अन्नपाणी वर्ज्य करून धरणें धरून बसला. दहा दिवस असें तामसी अनुष्ठान  झाल्यावर त्यांस स्वप्नांत असें सांगण्यांत आलें कीं आळंदीस जावें व श्रीज्ञानेश्वरांचें अनुष्ठान करावें, ते जी युक्ती सांगतील ती ऐकली असतां मनोरथ पूर्ण होतील. तेथून तो ब्राह्मण आळंदीस येवून अन्नपाणी वर्ज्य करून बसला. अशा तऱ्हेंनें बारा दिवस तामसी अनुष्ठान झाल्यावर त्यास स्वप्नांत पुन: आज्ञा झाली कीं देहूस त्वरित जावें, तेथें जगदोध्दारार्थ श्रीनामदेवांचे साक्षात् अवतार श्रीतुकाराम अवतरले आहेत, ते तुला जो अनुग्रह करतील त्यावर विश्वास ठेवून वागला तर तुझें कार्य सुफल होईल. जागा होऊन ब्राह्मण स्वप्नांतील दृष्टांत मनाशीं आठवूं लागला तोंच मनांत विकल्प उत्पन्न झाला कीं देहूचा तुकशेटवाणी तर आहे शूद्रा मी आहे ब्राह्मण, व मला शास्त्रव्युत्पत्ति प्राप्त होऊन पुराण वेदांत सांगतां यावें ही इच्छा, तेव्हां हें घडावें कसें ? पण स्वप्नांत आज्ञाच झालेली तेव्हां तो तसाच देहूस गेला व त्यानें आपली मनीषा महाराजांस सांगितली. त्याच सुमारास अहमदाबादेच्या एका व्यापाऱ्यानें एक नवस  श्रीज्ञानेश्वर महाराजांस केला होता तो फेडण्यासाठीं तोहि आळंदीस आला होता. त्यानें नवस केलेला ऐवज एका नारळांत घालून श्रीज्ञानेश्वर महाराजांपुढें ठेवला, तेव्हां त्यासहि आज्ञा झाली कीं हा नारळ देहूस तुकशेटवाणी यांच्या पुढें नेऊन ठेव म्हणजे आम्हांस पावेल; त्यानें तें श्रीफळ श्रीतुकोबारायापुढें ठेविलें. देहूस बीडचा देशपांडे ब्राह्मण येवून त्यानें आपलें वृत्त, मनीषा महाराजांस सांगितली म्हणून महिपतीबोवानीं म्हटलें आहे परंतु त्यानें काय सांगितलें हें महिपतबोवानीं दिलेलें नाहीं त्या बद्दल अनुमानच बांधलें पाहिजे व तें महाराजांच्या अभंगांवरूनच बांधले पाहिजे.

      त्या ब्राह्मणास मोक्ष हवा होता. त्यासाठीं विद्या शिकण्यास - विद्या शिकण्याचें वय गेलें होतें तरी - तो तयार होता. वेदशास्त्रें, पुराणें शिकावींत, पडतील तीं उपासपारणीं करण्यास, योगयाग करण्यास सांगतील ते विधिनिषेध सांभाळण्यास, उपास करून, अन्न सोडून शरीर कष्टविण्यास, तो तयार होता. व भवसागरांतून पार तरून जाण्याचा शास्त्रोक्त मार्ग तो शोधीत होता. या सर्व लक्षणांवरून असें दिसतें की त्यानें कोठेतरी नरदेहाचें सार्थक मोक्ष असें कथा कीर्तनांत ऐकलें असावें; व मोक्ष मिळविण्याचे कांहीं देहदंडणाचे उपासतापास करण्याचे मार्ग अमूक अमूक; ज्ञानाचे ग्रंथाध्ययन, वेदपठण हेहि मार्ग त्यास कोणी सांगितले असावेत. कदाचित् एखाद्या जगन्नाथ किंवा वामन पंडितासारख्यांच्या पांडित्यानें तो दिपला असावा. एखाद्या गाढया विद्वानाच्या गाडाभर पोथ्या व त्याचे ब्रह्ममायेचे वाद ऐकून तो स्तंभित झाला असावा; एखाद्या आत्मनिष्ठ जीवनमुक्त यांच्या योगबळाच्या गोष्टी ऐकून तो चकित झाला असावा. पण आपण काय मागतों तें समजो कां न समजो पण मला मोक्ष हवा असें तो म्हणत होता. तरीहि त्याचा त्यांत अंतस्थ हेतु कांहीं वेगळाच होता हें स्पष्ट आहे.

     तो ब्राह्मण आपले वृत्त महाराजांस सांगत होता त्यावेळीं त्याचे अंतरंग महाराजांचे लक्ष्यांत आलें नसेल असें नाहीं. पण कळून अगर न कळून पण तो मोक्षासाठीं लालचावलेला होता, श्रीपंढरीनाथाच्या आज्ञेनें श्रीज्ञानोबा रायांच्या अपुज्ञेनें आलेला, तेव्हां त्या धरणेकऱ्याची आर्तता पाहून महाराजांचें अंत:करण प्रवलें असल्यास नवल नाहीं. ते मोक्ष देण्यास (पुरुषार्थ सिध्दी चौथी । घेवोनि आपुले हातीं । निघाला भक्तीपंथी । जगा देत ) समर्थ होते. तेव्हां या धरणेकऱ्यानें धरणें कशासाठीं धरले आहे हें मनांत आणुन त्याचें सांकडें फेडण्यासाठीं प्रेममूर्ति श्रीपंढरीनाथानें प्रेम व ज्ञानमूर्ति श्रीज्ञानराजानें ज्ञान द्यावें म्हणून उभयतांचा धांवा त्यांनीं आरंभिला. हे धाव्याचे अभंग सात आहेत. या सात अभंगांतील पहिल्या दोंन अभंगांत श्रीपंढरीयास आळविलें आहे; पण अनंत रुपानीं व अनंत वेषांनीं, गुणांनीं मंडित असलेल्या श्रीहरीनें याप्रसंगी कोणत्यारूपानें-गुणानें-प्रगट व्हावें हेंहि खुबीनें सुचविलें आहे. पतितपावन, अनाथांचा कैवारी, उदार, कृपावंत, विश्वभंर, सत्ताधीश अशा अर्थपूर्ण विशेषणांनीं आळवून- 'या आळवण्याचे प्रयोजन काय हें तुला न सांगता समजलेंच असेल कीं :- या (आळी) धरणेंकऱ्यांचें समाधान करावयाचें आहे. तेव्हां मला अभयदान असावें (बाकी मी तरी काळजी कां करावी? ) तूंच दोन्हीं ठिकाणीं खेळतो आहेस. पण नारायणा, एवढें माझें करुणेचें वचन ऐकच या धरणेंकऱ्याचें समाधान करावयास उपदेश करावा-असा कांहीं माझा अधिकार नाहीं. मी कांहीं असा मोठा भक्त लागून गेलों नाहीं कीं मी कोणासाठीं पुण्य खर्च करीन; कारण तसें पुण्यहि माझें गाठीं नाहीं, पण एवढें खरें कीं माझ्या नांवाचा (भक्त म्हणून) डांगोरा झाला आहे खरा पण देवा, ही उपाधी तुम्हीं कांही वाढविलीत !हेंहि खरेंच तुमचे सत्तेशिवाय माझी  वाचा दुसरे कोण वदविणार तेव्हां मी या काळजीबद्दल तसा उदास आहे.

    लहरीवर लहरी याव्यात तसा प्रेमाच्या आळविण्याचा हा ओघ चार अभंग पुरे होऊन पांचव्या अभंगाच्या मध्यावर कांहीं तरी साक्ष पटली असावी, कारण पुढील चरणांत

'तुम्ही दिला धीर । तरी मन जालें स्थीर ॥'

अशा स्पष्ट शब्दांत मनस्थितींत-प्रियचितींत-झालेला फरक नमूद केला आहे. यापुढें कसें करूं, काय करूं ही वृत्ति नसून प्राप्त कर्म करण्याची तयारी स्पष्ट आहे 'मला आड करून आपण बोलणार हें तुम्ही, देवा तुम्ही आपल्या लेंकराचें कोड (कौतुक) करतहांत हेंहि मी जाणतों पण कौतुक झालें म्हणून काय झालें ? मी काय तुमच्याहून शहाणा लागून गेलों आहे कीं मी उपदेश करण्याचा अतिप्रसंग करावा. बाकी मी बोलणार ती वाणी तुमचीच आहे म्हणा (हें देवा तुमचें कौतुक झालें) पण श्रीज्ञानेश्वराजवळ काय वाण पडली कीं त्यानी धरणेरी येथें पाठवावा ! पण हें लिखित (पत्र) वाचून ही गोष्ट लक्ष्यांत आली. बाकी एवढें खरें धनी काय करावयाचें तें लक्ष्यांत आणून ती गोष्ट सेवकाकडून वदवितो. मी तराळ म्हणजे ओझें हलकें करणारा हमाल आहे, तेव्हां तुम्ही जें बोधरूपीं अन्न द्याल तें खावून मी राहीन असें म्हणून मी पायावर डोई ठेवितों. असा हा धांवा, नमन, मंगलाचरण, होऊन, पुढें अकरा अभंग उपदेशाचे आहेत. 

नको कांहीं पडों ग्रंथांचिये भरी ।

(1) ग्रंथांच्या भरीस पडूं नको, देहभाव ओस पाडून देवास देवासाठीं आळवावें हेंच व्रत लवकर कर. याहून इतर साधनें काळाच्या तोंडी घालतील व गर्भवास चुकणार नाहीं, कारण साधनें करून मिळवावयाचा मोक्ष ही गोष्ट उधारीची आहे. पण त्यांत पतन हें मात्र निश्चित तुला तर वृध्दपणा गांठू आला, तेव्हां नामासाठीं उडी घालणाऱ्या श्रीपांडुरंगाचें नाम घे; श्रीपांडुरंग पैलथडीस निश्चयानें पाववितो. 

नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें ।

(2) आणून हातीं गांठोडें द्यावें असा कांहीं देवाजवळ मोक्ष नाहीं. मन व इंद्रियें यावर जय मिळविणें म्हणजे मोक्ष, उपास, पारणीं अक्षरांची अटाअटी यांनीं सत्कर्म होत असेल, व त्यास, फळहि येत असेल, पण त्यासाठीं आदरानें संकल्पहि वाहावे लागतात. तेव्हां दु:खें सहज जाणार. स्वप्नांत धाव पडावा व मनुष्य विव्हळत उठावा तसें जग विव्हळत आहे. त्याबरोबर तूहि विव्हळत आहेस. (सर्व विश्वाचें) मूळ जो ईश्वर त्याचेजवळ फळ आहे, तेव्हां त्वरित त्यातच शरण जावें (इतर साधनांच्या भरीस न पडतां). 

त्यजिलें भेटवी आणुनी वासना।

(3) (व्रत करण्यास्तव हें सोड तें सोड असें केल्यानें) सोडलेल्या वस्तूंबद्दल वासना उत्पन्न होवून ती गोष्ट सारखी भेटत असते. (तेव्हां मी हा त्याग केला, तो त्याग केला) असलीं सोंगें जनांस दाखवून त्याचा काय उपयोग ? त्यापेक्षां आपण आपलें मन साक्षी करून, देवाची करूणा भाकून, त्यास आळवावें. त्यासाठीं कोठें दूर यावें जावें लागत नाहीं. कारण ज्यास आपला भाव कळावा तो अंतरी आहे व साक्षी आहे. तो कृपासिंधु असून तात्काळ भवबंध तोडतो. 

गोविंद गोविंद। मनां बैसलियां छंद।

(4) माणसाच्या मनाला गोविंद गोविंद हा एकच छंद होवून बसला कीं फुलपांखराच्या ध्यासानें आळी फुलपांखरू बनते तशी त्या माणसाची काया गोविंद होते. देव व तो यांतील भेद नाहींसा होतो मन आनंदाने व डोळे प्रेमानें पाझरतात. 

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥

(5) ज्यास ज्या गोष्टीचा ध्यास तसें त्याचें मन होतें. म्हणून सर्व बाजूस सारून-सर्वव्यापी पण विटेवर उभा, आकाशाहूनहि मोठा पण लहानाहूनहि लहान असा सम पाउलांचा पांडुरंग दृढ धरावा. 

पाहोनियां ग्रंथ करावें कीर्तन।

(6) वेदपठण्याचें पर्यवसान हरिगुणगाण्यांत व श्रीहरीचे कीर्तनांत झालें तर योग्य फळ आलें म्हणावयाचें, नाहींतर व्यर्थ बडबड तेव्हढी पदरीं उरावयाची. तप, तीर्थाटणें, यज्ञ, याग, दान, धर्म यांच्या शेवटीं हरिनामानें बुध्दि स्थिर झाली तर या कार्यापासून सिध्दि झाली म्हणावयाची. नाहींतर हे सर्व काबाड (होत) तेव्हां यांतील सार (हरिगुणगान, हरिनामकीर्तन) तेव्हढेंच घे. 

सुखें खावें अन्न। त्याचें करावें चिंतन।

(7) (अन्नत्याग वगैरे न करितां) श्रीहरीच्या चिंतनांत सुखानें अन्न खावें. म्हणजे ज्यानें अन्न दिलें त्यास तें पावतें व त्याचें फळ तेवढें आपणांस मिळतें. पांडुरंग विश्वाचा आधार आहे; त्याशिवाय रिता ठाव नाहीं असा भाव (अंतरांत) पसरूं दे. 

संकोचोनी काय झालासी लहान।

(8) मी-माझा संसार-असें घरकुल केल्यानें (जीवाचा संकोच होतो) व (या अज्ञानानें) अंधार पडतो. (तेव्हां श्रीहरि हृदयसंपुटी सांठविल्यानें) संसारास आंचव व ब्रह्मांडाचा ध्यास कर. उगाच उशीर करूं नकोस. लहान मुलास हवी असेल ती गोष्टी दाखवाव्यात तसा हा संसार हा श्रीहरीचा खेळ आहे. 

माझ्या बापें मज दिल्हेसे भातुकें।

(9) मी (माझा) बापा (श्रीज्ञानेश्वर) जवळ आळी करून त्यांचेपुढें कांहीं वचनें बोलतों, व त्यांनीं मला खाऊ दिला म्हणून कौतुकानें ही क्रीडा केली. हें जें तुझ्या वांटयास त्या क्रीडेचें फळ म्हणून ''उत्तम दान''आलें आहे तें घेवून आपल्या घरीं लवकर जा. श्रीज्ञानदेवांच्या नांवानें समुदाय गोळा कर, मी तेथें पायावर डोकें ठेवण्यास येतों. 

ज्ञानियांचा तू राजा महाराव।

(10) हें (उपदेश करण्याचें) थोरपण मला कां म्हणून! पायींची वाहाण पायीं बरी. ब्रह्मादिकांनीं आपली बरोबरीं करण्याची हाव धरावी, तेथें इतरांची काय कथा! आपण ज्ञान्यांचे राजे (नव्हे) महाराजे व आपले नांव ज्ञानदेव! आपली उपदेश करण्याची खोच मला कशी साधणार । तेव्हां मी आपल्या पायांवर डोकें ठेवतों. 

बोलिलीं उत्तरें । वेडीं वाकडीं लेंकरें ॥

(11) मी माझा अधिकार काय याचा विचार न करितां वेडींवाकडीं उत्तरें बोललों; महाराज आपण सिध्द आहांत, तरी हा अपराध क्षमा करा, व या सेवकास पायाजवळ ठेवा.

     या अकरा अभंगात जो उपदेश केला आहे-जो पंथ सांगितला आहेत्तो  'आधीं केलें । मग सांगितलें । 'या वचनाप्रमाणें किंवा 'बोले तैसा चाले या वचनाप्रमाणें पाहिलें तरी महाराजांनीं स्वत:आक्रमिलेला मार्ग सांगितला आहे.हें त्यांचें चरित्र डोळयांपुढें आणलें तर लक्षांत येण्याजोगें आहे. शिवाय पंडित, वाचक, ज्ञानी यांना दुर्लभ असें जें भक्तिप्रेमसुख तें लाभण्याचें साधन या मार्गांत - या सिध्दपंथांत-सांगितलें आहे. अठरा अध्याय गीता सांगितल्यावर 'सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।'हा जो श्रीकृष्णांनीं अर्जुंनास उपदेश केला; तेथूनच महाराजांनीं केलेल्या उपदेशास सुरवात आहे.

शरण देवासी जाये वेगीं

   कारण तूं ज्या फळाची (ज्ञानाची) इच्छा करून आहेस तें विश्वाचें मूळ जो श्रीहरी त्याचे जवळ आहे. तो कृपावंत आहे व भवबंध तात्काळ तोडतो अशी धरणेकऱ्यास कारणें सांगितलीं आहेत. 'आंधळा पांगुळ'म्हणून सहा अभंगांचें स्फुट प्रकरण आहे त्यांतहि सुरवात

'शरण आलो तुज आतां'

येथूनच-आहे.

'माझें मज आतां न देखे निरसतां ।'

ही स्थिति प्राप्त झाल्यावर 'जीवभाव तुज दिलां'व पुढें

'तारीं मारी करी भलतें दातारां'

असें होवून

'आतां तुझाचि ठेलों रे'

अशी अनन्यशरणागत स्थितीच प्राप्त होतें. नाटाचे अभंगांतहि

'माझा (बुध्दीचा) तंव खुंटला उपाय'

अशी प्रचीती आली

’म्हणोनि जालों शरणागत। तुझा दास मी अंकितं'

असें म्हटलें आहे.

शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना॥

भावें आलों लोटांगणीं । रुळे तुमचे चरणीं ॥

सांडियेली काया । वरी ओवाळुनि पाया ॥

तुका म्हणे शीर । ठेवियेलें पायांवर ॥

   अशारीतीनें एकदां श्रीहरीस शरण गेल्यावर आपण त्याचे सांभाळीं लागतो अशा स्थितीत जीवाची रहणी कशी असावी याचें विवेचन श्रीज्ञानेश्वरींत बाराव्या अध्यायांत खालीलप्रमाणें केलें आहे.

परि मने वाचा देहें । जैसा जो व्यापार होए ।

तो मी करितु आह । ऐसें न म्हण ॥

करणें कां न करणें । आधवें तोचि जाणें ।

विश्व चलिजत असे जेणें । ऐसें जाण ॥

उणेया पुरयाचें कांही । उरों नेवी आपुलां ठाई ।

संजात चि करुनि घेई । जीवीत हे ॥

माळिये जेउतें नेले । तेउतें निवांत चि गेले ।

पाणिया ऐसें जालें । नाठवें हें ॥

तें येऱ्हविं तऱ्ही सुभटा । हें उजवूं कां अव्हांटा ।

या व्यर्थ खटपटा । करित आहे ॥

तरि प्रवृत्ति आणि निवृत्ति । इयें वोझीं नेवो मती ।

अखंड चित्तवृत्ति । आठवी मी ॥

आणि जें जें कर्म निफजे । तें थोडें बहुत न म्हणिजे ।

निवांतचि अर्पिजे । माझां ठाई ॥ 117-124

    अशी ही आत्मसमर्पणाची पहिली पायरी व त्यांतील रहणी कशी याचें विवेचन श्रीज्ञानेश्वरीच्या आधारें झालें. ही रहणी चुटकीसरशी प्रत्येकांस साधेलच असें नाहीं. पण मी मीपणानें जोंवर जगांत वावरत होतों त्यावेळीं आपण आपल्यांत बुध्दीनें केलेला उपाय कुंठित झाला, तेव्हां श्रीहरीस शरण जावून त्याचे पायावर शीर ठेविलें कीं मग माझ्या कायिक-वाचिक-मानसिक उध्दाराचा तू काय उपाय करतोस तो पहातों, येवढेच जीवाचें काम उरतें.

असें माझें कोडें तुज हें सांकडे । मी असेन निवाडे सुखरुप ॥

बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥

   तेव्हां आत्मसमर्पण केल्यावर, त्या धरणेंकऱ्यास भवसिंधुचें भय वाटून तो जसा ग्रंथाध्ययन, वेद पठण, यज्ञ, याग, उपास, पारणी, तप, तीर्थ, दानें, व्रत याबद्दल विचारावयास गेला तसें, जीवानें तळमळण्याचें कारण उरत नाहीं; कारण आपला भार-सांकडें- श्रीहरीस या साधनाच्या उपयुक्ततेबद्दल महाराजांचें मत असें कीं :-

 माझे  मज आता न देखे निरसता । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला ।

नव्हतीमाझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।

 तारी मारी करी भलते दातारा । होऊन तुझा आता ठेलो रे ॥१॥

असो  माझे  कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।

 बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरी मायबाप ॥धृ॥

पापपुण्ये  श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।

विधिनिषिधें गोविली  पुराणे वेदांसी तो अहंभाव ।

काराचे मूळ व्यापिले माया । तेथेन धरे च भाव ।

म्हणऊन काबाड सांडिले उपसतां ।

केलें काय ? तर

धरिले तुझे चि नांव ॥२॥

तनमनइंद्रिये  ठेवूनि राहिलो । सर्व आशा तुझे पायी  ।

 तप तीर्थ दान करवू कवणा हाती। अधीन ते मज काई ।

आहिक्ये  परत्रे  चाड नाही सर्वथा । जन्म सदा मज देही  ।

मायामोहपाश करी विष तैसे । तुका म्हणे माझ्या ठायी ।।

   या महाराजांच्या वचनास आधार काय म्हणून जर कोणी विचारलें असतें तर त्यांनीं आपले मायबाप श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्याशिवाय दुसरीकडे कोठें बोट दाखविलें असतें ? श्रीज्ञानेश्वरींत स्पष्टच म्हटलें आहे कीं :-

'स्वर्ग नरक ह्या वाट चोरांचिया ।'

'योग याग येणें नोहे सिध्दी । वायांचि उपाधी दंभधर्म ।'

   योग याग करणाऱ्या दीक्षितांबद्दलचे उद्गार नमुनेदार आहेत.

आईके यया परि ते दीक्षित ।

यजुनि मातें याचित । स्वर्गभोग ॥

मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी तरे ।

आणि येवो लागती माघारे । मृत्यूलोका ॥

जैसा वेश्याभोगीं कवडा वेचे । मग दारहि चेपूं  नये तियेचे ।

ऐसें लाजिरवाणें दीक्षिताचें । काइ सांगों ॥ 9 : 328, 329

 

आतां आणीक ही संप्रदायें । परी मातें नेणति समवायें ।

जे अग्निइंद्रसूर्य सोमाये । म्हणौनि यजिति ॥

तें हि कीर मातें चि होये । कां जें हें आधवें मीचि आहे ।

परी ते भजती उजिरी नोहे । विषम पडे । 9 : 344, 345

  म्हणून करावें काय ? तर

तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥ 

  महाराजांच्या उपदेशाचें सारसर्वस्वहि :-

'देवाचिये चाडे आळवावें देवा । वोस देहभावा पाडोनिया ।'

हेंच आहे.

आळवणें व गाणें यांत फरक आहे. गाणें म्हटलें कीं ताल, राग, स्वर वगैरे सर्वशास्त्र आलें, म्हणून महारांजांनी प्रत्येकाची सोडवणुक करून ठेविली आहे कीं :

नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ती । विश्वासेसी प्रीती भावबळें ॥

    देव तुझ्या गोड बोलण्याला भुकेलेला आहे - सुस्वराला भुकेलेला नाहीं ; तेव्हां अंतर्यामींच्या ओलाव्याचें - जीवींच्या कळवळयाचें व आवडीच्या गोडीनें जय जय रामकृष्णहरि म्हण - म्हणजे आळव. भावार्थ असा नव्हे कीं आळवणें म्हणजे फुटक्या मडक्यासारखे बदसूर बेताल व ताशासारखे कर्कश, शिराताणून म्हटलेलेंच असावें, उलट आवडीच्या गोडीनें, अन्तर्यामींच्या कळवळयानें व श्रीहरी याबद्दलच्या पूज्यभावनेनें व कळवळीनें महाराजांच्या करुणापर किंवा नाटाच्या अभंगांच्या  आधारें जें बोल बोलले जाणार त्या बोलानें देव डोलेल, तेथें माणसाची काय मातब्बरी ! यांतच एखाद्याचा आवाज गोड असून त्यास थोडें फार ताल, राग अनुरूप लावतां येईल इतकें शास्त्र कळत असेल तर दुधांत साखर पडावी तशी.

गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगी ॥

हें तों देणें तुमचे देवा । घ्यावी अखंडीत सेवा ॥

  असें म्हणून स्वत:स धन्य समजावें.

    (1) श्रीपंढरीशा (2) अगा ये उदारा, या दोन्ही अभंगांत महाराजांनीं श्रीपंढरीशास आळविलें आहे. नाटाचे अभंगात पुष्कळसे अभंग आळविण्याचेच आहेत. फक्त महाराजांचेच घेतले तरी करुणापर अभंग सुमारें तीनशें आहेत. यांत कोठें तरी आपल्या विचाराचा, चित्तवृत्तीचा ठसा उमटलेला प्रत्येकास आढळेल; तो प्रत्येकाचा अभंग. शिवाय माणसाची रोज एकच वृत्ति असते असेंहि नाहीं, तेव्हां त्यास नित्य नवा रंग भोगता येईल. नाटाच्या व करुणापर अभंगांत मनाच्या विविधवृत्तींच्या लीला पहावयास सांपडतात; पण कमी जास्त कळवळयाचे हे जे निरनिराळे अभंग आहेत, ह्या नित्य नव्या पालटणाऱ्या चित्तवृत्तीच्या लहरी होत. या अभंगाचें नीट आकलन न झाल्यामुळें कांहीं पंडितमन्यांनीं हे अभंग मनाच्या अपक्वस्थितींतले, हे पापीवृत्तीच्या पश्चात्तापानें म्हटलेले असे या अभंगांवर शेरे मारले आहेत! पण या शहाण्या गाढवांची महाराजांच्या अभंगांशीं ओळख किती म्हणून पाहिलें तर नुसती तोंड ओळखी पुरती. महाराजांना कवित्वस्फूर्ति केव्हां झाली ही गोष्ट महाराजांनीं स्पष्ट सांगूनहि ज्या ऱ्हस्व बुध्दीच्या लोकांच्या डोक्यांत ती शिरली नाहीं; 'तुका म्हणे मज ऐसा भरंवसा । विंठ्ठल सरसा चालतसे ॥ रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।' या वचनाचा बोध त्यांच्या अन्तरांत काय प्रगटणार ? या ज्या निरनिराळया वृत्ती रोज नित्य नव्या असत त्या वरील दोन्ही वचनांची स्पष्ट प्रियप्रतीति होती. तरीहि श्रीहरी जितका निकट- जवळ -अंगसंगीं असावा असें वाटे; तो तसा वाटेना म्हणून निरनिराळया हांका घेवून मन कळवळे. येवढें हे चित्तवृत्तीचे निरनिराळें तरंग उठून व्हावयाचें काय, तर श्रीहरीच्या जवळिकेची प्रतीति वाढत जावयाची. चित्तवृत्तीच्या या अनंत तरंगांत आपल्या मनांत येणारा अमुक एक विचार त्यांत उमटलेला नाहीं  असें क्वचितच आढळेल. त्यांत प्रत्येक माणसास या हरघडी येणाऱ्या हांका त्यांत घेतलेल्या आहेत. घ्वेदांचें वीर्य तर गेलें नसेल ना ? नारायण वृध्द तर झाला नसेल ना ? प्रारब्ध, संचित आपल्या आड येत नसेल ना'देवास हजारो भक्तांचीं हजारों कामें त्यांतच हा श्रीकृष्ण छंदी फंदीत्तेव्हां आपण ''येवो येवो पांडुरंगे, प्रेमपान्हू, मज देगे 'म्हणून करुणेची चोंची पसरून जरी आळवीत असलों तरी त्याला गोपिकांचीं मुखें सोडवत नसलीं तर काय करावें, संतांचा शब्द मानतो तेव्हां त्यांसच म्हणावें कीं तुला जर बनत नसेल तर कोणातरी संतांच्या मला ताब्यांत दे म्हणजे मी तुला कंटाळा आणणार नाहीं. वर उध्दारास उशीर लागला तर त्याचेंच गीत करून विचारावें कीं 'कां बा उशीर कां केला? मला कोणाच्या हातीं दिलें ?'केव्हांहि मनुष्य कोणत्याहि गोष्टीचा आषुक झाला कीं आपले माषुकास 'करिसी कीं न करिसी माझा अंगिकार'असें म्हणणारच. मग त्यांत येणारीं विघ्नें आठवून, ही  तर गोष्ट आड येत नसेल ना, असे विचार मनांत येवून त्यासच आळवायचें कीं 'इतुलें करी देवा ऐके हें वचन । समूळ अभिमान जाळी माझा ।' म्हणून विनंति करावयाची. अशा रीतीनें माणसास जेवढया म्हणून वृत्ती येणें शक्य त्या सर्वांचा परिहार करुणापर अभंगांत दिलेला आढळेल. या सर्व आळविण्याचा उद्देश एवढाच कीं एकवार जीव हा आत्मसमर्पण करून अन्तर्मुख झाला कीं त्यास कोणीहि न सांगतां स्वत:चे दोष आरशांत पाहिल्यासारखे स्वच्छ दिसूं लागतात व मग जीव व शिव यांच्या प्रियसंगमाच्या आड या गोष्टी-देहभाव वोस पडला नाहीं-विरला नाहीं -तोंवर डोकें वर करतात असें वाटून त्यावर उपाय करण्यास तो जीव श्रीहरीस आळवूं लागतो. अशा वेळीं महाराजांचा उपदेश असा कीं -

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥

बंधनापासुनि उकलली गांठीं । देतां आली मिठी सावकाशें ॥

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधीं घर केलें रितें ॥

    बंधनें बंधनें म्हणून ज्या गोष्टींबद्दल सर्व शास्त्रें ओरड करून आहेत, व त्यांतून मुक्त होण्यास, योग, याग, उपास पारणीं, तीर्थक्षेत्र यांची आटाआटी सांगितलेली आहे, त्या बंधनांची गांठ उकलण्यास - म्हणजे त्यांतून अनायासें मुक्त होण्यास या सिध्दपंथातील उपाय काय  'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव.' मनानें विठ्ठलाची सोसानें हाव धरीली कीं मग तें मागें - देहभावानें वळून पाहत नाहीं. अशा रीतीनें बंधनांची गांठ आपसुखच ढिली होते; याची प्रतीति अशी कीं जितका-जसजसा -विठ्ठल या देहाचा ताबा घेईल तसतसे कामक्रोध जागा रिकामी करून चालूं लागतात. स्वत: अनुभवानें सिध्द झालेलें साधन येथें धरणेकऱ्यास सांगतांना षड्रिपु-प्रारब्ध-संचित-देहभाव यासर्वांवर एकच काट मारून त्या धरणेकऱ्यास ते म्हणाले कीं तूं दुसऱ्यांचें कांहीं तरी ऐकून त्यांच्या अनुकरणानें रडतो आहेस. वर सांगितल्याप्रमाणें इंद्रियांचा जय हा तुझ्या हातीं आहे. बरे निर्विषय असण्याचें तरी कारण काय ?  'बोलावा विठ्ठल' या अभंगात मनास तोच वेध लागला कीं, 'विषय तो त्यांचा जाला नारायण'अशी स्थिती झाली तर बिघडलें कोठें। अभंगांच्या आधारें  श्रीहरीस आळवीत आळवीत अंतर्मुख होऊन जीव आपल्या देहभाषाची ओझो-पूर्वसंस्कार-संकल्प-विकल्प ही सर्व आठवून त्यांस श्रीहरीपुढें ठेवून यांतून मला सोडूव-त्याची गांठ उकल-असें म्हणून ती क्रिया होईपर्यंत-बुध्दि त्या गोष्टीस अनुकूल होईपर्यंत जीवानें धीर सोडण्याचें कारण नाहीं, उतावीळ होण्याचेंहि कारण नाहीं.

सुखे खावें अन्न। त्याचें करावें चिंतन ॥

    अशा रहणीस जो काळ लागेल त्याची खंत बाळगण्याचें कारण नाहीं. कारण विश्वंभराचे सांभाळीं लागल्यावर आपणास तो सबाह्याभ्यंतरीं निर्मळ करीत आहे हें लक्ष्यांत आल्यावर आपण आपल्या बुध्दीनें उध्दारार्थ प्रयत्न करीत होतों तेव्हां आपले प्रयत्न निष्फळ होऊन आपलें आयुष्य वायां जात आहे असें वाटे, तेंच आतां उसाच्या एका पेऱ्यांतून दुसऱ्या पेऱ्याचा डेरा फुटतो तसा एकापुढे एकेक गोष्ट वाढून ठेविलेली पाहून श्रीहरीच्या लीलेचें तर कौतुक वाटतेंच पण श्रीहरीची आपणासाठीं एवढी काळजी, एवढी कळकळ पाहून स्वत:बद्दलहि धन्य वाटतें. अशा रीतीनें वृत्ति-विचार-निर्मळ होऊन अन्तर्यामीं ज्ञानाची -प्रेमाची-ज्योत प्रकाशमान होत जाते; अशा तऱ्हेनें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं विटेवर समपाउलांची खूण दिसूं लागते, त्यानें मनास आनंद होऊन तो डोळयांवाटें पाझर फुटून बाहेर पडतो; व या प्रेमाच्या पाझरानें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं नराचा नारायण होतो- 'विंठ्ठल  विठ्ठल झाला देह माझा ।'अशी ज्याची त्यासच प्रचीति येते. अशीही सिध्दपंथांतील किमयेची प्रक्रिया (1) गोविंद गोविंद (2) ज्याचें जया ध्यान, या दोन अभंगांत सांगितली आहे. पाहून यास ज्यास्त आधार तरी काय द्यावयाचा व विवेचन तरी काय करावयाचें ! या दोन्ही अभंगाचें येथें एकवारीच समपाउलें म्हणून दर्शन घ्यावें.

गोविंद गोविंद। मना बैसलिया छंद ॥1

मग गोविंद ते काया। भेद नाहीं देवा तया॥ धृ॥

आनंदलें मन। प्रेमें पाझरती लोचन॥ 2

तुका म्हणे आळी। जेषीं नुरेची वेगळी॥ 3

*****

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥ 1

म्हणउनी अवघें सारा। पांडुरंग दृढ धरा॥ धृ॥

समखुण त्याचे पाय। उभा व्यापक विटे ठाम॥ 2

मुका म्हणे नभा। सरसा अणूचाही गाभा॥3

     स्वत: महाराजांचें चरित्र हें या उपदेशाप्रमाणें झाल्याने इतिहासात नमुद आहे. उपदेशांतील शेवटचे तीन अभंग समारोपाचे आहेत. त्यांत श्री ज्ञानेश्वर महाराजांबद्दल महाराजांचे मनांत काय भावना होती याचें आणखी एक चित्र या तीन अभंगांत आहे. तसेंच एक गोष्ट येथें स्पष्ट सांगितली आहे ; ती ही कीं माझ्या बापें-ज्ञानदेवें-जें भातुकें म्हणजे खाऊ दिला तें हें उत्तमज्ञान-दान होय. दुसरी गोष्ट यांत अशी दिसते कीं उपदेश करण्याची महाराजांची ही पहिलीच वेळ असावी. हळूं हळूं गळती होऊन महाराजांचा घट बोध-प्रेम यांनीं पूर्ण भरल्यावर हा श्रीज्ञानोबारायांनीं महाराजांस प्रकट करण्यास उपाय योजला असावा. धाव्यांत व उपदेशाच्या समारोपांतहि उपदेश करणें हा अधिकार श्रीज्ञानराजांचा-आपण त्या पदवीस पाय तर लावीत नाहीं ना? असें कचरतांना जे महाराज आढळतात तेच पुढें स्पष्ट सांगूं लागले, 'मेघवृष्टीनें होतसे उपदेश'या उपदेशांत सर्वत्र हरिपाठाची छाया पसरली आहे असेंहि आढळून येईल.

    उपदेशाचे हे अकरा अभंग व श्रीफळ श्रीतुकोबारायांनीं त्या धरणेकऱ्यास दिलें व माझ्या बापें-मोठया प्रेमानें-जो हा खाऊ दिला आहे तो घेऊन तूं आपल्या ठिकाणीं जा म्हणून सांगितलें. देव देतो व कर्म नेतें. त्या बीडच्या ब्राह्मण देशपांडयानें बेचाळीस दिवस धरणें धरलें होतें. पण त्यास आलेलें फळ त्याच्या पूर्वग्रहाप्रमाणें नव्हतें म्हणून तो तें श्रीफळ व अभंग टाकून आळंदीस गेला. व पुन: तेथें धरणें धरून बसला. त्यावेळी झालेल्या वृत्तांताचें पत्र श्रीतुकोबारायांकडून आल्यावर धरणेकऱ्यास पिटाळून लाविलें असें महिपतीबोवांनीं वृत्त नमूद केलें आहे. श्रीतुकोबारायांनी लिहिलेलें पत्र व त्यास आलेलें पत्र 'आइकोनिया लिखित'- या दोन पत्रांचे काय झालें तीं एकमेकांकडे कशीं गेलीं हें वृत्त आजवर कोठें नमूद नाहीं. श्रीतुकोबांनीं श्रीज्ञानोबारायांस लिहिलेल्या पत्रांत हे अभंग कोणासाठीं निर्माण झाले आहेत अशी पृच्छा केली होती ती देशपांडे परत फिरल्यावर त्याच्याच सारखा वयाने जास्त, बुध्दीनें जड, असा कोंडभट ब्राह्मण तेथे आला व त्यानें विश्वासानें तें श्रीफळ व अभंग घेतले. अभंगाच्या नित्यपारायणानें तो पुढे व्युत्पन्न ब्राह्मण होऊन राजदरबारीं पोथ्यापुराणें सांगूं लागला. व श्रीफळ फोडून पाहतों तों त्यास गुप्तधन मिळालें व त्याचें जन्माचें दैन्य गेलें. असा त्याचा संसार व परमार्थ सांग झाल्याचें वृत्त महिपतीबोवांनीं लिहिले आहे. तेव्हां संसारयुक्त गढूळ मन व कोरा कागद यांत कोरा कागद श्रेष्ठ ठरला.

     श्रीज्ञानेश्वरांस लिहिलेल्या पत्रांत धरणेकऱ्यानें अविश्वासानें कथेचा अव्हेर केला म्हणून श्रीतुकोबांनीं गाऱ्हाणें सांगितलें आहे. तेव्हां सात अभंगाचा थांबा हा अकरा अभंगाचा उपदेश हें महाराजांनीं केलेलें कीर्तन आहे. थांब्याचे अभंगात पहिल्या दोन अभंगात आवाहन,पुढें आपल्या उद्दिष्ट कार्याचें निवेदन व पुन: नमन असे तीन भाग डोळयापुढें येतात. उपदेशाच्या पहिल्याच अभंगात उपदेशाचें सारसर्वस्व-पहिल्या प्रथम ठसठशीतपणें सांगून पुढें सात अभंगांत त्या उपदेशामृताचें तपशीलवार विवेचन करून पुढील तीन अभंगांत हें कीर्तन हें ज्ञानोबांनीं दिलेलें दानभातुकें -होय म्हणून सांगितलें आहे. महाराजांच्या कीर्तनाचा एक नमुना म्हणून या अठरा अभंगाकडे पहावें लागतें. भगीरथाच्या प्रयत्नानें वाहणारी गंगा ही वरून खाली वाहात येते. महाराजांनीं सांगितलेंल्या सिध्दपंथात हरिकथा हि खालून वर वाहणारी अमृताची धार आहे. असा हा योग याग विधी येणें जी सिध्दी प्राप्त होत नाहीं ती सिध्दी प्राप्त करून देणारा हा उलटपंथ - सिध्दपंथ होय - यांत एकदांच श्रीहरीस शरण जावयाचें व मग श्रीहरीवर भार घालून 'असे माझें कोडें तुज सांकडें। मी असे निवाडे सुखरूपें । असा जीव असावयाचा.  या सिध्दपंथाचे आचार्य व अध्वर्युं श्रीनामदेवराय व श्रीतुकोबाराय. दोघेहि श्रीहरीस शरण जावून 'देवाचिये चाडे देवास आळवीत' होते. असें आळवीतां आळवीतां त्या उभयतांच्या उध्दाराची काळजी, त्यांस ज्ञान व प्रेम कसें प्राप्त होईल याची काळजी श्रीहरीस लागली. तेव्हां नको नको म्हणत असतांनां श्रीनामदेवरायाकडून विसोबा खेचरांची सेवा करविली. तोच कार्यभाग श्रीतुकोबारायांच्या बाबतीत स्वप्नांतल्या दृष्टांतावर उरकून घेतला. येथें एक गोष्ट लक्ष्यांत घेण्याजोगी आहे. महाराजांनीं मला श्रीनामदेवरायांसारखा अनुभव कां नाहीं. म्हणून हट्ट धरला नाहीं उलट, 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणहि होय देव गुरु। म्हणून श्रीहरीस गीत गाइलें आहे. श्रीहरीस शरण जावून गोविंद गोविंद म्हणत मग गोविंद ते काया असा भोग भोगण्याचा- 'शरीरें साध्य केलें परब्रह्म हें अनुभविण्याच्या सिध्दपंथाचें यथाशक्ति यथामति विवेचन केलें आहे. हें विवेचन वगळून कोणीहि त्या अभंगाकडे वळेल त्यास तोच अनुभव येईल. असा अनुभव घेण्याची एकाद्यास जरी बुध्दि झाली तरी हा लेख लिहिण्याचें सार्थक झालें असें मी समजेन.

    (1) श्रीपंढरीशा (2) अगा ये उदारा, या दोन्ही अभंगांत महाराजांनीं श्रीपंढरीशास आळविलें आहे. नाटाचे अभंगात पुष्कळसे अभंग आळविण्याचेच आहेत. फक्त महाराजांचेच घेतले तरी करुणापर अभंग सुमारें तीनशें आहेत. यांत कोठें तरी आपल्या विचाराचा, चित्तवृत्तीचा ठसा उमटलेला प्रत्येकास आढळेल; तो प्रत्येकाचा अभंग. शिवाय माणसाची रोज एकच वृत्ति असते असेंहि नाहीं, तेव्हां त्यास नित्य नवा रंग भोगता येईल. नाटाच्या व करुणापर अभंगांत मनाच्या विविधवृत्तींच्या लीला पहावयास सांपडतात; पण कमी जास्त कळवळयाचे हे जे निरनिराळे अभंग आहेत, ह्या नित्य नव्या पालटणाऱ्या चित्तवृत्तीच्या लहरी होत. या अभंगाचें नीट आकलन न झाल्यामुळें कांहीं पंडितमन्यांनीं हे अभंग मनाच्या अपक्वस्थितींतले, हे पापीवृत्तीच्या पश्चात्तापानें म्हटलेले असे या अभंगांवर शेरे मारले आहेत! पण या शहाण्या गाढवांची महाराजांच्या अभंगांशीं ओळख किती म्हणून पाहिलें तर नुसती तोंड ओळखी पुरती. महाराजांना कवित्वस्फूर्ति केव्हां झाली ही गोष्ट महाराजांनीं स्पष्ट सांगूनहि ज्या ऱ्हस्व बुध्दीच्या लोकांच्या डोक्यांत ती शिरली नाहीं;

 'तुका म्हणे मज ऐसा भरंवसा । विंठ्ठल सरसा चालतसे ॥

रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।'

      या वचनाचा बोध त्यांच्या अन्तरांत काय प्रगटणार ? या ज्या निरनिराळया वृत्ती रोज नित्य नव्या असत त्या वरील दोन्ही वचनांची स्पष्ट प्रियप्रतीति होती. तरीहि श्रीहरी जितका निकट- जवळ -अंगसंगीं असावा असें वाटे; तो तसा वाटेना म्हणून निरनिराळया हांका घेवून मन कळवळे. येवढें हे चित्तवृत्तीचे निरनिराळें तरंग उठून व्हावयाचें काय, तर श्रीहरीच्या जवळिकेची प्रतीति वाढत जावयाची. चित्तवृत्तीच्या या अनंत तरंगांत आपल्या मनांत येणारा अमुक एक विचार त्यांत उमटलेला नाहीं  असें क्वचितच आढळेल. त्यांत प्रत्येक माणसास या हरघडी येणाऱ्या हांका त्यांत घेतलेल्या आहेत. घ्वेदांचें वीर्य तर गेलें नसेल ना ? नारायण वृध्द तर झाला नसेल ना ? प्रारब्ध, संचित आपल्या आड येत नसेल ना'देवास हजारो भक्तांचीं हजारों कामें त्यांतच हा श्रीकृष्ण छंदी फंदीत्तेव्हां आपण ''येवो येवो पांडुरंगे, प्रेमपान्हू, मज देगे म्हणून करुणेची चोंची पसरून जरी आळवीत असलों तरी त्याला गोपिकांचीं मुखें सोडवत नसलीं तर काय करावें, संतांचा शब्द मानतो तेव्हां त्यांसच म्हणावें कीं तुला जर बनत नसेल तर कोणातरी संतांच्या मला ताब्यांत दे म्हणजे मी तुला कंटाळा आणणार नाहीं. वर उध्दारास उशीर लागला तर त्याचेंच गीत करून विचारावें कीं 'कां बा उशीर कां केला? मला कोणाच्या हातीं दिलें ?'केव्हांहि मनुष्य कोणत्याहि गोष्टीचा आषुक झाला कीं आपले माषुकास 'करिसी कीं न करिसी माझा अंगिकार'असें म्हणणारच. मग त्यांत येणारीं विघ्नें आठवून, ही  तर गोष्ट आड येत नसेल ना, असे विचार मनांत येवून त्यासच आळवायचें कीं 'इतुलें करी देवा ऐके हें वचन । समूळ अभिमान जाळी माझा ।' म्हणून विनंति करावयाची. अशा रीतीनें माणसास जेवढया म्हणून वृत्ती येणें शक्य त्या सर्वांचा परिहार करुणापर अभंगांत दिलेला आढळेल. या सर्व आळविण्याचा उद्देश एवढाच कीं एकवार जीव हा आत्मसमर्पण करून अन्तर्मुख झाला कीं त्यास कोणीहि न सांगतां स्वत:चे दोष आरशांत पाहिल्यासारखे स्वच्छ दिसूं लागतात व मग जीव व शिव यांच्या प्रियसंगमाच्या आड या गोष्टी-देहभाव वोस पडला नाहीं-विरला नाहीं -तोंवर डोकें वर करतात असें वाटून त्यावर उपाय करण्यास तो जीव श्रीहरीस आळवूं लागतो. अशा वेळीं महाराजांचा उपदेश असा कीं -

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥

बंधनापासुनि उकलली गांठीं । देतां आली मिठी सावकाशें ॥

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधीं घर केलें रितें ॥

    बंधनें बंधनें म्हणून ज्या गोष्टींबद्दल सर्व शास्त्रें ओरड करून आहेत, व त्यांतून मुक्त होण्यास, योग, याग, उपास पारणीं, तीर्थक्षेत्र यांची आटाआटी सांगितलेली आहे, त्या बंधनांची गांठ उकलण्यास - म्हणजे त्यांतून अनायासें मुक्त होण्यास या सिध्दपंथातील उपाय काय  'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव.' मनानें विठ्ठलाची सोसानें हाव धरीली कीं मग तें मागें - देहभावानें वळून पाहत नाहीं. अशा रीतीनें बंधनांची गांठ आपसुखच ढिली होते; याची प्रतीति अशी कीं जितका-जसजसा -विठ्ठल या देहाचा ताबा घेईल तसतसे कामक्रोध जागा रिकामी करून चालूं लागतात. स्वत: अनुभवानें सिध्द झालेलें साधन येथें धरणेकऱ्यास सांगतांना षड्रिपु-प्रारब्ध-संचित-देहभाव यासर्वांवर एकच काट मारून त्या धरणेकऱ्यास ते म्हणाले कीं तूं दुसऱ्यांचें कांहीं तरी ऐकून त्यांच्या अनुकरणानें रडतो आहेस. वर सांगितल्याप्रमाणें इंद्रियांचा जय हा तुझ्या हातीं आहे. बरे निर्विषय असण्याचें तरी कारण काय ?  'बोलावा विठ्ठल' या अभंगात मनास तोच वेध लागला कीं, 'विषय तो त्यांचा जाला नारायण'अशी स्थिती झाली तर बिघडलें कोठें। अभंगांच्या आधारें  श्रीहरीस आळवीत आळवीत अंतर्मुख होऊन जीव आपल्या देहभाषाची ओझो-पूर्वसंस्कार-संकल्प-विकल्प ही सर्व आठवून त्यांस श्रीहरीपुढें ठेवून यांतून मला सोडूव-त्याची गांठ उकल-असें म्हणून ती क्रिया होईपर्यंत-बुध्दि त्या गोष्टीस अनुकूल होईपर्यंत जीवानें धीर सोडण्याचें कारण नाहीं, उतावीळ होण्याचेंहि कारण नाहीं.

सुखे खावें अन्न। त्याचें करावें चिंतन ॥

    अशा रहणीस जो काळ लागेल त्याची खंत बाळगण्याचें कारण नाहीं. कारण विश्वंभराचे सांभाळीं लागल्यावर आपणास तो सबाह्याभ्यंतरीं निर्मळ करीत आहे हें लक्ष्यांत आल्यावर आपण आपल्या बुध्दीनें उध्दारार्थ प्रयत्न करीत होतों तेव्हां आपले प्रयत्न निष्फळ होऊन आपलें आयुष्य वायां जात आहे असें वाटे, तेंच आतां उसाच्या एका पेऱ्यांतून दुसऱ्या पेऱ्याचा डेरा फुटतो तसा एकापुढे एकेक गोष्ट वाढून ठेविलेली पाहून श्रीहरीच्या लीलेचें तर कौतुक वाटतेंच पण श्रीहरीची आपणासाठीं एवढी काळजी, एवढी कळकळ पाहून स्वत:बद्दलहि धन्य वाटतें. अशा रीतीनें वृत्ति-विचार-निर्मळ होऊन अन्तर्यामीं ज्ञानाची -प्रेमाची-ज्योत प्रकाशमान होत जाते; अशा तऱ्हेनें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं विटेवर समपाउलांची खूण दिसूं लागते, त्यानें मनास आनंद होऊन तो डोळयांवाटें पाझर फुटून बाहेर पडतो; व या प्रेमाच्या पाझरानें दृष्टि निर्मळ होऊ लागली कीं नराचा नारायण होतो- 'विंठ्ठल  विठ्ठल झाला देह माझा ।'अशी ज्याची त्यासच प्रचीति येते. अशीही सिध्दपंथांतील किमयेची प्रक्रिया (1) गोविंद गोविंद (2) ज्याचें जया ध्यान, या दोन अभंगांत सांगितली आहे. पाहून यास ज्यास्त आधार तरी काय द्यावयाचा व विवेचन तरी काय करावयाचें ! या दोन्ही अभंगाचें येथें एकवारऱ्हींच समपाउलें म्हणून दर्शन घ्यावें.

गोविंद गोविंद। मना बैसलिया छंद ॥1

मग गोविंद ते काया। भेद नाहीं देवा तया॥ धृ॥

आनंदलें मन। प्रेमें पाझरती लोचन॥ 2

तुका म्हणे आळी। जेषीं नुरेची वेगळी॥ 3

*****

ज्याचें जया ध्यान। तेंचि होय त्याचें मन॥ 1

म्हणउनी अवघें सारा। पांडुरंग दृढ धरा॥ धृ॥

समखुण त्याचे पाय। उभा व्यापक विटे ठाम॥ 2

मुका म्हणे नभा। सरसा अणूचाही गाभा॥3

     स्वत: महाराजांचें चरित्र हें या उपदेशाप्रमाणें झाल्याने इतिहासात नमुद आहे. उपदेशांतील शेवटचे तीन अभंग समारोपाचे आहेत. त्यांत श्री ज्ञानेश्वर महाराजांबद्दल महाराजांचे मनांत काय भावना होती याचें आणखी एक चित्र या तीन अभंगांत आहे. तसेंच एक गोष्ट येथें स्पष्ट सांगितली आहे ; ती ही कीं माझ्या बापें-ज्ञानदेवें-जें भातुकें म्हणजे खाऊ दिला तें हें उत्तमज्ञान-दान होय. दुसरी गोष्ट यांत अशी दिसते कीं उपदेश करण्याची महाराजांची ही पहिलीच वेळ असावी. हळूं हळूं गळती होऊन महाराजांचा घट बोध-प्रेम यांनीं पूर्ण भरल्यावर हा श्रीज्ञानोबारायांनीं महाराजांस प्रकट करण्यास उपाय योजला असावा. धाव्यांत व उपदेशाच्या समारोपांतहि उपदेश करणें हा अधिकार श्रीज्ञानराजांचा-आपण त्या पदवीस पाय तर लावीत नाहीं ना? असें कचरतांना जे महाराज आढळतात तेच पुढें स्पष्ट सांगूं लागले, 'मेघवृष्टीनें थेंबें होतसे उपदेश'या उपदेशांत सर्वत्र हरिपाठाची छाया पसरली आहे असेंहि आढळून येईल.

    उपदेशाचे हे अकरा अभंग व श्रीफळ श्रीतुकोबारायांनीं त्या धरणेकऱ्यास दिलें व माझ्या बापें-मोठया प्रेमानें-जो हा खाऊ दिला आहे तो घेऊन तूं आपल्या ठिकाणीं जा म्हणून सांगितलें. देव देतो व कर्म नेतें. त्या बीडच्या ब्राह्मण देशपांडयानें बेचाळीस दिवस धरणें धरलें होतें. पण त्यास आलेलें फळ त्याच्या पूर्वग्रहाप्रमाणें नव्हतें म्हणून तो तें श्रीफळ व अभंग टाकून आळंदीस गेला. व पुन: तेथें धरणें धरून बसला. त्यावेळी झालेल्या वृत्तांताचें पत्र श्रीतुकोबारायांकडून आल्यावर धरणेकऱ्यास पिटाळून लाविलें असें महिपतीबोवांनीं वृत्त नमूद केलें आहे. श्रीतुकोबारायांनी लिहिलेलें पत्र व त्यास आलेलें पत्र 'आइकोनिया लिखित'- या दोन पत्रांचे काय झालें तीं एकमेकांकडे कशीं गेलीं हें वृत्त आजवर कोठें नमूद नाहीं. श्रीतुकोबांनीं श्रीज्ञानोबारायांस लिहिलेल्या पत्रांत हे अभंग कोणासाठीं निर्माण झाले आहेत अशी पृच्छा केली होती ती देशपांडे परत फिरल्यावर त्याच्याच सारखा वयाने जास्त, बुध्दीनें जड, असा कोंडभट ब्राह्मण तेथे आला व त्यानें विश्वासानें तें श्रीफळ व अभंग घेतले. अभंगाच्या नित्यपारायणानें तो पुढे व्युत्पन्न ब्राह्मण होऊन राजदरबारीं पोथ्यापुराणें सांगूं लागला. व श्रीफळ फोडून पाहतों तों त्यास गुप्तधन मिळालें व त्याचें जन्माचें दैन्य गेलें. असा त्याचा संसार व परमार्थ सांग झाल्याचें वृत्त महिपतीबोवांनीं लिहिले आहे. तेव्हां संसारयुक्त गढूळ मन व कोरा कागद यांत कोरा कागद श्रेष्ठ ठरला.

    श्रीज्ञानेश्वरांस लिहिलेल्या पत्रांत धरणेकऱ्यानें अविश्वासानें कथेचा अव्हेर केला म्हणून श्रीतुकोबांनीं गाऱ्हाणें सांगितलें आहे. तेव्हां सात अभंगाचा थांबा हा अकरा अभंगाचा उपदेश हें महाराजांनीं केलेलें कीर्तन आहे. थांब्याचे अभंगात पहिल्या दोन अभंगात आवाहन,पुढें आपल्या उद्दिष्ट कार्याचें निवेदन व पुन: नमन असे तीन भाग डोळयापुढें येतात. उपदेशाच्या पहिल्याच अभंगात उपदेशाचें सारसर्वस्व-पहिल्या प्रथम ठसठशीतपणें सांगून पुढें सात अभंगांत त्या उपदेशामृताचें तपशीलवार विवेचन करून पुढील तीन अभंगांत हें कीर्तन हें ज्ञानोबांनीं दिलेलें दानभातुकें -होय म्हणून सांगितलें आहे. महाराजांच्या कीर्तनाचा एक नमुना म्हणून या अठरा अभंगाकडे पहावें लागतें. भगीरथाच्या प्रयत्नानें वाहणारी गंगा ही वरून खाली वाहात येते. महाराजांनीं सांगितलेंल्या सिध्दपंथात हरिकथा हि खालून वर वाहणारी अमृताची धार आहे. असा हा योग याग विधी येणें जी सिध्दी प्राप्त होत नाहीं ती सिध्दी प्राप्त करून देणारा हा उलटपंथ - सिध्दपंथ होय - यांत एकदांच श्रीहरीस शरण जावयाचें व मग श्रीहरीवर भार घालून 'असे माझें कोडें तुज सांकडें। मी असे निवाडे सुखरूपें । असा जीव असावयाचा.  या सिध्दपंथाचे आचार्य व अध्वर्युं श्रीनामदेवराय व श्रीतुकोबाराय. दोघेहि श्रीहरीस शरण जावून 'देवाचिये चाडे देवास आळवीत होते. असें आळवीतां आळवीतां त्या उभयतांच्या उध्दाराची काळजी, त्यांस ज्ञान व प्रेम कसें प्राप्त होईल याची काळजी श्रीहरीस लागली. तेव्हां नको नको म्हणत असतांनां श्रीनामदेवरायाकडून विसोबा खेचरांची सेवा करविली. तोच कार्यभाग श्रीतुकोबारायांच्या बाबतीत स्वप्नांतल्या दृष्टांतावर उरकून घेतला. येथें एक गोष्ट लक्ष्यांत घेण्याजोगी आहे. महाराजांनीं मला श्रीनामदेवरायांसारखा अनुभव कां नाहीं. म्हणून हट्ट धरला नाहीं उलट, 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणहि होय देव गुरु। म्हणून श्रीहरीस गीत गाइलें आहे. श्रीहरीस शरण जावून गोविंद गोविंद म्हणत मग गोविंद ते काया असा भोग भोगण्याचा- 'शरीरें साध्य केलें परब्रह्म  हें अनुभविण्याच्या सिध्दपंथाचें यथाशक्ति यथामति विवेचन केलें आहे. हें विवेचन वगळून कोणीहि त्या अभंगाकडे वळेल त्यास तोच अनुभव येईल. असा अनुभव घेण्याची एकाद्यास जरी बुध्दि झाली तरी हा लेख लिहिण्याचें सार्थक झालें असें मी समजेन.

सौजन्य : प्रेमबोध - मार्च,१९४३. ( फाल्गुन,१८६४)