Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

मानवी जीवनाचा महाभाष्यकार  

सदानंद मोरे

मानवी जीवन ही एक अत्यंत गुंतागुंतीची व बहुजिनसी अशी बाब आहे. इतिहासाच्या प्रारंभिक अवस्थेत ते सरळ साधे असेलही; परंतु ज्ञान आणि विज्ञान यांच्या प्रगती बरोबर ते व्यापक, समृध्द आणि व्यामिश्र होत गेले. या जीवनात नाना नाना प्रकारच्या व्यवहारांचा अंतर्भाव होतो. हे   व्यवहार  कधी  एकमेकांना  पूरक  ठरतात  तर  कधी

 

परस्परविरोधी होतात. उदाहरण द्यायचे झाले, तर स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक आणि राजकीय सुधारणा या जीवन व्यवहारांच्या परस्परसंबंधांबद्दल झालेल्या वादाचे देता येईल.  आगरकरांना ते पूरक वाटायचे, तर टिळकांना विरोधी वाटायचे. आज्या काळापुरते बोलायचे झाले, तर धर्म आणि राजकारणाच्या संबंधांच्या मुद्याकडे बोट दाखविता येईल. 'धर्मराजकारण समवेत चालती...,' असे महाराष्ट्राचे वर्णन मराठी कवींनी केलेले आहेच; पण मग सेक्युलॅरिझमच्या मुद्याचे काय, हा प्रश्नही उपस्थित होतोच !

          मानवी जीवनाच्या वेगवेगळया क्षेत्रांचे तर सोडाच; पण एकाच व्यक्तिच्या जीवनाचे आपण खासगी आणि सार्वजनिक, असे भाग करीत असतो. कधी त्या दोन्हींत सुसंगती आढळते, कधी नाही. आढळली नाही तर तशा व्यक्तीला आपण दांभिक म्हणतो.

          जीवन, व्यवहार आणि त्यांचे परस्परसंबध या विषयाला आधुनिक काळात एक वेगळाच आयाम प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे विशेषीकरणाचा, स्पेशलायझेशनचा. एकेक क्षेत्राच्याच गरजा इतक्या वाढल्या आहेत, टोकदार झाल्या आहेत, की एका क्षेत्रातील माणसाला दुसऱ्या क्षेत्रात काय चालले आहे, याची दखल घेणेही अवघड होत चालले आहे.

          अशा काळी परिपूर्ण जीवनाची, अष्टपैलू व्यक्तित्वाची आणि समग्रतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. तत्त्वज्ञान, राजकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांत मुक्त संचार करणारा श्रीकृष्ण; चित्रे काढणारा, वैज्ञानिक शोध लावणारा प्रबोधनकालीन लिओनार्दो द व्हिन्सी; रवींद्रनाथ टागोर आता परत होऊ शकतील का, हा अडचणीत टाकणाराच प्रश्न आहे. आजच्या काळात अष्टपैलुत्त्वाची व्याख्या एका क्षेत्रातील विशेष प्राविण्य आणि अन्य क्षेत्रांत साधारण संचार, अशीच करावी लागते.

            परंतु मुद्दा एखाद्या व्यक्तीने जीवनाचे अनेक प्रांत आत्मसात करणे, हा नाही. जीवनाचे वेगवेगळे तुकडे हाताळता येण्याचा किंवा न येण्याचा प्रश्न नाही. जीवनाचे समग्रतेचे भान असणे, वेगवेगळी क्षेत्रे व व्यवहार एका जीवनसूत्रात गोवता येणे, हा खरा मुद्दा आहे. त्यासाठी जीवनाचे भाष्यकार होता आले पाहिजे. हे तत्त्वज्ञाचे, विचारवंतांचे काम आहे. उदाहरणार्थ चांगल्या कलावंताला कला आणि जीवन यांच्या संबंधाचे योग्य आकलन असेलच, असे नाही. त्यासाठी सम्यक जीवनभान असायला हवे. अशा भाष्यकाराला वाट पुसत इतरांचे जीवन सफल सुरळीत होऊ शकते.

            संत तुकाराम महाराज हे मानवी जीवनाचे एक श्रेष्ठ भाष्यकार होते. संत हे जीवनविन्मुख होते, असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. या मंडळींचे मानवी जीवनाचे आकलनच संकुचित व एकदेशी असते. त्यामुळे त्यांचा फारसा विचार करण्याचे कारण नाही. तुकोबा जीवनाचे भाष्यकार होते; परंतु त्यांचे भाष्य हे पुस्तकी पंडिताने केलेले भाष्य नव्हते. किंबहुना, तत्कालीन विशिष्ट समाजरचनेमुळे ते पुस्तकी पंडित होऊ शकलेही नसते. अर्थात ही एक प्रकारची इष्टापत्ती म्हणायला हवी.

            तुकोबांचा जन्म ज्या कुळात झाला ते पारंपरिक विठ्ठलभक्त वारकऱ्याचे कूळ होते. तुकोबांच्या मालकीची शेती होती, शिवाय  विठ्ठलदेवाला इनाम असलेल्या शेतीची व्यवस्थाही ते पाहायचे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाटयाला येणारे सर्व अनुभव त्यांनी घेतले होते. 'मोडी पुसे पिटी ढोरे' असा बैलबारदानाचा अनुभव त्यांच्या गाठी होता. प्रत्यक्ष मशागतीचे बारकावेही त्यांना माहीत होते.

           तुकोबांच्या घराण्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे गावाच्या  महाजनकीचे वतन त्यांच्याकडे होते. ते सावकार व व्यापारी घराणे होते. गावच्या बाजारपेठेची व्यवस्था व देखरेख त्यांच्याकडे असे. व्यापारउदिमाच्या व्यवहारात काही कज्जे खटले झाले, तर त्यांचा निवाडा करण्याचे काम ते करीत. शेती, सावकारी, व्यापार व महाजनकी यांच्यामुळे त्यांचे घराणे परिसरातील एक सुखी, संपन्न व प्रतिष्ठित घराणे समजले जाई. विठ्ठलभक्तिमुळे धार्मिक नेतृत्वही त्यांच्याकडे अनायासे आले होतेच.

             आयुष्याच्या पूर्वार्धात तुकोबांनी हा सर्व अनुभव घेतला. उत्तरार्धात महाराष्ट्रातील भयानक दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीला त्यांनी तोंड दिले. या आपत्तीत त्यांना स्वत:चे आप्त, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचा नाश होताना पाहावा लागला. मानवजीवनातील अनिश्चिततेचा प्रत्यय आला.

              थोडक्यात सांगायचे, म्हणजे त्यांचे अनुभवविश्व हे विस्तीर्ण आणि समृध्द होते. पुढेही ते आणखी विस्तारत गेले. त्यांनी ईश्वरानुभूती मिळवली. कवित्व करताना निर्मितीप्रक्रिया अनुभवली. एका बाजूला या कवित्वाची वाढती लोकप्रियता, तर दुसऱ्या बाजूला त्याला प्रखर विरोध त्यांनी अनुभवला. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामधील सर्वांत लोकप्रिय; परंतु वादग्रस्त व्यक्ति म्हणजे तुकोबा होती. मावळ परिसरात परकीय सत्तेला ग्रहण लागले असून, शिवाजीचा उदय होत आहेहेही त्यांना पाहायला मिळाले.

               या सर्व अनुभवप्रक्रियेला तुकोबा जाणीवपूर्वक सामोरे जात होते. त्यावर विचारचिंतन करीत होते.

विचारावाचोन।  न पावेजे समाधान।

स्वत:चे समाधान होईपर्यंत, खात्री पटेपर्यंत विचार करीत होते.

विचारिले आधी आपुल्या मनासी,

तुका म्हणे करू मनासी संवाद

अशी त्यांची आत्मसंवादाची प्रक्रिया सातत्याने सुरू होती.

सत्य-असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता'

अशी त्यांची प्रामाण्यपध्दती होती. वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मतृष्टी ही चार धर्मप्रमाणे परंपरेने सांगितली आहेत. त्यातील आत्मतृष्टी प्रमाण जवळ जवळ लुप्तप्राय झाले होते. तुकोबांनी त्याचाच अवलंब केला. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन, अशा दुहेरी सामग्रीमुळे तुकोबा जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. आपले अनुभव व चिंतन त्यांनी अभंगांमधून अभिव्यक्त केले. ते प्रतिभावंत कवी तर होतेच. आता एवढी तयारी असल्यावर त्यांची वचने विलक्षण प्रभावी ठरली नसती तरच नवल. गेली साडेतीन शतके तुकोबांनी दिलेली सामग्री मराठी मनाला पुरून उरली आहे.

           तुकोबांनी वेगवेगळया जीवन व्यवहारांचे जे अनुभव घेतले ते त्यांच्या वचनांमधून कधी प्रत्यक्ष, तर कधी दृष्टान्तांच्या स्वरूपात प्रगट झाले आहेत. त्यांच्या अभंगांमधून कितीतरी व्यवहारसूत्रे आढळून येतात. त्यांना मराठी भाषेत म्हणींचा, वाक्यप्रचारांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यांचा उपयोग करणाऱ्यांना कित्येकदा ही वचने तुकोबांची आहेत, याचा पत्ताही नसतो; इतकी ती मराठी भाषेशी एकरूप झालेली आहेत. ती वचने म्हणजे नुसतेच लिहिणे बोलणे नटवण्यासाठी वापरलेले शोभादायक अलंकार राहिले नाहीत. ती भाषेतून थेट मराठी माणसाच्या विचारपध्दतीत व जीवनशैलीत उतरली आहेत. एखाद्या संकटाला सामोरे जाताना मराठी माणूस 'आलिया भोगासी असावे सादर',  'ठेविले अनंते तैसेचि राहावे' , 'आले देवाजीच्या मना' असे उद्गार सहजगत्या काढतो, तो यामुळेच. ही मनाची एक चौकटच म्हणायला हवी. तुकोबांनी घडवलेली. केवळ भाषिक अभिव्यक्ती नव्हे, तर ती जणू वैचारिक वर्गवारीच होऊन बसली आहे.

          रोजच्या सर्वसाधारण विविध जीवन व्यवहारांत तुकोबांचे सूत्ररूपाने मार्गदर्शन कसे होत असते, ते पाहा. वेगवेगळया व्यवहारांची ब्रीदवाक्ये, घोषवाक्ये, नीतितत्त्वे तुकोबा पुरवतात.उदाहरणादाखल पाहा. 'एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ' हे सहकार क्षेत्रातले, 'बल बुध्दी वेचुनिया शक्ती ।उदक चालवावे युक्ती' हे जलनियोजनाचे, 'शुध्द बीजापोटी। फळे  रसाळ गोमटी' हे बी - बियाणे निवडण्याबद्दल, 'असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे' प्रयत्नाची महती पटवून देते.

           क्षणभंगुर हा येथील पसारा, नाशिवंत देह जाणारे सकळ । आयुष्य खातो काळ सावधान, चालले सोबती काय मानिली निश्चिती, अशी वचने अटळ भवितव्यतेची आठवण करून देऊन सतत सावध ठेवतात. 'दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दलण कंटकांचे', 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा'  'तुका म्हणे तोचि संत । सोशी जगाचे आघात', 'भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु' या सुत्ररूप व्याख्या मनात कायमच्या ठसून राहतात,  'नाही निर्मळ जीवन । काय करील साबण',  'गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले', 'तुका म्हणे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजारो', 'तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधमे' अशा स्पष्टोक्ती प्रतिपक्षावर तुटून पडताना उपयोगी पडतात, मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया, 'तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे ', 'धनवंता लागी । सर्वमान्यता आहे जगी', 'पोट लागले पाठीशी । हिंडविते देशोदेशी ' या प्रकारची वचने जीवनामधील कठोर वास्तविकतेची जाणीव करून देतात. नरदेह दुर्लभ जाणा , आयुष्याचिया साधने । सच्चिदानंद पदवी घेणे यामुळे आपणाला मनुष्यजन्माची किंमत कळते. कुळी कन्यापुत्र होती जे सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा हा एक प्रकार, तर  'तुका म्हणे त्यांनी । केली मनुष्यपणा हानी ' हा दुसरा नमुना याबद्दल  'मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचा धोंडा येऊनी ठाके' हीच प्रतिक्रिया योग्य.  'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ' हे एकूणच मानवी जीवनाचे नियमन करणारे अर्थनीतीचे सूत्र. 'तुका म्हणे जिणे । शर्तिविण लाजिरवाणे 'हा  मिळमिळीत, ध्येयशून्य जगण्याचा धिक्कार.  'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे' हा आत्मविश्वासाचा प्रत्यय. 'भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा' यातील दिलदारपणा आणि प्रतिकारप्रवणता अशा तुकोबांच्या अनेक गोष्टी मराठी मनाने आत्मसात केलेल्या आहेत. जीवन ही एक समभूमीच आहे. तुकोबांच्या वाटयाला तर     'रात्रंदिवस युध्दाचा प्रसंग' आलेला. त्यामुळे जीवन संघर्षात तुकोबांकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. पाइकाचे अभंग लिहून त्यांनी तत्कालीन मावळयांना राष्ट्रभक्तीची सूत्रे आणि गनिमी काव्याच्या खुब्या शिकवल्या आणि छत्रपतींचे स्वराज्यसाधनेचे काम सोपे केले.  'तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेणे अवकळा अभये मोल ', असे मरणाच्या भीतीपेक्षा मरणाच्या प्रकारातील प्रतिष्ठा जपण्याचे महत्त्व सांगितले,  'शूर मिरवे रणांगणी । मरणीच संतोष  'असे नमूद करून 'शूरा साजती हत्यारे । गांढया हासतील पोरे ' म्हणत शेंदाड शिपायांची थट्टाही केली.

      तुकोबांच्या निर्वाणासंबंधी अनेक वादप्रवाह आहेत. त्यांची चर्चा येथे प्रस्तृत नाही; पण मृत्यूवर मात केल्याची ग्वाही त्यांच्या अभंगांमधून अनेक ठिकाणी मिळते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अंत्यंसंस्काराच्या वेळी हे अभंग म्हणण्याची प्रथा आहे. 'आम्ही जातो आमच्या गावा । आमुचा रामराम घ्यावा',  'मरण माझे मरोनी गेले । मज केले अमर',   'आपुले मरण पाहिले म्या डोळा । तो झाला सोहळा अनुपम्य', मरणाहाती सुटली काया इत्यादी. या प्रसंगीचे अभंग अत्यंत हृद्य; परंतु तरीही या दु:खद प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन त्याच्यावर मात करायला शिकवणारे आहेत. अमंगलाचे रूपांतर मंगलात करणारे आहेत.

       मनुष्य आणि त्याच्या भोवतालची सृष्टी यांच्या नात्याविषयी तुकोबा अत्यंत जागरूक व संवेदनशील होते. त्यांचा  'बुडताहे जन न देखवे डोळा' हा माणसांबद्दलचा कळवळा सर्वज्ञात आहेच; परंतु मानवतेवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशीही त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला होता. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' किंवा  'झाडेझुडे जीव सोयरे पाषाणे' हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येयवाक्ये ठरावीत, असे आहेत.

         तुकोबांचा सर्वसाधारण मराठी माणसांच्या जीवनव्यवहारांशी काय संबंध आहे, याची थोडी चर्चा केल्यावर कदाचित असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, की सर्वसामान्य याचा अर्थच मुळी सरासरी बुध्दिमत्तेचा व कर्तृत्वाचा माणूस. त्याला असा कोणाचा तरी आधार लागणारच. जे असाधारण आहेत, प्रतिभावंत आहेत, स्वयंप्रज्ञ आहेत त्यांना तुकोबांची काय मातब्बरी?

         या बाबतची वस्तुस्थिती अशी आहे, की महाराष्ट्रातल्या अनेक प्रज्ञावंतांना, प्रतिभावंतांना आणि कार्यवंतांना तुकोबांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. लेखकांना शब्द आणि शीर्षके देण्यात तुकोबा सतत अग्रेसर राहिलेले आहेत; परंतु भाषिक पातळी ओलांडून त्यांनी विचार आणि स्फूर्तीही पुरविलेली आहे. अभंग या छंदावर त्यांची एवढी पकड होती आणि तो त्यांनी इतक्या परिपूर्ण अवस्थेला नेला, की 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची ' असे समीकरणच रूढ झाले व त्यानंतर हा छंद हाताळणाऱ्यांना तुकोबांना मार्गदर्शक व आदर्श मानणे जणू अनिवार्यच ठरले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'अखंड ' या नावाखाली जे अभंग लिहिले, ते तुकोबांचे अभंग समोर ठेवूनच; पण तुकोबांचा फुले यांच्यावरील प्रभाव केवळ छंदशास्त्रीय वा भाषिक नव्हता. फुले यांच्या विचारांवर व जीवनशैलीवरही तुकोबांचा प्रभाव होता. तुकोबांकडे ते 'शेतकरी संत ' म्हणून पाहत. फुले यांचे तरुण सहकारी आणि अनुयायी कृष्णराव भालेकर हे तर पारंपरिक घरंदाज वारकरी होते. त्यांनी फुले यांचे तुकारामप्रेरित अभंगलेखन आणखी पुढे नेले. त्यात वैविध्य आणले. विशेष म्हणजे भालेकर आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी हे सामाजिक आशयाचे अभंग वारकरी पध्दतीने दिंडी काढून टाळमृदंगाच्या साथीवर गात असत. भालेकर पुढे पत्रकार झाले. अर्थात पत्रकारितेमागचा त्यांचा (व तेव्हाच्या बहुतेक पत्रकारांचा) उद्देश जनजागृतीचा होता.उपदेशकाचा होता.ते त्यांचे जीवनध्येयच होते. तुकोबाप्रमाणे आपण उपदेशकाचे कार्य पत्करले आहे, असे ते सांगत. सत्यशोधकांनी व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अस्पृश्यांनी सुरू केलेल्या समाजजागृतीच्या कीर्तनामधून भर तुकोबांच्या अभंगांवरच असायचा. धर्मशास्त्राच्या पोथ्यापुराणांपेक्षा सदसद्विवेक बुध्दिला प्राधान्य द्यावे, हे सांगताना  'सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता 'या तुकोक्तीचा ते विशेष उपयोग करीत.

          तुकोबांनी केवळ बहुजनांनाच साद घातली नाही, तर एकोणिसाव्या शतकामधील उच्चशिक्षित अभिजनांच्या आचारविचारांवरही तुकोबांचा मोठया प्रमाणावर प्रभाव पडला. प्रार्थना समाजाचे धुरीण  न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक, सदाशिवराव केळकर, न्यायमूर्ती चिंतामण नारायण भट, सर चंदावरकर यांचा येथे उल्लेख करता येईल. डॉ. भांडारकर तुकोबांना मानवजातीचे मार्गदर्शक मानीत. त्यांच्या मते तुकोबांचा धर्म हा बुध्द, येशू व महंमद यांच्या धर्माप्रमाणे विश्वव्यापक व्हायच्या पात्रतेचा आहे व तसा व्हायलाही हवा होता; परंतु त्या तिघांच्या धर्माला राजाश्रय लाभून मोठी प्रचारयंत्रणा उपलब्ध झाली, तसे तुकोबांच्या संदर्भात न घडल्याने त्यांचा धर्म मागे पडला. या धर्माला विश्वव्यापक करण्याचे प्रार्थना समाजाचे स्वप्न होते.

           मात्र रानडे, भांडारकर 'तुकोबांचा उपदेश केवळ ईश्वरप्राप्तीचे साधन सांगणारा आहे एवढाच. म्हणजे पारमार्थिक आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. असे मानत नव्हते. तो एकूण मानवी जीवनाविषयी आहे. परमार्थाबरोबरच प्रपंचाविषयी, लौकिक व्यवहारांविषयीही आहे, ' असा त्यांचा दावा होता. रोजच्या जीवनात आपणाला तुकोबांकडून मार्गदर्शन होते, अशी त्यांची धारणा होती. न्यायमूर्ती रानडे तर न्यायनिवाडे लिहिताना अडले, की तुकोबांचे अभंग म्हणत. त्यातून त्यांना स्फूर्ती  मिळे, मार्ग दिसे. केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रांमधील जीवनमूल्ये त्यांनी तुकोबांकडून घेतली. एखाद्या विशिष्ट पेचप्रसंगात निर्णय घ्यायची वेळ आली, तर तुकोबा अशा प्रसंगी कसे वागले असते, याचा विचार करून ते निर्णय घेत व कृती करीत. प्रार्थना आणि ब्राह्मो समाजांमुळे तुकोबांचे विचार बंगाल आणि गुजरात या प्रांतात पोचले व तेथेही त्यांचा प्रभाव पडला.

             सत्यशोधक समाजाचे आणि प्रार्थना समाजाचे धोरण स्थूलमानाने राजकीय क्षेत्रात मवाळ म्हणता येईल असे होते. प्रार्थना समाजातील मंडळी सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही नेमस्त होती. सत्यसमाज सामाजिक क्षेत्रात विशेषत: जातिभेदाच्या क्षेत्रात जहाल होता. याउलट चिपळूणकर, टिळक यांची परंपरा सांगणारे विचारवंत व कार्यकर्ते राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत जहाल असले तरी, सामाजिक संदर्भात मात्र नेमस्तांपेक्षाही नेमस्त होते. या गटाकडून रामदासांची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; पण तरीसुध्दा टिळकांसारखे खोलवर विचार करू शकणारे स्थिरबुध्दीचे विचारवंत तुकोबांचे महत्त्व जाणून होते. 'गीतारहस्य ' ची सुरवात व समारोप तुकोबांच्या वचनांनी होतोच; पण एकूणच  'गीतारहस्य ' त सर्वात अधिक अवतरणे तुकोबांच्या अभंगांची आहेत. 'ज्ञानोत्तर कर्म करायचे की नाही', या भारतीय तत्त्वज्ञानातील यक्षप्रश्नाला शांकरवेदान्ती संप्रदायाचे उत्तर 'नाही ' असे होते, तर लोकमान्य टिळकांचा कर्मयोग लोकसंग्रहासाठी ज्ञान्यानेही कर्म करावे, असा सांगू इच्छित होता. प्राचीन काळातल्या जनकादिकांची गोष्ट ग्रंथांत राहिली. आपल्या नजीकचे उदाहरण हवे असेल, तर  'तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता' असे सांगणाऱ्या तुकोबांचेच आहे. वस्तुत: टिळकांनी वापरलेला  'निष्काम कर्म ' हा शब्द सर्वांत प्रथम तुकोबांनी वापरलेला आहे आणि तोहि नेमका क्षत्रियांच्या युध्दकर्माच्या संदर्भात.  'हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म'. क्षत्रियांनी त्यांचा स्वधर्म पाळताना केलेली शत्रूची हत्या ही वस्तुत: हत्या नसून निष्काम कर्म आहे, असे तुकोबा सांगतात. भगवद्गीतेवरील हे खास देशी शैलीतील रोख ठोक भाष्य आहे. गीता आणि ज्ञानेश्वरीचे सार त्यात उतरले आहे. तुकोबांमधील हा पैलू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विशेष भर देऊन पुढे आणला.  'तुका म्हणे गेला आळस किळस । अकर्तव्य दोष निवारला',  'कर्म अकर्म जळाले । प्रौढ तुका ते ठरले'.

          कर्त्याचे चित्त शुध्द असेल तर  'अकर्तव्य नीत होय तया' अशा शब्दांत तुकोबांनी कर्मयोगाचे तत्त्वज्ञान थोडक्यात सांगितले आहे. लोकमान्य टिळकांची भाषणे आणि अग्रलेख तुकोबांच्या संदर्भांनी सजलेले दिसतात. सामाजिक - राजकीय बहुजनांनी व अभिजनांनी तुकोबांकडून हव्या त्या गोष्टी घेतल्या. बहुजनांच्या चळवळीतच अंतर्भृत असलेली दलितांची चळवळ  पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृतांची चळवळ म्हणून स्वतंत्र केली. तिचा पहिला उच्चार त्यांनी 'मुकनायक' या पत्रातून केला. बहिष्कृत वर्ग आजपर्यंत मूक होता आता तो बोलला. आपली गाऱ्हाणी त्याने भीडभाड न ठेवता वेशीवर टांगली, तरच त्याला त्याचे हक्क मिळू शकतील. गप्प राहून कुणालाच काही मिळत नसते, हा 'मुकनायकया नावामागचा आशय व्यक्त करणारे घोषवाक्य आंबेडकरांना तुकोबांच्या अभंगामध्ये मिळाले आणि ते 'मुकनायक' च्या अंकाच्या शिरोभागी झळकू लागले.

           काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥

नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन हित नव्हे ॥'

                       बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख । ('बहिष्कृत भारत', 'जनता' पत्रांमधून) आणि त्यांची मराठी भाषणे ज्ञानदेव - तुकोबांच्या संदर्भानी सजलेली असत. 'ज्ञानेश्वरी' आणि 'गाथा' हे दोन ग्रंथ सोडून सारे मराठी साहित्य समुद्रात बुडवले तरी मराठीचे फारसे नुकसान होणार नाही, असे त्यांचे प्रक्षोभक मत होते. ज्या आपल्या बहिष्कृत, अस्पृश्य बांधवांशी ते संवाद करीत होते, त्यांची भाषा ही ज्ञानदेव तुकोबांचीच भाषा होती. चिपळूणकर, आगरकर, केशवसुत त्यांना अज्ञातच होते. स्वत: बाबासाहेबांवर लहानपणी संतवाङ्मयाचे संस्कार झाले होते. खुद्द अस्पृश्यांमध्ये पंढरी, आळंदीची वारी करणारे, भजन - कीर्तन करणारे अनेक लोक होते. त्यामुळे आंबेडकरांच्या  मुखातून सहजगत्या संतवचने निघत असत. पण येथेही मुद्दा केवळ अलंकारिक सजावटीचा नव्हता, आधार घेण्याचाही नव्हता. वैचारिकतेचा होता. बाबासाहेब गौतम बुध्दांच्या विचारांचा पुरस्कार करीत, त्या वेळी महात्मा गांधी अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडत होते. साहजिकपणे आंबेडकरांना कोणीतरी विचारलेच, ''गांधीजी अहिंसा सांगतात, बुध्दही अहिंसा सांगायचे, मग तुम्हाला गांधी विचार का मान्य नाहीत ?'' आंबेडकरांनी उत्तर दिले ''तुकोबांनी अहिंसेची पूर्ण व्याख्या दिली आहे. 'दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दलण कंटकांचे.' गांधीजी याचा अर्धाच भाग सांगतात. माझी अहिंसा तुकोबांची अहिंसा आहे.'' अर्थात बाबासाहेबांनी लावलेला गांधी विचारांचा अन्वयार्थ तेव्हा बहुसंख्य लोकांना मान्य नव्हता. महाराष्ट्रातल्या टिळकांच्या अनुयायांनी टिळकांना रामदासांचे अवतार मानले, तर गांधींच्या अनुयायांनी गांधींना तुकोबांचे रूप मानले. टिळकांचे काही अतिउत्साही अनुयायी हेच समीकरण स्वीकारत होते; पण उपहासाने. त्यांना तुकोबा व गांधी हे अहिंसक, अप्रतिकारक , दुर्बल वाटत. अर्थात स्वत: लोकमान्यांना वाटत नव्हते व त्यांच्या समतोल अनुयायांनाही वाटत नव्हते. 1924 मध्ये लोकमान्यांचे नातू (मुलीचा मुलगा) गजानराव केतकर यांनी 'किर्तन' मासिकातून  'दोन महात्म्यांची अकल्पित भेट' या नावाचा लेख लिहिला. त्यात मुंबई येथील गांधींच्या निवासस्थानी तुकोबा येतात, गांधींची त्यांची चर्चा होते. तुम्ही माझेच कार्य पुढे चालू ठेवले आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, असे तुकोबा गांधींना सांगतात, अशी मजेदार कल्पना केलेली आहे. काँग्रेसच्या चळवळीत शिरलेल्या सत्यशोधक ब्राह्मणेतरांनी तर या वेळी तुकोबा-महात्मा फुले-महात्मा गांधी अशी परंपरा सांगायला सुरवात केली.

         तुकोबांच्या आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय जीवन व्यवहारांचा प्रभाव असा सार्वत्रिक असताना व त्यामुळे मराठी माणसाचे विचारविश्व ढवळले जात असताना त्यांचे काव्य पूर्णत: दुर्लक्षित राहिले होते, असे मात्र नाही. विष्णू मोरेश्वर महाजनी आणि प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन हे इंग्रजी काव्याचे नामवंत अभ्यासक होते. पटवर्धन तर प्रार्थना समाजाने चालविलेल्या तुकाराम चर्चा मंडळाचे सभासद होते. इंदूरचे इंग्रजीचे प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे नावही या संदर्भात घ्यायला हवे. या मंडळींनी तुकोबांच्या  काव्याचा विचार इंग्रजी कवितेच्या संदर्भात करून तुकोबांचे महत्त्व सांगितले. शेक्सपियर आणि ब्राऊनिंग ही दोन नावे त्यांना विशेष महत्त्वाची वाटली. अगदी अलीकडच्या काळात कविवर्य विंदा करंदीकर यांनी तुकाराम - शेक्सपियरची संवादकविता लिहिली असल्याचे आपणास ठाऊक आहे.

           बा. सी. मर्ढेकरांनी नवकविता लिहून मराठी काव्यविश्वाला हादरे दिले. तुकोबांचे अनुकरण करीत त्यांनी नाठाळ गाथा लिहिली खरी; परंतु त्यांच्या काव्यविचारात आणि समीक्षेत त्याचे प्रतिबिंब पडले नाही. मर्ढेकरांकडून अपुरे राहिलेले कार्य अलीकडच्या काळात दिलीप पुरुषोत्तम चित्रे पूर्णतेला नेत आहेत. तुकोबांना मराठी काव्याच्या केंद्रस्थानी ठेवून, तुकोबांच्या कवितेच्या अनुषंगाने स्वतंत्र समीक्षा उभी करून, तिच्या तत्त्वांच्या आधारे इतर मराठी कवींची समीक्षा करणे, हे चित्रे यांचे वैशिष्टय आहे; पण आणखी महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे चित्रे यांनी तुकोबांच्या कवितेकडे वैश्विक आणि तौलनिक परिप्रेक्ष्यातून पाहिले आहे. तुकोबांशिवाय आपण कीर्तनाची कल्पना करू शकत नाही, असे आर्यासम्राट मोरोपंतांनी पूर्वी म्हटलें होते. तुकोबांशिवाय मराठी कविता अपुरी राहील, ही जाणीव अनेक मराठी कवींना व समीक्षकांना होती; परंतु चित्रे यांना तुकोबांशिवाय कविता हा वाङ्मयप्रकारच अपूर्ण वाटतो. चित्रे यांच्या या भूमिकेनुसार तुकोबा विश्वकवी ठरतात. तुकोबा हे राष्ट्रकवी असल्याचे विधान सर अलेक्झांडर ग्रँट यांनी एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात केले होते. चित्रे तुकोबांना वैश्विक पातळीवरून पाहत आहेत. महाकवी मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला भिडून मानवी जीवनावर भाष्य करीत असत. ऐतिहासिक व भौगोलिक योगायोगामुळे त्याला ते कोणत्या तरी काळात, कोणत्या तरी देशात व साहजिकच त्या काळातील त्या देशाच्या भाषेत त्याला ते करावे लागते; पण अनुवादांद्वारे या योगायोगावर, तात्कालिकतेवर व एतद्देशीयतेवर मात करून या कवितेतील मानवी अस्तित्वाची जाणीव व तिच्यावरील भाष्य कोणत्याही प्रकारांच्या लोकांपर्यंत  पोचवता येते, असे चित्रे यांचे म्हणणे व अनुभव आहे. ते स्वत: तुकोबांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत करतात. त्यांच्या इंग्रजी अनुवादांवरून अन्य युरोपियन भाषांमध्ये तुकोबांचे आणखी अनुवाद सिध्द होत आहेत. काव्याबरोबरच इतर कलामाध्यमे हाताळण्याचाही त्यांचा इरादा आहे. तुकोबांवरील इंग्रजी चित्रपट काढण्याच्या गडबडीत सध्या ते आहेत.

           हॉलंडमध्ये स्थायिक झालेले मराठी चित्रकार भास्कर हांडे यांनी तुकोबांच्या अभंगांवर अमूर्त शैलीत चित्रें काढली असून , या अभंगांचा अर्थ ते रंगरेषांच्या माध्यमातून युरोपच्या कलादालनांतील प्रदर्शनांमधून तेथील रसिकांपर्यंत पोचवत आहेत.

          मराठी कवितेत विद्रोह आणि क्रांती यांची जाणीव व्यक्त करणारे आंबेडकरी वारशाचे महत्त्वाचे कवीही तुकोबांचा वारसा मानतात. दीनबंधू शेगावकर, बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ ही त्यांच्यापैकी महत्त्वाची नावे, बाबूराव बागूल म्हणतात,

अरे ती माझी बंदूक तरी द्या

नाही तर तुक्याची वीणा तरी द्या

गावोगावी जाईन म्हणतो.....

या वीणेवर क्रांतीची गीते गाईन म्हणतो.

        मानवी जीवनात क्षमा आणि नम्रता यांचे महत्त्व प्रतिपादन करणारा कवी क्रांतीचीही प्रेरणा देऊ शकतो. याचे कारणच मुळी त्याला मानवी जीवनाच्या व्यापकतेचे, व्यामिश्रतेचे आणि समयाचे भान होते. ग्वाल्हेर घराण्यात चतुरंग'नावाचा एक प्रकार गाण्यात येतो. त्यात ख्याल, टप्पा, ठुमरी, तराणा या चारही बाबींचा अंतर्भाव असतो; पण हे काम तितक्या तयारीच्याच गायकाचे आहे. तुकोबांचे काव्य हे असे आहे. त्यात मानवी जीवनाचे आभाळ त्यांच्यातील ग्रह, तारे, नक्षत्रे, धूमकेतूंसह प्रतिबिंबित झालेले आहे.

तुकोबा मानवी जीवनाचे महाभाष्यकार आहेत.