Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

पुन्हा तुकाराम

 

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

 तुकोबांच्या जन्मानंतर तीनशेऐंशी वर्षांनी आज आपण जी मराठी भाषा वापरत आहोत, तिचा कस तुकोबांच्या गाथेतून आलेला आहे. जवळजवळ चार  शतके  तो   कोटयवधी  निरक्षर  वारकऱ्यांच्या मौखिक  परंपरेद्वारा

आपल्या भाषिक अभिसरणात मिसळलेला आहे.

    हजार वर्षे जुन्या आणि सातशेपेक्षा जास्त वर्षांची वाङ्‌मयीन परंपरा असलेल्या आपल्या मराठी भाषेचा मानदंड असा लेखक कोण ? मी याचे उत्तर तुकाराम असे दिले, तर बहुधा कोणीही समंजस मराठी वाचक फारसा वाद घालणार नाही. आज आपल्या सर्वांच्या तोंडी असलेल्या मराठी भाषेवर इतका सर्वांगीण प्रभाव असलेला दुसरा कोणताही लेखक नाही. इंग्लंडात जेम्स राजाच्या कारकिर्दी बायबलाचे जे इंग्रजी भाषांतर झाले त्याच्या नंतरच्या इंग्रजी भाषेच्या जडणघडणीवरच प्रभाव पडला. तेच तुकोबांच्या गाथेच्या मराठी भाषेवरील प्रभावाच्या प्रभावाच्या बाबतीत म्हणता येईल. तुकोबांच्या जन्मानंतर तीनशेएेंशी वर्षांनी आज आपण जी मराठी भाषा वापरतो आहोत, तिचा कस तुकोबांच्या गाथेतून आलेला आहे. जवळजवळ चार शतके तो कोटयवधी निरक्षर वारकऱ्यांच्या मौखिक परंपरेद्वारा आपल्या भाषिक अभिसरणात मिसळलेला आहे. नामदेवांनंतर मराठी भाषेशी इतकी जवळीक साधणारा कोणताही कवी मराठीत झाला नाही. तुकोबांनंतर - विशेषत: आधुनिक काळात - मराठी भाषेशी जवळीक करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; पण ही जवळीक त्यांना केवळ शैली म्हणून आणि तेवढयापुरतीच साधली. समकालीन कवींमध्ये मर्ढेकर, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा काही कवींमध्ये तुकारामी परंपरेच्या छटा आल्या; पण तुकोबांचे प्रचंड व्यवहारजन्य शब्दभांडार, बोलीच्या सहजतेतून छंदाच्या डौलदार तोलात विविधपणे चकित करत येणारे पद्यप्रभुत्व या कवींमध्ये नाही. याचे कारण एकच. तुकोबांच्या अस्तित्वानुभवाचा व्यापकपणा आणि त्यांच्या कवितेच्या संकल्पनेची सर्वंकष सहजता या आधुनिक आणि आधुनिकोत्तर कवींमध्येही नाही.

     आपण तुकोबांच्या कवितेची काय किंमत करतो, या प्रश्नापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न तुकोबांनी आपल्या कवितेची काय किंमत केली असती, हा आहे. देश, काळ आणि परिस्थिती यांचे निव्वळ निष्पन्न नसते. जीवनमूल्यांच्या सातत्यावर परंपरा आणि नवता या दोन्हींची कसोटी लागते. परंपरा जशा मारक असू शकतात, तशी नवतासुध्दा मारक असू शकते. परंपरा जशी तारक ठरू शकते, तशी नवतासुध्दा तारक ठरू शकते. परंपरा एकसंध नसते. परस्परविरोधी परंपरांमधून पर्याय शोधत जीवनमूल्यांचे सूत्र आपले सातत्य टिकविण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे नवता एकसंध नसते. परपरेबाहेरचा प्रत्येक पर्याय नवतेत मोडत असला, तरी प्रत्येक नवा पर्याय इतर नव्या पर्यायांशी सुसंगत असतोच असे नाही. तसेच प्रत्येक नवा पर्याय जीवनमूल्यांशी सुसंगत असतो असेही नाही. तुकोबांच्या काव्यातली जीवनसृष्टी आपल्याला मानवी अस्तत्वाच्या सार्वभौम संदर्भात पाहावी लागेल माणूस असण्याचा अनुभव सर्वच माणसांना सर्वकाळ येणारा अनुभव आहे आणि या वैश्विक माणूसपणाच्या अनुभवावर तुकोबांची कविता कोणता प्रकाश कितपत टाकते, याचा आपल्याला विचार करावा लागेल.

    वाङ्मयाची मूळ मराठी कल्पना ही मराठी भाषेच्या पर्यावरणापासून वेगळी करता येणार नाही. वाङ्मयात मौखिक परंपरा आणि लिखित 'साहित्य' यांच्यातही तटबंदी करता येणार नाही. उदाहरणार्थ, ओवी आणि अभंग हे मराठी पद्यरचनेचे मूळ प्रकार मराठी बोलीशी संलग्न आहेत आणि संस्कतोद्भव मराठी पद्यरचना ही मराठी बोलीच्या उपजत छंदोमयतेवर लादलेली शैली आहे. अशी शैली स्वीकारली. तर मराठीतच स्वाभाविक शब्दभांडार संकुचित करावे लागते आणि मराठी उच्चार-रचनेला न पेलणारी संस्कृतातून आयात केलेली शब्दकळा बळजबरीने वापरावी लागते. म्हाइंभटाचे सहज मराठी गद्य, ज्ञानेश्वरांच्या अभंगांमधील राजस शब्दकळा किंवा अमृतानुभवात मराठी भाषेला सहज प्राप्त झालेला सात्त्विपणा, नामदेवांच्या रचनेचा डौलदार गोडवा, तुकोबांच्या अभंगाची सर्वंकष भाषा हे मूळ मराठीचे आदर्श आहेत. मूळ उच्चार-रचनेशी इमान राखल्यामुळे बखरकरानाही फारशी, अरबी शब्द पेलता आले. अव्वल इंग्रजीत इंग्रजीच्या दबावाखाली तोल साधणाऱ्या मराठी गद्य - पद्यकारांना पुन्हा एकदा संस्कृतचा आसरा घ्यावासा वाटला; याचे मुख्य कारण हेच की, पेशवेकाळापासून अधिकृत संस्कृतीचा संतांच्या आणि बहुजन समाजाच्या सकस मराठीशी संबंध तुटला होता. हीच अधिकृत संस्कृती पुढे पुढे जास्त इंग्रजाळली आणि इंग्रजीमुळे संस्कृताळली. उच्चवर्णीय भारतीयांचा पुनरुज्जीवनवाद 'हिदुत्वाचा' च्या ब्राह्मणकेंद्रित कल्पनेवर आणि भाषेच्या संस्कृतकेंद्रित 'विकासा' वर अवलंबून होता. आज अधिकृत हिंदीला आलेले विकृत ग्रांथिक स्वरुप आणि अधिकृत मराठीचा तसलाच स्थूलपणा यांची तुलना करण्यासारखी आहे.

    अनेक शतके उत्क्रांत होत आलेल्या मराठी भाषेला आधुनिक ज्ञानविज्ञानाची वळणे सहज झेपू शकली असती, हे गेल्या सव्वाशे वर्षांतील मोजक्या पण समर्थ लेखकांच्या उदाहरणांवरून सिध्द करता येईल. मात्र मराठी भाषेचे वरकरणी समर्थन करणाऱ्या अनेक विचारवंतांची आणि लेखकांची स्वत:ची मराठी भाषा मात्र इंग्रजीचा संस्कृतप्रचुर आणि अ-मराठी अनुवाद असल्यासारखी दिसते. तेव्हा ते नेमके कोणत्या मराठीचे समर्थन करत आहेत, याबाबत संशय वाटतो.

     तुकोबांसारख्या श्रेष्ठ लेखकाला मराठीच्या अभ्यासक्रमांत सातत्याने महत्त्वाचे स्थान दिले, तर जिला भाषेचे ब्राह्मणीकरण आणि इंग्रजीकरण करणारे उगाचच 'गावरान' किंवा 'साधीभोळी' मराठी मानतात, तीच खरी आधुनिक, विकसित मराठी भाषेचे अभिजात रूप असलेली मराठी आहे, हे सर्वांना कळून येईल. भाषेच्या आणि वाङ्मयाच्या अभ्यासक्रमात आजतागायत् विविध प्रयोजनांसाठी वापरलेली मराठी भाषा दुर्लक्षित राहलेली किंबहुना केली गेलेली आहे. जे काही तुरळक, पण उत्तम आणि कार्यक्षम गद्य गेल्या सव्वाशे वर्षांत मराठीत लिहिले गेले आहे. त्याचे मासले समोर ठेवण्याऐवजी पोकळ, शैलीबाज, कृतक -लालित्याने सजवलेल्या तथाकथित 'साहित्या' ला प्राधान्य देण्यात आलेले आहे. विद्यापीठीय आणि ग्रांथिक मराठी, वर्तमानपत्री आणि शासकीय मराठी यांच्यात आणि ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठीत एक वाढती दरी तर आहेच; पण आठशे वर्षे सातत्याने विकसित झालेल्या मराठीत आणि आकाशवाणी व दूरदर्शनवर बोलल्या जाणाऱ्या, रंगभूमीवर आणि व्यासपीठावर वापरल्या जाणाऱ्या मराठीतसुध्दा वाढता फरक आढळतो आहे. पेशवाईपासून मराठी वाङ्मयात वर्णीयतेची वाढ होत आहेच. त्यात स्वातंत्र्योत्तर काळात वर्गीयतेची भर पडलेली आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्तारचनेतील विकृती सांस्कृतिक एकात्मतेला तडे पाडतात, याचा आपल्याला विसर पडू नये. भक्तिसंप्रदायाचे आणि लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरांचे खरे महत्त्व त्या हिंदुत्ववाद्यांना अधूनमधून सोयीस्कर वाटतात. यात नसून, त्यात मराठी भाषेची स्वायतत्ता प्रकट झालेली आहे; त्यात आहे. उदाहरणार्थ, हिंदुत्ववादी 'ज्ञानेश्वरी' डोक्यावर घेतात ती भगवद्गीतेखातर, मराठीखातर नव्हे. एरवी ज्ञानदेवांच्या जास्त अस्सल अभंगरचनेचा आणि 'अनुभवामृता' सारख्या मौलिक आविष्काराचा त्यांनी जास्त जयजयकार केला असता. नामदेव आणि तुकाराम हे मराठी कवितेचे मुख्य मानदंड आहेत, हे त्यांनी आनंदाने मान्य केले असते. जनाबाई, चोखोबा, सेना, सावता, शेख महंमद, बहिणाबाई इत्यादिकांना त्यांचे खरे स्थान दिले असते, तर प्राथमिक शाळेपासून मुक्तेश्वर, वामनपंडित किंवा मोरोपंत वाचण्याची वेळ निष्पाप विद्यार्थ्यांवर आली नसती. आमच्या शिक्षणक्रमात सगनभाऊ, प्रभाकर, होनाजी, पठ्ठे बापूराव वगैरे असते, तर भास्करराव तांबे किंवा पुरुषोत्तम शिवराम रेग्यांची कविता वाचतानासुध्दा आम्हाला व्यापक संदर्भात विचार करता आला असता; पण मराठी भाषा आणि वाङ्मयाच्या इंग्रजोत्तर अभ्यासाची दिशाच अ-मराठी आहे आणि हा निव्वळ योगायोग किंवा अपघात नसून, वर्णांध, पुनरुज्जीवनवादी आणि क्वचित पश्चिमाभिमुख प्रवृतींचा हा संमिश्र परिपाक आहे. तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी आहेत हे मानल्यावर, मराठीचे स्वतंत्र पण वैश्चिक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र आपल्याला मराठीबाहेरच दिसल्यामुळे मराठी काव्याच्या यशाचीच आपल्याला कल्पना येणार नाही. तुकोबांच्या वह्या एकदा ब्राह्मणांपायी इंद्रायणीत बुडविल्या गेल्याच होत्या. विसाव्या शतकातील विद्यापीठीय साहित्यिकांच्या षडयंत्राने त्या पुन्हा बुडविण्याच्या पराक्रम केलेला आहे. गेल्या पाव शतकातील दलित साहित्याचे समकालीन महत्त्व आम्हाला विद्यापीठीय भोंदूंपेक्षा अगोदरपासून आणि मनापासून मान्य आहे. पण नामदेव किंवा तुकाराम हे साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीतले लेखक नाहीत आणि सार्वभौम, सर्वसमावेशक मराठीचे मूळपुरुष म्हणता येतील एवढे ते मोठे आहेत, हे दलितांनाही सांगण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. मराठी वाङ्मय बिनइतिहासाचे नाही; तसेच मुद्दाम आपमतलबी पध्दतीने त्याचा इतिहास लिहिता येणार नाही. कवी म्हणून आम्ही एक वेळ रामदासांची मौलिक प्रतिभा वाखाणू; पण ज्या अर्थाने त्यांना संत म्हणणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा किंवा शिवसेना या आधुनिक राजकीय चळवळी सांस्कृतिक अर्थाने आम्हाला अ-मराठी वाटतात. ज्ञानदेव, चक्रधर, नामदेव, तुकोबा यांच्याशी तर त्यांचा संबंध जोडता येत नाहीच; पण शिवछत्रपतींशीही तो जोडता येत नाही. उलट या मुख्य मराठी परंपरेत धर्माच्या विकृत सामाजिक आविष्कारांना विरोध करणारे फुले आणि आंबेडकर चपखल बसतात आणि भारतात अन्यत्र न आढळणारे दलितांचे पुनरुत्थान महाराष्ट्रातच का व्हावे, या प्रश्नाचेही उत्तर त्यातच आहे.