साहित्याची जी
मूलभूत तत्त्व व सार्वत्रिक तत्त्वे आहे त्यांच्याशी संबंधित आहे. शैलीमीमांसा ही
साहित्यकृतिकेंद्री अभ्यासपध्दती असल्यामुळे संबंधित साहित्यकृतीकडून तिला आवश्यक
ती गमके मिळत असतात. साहित्यकृती ज्या परंपरेशी संबंधित असते,
ती परंपरा व कलाकृती यांनी परंपरेशी संबंधित राहून पृथगात्म
वैशिष्टे टिकविणे, यामुळे संबंधित परंपरेचे व्यापक
कलात्मक स्वरूप वाङ्मयव्यवहारासंबंधी काही एक भान देते. साहित्यकृती ही भाषेच्या
साह्याने साकार होते व भाषा या माध्यमाच्या मुखानेच बोलते,
तेव्हा भाषेच्या अभ्यासाची तत्त्वेही सार्वत्रिक व त्या त्या
भाषेच्या जडणघडण व वर्तनव्यवहाराशी पृथगात्मपणे संबंधित असतात. म्हणून
भाषाविज्ञानातून मिळालेली तत्त्वे ही साहित्यकृतीच्या आविष्काराची पध्दत समजून
घ्यायला उपयोगी पडतात. शैलीमीमांसा ही साहित्यकृतीची कलाकृती म्हणूनच दखल घेते.
यामुळेच कलाकृतीची जडणघडण ज्या तत्त्वांनी होते, ती
तत्त्वे व कलाकृतीचा रुपांतर्गत पसारा याला महत्त्व प्राप्त होते. कलाकृतीतील
आशयाचाच केवळ शोध घेण्याने अगदी प्रारंभीच कलाकृतीचे कलापण नाकारले जाते. कलाकृती
आशयसंपन्नच असते; पण त्या आशयाची अभिव्यक्ती कलेच्या
मुखाने होत असते व कलाकृतीचा अवघा देहच कलारूप असल्यामुळे ती अनेक मुखांनी बोलत
असते. हे लक्षात घेतले नाही तर झाडाच्या नादात जंगलाचे भान सुटावे तसे आशयाच्या
नादात कलाकृतीच्या कलेच्या पसाऱ्याचे भान सुटते व तिच्या सौंदर्याची प्रतीती होणे
अशक्य होते. आशयही सत्य व त्या आशयाला मंडित करणारा पसाराही सत्य ही कल्पना एक
प्रकारे चिद्विलासवादीच आहे.
कुठल्याही
श्रेष्ठ साहित्याचे नवनवीन द्दृष्टींनी अध्ययन होणे हे साहित्यनिर्मिती व
साहित्यसमीक्षा या उभयविध व्यवहारांसाठी आवश्यक असते. संतसाहित्याच्या बीजभूत
श्रेष्ठतेमुळे व कसदार विपुल निर्मितीमुळे नवीन अभ्यासपध्दतींची कसोटी
संतसाहित्याचा अभ्यास करण्यानेच लागू शकते याची टीकाकारांना खात्री पटलेली आहे.
तसेच संबंधित साहित्याचे नित्यनूतनत्व प्रगट करण्याची क्षमता लक्षात यावी यासाठी
नवीन अभ्यासपध्दतीच अभ्यासकांना जुन्या अभ्यासपध्दतींच्या कचाटयातून मुक्त करीत
असतात. शेक्सपीअरच्या संदर्भात लिहिताना टी. एस. एलियट यांनी म्हटले आहे की
Meanwhile, the reader may ask himself why
need I be conscious of all these things in Shakespeare’s plays of which
Shakespeare himself was perhaps not quite concious ?Why I cannot enjoy the play
simply, as a contemporary would have done ? The answer is of course, that we
cannot escape from the criticism of the past except through the criticism of the
present.
संतसाहित्याच्या
अभ्यासाबाबतही हेच म्हणता येईल.
शैलीमीमांसेसाठी
भाषाविज्ञानाची मदत होते; पण मूल्यमापनात त्याचा सहभाग
नसतो. भाषाविज्ञान समीक्षेसाठी स्तरावर कार्य करीत नाही तर मूल्यपातळीवर जाणवलेल्या
व्यवस्थापूर्व प्रतिसादांचे भाषावैज्ञानिक विश्लेषण करून मूल्यमापनासाठी ते
आधारभूमी तयार करून देते. मूल्यमापन, मूल्यात्मकता हे
समीक्षेचे स्तर आहेत. शैलीमीमांसा या स्तरांमध्ये येते.
तुकोबांच्या
अभंगवाणीची शैलीमीमांसा करताना मी जो विचार केला,
त्याचे दिङ्मात्र दर्शन प्रस्तृत निबंधात करीत आहे.
विस्तारपूर्वक शैलीमीमांसा मी अन्यत्र केली आहेच.
तुकोबा हे वारकरी संप्रदायातले संत. म्हणून वारकरी परंपरेच्या संदर्भात विचार
करणारी 'वारकरी शैली' ही
संकल्पना मांडली आहे. साहित्येतिहासात युग ही संकल्पना स्वीकारली जाते.
वाङ्मयेतिहासात वाङ्मयीन
परंपरांचा शोध घेण्यासाठी युग ही कल्पना वापरली जाते,
तर शैलीविज्ञानात एखाद्या विशिष्ट काळातील भाषेचे सर्वसाधारण
शैलीगत स्वरूप म्हणून युगशैली ही संकल्पना वापरली जाते. युगशैली व वारकरी शैली या
संकल्पनांत काही भेद आहे काय ? युगशैली ही संकल्पना
इतिहासाधिष्ठित आहे. युगशैलीचे स्वरूप हे सर्वसाधारण असते. वाङ्मयेतिहासात युगशैली
निश्चित करीत असतांना वाङ्मयीन भाषेची कालाधिष्ठित वैशिष्टे केवळ नोंदवली जातात.
युगशैली कालखंडाशी संबंधित असल्यामुळे त्या त्या विशिष्ट कालखंडात जे जे काही
बरेवाईट लिखित साहित्य असेल, ते सगळेच त्या काळातील
वाङ्मयीन सामग्री ठरते. एखाद्या विशिष्ट कालखंडाची एकूणच सर्जक प्रवृत्ती म्हणजे
त्या युगाची शैली असे म्हणायला हरकत नाही.
शैलीचा विचार
हा केवळ भाषेशीच निगडित ठेवता येत नाही. युगशैलीची संकल्पना ही आंतर व्यक्तिनिष्ठ,
व्यक्तिबोलीबाह्य व संस्कृतीइतकी वरचढ असते. युगशैलीत विशिष्ट
युगातील सर्वच लेखनाचा समावेश होत असल्यामुळे, ह्या सर्व
लेखनाला सामावून घेणारी, ह्या लेखनाचे विविध गटांत
वर्गीकरण करून व्यवस्था लावणारी अशी ही युगशैलीची संकल्पना दिसते. या विशिष्ट
कालखंडात काही लेखनप्रकार प्रभावी असतील तर काही खचितच वापरले गेलेले असतील. यावरून
या कालखंडातील प्रमाणके व चलघटक निश्चित होतील. ही प्रमाणके चलघटक शैलीनिर्देशक
असतात. एन्केव्हिस्टने संहितानिष्ठ संदर्भ व संहिताबाह्य संदर्भ असे भाग करून त्यात
समाविष्ट होऊ शकणाऱ्या विविध चल घटकांची नोंद करणारा एक नमुना दिला आहे.
वारकरी शैली ही संकल्पना परंपराधिष्ठित आहे. परंपरेमध्ये ऐतिहासिक कालखंडापेक्षा एक
सलग कालपरंपरा अनुस्युत आहे. त्यामुळे विविध कालखंडांतून वर्तणारी एक सलग परंपरा
इथे लक्षात घ्यावी लागते. शैलीविज्ञानातल्या युगशैली या कल्पनेचा यामुळे कालिक
विस्तार होऊन अनेक समान चल घटकांचा त्यामुळे प्रत्यय येतो.
वारकरी शैली म्हणजे वारकरी संप्रदायाच्या साहित्याची शैली. निवृत्तिनाथ ते निळोबा
या कालखंडातील संबंधित संतांचे हे साहित्य आहे. एवढा विस्तृत कालखंडातील हे साहित्य
प्रकृतिदृष्टा एकजिनसी आहे. संत बहिणाबाईंनी देवालयाच्या इमारतीचे रूपक कल्पून
वारकरी संप्रदायाचे जे वर्णन केले आहे ते एकजिनसीपणाच सूचित करणारे आहे.
वारकरी शैलीचा विचार करतांना जसा वारकरी महत्त्वाचा घटक ध्यानात घ्यावा लागतो तसे
साहित्यबाह्य घटकही ध्यानात घ्यावे लागतात. यांत वारकरी संप्रदायाचे दैवत,
आचारधर्म, उपासनापध्दती,
पेहराव वगैरे गोष्टींचा समावेश होतो. साहित्य व साहित्यबाह्य
घटक यांना जोडणारा तत्त्वज्ञान हा घटक आहेच. वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल,
त्याचे विविधांगी निराळेपण,
आचारधर्मांतर्गत वारी, भजन,
नामस्मरण, कीर्तन यांचे व्यवच्छेदकत्व यामुळे या
संप्रदायाला शैलीगत परिमाणे प्राप्त होतात. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञानही
पूर्वकालीन तत्त्वज्ञानांपेक्षा निराळे आहे. हा संप्रदाय शुध्द भक्तिच्या परिमाणात
आहे. भक्ती ही मुळात आहेच, ती काही वैयक्तिक भावना नाही.
परमेश्वर स्वप्रीतिस्तव विलास करतो. याचा अर्थ प्रेम हे त्याच्या अंगभूत आहे. त्या
प्रेमाला आस्वादण्यासाठी भक्तीची गरज आहे. भक्तीनेच केवळ प्रेम व प्रेमाची रूची
आस्वादता येते. ज्ञानी फक्त स्वसंवित्तीच पहातो, शैव
फक्त शक्तीच जाणतो; पण दोन्हींचा जो गाभा ती परमभक्ती
तिच्यावर आमची दृष्टी आहे, असे ज्ञानदेव सांगतात.
परमात्मा हा मानवी जीवनाचा जिव्हाळा आहे. त्याला बाहेर काढायचे म्हटले तरी अशक्य.
अशा वेगळया नसलेल्या परमेश्वराचा अनुभव सतत जागवण्याचा उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण.
नामस्मरणामुळे जीवनाच्या अधिष्ठानी असलेला परमात्मप्रेमाचा झरा सतत उचंबळत ठेवता
येतो. परमेश्वराला जीवाच्या भक्तीची उत्कंठा असल्यामुळे तो सगुण साकार होतो. यासाठी
जीवाने भक्त होऊन भक्तीच्याच वाटला लागावे असे ज्ञानदेव आवाहन करतात. या
चिद्विलासवादी तत्त्वज्ञानाचे निनाद तुकोबांच्या अभंगवाणीत उमटणे स्वाभाविकच. एक
प्रातिनिधिक उदाहरण पाहूः
तरूवर बीजा
पोटीं । बीज रूवरा सेवटीं ॥१॥
तैसे तुह्मां
आह्मां जाले । एकीं एक सामावलें ॥धृ॥
उदकावरील तरंग
। तरंग उदकाचे अंग ॥२॥
तुका म्हणे
बिंबछाया । ठायी पावली विलया ॥३॥
(अभंग क्र.
३०६९)
चिद्विलासवादाचा पाया क्रिडा आहे. प्रभूची स्वप्रीतिस्तव क्रीडा म्हणजे हे जगत. या
दृष्टीकोनामुळे जगाकडे पहाण्याचा एक खेळकर दृष्टीकोन प्राप्त होतो व तोच खेळकरपणा
साहित्यातून आविष्कृत होतो. काव्याची प्रकृती क्रीडामय व त्याला क्रीडामय
तत्त्वज्ञानच अभिव्यक्त करायचे,
म्हणून ज्ञानदेवादी संतांचे काव्य हे क्रीडामय आहे. विविध
खेळांची रूपके, विश्वव्यापी भरगच्च प्रतिमानसृष्टी,
लोककलेतील रचनाबंध, संसाहित्याला
लाभलेली गायन - वादन - नृत्य यांची परिमाणे व त्यांचे सामूहिक पातळीवरील सादरीकरण
या सर्व गोष्टी क्रीडामयताच सुचवितात. अशी ही वारकरी शैली मराठी संस्कृतीची शैली
असल्याचे संस्कृतीच्या आघाडीच्या अभ्यासकांनी सिध्द केले आहे.
तुकोबांच्या
अभंगांचा रूप व नादमयता या दृष्टीने विचार करता येऊ शकतो.
'अभंगवाणी
प्रसिध्द तुकयाची' हे निर्धारक उदाहरण आहे. तुकोबांच्या
अभंगरचनेचे शैलीगत विशेष शोधण्याच्या दृष्टीने भाषावैज्ञानिक तत्त्वांचा उपयोग होऊ
शकतो, कारण वृत्त किंवा छंद यांचे रूपांतर्गत खूप भाषिक
विशेष असतात असे रोमन याकोबसन यांचे म्हणणे आहे. काव्यबंधात कालौघात बदल न होता
सातत्यच राहिले आहे. रूपक (Metaphor)
आणि लक्षणा (Metonymy)
व समांतर - न्यास (parallelism)
म्हणतात. आघात, अक्षर किंवा मात्रा
यांच्या आवर्तनाला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. विविध प्रकारच्या स्वर व
व्यजनात्मक आवर्तनाला यमक, प्रास,
स्वरावृत्ती किंवा व्यंजनावृत्ती असे म्हणतात.
ओवी हा छंद
आघातप्रधान आहे. संख्येच्या निर्बंधापासून मुक्त असे गद्यलेखनाचे विचारप्रधान
आंदोलनतत्त्व व पद्यातील यमकतत्त्व या दोहोंच्या मिश्रणाने हा छंद तयार झालेला
असल्याचे डॉ. ना. गो. कालेलकर यांचे म्हणणे अभंग या छंदासही लागू पडते. अभंग हा
तालगेय आहे व ही तालगेयता भावगर्भ विचारांदोलननिष्ठ आघाताशी निगडित आहे .
उदाहरणार्थ
भवनिर्दाळण नाम
। विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥
भवनिर्दाळण व
विठ्ठल तसेच नाम व काम यांतील अनुक्रमे आघाततत्त्वयुक्त व यमकतत्त्वयुक्त
परस्परसंबंधांमुळे एक अर्थप्रधान रचनाबंध तयार होतो तसेच त्याची एकाच ओळीत
पुनरावृत्ती झाल्यासारखी वाटते.
विठ्ठल
भवनिर्दाळण नाम । (नाम)
विठ्ठल नासी काम ॥
या
वाक्यपातळीवरच्या समांतर-न्यासामुळे (syntactic
parallelism)
अर्थपातळीवरील समांतर-न्यास (syntactic
parallelism)
कळतो. ओवीघटकांच्या सममूल्य मांडणीमुळे (equivalence)
हे घडते. ध्रुवपद हे अभंगप्रबंधाचे वैशिष्टय आहे. ते गायनाचे व अर्थाचेही एकक आहे.
ध्रुवपद घोळवले जाते याचा समांतर - न्यास म्हणून विचार अर्थपूर्ण ठरतो.
आवर्तनाचे अंग
म्हणून यमकतत्त्वाचा विचार महत्त्वाचा असतो. स्वरावृत्ती व व्यंजनावृत्ती यामुळे
निर्माण होणारी नादमयता यमकतत्त्वाचाच भाग असते. ध्वनिपरिणामांच्या दृष्टीनेही
यमकाचा विचार महत्त्वाचा ठरतो. यमकान्वित पदांतीत साधर्म्य व वैधर्म्य यांच्या
द्वारा स्पष्ट होणाऱ्या सामीप्यमूलक संबंधांचे विश्लेषण उद्बोधक ठरते. उदाहरणार्थ
तुका ह्मणे
माझे । हेचि सर्व सुख ।पाहीन श्रीमुख । आवडीने ॥
यातील पहिले
दोन चरण एका भावबंधाचे निदर्शक,
तर तिसरा चरण दुसऱ्या भावबंधाचा निदर्शक आहे. या दोहोंचा अन्वय
यमकाने साधला आहे. याला सामीप्य म्हणायचे. श्रीमुख आवडीने पहाणे हेच सर्व सुख असे
तुकोबा म्हणतात. श्रीमुख या घटकानयवावे परमेश्वर दर्शनाचा,
परमेश्वरप्रेमानुभवाचा भाव सूचित होतो. यामुळे लक्ष्यार्थाची
जाणीव होते.
दगडाची नाव
आधीच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥
दगड व जड या
यमकान्वित पदांत गुणीगुणभाववाचक अन्वय स्पष्ट आहे. हा साधर्म्यमूल संबंध आहे.
दगडाची नाव व तारू जाणे यातील अप्रत्यक्ष अन्वय यमकामुळे स्पष्ट होतो. दगडाची नाव व
काय तारू जाणे यात उघडच विरोध आहे. दगडाच्या नावेला पुन्हा दगडच तारायचे आहेत. हे
कसे शक्य आहे ?
अर्थातच अशक्य. अयाचितवृत्ती असलेल्या गोसाव्याच्या संदर्भात
तुकोबांचे वरील वाक्य लक्षात घेतले तर त्याचे रूपकीय कार्य खूपच ठसते. आता मूलतः
वैधर्मीय असलेले व यमकाने समन्वित झालेले एक उदाहरण पाहूः
सुख पाहतां
जवापाडें । दुःख पर्वतांएवढें ॥
जवापाडे व
पर्वताएवढे यांतील अंत्ययमकामुळे नातेसंबंध स्पष्ट होऊन ही पदे ठळक होतात. परिणामतः
सुख व दुःख ही पदेही ठळक होतात. सुखाने खरे तर पर्वताएवढे असावे व दुःखाने जवाएवढे
. पण ती आकांक्षा फोल ठरते. उलट जवाएवढया सुखासाठी पर्वताएवढे दुःख पहावे लागते.
तुकोबांच्या
अभंगावाणीतील विविध प्रकारच्या वाक्यपातळीवरील समांतर - न्यासाची उदाहरणे
विश्लेषिता येऊ शकतात. काही उदाहणांतीत व्याकरणिक प्रवर्गांचे आवर्तनही विश्लेषित
करता येऊ शकते. उदाहरणार्थः
ढेंकणाचे संगे
हिरा जो भंगला । कुसंगे नाडला तैसा साधु ॥
ओढाळाच्या संगे
सात्त्वि नासली । क्षण एक नाडती समागमें ॥
डांकाचे संगती
सोने हीन जाले । मोल ते तुटले लक्ष कोडी ॥
नामपदबंध अ
पूरक अ .... असे हे व्याकरणिक प्रवर्गांचे आवर्तन आहे. या समांतर - न्यासामुळे तळमळ,
उत्कटता, उत्स्फूर्तता,
संवाद साधणे, लोकांना शहाणे करण्याची
खटपट, भक्तांच्या ठायी असणारी आर्तता,
उपास्य दैवतावरचा दृढ विश्वास,
परमेश्वराशी संवाद साधण्याची धडपड वगैरे काही गोष्टींचा प्रत्यय येतो. तुकोबांची
भक्त म्हणून आर्तता व जगदुध्दाराची तळमळ या दृष्टीने त्यांच्या कवितेतील आर्वतन
महत्त्वाचे ठरते.
तुकोबांच्या
काव्यात्म वाक्याचा विचार करतांना काही एक क्रम निश्चित करावा लागतो. प्रथम पदांची
वैशिष्टये ध्यानात घ्यावी लागतात. कारण पदे ही वाक्यात कार्यशील होतात. पदविन्यास
हा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याजोगा भाग आहे. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेतील
पदांचा विकार (Inflection)
व सिध्दी (Derivation)
या दोन स्तरांवर व्याकरणिक विचार करता येतो. विकारजन्य पदे ही वाक्यरचनेच्या
दृष्टीने महत्त्वाची असतात. एकाच रूपघटकाची विविध व्याकरणिक विकरणाने पुनरावृत्ती
झालेली दिसते. तिचा पदपातळीवर विचार,
एकाच पदाच्या व व्याकरणिक विकरणाने मिळणाऱ्या परस्परविरोधी
पदांच्या जोडया व त्यांचा काव्यात्म वापर, काही पदांची
संक्षिप्त व वैशिष्टयपूर्ण रूपे, अभंगांच्या एकूण
परिवेशातच उलगडणारी दुर्बोध पदे, बोलभाषेतील पदे,
नामधातू व क्रियानामे यांची निर्मिती व वापर,
सामासिक पदे, त्यांचे विभाजन,
संबंधी सर्वनामांचा विलोप, सामासिक
शब्दांतील उत्तरयोगी पूर्वयोगी करणे, अभ्यस्त शब्दांचा
वैशिष्टयपूर्ण वापर, बोलभाषेतील शब्दांचा मुक्त वापर
इत्यादी बाबींची पदविन्यासाच्या अंगाने सोदाहरण चर्चा करता येऊ शकते. तत्सम संस्कृत
शब्दांपासून बोलभाषेत वापरल्या जाणाऱ्या शब्दांपर्यंत विविधता असणारा असा तुकोबांचा
शब्दनिधी आहे.
तुकोबांच्या
काव्यात्म वाक्याची बरीच वैशिष्टये कळतात. तुकोबांच्या अभंगावाणीतील काव्यात्म
वाक्य कमालीचे लवचिक आहे. व्याकरणिक वाक्यातील काटेकोरपणा मोडल्यामुळे ही लवचिकता
येते. वाक्यात सर्वसाधारपणे ज्या व्याकरणिक घटकांची उपस्थिती अभिप्रेत असते,
त्या घटकांचा विलोप हे तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे
महत्त्वाचे वैशिष्टय आहे. या विलोपित पदांमुळे वाक्यातील उर्वरित पदे लक्षवेधी
ठरतात. काव्यात्म वाक्य बंदिस्त असते. या संघटनतत्त्वामुळे पदांचे परस्परसंबंध
निश्चित होतात. त्यामुळे वाचकाला विलोपित पदांचा बोध होत होतो. परिणामतः वाचकाच्या
सजर्क सहभागाला वाव मिळतो. छंद किंवा वृत्त या संघटनतत्त्वांमुळे वाक्य लयबध्दही
होते. साहजिकच यति व विरामाच्या जागा निश्चित होतात. यति व विरामामुळे काव्यात्म
वाक्य अर्थदृष्टया नियंत्रित होते.
तुकोबांच्या
काव्यात्म वाक्यातील पदक्रम एका बाजूला स्वतंत्र आहे व दुसऱ्या बाजूला तो छंदाच्या
परिघात यमक या संघटनतत्त्वाशी बांधील आहे. पदक्रम स्वतंत्र असल्यामुळे यमक या
संघटनतत्त्वाशी कृत्रिमपणे बांधील नाही;
तर लयतालपोषक व अर्थपोषक असा नैसर्गिक आहे. म्हणून पदक्रमभंग हे
तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे वैशिष्टय आहे. काव्यात्म वाक्यात अन्वय लावणे अवघड
ठरावे इतका हा पदक्रमभंग आहे. मराठी या बहुतांश प्रत्ययप्रधान व काहीशा
शब्दक्रमप्रधान (काव्यातील दर्शन) भाषेच्या मुक्त व लवचिक व्यवस्थेचा वापर करून
घेतल्याने व त्याला विविध संघटनतत्त्वे असणाऱ्या अभंग या छंदाची जोड मिळाली
त्यामुळे लवचिक पण बंदिस्त असे एकात्म दर्शन घडते.
संभाषणत सर्वच
पदघटकांची आवश्यकता नसते. यामुळे संभाषण मितभाषी असते. तुकोबांची कविता ही या
अर्थाने बोलणारी कविता आहे. ती अभंग या छंदातून बोलते म्हणून ती गाणारीही आहे.
परिणामतः तिचे लिखित रूप सहजासहजी उमगत नाही. वाचकाला आपली भाषिक व साहित्यिक
क्षमता वापरून सर्जकतेने सहभागी व्हावे लागते.
समांतर - न्यास
व अधिअनुचलन (parataxis)
ही तुकोबांच्या अभंगांतील काव्यात्म वाक्याची वैशिष्टे आहेत. समांतर - न्यासाची
चर्चा यापूर्वी केली आहेच. अधिअनुचलनाची दोन विविध उदाहरणे पाहू.
बैसों खेळूं
जेवूं । तेथे नाम तुझे गाऊं ॥ (७३३)
अधिअनुचलन
सुसंगत विचार
राम वेळावेळा
आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडिता जेवितां गे बाइये ॥ (११०६)
एका चरणार्धात
अधिअनुचलन व दुसऱ्या चरणार्धात त्याच्याशी विरोधी विचार असतो. उदाहरणार्थः
जन धन तन ।
केले तृणाही समान ॥ (५२१)
अधिअनुचलन
विरोधी विचार
जन धन तन ।
वाटे लेखावें वमन ॥ (१८८५)
अधिअनुचलनात
जेवढे घटक असतात,
त्यातील एकेका घटकाचे स्वतंत्र वाक्य होऊ शकते. म्हणून संबंधित
वाक्यात गर्भित समांतर - न्यास (Implied
parallelism)
असतो. वरील उदाहरणांतील वाक्यांमुळे अभिप्रेत विषयाचे
प्रस्तुतीकरण ठाशीवपणे होते. जे तळमळीने, उत्कटतेने
म्हणावयाचे आहे, ते पुनरावृत्तीमुळे ठसते.
प्रतिपक्षात्मक मांडणीचा समांतर - न्यास हे तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचे
व्यवच्छेदक वैशिष्टय आहे. वास्तव हे कधीच एकांगी नसते. मात्र त्याचे आपले आकलन
एकांगी असते. परिणामतः आदर्श आणि व्यवहार यापैकी कुठल्यातरी एकाच अंगाचा एकांगी
पुरस्कार होतो. यामुळे व्यक्तीच्या तसेच सामाजिक जीवनात संतुलन राहात नाही.
सर्वसाधारणपणे पारंपरिकतेने आदर्शाच्याच अंगावर भर दिला जात असल्यामुळे नीतीचाच एक
भाग असलेल्या व्यवहाराचे भान राहात नाही. तुकोबा आदर्श व व्यवहार यांची सांगड घालून
ते भान आणून देतात. एकाच पदाची पुनरावृत्ती होऊन साधलेल्या गर्भित - वाक्य समांतर
- न्यासाच्या उदाहरणांत क्रियापदांच्या पुनरावृत्तीमुळे अधीरता,
ठामपणा, निषेध,
कळकळ या मनोवृत्तींचा बोध होतो. जगदुध्दाराच्या तळमळीपोटी
तुकोबा संवाद साधतात. संबोधनार्थी, आज्ञार्थी,
विध्यर्थी, प्रश्नार्थी अशा
वाक्यांद्वारा तुकोबा संवाद साधतात. अभंगाच्या परिवेशात अशी वाक्यें ही काही
वैशिष्टये. अजूनही काही वैशिष्टये मिळू शकतात. तुकोबांच्या काव्यात्म वाक्याचा
महावाक्याच्या संदर्भात विचार करता येऊ शकतो.
तुकोबांच्या
प्रतिमासृष्टीचा अभ्यास करताना नवी दृष्टी वापरता येऊ शकते. प्रतिमा ही नवीन
समीक्षेतील संकल्पना आहे. तिचे उपयोजन कोणकोणत्या अर्थाने होऊ शकते हा विचार
महत्त्वाचा आहे. सर्वच संतांच्या साहित्याचे प्रधान आशयसूत्र हे भक्तितत्त्व हे
आहे. भक्तितत्त्व हे अतींद्रिय अनुभवाला इंद्रियांकरवी भोगायला लावणारे तत्त्व आहे.
मनवाचातीत अशा ईश्वरानुभवाला मनगोचर वा इंद्रियगोचन करण्यासाठी विविध
लौकिकानुभवातील उदाहरणांनी,
दृष्टांतानीच हे कार्य होते. अनुभव इंद्रियसंवेदन करायचा तर
वाक्चातुर्य हे हवेच. वाक्चातुर्य म्हणजे प्रतिभेच्या बळाने निर्मिलेले विश्व. इथे
भक्तितत्त्व व काव्यतत्त्व यांची एकरूपता होते. संतांच्या वाङ्मयातील प्रतिमा या
अलंकरणरूप नाहीत. प्रतिमा या अप्रस्तुत नाहीत; तर त्या
प्रस्तुतच आहेत. जिच्यामुळे आध्यात्मिक अनुभव प्रस्तुत ठरतो त्या व्यावहारिक जगातील
प्रतिमासृष्टी ही जगाच्या वास्तव स्वरूपापेक्षा मूल्ययुक्त स्वरूपाने सिध्द झालेली
असते. म्हणून इथे मूल्यांच्या जाणिवेच्या अर्थप्रकाशातच इंद्रियसंवेदन प्रतिमा
निर्माण होतात. ह्या इंद्रियसंवेदन प्रतिमा इंद्रियांनी भोगून परत हृदयात भोगायच्या,
त्यामुळे प्रतिमा सार्थ होतात. तुकोबांच्या अभंगांतील
प्रतिमानरून लौकिकसृष्टी मूल्ययुक्त आहे. ही मूल्ये अनुभवाच्या संदर्भात समजून
घेतली नाहीत तर ती मूल्यगर्भ विधाने केवळ अलंकरणरूप सुभाषिते ठरतील. तुकोबांची
विधाने सुभाषिते म्हणून वापरताना संदर्भांपासून तोडली जातात. प्रतिमेच्या संदर्भात
बिंब - प्रतिबिंब असे म्हणण्यापेक्षा बिंब - प्रभा असा प्रयोग करणे अधिक युक्त.
कारण संतांच्या काव्यात उपमा - रूपक - उत्प्रेक्षा - दृष्टांताची जी उतरंड येते -
त्यामुळे उपमाने घडतात. उपमेयाला जर बिंब मानले तर ही उपमाने ही त्या बिंबाची
प्रभाच ठरतात. अभंगाचा घाट व प्रतिमा यांच्या संबंधांचा
विचार करता ध्रुवपद हे उपमेय किंवा दार्ष्टान्तिक असते. इतर ओळीतील उपमाने ही
दार्ष्टान्तिकाचाच आशय प्रक्षेपित करीत असतात. परिणामतः आशय व घाटाचा विस्तार होत
असतो. प्रतिमेच्या संदर्भातील पारंपरिक प्रतिमा व अपारंपरिक प्रतिमा हा भेद रूढ
अर्थाने बरोबर नाही . एखादी पारंपरिक प्रतिमा नवी संवेदनशीलता प्रकट करीत असेल,
तर अपारंपरिकच ठरेल. प्रतिमा ही समग्र कलाकृतीच्या संरचनेचा एक
भाग असल्यामुळे त्या संदर्भातच तिचा विचार व्हायला हवा. तुकोबांच्या अभंगांतील
प्रतिमांची काही वैशिष्टये खालीलप्रमाणेः
तुकोबांच्या
उपमानप्रतिमा या सबलनिर्देशक तर उपमेयप्रतिमा दुर्बल निर्देशक दिसतात. त्यांची
मांडणी द्वैती असते पण या द्वैताचा निरास होऊन अद्वैतानुभवाचा प्रत्यय यावा अशी
तुकोबांची मनीषा असते. दुर्बळांमुळेच सबळांचे थोरपण सिध्द होते. भक्तीमध्ये देव आणि
भक्त असे द्वैत असतेच. भक्ती त्यामुळेच रंगते. बौध्दिकता,
चिंतनात्मक विचारप्रवणता, ही
तुकोबांच्या प्रतिमांची वैशिष्टये आहेत. काही मूल्ययुक्त प्रतिमांची
प्रतिपक्षात्मक मांडणी करून तुकोबा आपल्या कल्पकतेची व बुध्दिमत्तेची चुणुक
दाखवितात. कधी एकाच प्रतिमेचा विस्तार करून तुकोबा आपले म्हणणे युक्तिवादपूर्वक
मांडतात. रूपकातिशयोक्ती हे तुकोबांच्या प्रतिमेचे वैशिष्टय आहे. प्रतिकात्मक
प्रतिमा हेही तुकोबांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. रूपकाचा सरळ वापर होऊन निर्माण
झालेल्या प्रतिमा हेही त्यांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. नादप्रतिमा तसेच यमकजन्य
नादसाम्यातून मानसिक पातळीवर जाणवणाऱ्या प्रतिमा हे तुकोबांच्या प्रतिमांचे एक
वैशिष्टय आहे. चेतन व कृतिशीलता हे तुकोबांच्या प्रतिमांचे वैशिष्टय आहे. अमूर्त
अशा आध्यात्मिक तत्त्वांची चिंतनगर्भ प्रतीती ही कृतिशील असल्यामुळे ती तशाच
स्वरूपात अभिव्यस्त होते. तुकोबा एकच प्रतिमा विविध संदर्भात वापरतात. परिणामतः
त्या प्रतिमानाच्या नानाविध गुणवैशिष्टयांचे सूक्ष्मावलोकन कळतेच व त्यामुळे त्या
प्रतिमेची संरचनागत बरीच वैशिष्टये स्पष्ट होतात. उदा. तुकोबांच्या गाथेत
श्वानप्रतिमा एकूण 42 वेळां आलेली आहे.
त्यातून उभक्त दुर्जन व भक्त या उफमेयप्रतिमा समूर्त होतात.
गुणाकडे अवगुण म्हणून पाहिल्यानंतर प्रतिमेचा चेहराच पालटतो व संबंधित प्रतिमेचे
द्विदलत्व लक्षात येते. तुकोबांची प्रतिमासृष्टी विश्वव्यापी आहे. विश्वातील
बारीकसारीक घटकांचा मूल्ययुक्त वापर या प्रतिमासृष्टीत येतो. तुकोबांच्या
प्रतिमासृष्टीत नित्याच्या वस्तू, प्राणी यांचे आधिक्य
आहे. या वस्तू व प्राणी यांच्या सर्वसाधारण अनुभवाचा आधार घेऊन तुकोबा विचार व
भावना यांची खोली केवळ संबंधित वस्तू वा प्राणी यांच्या स्तब्ध वर्णनाने वाढत नाही,
तर त्यांच्या ठायी असलेल्या व्यवच्छेदक गुणांचे
सूक्ष्मावलोकनजन्य नवे व कल्पकतापूर्ण दर्शन ते घडवतात,
म्हणून वाढते. परिणामतः तो अनुभव चित्तात खोलवर ठसतो. काव्यातील प्रतिमांचे हेच
महत्त्वाचे कार्य असते.
तुकोबांच्या
अभंगवाणीतील कथांची कथनमीमांसा करता येऊ शकते. नीतितत्त्वांचा प्रसार करण्यासाठी
कथा हे माध्यम परिणामकारक असल्यामुळे सर्वच संप्रदायांनी या माध्यमाचा वापर केला
आहे. संतांनी नीतितत्त्व व भक्तितत्त्व यांच्या सम्यक प्रसारासाठी कथांचा वापर करणे
स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
कथनगुणपरता हा
कथावाङ्मयाचा समान गुणधर्म तुकोबांच्या अभंगांचा कथनगुणपरतेच्या अंगाने विचार
करायला हवा. शैलीमीमांसा व कथनमीमांसेचा संबंध आहे. रशियन रूपवादी व फ्रेंच
संरचनावादी यांनी कथनपर साहित्याचा नव्या दृष्टीने विचार करून कथनमीमांसेची उभारणी
केली आहे. सोस्यूरची चिन्हमीमांसा ही या कथनमीमांसेचा पाया आहे. रशियन रूपवाद,
संरचनावाद, मानववंशविज्ञान,
भाषाविज्ञान यांनी विकसित केलेल्या मर्मदृष्टींचा शैलीविज्ञान
उपयोग करून घेते.
तुकोबांच्या
अभंगवाणीतील अवतरणक्षम विधानांनी जुन्या - नव्या अशा सर्वच अभ्यासकांचे लक्ष वेधून
घेतले आहे. व्यावहारिक प्रबोधनशक्ती,
सौंदर्यशक्ती यामुळे अवतरणक्षमतेची व्यापकता सिध्द झालेली.
तुकोबांच्या अवतरणांमध्ये एक मंत्रशक्ती आहे. या मंत्रशक्तीचे रहस्य शोधणे,
ही अवतरणे ज्या मुखातून निघाली त्या मुखनायकाचे व्यक्तीमत्व,
अवतरणांचा रचनाबंध, रचनाबंधामुळे
मानवी मनाला होणाऱ्या विविध जाणीवा, अवतरणांतून
प्रत्ययाला येणाऱ्या वैश्विक व सार्वकालीन सत्यामुळे अवतरणांना लाभलेला चिरकालीन
ताजेपणा या गोष्टींचा शोध घेता येतो.
गीतेतील अक्षरे
ही आत्म्याला प्रकट करणारे मंत्रच होत असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे. गीतेच्या
संदर्भात हे जितके सार्थ आहे तितके ते सबंध संतसाहित्याबाबतही सार्थ आहे. म्हणून
संतवाणी ही मंत्रवाणी आहे. मंत्रवाणी ही दैवीवाणी असते. दैवीवाणी ही प्रेरक,
प्रचोदक असते. ही प्रेरकता ती वाणी अखंड वाक्यरूप असते म्हणून
असते. अखंड वाक्यअभंग वाक्य हे महावाक्यस्वरूप असते. महावाक्य हे वैखरीच्या रूपाने
मूर्त होते. मंत्रद्रष्टया ऋषींनी अवर ऋषींना वैखरी स्वरूपातच उपदेशपध्दतीने मंत्र
प्रदान केले. पण याचबरोबर हे मंत्र जेथून अवतरले त्या उगमस्थानाचा साक्षात्कार करून
घ्या असे सुचविले. मंत्राची सार्थकता यातच असते. ज्ञानदेव आत्मा अवतरविते मंत्र
म्हणतात ते आत्मतत्त्व हे उगमस्थान परावाणीचे तत्त्व. म्हणजेच परतत्त्व. यासाठीच
काव्याला परतत्त्वाचा स्पर्श लाभावा असे ज्ञानदेव म्हणतात. तुकोबांनीही माझा शब्द
नव्हे एकदेशी । सांडी गवशी कोणाला ॥ असे का म्हटले,
त्याचे मर्म ध्यानात येते.
महावाक्य
स्वरूपातल्या वैखरीत तुकोबांसारख्या महाकवीचा अनुभव साठलेला असतो. तो आकळण्याऐवजी
त्या अनुभवाच्या स्पष्टीकरणार्थ दिलेली उदाहरणे किंवा स्फुटानुभव वैखरी पातळीवर
आकळतो. यमकतत्त्व,
ध्वनींची पुनरावृत्ती,
ध्वनिविरोधजन्य अर्थविरोध, मानसिक परिणाम करणारे घटक
महत्त्वाचे असतात. थोडक्यात, भाषावैज्ञानिक तत्त्वांचा
वापर करून वैखरीच्या पातळीवरच्या - आलंकारिक कार्य पाडणाऱ्या अंगाला समजून घेता
येते.
तुकोबांची
अवतरणक्षम वचने तुकोबांना अभिप्रेत अर्थाने वापरली जात नाहीत. तुकोबांचे महावाक्य व
त्यातील अवतरणक्षम विधान,
तुकोबांचा महावाक्यांतर्गत अर्थ व चलनातील सर्वसाधारण अर्थ या
पध्दतीने तुलनात्मक तपासणी करता येऊ शकते. तुलनात्मक अध्ययनावरून काही निष्कर्ष
हाती लागू शकतात. तुकोबांची अलौकिक आध्यात्मिक अनुभव व्यक्त करणारी महावाक्ये मराठी
भाषक समाजाकडून लौकिक अनाध्यात्मिक अनुभव व्यक्त करण्यासाठी वापरली जातात. आपल्या
लौकिक कृतींना भव्य परिमाण लाभावे व आपणास कृतकृत्य वाटावे यासाठी तुकोबांच्या
मुखाने आपला अनुभव व्यक्त करण्याची धडपड होते. यात सामान्यांपासून विद्वानांपर्यंत,
वृत्तपत्रीय लेखन करणाऱ्यापासून साहित्यनिर्मिती करणाऱ्या
लेखकापर्यंत सर्वांचा सहभाग असतो. म्हणून ग्रंथांची अन्वर्थक शीर्षके,
सभासमारंभातील भाषणे, दैनंदिन
व्यवहारातील सामान्य संभाषणे, अग्रलेखांची शीर्षके,
ग्रंथांचे उपोद्धात, उपसंहार यासाठी
तुकोबांची भाषा वापरली जाते.
तुकोबांच्या
अभंगवाणीतील पारिभाषिक संज्ञांचा भावार्थविचार समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
वारकरी संप्रदाय हा अनुभवप्रतीतिवादी आहे,
केवळ ज्ञाननिष्ठ नाही. परिणामतः इथे शुष्क अर्थवादाला स्थान
नाही. भावार्थ, संकल्पना यांना महत्त्व आहे. शास्त्राची
परिभाषा ही वाच्यार्थक असते; पण भक्तिमार्गी वारकरी
संप्रदायाची परिभाषा ही स्वानुभवांच्या बोलांची ओल कायम टिकवून ठेवणारी,
भावार्थक अशी आहे असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे. एखाद्या विशिष्ट
क्षेत्राशी संबध्द क्षेत्रनिर्देशक पदे ही त्या क्षेत्राची सर्वसाधारण परिभाषा
असते. ह्या क्षेत्रनिर्देशक पदे ही त्या क्षेत्राची सर्वसाधारण परिभाषा असते. ह्या
परिभाषेला स्तरभाषा (register)
असे म्हणतात. ही परिभाषा क्षेत्रस्थ आचारविचार,
तत्त्वज्ञान, दैवतविचार इत्यादी
बाबींचा निर्देश करणारी असते. कालौघात नवीन संप्रदाय उदयास येणे,
जुन्या तत्त्वज्ञानाची बैठक बदलणे किंवा नवीन तत्त्वज्ञानाची
स्थापना करणे, आचारविचारात बदल होणे वगैरे घडामोडी घडत
असतात. रूपदृष्टया पद तेच असले तरी त्यामागची संकल्पना बदलते. भाषाविज्ञानात याला
अर्थविन्यासात्मक बदल (Semantic
change
) असे म्हणतात.
एखाद्या संप्रदायविशिष्ट लेखकाच्या शैलीचा अभ्यास करताना
त्याच्या साहित्यकृतीत येणाऱ्या संज्ञांपाठीमागचा भावार्थ समजून घेणे हे फार आवश्यक
असते. या अभ्यासामुळे पारंपरिक संकल्पना व संप्रदायविशिष्ट लेखकाची संकल्पना यातील
नाते कळते. हे नाते संकल्पनाविस्तार (extension),
संकल्पनाविपथन (deviation),
संकल्पनालोप (syncope),
संकल्पनाविपर्यय (metathesis)
वगैरे स्वरूपाचे असू शकते. त्यांच्या साक्षेपानुसार संप्रदायाची भूमिका,
लेखकाचे व्यक्तिमत्व यांची कल्पना येते. प्रस्तुत अभ्यासानंतर
जे निष्कर्ष हाती लागतात ते या प्रमाणेः
तुकोबांनी
भारतीय तत्त्वविचारातल्या सर्वच संज्ञा तपासून त्यांच्यातली ग्राह्याग्राह्यता
पारखून त्यांच्या स्वीकारनकाराचे धोरण ठरविले आहे. विशिष्ट संज्ञा ही केवळ ज्ञानरूप
असेल व भावजागृती करीत नसेल तर ती केवळ अर्थवाद करणारी म्हणून टाळलेली आहे.
पारंपरिक
तत्त्वविचारातील संज्ञांची भक्तितत्त्वाशी सांगड घालून त्यांना भक्तिमुखी बनविले
आहे. नामस्मरण हा भक्तीचा अत्युत्तम मार्ग असल्यामुळे योगयागतप व इतर आगमनिगमोक्त
गोष्टींना सपशेल नाकारले आहे. ही नकाराची रीत कधी संज्ञारूपाने स्वीकारायची;
पण त्यात आशय मात्र आपल्याला अभिप्रेत असा भरायचा. याला
संकल्पनाविपर्यय म्हणता येऊ शकते. जीवनाचे ध्येय आध्यात्मिक उन्नती हेच असेल,
तर्ककर्कश चर्चेने ते गाठता येणार नाही. त्यासाठी अंतःकरणात
परमेश्वर ठसविणे आवश्यक आहे. यामुळे अंतःकरणशुध्दी होईल. अंतःकरण प्रभुप्रेममय
करण्यासाठी नामस्मरण हाच उत्तम उपाय असल्याचे त्यांच्या संज्ञा ध्वनित करतात. या
उपायात देहदंड नाही, श्रेष्ठकनिष्ठता नाही,
ज्ञानी - अज्ञानी, जातीपातीचा असा
विषम भेद नाही. एक सामूहिक चळवळ म्हणून वारकरी पंथाने एक विशिष्ट आचारधर्म
स्वीकारलेला होता. त्याचा अनुवाद संतांनी जिवेभावे केला हे तुकोबांच्या पारिभाषिक
संज्ञांच्या भावार्थातून दिसते.
काव्यमीमांसा
मध्यवर्ती ठेवून शैलीमीमांसा कशी होऊ शकते याचे प्रारूप तयार करण्याचा हा प्रयत्न
म्हणता येईल. सबंध गाथा आधाराला घेऊन अनेक उदाहरणांच्या साह्याने ह्या प्रारूपातील
मुद्दे विस्ताराने अन्यत्र चर्चिलेले आहेत.
संदर्भ :
1.
Bethell, S. L.: ‘Shakespeares and Popular
Dramatic Tradition’, P. S. King and
Staples Limited, Westminster, 1944 (Introduction).
2.
Roman Lakobson: ‘Linguistics and Poetics’,
in “Style in Language”,
(ed.) T. A. Sebeok, MIT, Massachusetts, 1960, P. 365.
3.
Paul Kiparsky: ‘The Role of linguistics
in a Theory of Poetry’
in Essays in Modern Stylistics’’
(ed.)Freeman Donald, Methnen, London and
New York, 1981.
4.
कालेलकर,
ना. गो.:
ध्वनिविचार,
मौज प्रकाशन,
मुंबई,
१९९०
पृ.
१३१. |