तुकाराम दर्शन
- प्रस्तावना
डॉ. सदानंद
मोरे हे तुकारामांचे दहाव्या पिढीतले वंशज. स्वत: पिढीजात वारकरी. त्याशिवाय
तत्त्वज्ञ. मराठी भाषेच्या संस्कृतीचा बहुजन समाज हा गाभा आहे. देहूकर मोरे घराणे
जणू त्याच्या केंद्रस्थानी आहे. या घराण्यातून आधुनिक विद्येचा पहिला पदवीधर
होण्याची संधी डॉ. मोरे यांचे वडील श्री. श्रीधरअण्णा यांना लाभली असती. पण त्यांनी
१९४२
च्या स्वांतत्र्य संग्रामात भाग घेतल्याने त्यांची ही संधी
हुकली. तथापि त्यांचे चिरंजीव सदानंद यांनी विद्यापीठीय शिक्षणातील सर्वोच्च पदवी
तर मिळविलीच पण स्वत:च्या कर्तृत्वाने पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक वर्गात
प्रवेश मिळविला.
प्राप्त
परिस्थितीत माणुकसीला धरून पुढची वाट कशी काढावी याविषयी जगभरची व भारतातीलही
नानाविध दर्शने व विचारप्रणाली आज गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अशा वेळी आपल्या
परंपरेशी जैव नाते राखत आणि आपल्या वडिलांच्या व्यासंगी आशिर्वादाच्या कृपेने डॉ.
मोरे मराठी भाषेच्या संस्कृतीचा वेध घेऊन आपण यापुढे कशी वाटचाल करावी याचे
विश्लेषण वारकरी दर्शनाच्या नव्या अभिनव व मौलिक मांडणीतून करीत आहेत. त्यांचा हा
ग्रंथ म्हणजे आत्मभान आलेल्या बहुजन समाजात तुकोबांचा वारसा घेऊन यापुढे जोमाने
नव्या दार्शनिक मांडणीला सुरुवात होणार आहे याचे प्रसादचिन्हच आहे. अशा या प्रेरणा
देणाऱ्या नव्या द्दष्टीच्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे ही गोष्ट मी
मोठ्या
आनंदाची मानतो.
१
प्रथमत: हे
लेखन करण्यामागील डॉ. सदानंद मोरे यांची उद्दिष्टे कोणती,मराठी
संस्कृती, वारकरी परंपरा व तुकोबा यांच्या अन्योन्य
संबंधाविषयी त्यांची धारणा कोणती, कोणत्या शत्रू
/ मित्रांच्या संदर्भात ते संघर्ष/
संवाद करीत आहेत आणि या सर्वांमागे त्यांची स्वत:ची जीवननिष्ठा काय आहे हे मी
थोडक्यात जास्तीत जास्त त्यांच्याच शब्दांत सांगणारे आहे.
वारकरी
संप्रदायाची खूण म्हणून गळयात तुळशीमाळ घालतात. ती
१०८
मण्यांची असते.
डॉ. मोरे यांची लेखमालाही
१०८
लेखांचीच असून
नंतरचे काही लेख तिला जणू पूरक म्हणून त्यांनी समाविष्ट केले आहेत. एखाद्या
साप्ताहिकामधून एखाद्या मूलभूत,
तात्विक विषयाची, तीही नवी अशी
मांडणी करणे सोपे नसते. अशा वेळी आपल्या 108 लेखांच्या
धारावाही मांडणीत त्या मर्यादा ओलांडून मोरे यांनी मराठी संस्कृतीचे व तिच्या भागवत
संप्रदायी सत्त्वधारेचे स्वरूप साररूपाने आपल्या पुढे मांडले आहे. ते मांडताना
त्यांची उद्दिष्टे आपल्याला लक्षात घेतली पाहिजेत.
ते असे
रास्तपणे मांडतात की,
ज्याला महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे
त्याला तुकोबा ही मोक्याची जागा पकडावी लागेल. तुकोबा हा सांस्कृतिक टेहळणीसाठी
मोक्याचा बुरुज आहे. येथून चौफेर द्दष्टिक्षेप टाकता येतो,
आणि एरवी नजरेरून सुटणाऱ्या अनेक बाबी अचूकपणे टिपता येतात.
त्यांच्या मते तुकोबा एक सम्यक् सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आहे,
म्हणूनच तुकोबांच्या व्यक्तित्वाचा वेध थेट ज्ञानदेवांपर्यंत,
खरे तर पुंडलिकापर्यंत पोहचला व दुसऱ्या बाजूला शिवकाल,
उत्तर मराठेशाही, पूर्वोत्तर पेशवाई
आणि अव्वल इंग्रजी काळातील प्रबोधन इत्यादि टप्पे ओलांडत थेट इथे आणि आत्ता अशा
जिवंत वर्तमानात उतरतो.
ही
धारणा बाळगून या मालेची तीन प्रमुख उद्दिष्टे ते नमूद करतात. संतविषयक सर्वसाधारण
गैरसमजांशिवाय स्वत: तुकोबा या व्यक्तिविषयकही अनेक चुकीच्या कल्पना रूढ आहेत. त्या
दूर करून तुकोबांचे यथार्थ दर्शन घडविणे हे पहिले उद्दिष्ट. महाराष्ट्राचे
संस्कृतीपुरुष म्हणून तुकोबांचे वेगवेगळया कालखंडांमधील वेगवेगळया व्यक्तिंनी आणि
सांस्कृतिक समूहांनी मूल्यमापन केले. त्यातून तुकोबांचे दर्शन घडते. त्याशिवाय त्या
त्या व्यक्ति व व्यक्तिसमूहांचेही दर्शन आपोआप घडते. ते एकत्रितपणे प्रकट करणे हे
दुसरे उद्दिष्ट. अर्थातच संबंधित व्यक्ती वा समूहांना तुकोबा नेमके असेच का दिसले
यामागील कार्यकारण भावाचा हा तिसरा उद्देश. या तिहेरी प्रक्रियेतून महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक इतिहासाचा पट उलगडायला मदत होते. ही सिध्दी पण त्यांना मिळवायची होती.
वेगळया भाषेत
मांडायचे म्हणजे तुकोबांच्या अभंगांमधून त्यांचे दर्शन घडविणे हा या लेखमालेचा
प्रधान हेतू नव्हता. त्याचप्रमाणे तुकोबांसंबंधी कोणी काय लिहिले आहे,
याचा आढावा घेणे हेही तिचे उद्दिष्ट नव्हते. भाविक विवेचनाला
त्यात स्थान नव्हते, तर पारलौकिक आणि लौकिक किंवा
तत्त्वदर्शन व व्यवहार असे कप्पे न पाडता तुकारामरुप महाराष्ट्र संस्कृतीचे
मूल्याधिष्ठित व सर्जनशील विश्लेषण करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या पुस्तकात
तुकोबांचा गौरव करण्याचा किंवा त्यांचे उन्नयन करण्याचा खटाटोप नाही. तुकोबांचा
मोठेपणा इतका आहे, की असल्या गोष्टींची त्यांना गरजच
नाही. मराठी संस्कृतीची चोख समीक्षा व्हावी आणि त्याकरिता तुकोबांच्या दर्शनाचा
अंजन म्हणून उपयोग व्हावा अशी त्यामागे धारणा आहे. झाले असेल तर एवढेच की तुकोबांचे
देणे तुकोबांना देण्यात कुणी खळखळ केली असेल तर त्याचे माप त्याच्या पदरात टाकण्यात
आले आहे.
मराठी संस्कृती,
वारकरी दर्शन व संप्रदाय आणि तुकाराम यांच्याविषयी डॉ. मोरे
यांची धारणा पुढीलप्रमाणे सांगता येईल. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य
प्रवाह. तुकोबांना समजावून घेतले म्हणजे वारकरी परंपराच समजली;
म्हणजेच मराठी संस्कृतीच्या आकलनाची कळच हातात आली. तुकोबांचे
विचार हे वेगळे आणि स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या मांडणीची सुरुवात प्रथम
ज्ञानदेवांनी केली. तुकोबांनी ते पूर्णतेला नेले. ही वारकरी परंपरेची निर्मिती
असल्याने म्हटले तर ते वारकऱ्यांचे स्वतंत्र दर्शन आहे. पण त्याचबरोबर ते
तुकोबांमध्ये परिपूर्ण स्वरूपात दिसत असल्याने तुकोबांचे दर्शन आहे. ज्ञानदेव,
नामदेव, एकनाथ,
तुकाराम या क्रमाने ते पूर्णत्वाला पोहचले. ही एक आत्मभान
असणारी परंपरा आहे. त्यात भेद नाहीत तर एक अखंड संवाद आहे. म्हणूनच कालद्दष्टया
पहिल्या तिघांचेही संस्कार व विचार तुकोबांच्या ठायी एकवटले आहेत. त्यामुळे
तुकोबांचे आकलन या सर्वांच्या आकलनाला उपकारक ठरते. या स्वायत्त दर्शनाच्या व
परंपरेच्या संदर्भात ज्ञानेश्वर व तुकाराम यांत भेदाभेद करणे हे वारकऱ्यांच्या लेखी
महापाप. त्यांना पाहायचे तर वारकरी होऊन पाहावे. ज्ञानोबा-तुकाराम हा वारकऱ्यांचा
मूलमंत्र, ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ तुकोबांच्या
अभंगांनी आणि अभंगांचा अर्थ ओव्यांनी उलगडून दाखवणे ही खास वारकरी पध्दती
देहूकरांमध्ये चालत आलेली.
डॉ. मोऱ्यांना
बहुपरिमाणी तुकोबांचे दर्शन ही काही सोपी बाब नव्हे असे रास्तपणे वाटते. म्हणून
त्यांची मांडणी एका वेगळया पध्दतीची आहे. पूर्वसूरींना तुकोबा कसे दिसले,
कसे समजले याचे दर्शन ते पहिल्यांदा घडवतात. पण एवढेच सांगणे
पुरणार नाही. म्हणून त्या दर्शनांचे विश्लेषण करून त्यांची काही कारणमीमांसा करता
येते का, याचा प्रयत्नही ते करतात. ही कारणमीमांसा
आवश्यक तेथे व्यक्तिगत, तर आवश्यक तेथे सामाजिक आहे असे
त्यांना वाटते. तुकोबांच्या व्यक्तित्वाचे कोणते पैलू कोणाला दिसले,
कोणते दिसले नाहीत, का दिसले व का
दिसले नाहीत इत्यादि प्रश्नांची चर्चाही ते करतात.
या दर्शनाची
सुरुवात तुकोबांच्या समकालिनांपासून होणार असे वाटणे स्वाभाविक असताना ते सुरवात
करतात ते थेट ज्ञानदेवांपासून आणि येतात पार समकालीन दिलीप पुरुषोत्तम
चित्र्यांपर्यंत. या प्रदीर्घ कालखंडातील तुकारामदर्शनांचा वेध हा आपोआपच मराठी
संस्कृतीमधील स्थित्यंतरांचा आलेख ठरतो. झाले दर्पणाचे अंग,
ज्याचा त्यासी दावी रंग असे तुकोबांनी स्वत:बद्दल म्हटले आहे.
मोरे ठासून सांगतात, की आपल्या समकालिनांना तुकोबा
त्यांचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा ठरले. पण त्यांचे हे दर्पण असणे अजूनही संपलेले
नाही. तुकोबांना त्यांच्या उत्तरकालिनांनी जो प्रतिसाद दिला,
त्यातून त्यांची स्वत:ची इयत्ता आणि गुणवत्ता यांचे दर्शन घडतेच,
तुकोबांचे आपल्याला घडणारे दर्शन हे आपले स्वत:चेही दर्शन असते.
ती आपल्या द्दष्टीची परीक्षाही असते.
तुकारामदर्शन
म्हणजे मराठी संस्कृतीचे दर्शन म्हणायला आणखी एक निर्णायक कारण आहे. त्याच्या अतूट
संबंधाचे बीज भाषिक आहे. मराठी भाषेवर व म्हणूनच मराठी संस्कृतीवर तुकोबांचा प्रचंड
ठसा आहे. राजारामशास्त्री भागवतांच्या शब्दांत आम्हा मराठयांचा आगम खरोखर मराठीत
आहे,
संस्कृतात नाही. आम्हा मराठयांस श्रुती,
स्मृती, वेदांतभाष्याची गरज नाही.
ज्ञानेश्वरी व तुकारामबुवांची गाथा म्हणजे आमचे आगम. भाषा,
संस्कृती, तत्त्वज्ञान व जीवन यांचा
हा एकात्म संबंध लक्षात घेतला तर तुकोबा समजून घेतल्याने मराठी माणसालाच नव्हे तर
तुकोबांची भाषिक गुणवत्ताच अशी की जगातल्या कुठल्याही माणसाला आत्मभान गवसेल.
तुकोबांच्या भाषेत गुंफल्या गेलेल्या आत्मभानाला तोड नाही. ते व्यापक होते,
एकसंध होते. त्यांच्या या अभंग आत्मप्रत्ययामुळे आत्मनिष्ठा आणि
सामाजिकता यातील द्वैत विरून जाते. आमुचा स्वदेश । भुवनत्रयामाजी वास ॥ असे
म्हणणाऱ्या तुकोबांच्या आत्मप्रत्ययाचा आवाका; देश,
धर्म, जातींच्या सीमा ओलांडून एकूण
मानवतेलाच कवेत घेणारा आहे. तुकोबांच्या या भूमिकेमुळे मराठी संस्कृतीला व माणसाला
स्वत:चा अस्सलपणा राखून वैश्विकतेला जैवपणे जोडणारा एक शुध्द जीवनरसच लाभला आहे.
तुकारामदर्शनाची मांडणी डॉ. मोरे एका विशिष्ट सामाजिक - सांस्कृतिक संदर्भात करीत
आहेत. एकाच परंपरेत वेगवेगळे अंत:प्रवाह संभवतात,
मतभेदही संभवतात ह्या वस्तुस्थितीची जाणीव मनाशी सदैव बाळगत
बाळगत महाराष्ट्रातील प्राचीन , अर्वाचीन ,
तसेच सनातनी, पुरोगामी तसेच ब्राह्मण,
ब्राह्मणेतर परंपरांनी तुकोबांकडे कोणत्या द्दष्टीने पाहिले,
त्यांना कोणत्या प्रकारचा प्रतिसाद दिला,
यांचा विचार मांडताना हे संदर्भ महत्त्वाचे ठरतात. कारण
त्यावरून डॉ. मोरे कोणत्या शत्रू - मित्र वाचकांशी संघर्ष संवाद साधू पाहात आहेत
याचाही उलगडा होतो.
त्यांच्या मते
या मांडणीचा एक संदर्भ असा;
की गेल्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तुकारामदर्शन स्वायत्त
असल्याने अबाधित होते. परंतु त्यानंतरच्या काळात वारकरी संप्रदायाशी मुळात संबंध
नसलेली काही मंडळी त्यात घुसून गीता-भागवताला व ज्ञानेश्वरी-गाथेला वेदोपनिषदांच्या
चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करून संप्रदायाचे स्वरूपच बिघडवीत आहेत. खरे तर ते
त्यांनी बिघडविलेलेच आहे. या उच्चस्तरीय पोपटपंची करणाऱ्या धर्मठकांची वारकऱ्यांना
झालेली लागण सदानंद मोरे यांना दूर करावयाची आहे. महाराष्ट्रातल्या काही मंडळींना
ज्ञानदेवांनी वारकरी असणे रुचत नाही. ते ज्ञानदेवांना तुकोबांपासून तोडून तुकोबांना
गौण स्थान देऊ पाहतात. म्हणूनच तुकारामकालीन महाराष्ट्रात ज्ञानाच्या सर्व किल्ल्या
ब्राह्मणांच्याच कमरेला असल्यामुळे तुकोबा किती खोल पाण्यात आहेत हे अनुभवलेल्या
रामेश्वर भट्टांना म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा हे समकालीन
ब्राह्मणांना सांगावे लागते यातच महाराष्ट्रातील ज्ञान,
अभ्यास आणि अधिकार यांचा पूर्ण आलेख आलेला आहे, ही गोष्ट
डॉ. मोरे यांना आवर्जून प्रगट करावी लागते. आणि मग तुकारामकालीन परिस्थितीत आजही
काही गुणात्मक फरक पडला आहे, असे म्हणायला निदान मला तरी
जागा दिसत नाही असे ते साधार म्हणतात त्याचे रहस्य आपल्याला कळते.
याच
संदर्भात डॉ. मोरे यांना सनातन परंपरा आणि वर्तमानकालीन आधुनिक बुध्दिवाद यांची
कप्पाबंद विभागणी करणाऱ्या व म्हणून तुकारामरूप बहुजनांपासून तुटलेल्या अभिजनवादी
उच्चशिक्षितांकडे वळावे लागते. आधुनिक महाराष्ट्रातील उपयुक्ततावादी बुध्दिवादी
तसेच यांत्रिक जडवादाच्या छायेत वावरणारे मार्क्सवादी प्राचीन भारतीय अभिजात परंपरा
आणि पाश्चात्य नवविचार ही दोनच विश्वे गृहीत धरतात मराठी संतांच्या विचारांचे एक
स्वतंत्र विश्व आहे हे त्यांना उमजतच नाही. त्यांनी गृहीत धरलेली दोन विश्वे फारच
थोडया लोकांसाठी अस्तित्वात होती. येथील बहुसंख्य समाज तिसऱ्या विश्वात वावरणारा
आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या तिसऱ्या विश्वातील समृध्द
शक्तिमत्तेमुळे इतर दोन विश्वांची कोणताही ताण निर्माण होऊ न देता सांधेजोड होऊ
शकते हे त्यांना कळतच नाही. असे विचारवंत मराठी संताचे अर्थातच तुकोबांचे विश्व ही
प्राचीन अभिजात विश्वाची बाळबोध प्रतिकृती मानतात,
व म्हणून ती अनावश्यकही ठरवतात. ते या भरात ज्यावेळी
तुकोबांविषयी व म्हणून मराठी परंपरेविषयी तुच्छतेने उद्गार काढतात त्यावेळी डॉ.
मोरे यांना त्यावर शरसंधान करावेच लागते. बोलूनचालून आहेत ते तुकोबांचेच वंशज !
या
संदर्भात डॉ. सदानंद मोरे यांची वैचारिक भूमिका समजावून घेतली तर आपल्याला या
ग्रंथाचे मर्म समजावून घेता येईल. पाश्चात्य पध्दतीने विचार करणाऱ्या आपल्या
विद्वानांना भारतीय संदर्भात धर्म आणि राज्य यांचा संबंध कसा असला पाहिजे याची
कल्पना करता येत नाही. तसेच येथील सेक्युलॅरिझम सुध्दा पाश्चात्य वळणाचा असण्याची
गरज नाही,
हेही समजत नाही आणि परिणामत: ते जनसामान्यांकडून अलग पडतात,
काही वेळा तर हास्यास्पद बनतात असे मोऱ्यांना वाटते. राजा,
राज्य, शासन या उपटसुंभ पण अटळ
आपत्ती आहेत. परंतु पाश्चत्य राज्यसंस्था आणि भारतीय राज्यसंस्था यांच्या विकासात
एक महत्त्वाचा फरक आहे. राज्यसंस्था आणि यांच्या विकासात एक महत्त्वाचा फरक आहे.
राज्यसंस्था आणि धर्मसंस्था यांच्या संघर्षातून तिकडे सेक्युलॅरिझमची कल्पना
निघाली. परंतु राज्यसंस्था धर्माच्याच वळणावर जाऊन लोकांच्या डोक्यावर बसू लागली.
'सिव्हिल सोसायटी' आणि
'स्टेट'असे नवे द्वैत उत्पन्न झाले.
हा झाला पाश्चात्य राज्यसंस्थेच्या विकासाचा क्रम. भारतात एकतर धर्मसंस्था आणि
राज्यसंस्था असा विरोध दिसत नाही. आणि दुसरे असे की औपचारिक लोकशाही नसतानाही
सत्तेचे आणि अधिकारांचे मोठया प्रमाणावर विकेंद्रीकरण भारतात पहिल्यापासून आहे.
त्यामुळे वरील तऱ्हेचे 'सिव्हिल सोसायटी'
विरुध्द 'स्टेट'
हे द्वंद्व येथे उत्पन्न झाले नाही. येथे केंद्रस्थानी कोणाचेही
राज्य आले तरी सामान्य माणसाला त्याची पर्वा नसे. म्हणून राजवाडे प्रभृती मंडळी
भारतीय मानसिकतेला दूषण देतात ते त्यांनी आधुनिक राष्ट्र - राज्य संकल्पना
पश्चिमेकडून घेतल्यामुळे असा अन्वयार्थ डॉ. मोरे लावू पाहतात. आशियाई शासने दमनसाधन
म्हणून युरोपीय शासनांपेक्षा वेगळया प्रकारची होती, अशी
कबुली काही मार्क्सवादी विचारवंतांनी केल्याचा दावाही ते मांडतात. थोडक्यात आशियात
भारतीय आणि भारतात परत मराठी राज्यपध्दतीचा विचार वेगळया रीतीने करावा लागतो हे
त्यांचे म्हणणे.
डॉ. सदानंद
मोरे यांच्या या द्दष्टिकोनाच्या बुडाशी आणखी एक खोल तत्त्व आहे. जीवनाचे आत्मनिष्ठ
आणि सामाजिक असे दुभंगलेपण मान्य केल्यावर त्यावर मात करण्यासाठी,
मेळ घालण्यासाठी आपण राज्यसंस्था नावाच्या तिसऱ्याच गोष्टीच्या
विषारी वर्तुळात अडकतो. यासाठी समाजरचनाच बदलली पाहिजे हा एक मार्ग. परंतु हा बाह्य
मार्ग झाला. या बाबतीत उदारमतवादी आणि त्यांचे शासन किंवा उलट मार्क्सवादी आणि
त्यांचे शासन प्रश्न अधिकच जटील बनवतात. म्हणून परत एकदा व्यक्तीला तिची सामाजिकता
पटावी, नैसर्गिक वाटावी, आपण
इतरांनाही जबाबदार आहोत, अशी भावना तिच्यात निर्माण
व्हावी असे पाहिले. उठसूट आपले प्रश्न शासनाकडे किंवा अन्य संस्थांकडे न सोपवता
त्याबाबतचे आपले कर्तव्य अगोदर पार पाडायला शिकविले पाहजे,
त्यातून आपला लाभ झाला नाही (किंबहुना हानी झाली) तरीही.
साहित्यात काय, किंवा शासनात काय,
साहित्यिकांचा आणि शासनकर्त्यांचा दुभंगलेपणा प्रतिबिंबीत होत
असतो, म्हणून तर भूमिका (रोल) बदलली की,
माणूसच बदलल्यासारखा वाटतो असे डॉ. मोरे यांना मनोमन वाटते.
तुकोबासांठी
वैयक्तिकता आणि सामाजिकता,
आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोन भिन्न बाबी भिन्न नाहीतच.
म्हणूनच मन आणि जन, आत्मविष्कार आणि उपदेश,
करुणा आणि क्रोध, औचित्य आणि कठोर
समीक्षा, माणूस आणि निसर्ग यांच्यातला दुभंगलेपणा
तुमाराम मानत नाहीत. मुख्य म्हणजे असल्या द्वंद्वांवर मात करून निरपेक्ष,
नैतिक, आनंदभावी अशी सर्व जडचेतन
विश्वाची सर्वसमावेशक जीवनद्दष्टी व आत्मनिष्ठा वेळोवेळी घनघोर संग्रमांचे आव्हान
सहजगत्या स्वीकारून जगून दाखवतात. हेच त्यांच्या जीवनाचे सार,
हेच वारकरी परंपरेचे दर्शन, हेच
ज्ञानोबा - तुकोबा नामजपाचे इंगीत.
२
आता या
प्रकाशात लेखांक दोन ते सदतीस व नंतर एकशेएक व एकशेतीन या लेखांतून मोरे
तुकोबांच्या आरशात आधुनिकपूर्व मराठी संस्कृतीचे अंतरंग कसे दिसते याचा उलगडा
करतात. त्यातून आपल्याला स्वतः तुकोबा,
ज्ञानोबा - तुकोबा; वेद,
प्रस्थानत्रयी, वेदांत,
वेदप्रामाण्य; तत्कालीन ब्राह्मण
समाज व त्याचे ब्राह्मणेतरांशी नाते; तत्कालीन हिंदु -
मुसलमान संबंध, तत्कालीन स्त्रीविषयक द्दष्टिकोन,
तत्कालीन धर्मसत्ता व राजसत्ता यांच्यातील अन्योन्यसंबंध,
तत्कालीन संप्रदायांच्या एकमेकांविषयीच्या धारणा आणि खुद्द
तुकोबांचे स्वतःचे विश्व व त्यांच्या कुटुंबियांचे जग उजळून दिसते.
तुकोबांचे
व्यक्तित्व कमालीचे आत्मनिष्ठ होत. आपल्या ज्ञानाचे,
वाणीचा, अभंगांचा झरा साक्षात ईश्वरी
स्फूर्ती हाच आहे अशी त्यांची धारणा होती. फार मोठी किंमत देऊन त्यांनी हा अनुभव
घेतला होता. म्हणून आपण श्रुतीचे अंकित नसून साक्षात ईश्वराशी संबंध असल्याच्या
खात्रीपोटी आणि वेदांचे अध्ययन न करताही तुकोबांनी वेदांची खंडे निवडण्याचे धारिष्ट
ईश्वरी प्रसाद लाभल्याच्या डोळस अनुभवामुळेच केले. अशा निमित्ताने दिसणारे वेद व
त्यांच्या विचारातील अर्थसाम्यमूळ वेद नसून वेदांचे जे मूळ म्हणजे ईश्वरच आहे अशी
त्यांची धारणा होती. ईश्वरानेच आपली निवड केली आणि आपल्याला अभिषिक्त केले अशी बेडर
भूमिका म्हणूनच ते घेऊ शकले.
हेच सत्य
अनुभवाने प्रतित झालेल्या ज्ञानदेवांनी गीता नामक स्मृतीला वेदांपेक्षा जास्त
प्रामाण्यदर्जा देऊन,
प्रामाण्याच्या क्षेत्रात जणू 'कोपर्निकन
क्रांती' घडवून आणली. ऋषींच्या वाणीहून परमात्म्याच्या
वाणीला प्रमाण मानल्याने ज्ञानदेवांनी गीतेच्याच जोडीला अन्य दोन प्रस्थानांवर
भाष्ये करण्याची प्रथा मोडली. या भूमिकेची पूर्तता एकनाथांनी केली. त्यांनी
कृष्णवाणी असलेल्या एकादशस्कंधावर मराठीत भाष्य लिहिले. तेव्हापासून मातृभाषेला
प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीची साथ घेऊन ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हीच
वारकऱ्यांची प्रमाणे आणि प्रस्थानद्वयी. ही बैठक एकदा पक्की असली म्हणजे वेदांची
व्यापक प्रमाण चौकट स्वीकारण्यामुळे काही बिघडत नाही,
असे मोऱ्यांना दिसते.
याच पध्दतीने
गुरुपरंपरेला वारकरी परंपरेने कसा छेद दिला हे कळते. नाथपंथ या गुरुमार्गी परंपरेचे
वारसदार असताना सुध्दा गहनीनाथ आणि म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञान संक्रात
करण्याच्या पध्दतीत एक क्रांतिकारक कृती केली. मेघवृष्टीने करावा उपदेश । परि
गुरुने न करावा शिष्य अशी नवी उन्नत द्दृष्टी वारकरी संप्रदायाला लाभली.
निवृत्तीनाथ हे पारंपरिक अर्थाने वारकरी संप्रदायाचे अखेरचे गुरु ठरतात. त्यानंतर
गुरु हा शब्द राहिला असेल पण वजन आणि परिमाण दोन्ही बदलली. या संदर्भात
अद्वैतशास्त्र न आवडणाऱ्या तुकोबांनी स्वप्नात बाबाजी चैतन्यांकडून रामकृष्णहरी हा
मंत्र घेण्याच्या कथेच्या निमित्ताने तुकोबांनी परंपरेला कलाटणी कशी दिली व गुरु
हाच देव या पारंपरिक समजुतीऐवजी देव हाच गुरु ही उघडया मंत्राची रीत कशी सिध्द
केली याचे मोरे फार मार्मिक वर्णन करतात. गुरु फार तर ब्रह्मज्ञान देऊ शकतात पण
विठोबाची प्रेमखुण देऊ शकत नाहीत,
पण संत नेमके ते करतात. प्रेमाची अवस्था ही ईश्वरी ज्ञान पोटात
घेऊन पुढे जाण्याची आहे. व हे रहस्य सर्वांपुढे प्रेममय जीवनाकरता प्रगट करणे ही
वारकरी परंपरेची देणगी आहे व तिची स्पष्ट मांडणी तुकोबांच्या अभंगांमधून सापडते.
याच संदर्भात
वारकऱ्यांचे आणि अर्थातच तुकोबांचे प्रतिपादन पूर्वमीमांसक,
शंकराचार्यादि पंडित तसेच लोकमान्य टिळकांपेक्षा वेगळे आहे.
भक्तीची प्राप्ती हे कार्य आणि त्यासाठी ब्रह्मज्ञान हा मार्ग किंवा कारण हा
तुकोबांचा मुद्दा मात्र पारंपरिक, कार्यकारणक्रमाची
उलटापालट आहे. म्हणजेच भक्तीशिवाय ज्ञान सांगणे त्यांना मान्य नाही. पाखंडी ठरतो.
दोघेही वेदप्रामाण्यवादी. पण एवढा मोठा फरक. त्यामुळे तुकोबा हे एक ऋषीच आहेत असे
प्रतिपादन मोरे करतात.
असे असेल तर
वारकऱ्यांनी वेदप्रामाण्य का नाकारले नाही?
डॉ. मोरे यांच्या मते वेद तेव्हाचा कायदा,
घटना, 'पॅरॅडाईम'
च होता व मुख्य म्हणजे जनमानसावर त्याचा पगडा होता. अशावेळी
वेदप्रामाण्य मानल्यामुळे सुधारणावाद हा कमअस्सल होतो हा समज मोऱ्यांना भाबडा,
अनैतिहासिक, साहसवादी वाटतो.
वेदप्रामाण्य हा शब्द या संदर्भात आधुनिकांना व सुधारकांना चकवतो,
त्यांचा गोंधळ होतो. म्हणून वारकऱ्यांना प्रतिगामी मानणारे
आधुनिक आणि त्यांना आपल्या कळपात ओढू इच्छिणारे परंपरागत यांच्या गफलती स्पष्ट
करण्याकरता वेदांताचे सार सांगताना गोब्राह्मणहिता होऊनि निराळं । वेदांचे ते मूळ
तुका म्हणे म्हणजे वेदांचे मूळ गोब्राह्मणाहितापेक्षा वेगळे आहे असे तुकोबा ठामपणे
सांगतात ही गोष्ट डॉ. सदानंद मोरे यांना फार महत्त्वाची वाटते. हा मुद्दा त्यांनी
इतका आवेशाने मांडला आहे की त्या भरात त्यांनी तुकोबांना ज्ञानोबांच्या तुलनेत जादा
गुण बहाल केले आहेत.
याचमुळे
तुकोबांनी उच्चवर्णीय नसणे,
त्यांना वेदांचा अधिकार नसणे,
त्यांनी औपचारिकरीत्या अध्ययन केलेले नसणे या गोष्टींचे भांडवल करणाऱ्या
तुकारामशत्रू खोडसाळ पंडितांचा प्रतिवाद तुकारामांनी कसा केला हे पाहण्यासारखे आहे.
वेद हे ब्रह्मज्ञानाचे एकमेव प्रमाण नाही. वेदज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांच्यात
अनिवार्य संबंध नाही. समकालीन वेदवेत्ते ज्ञानहीन असून आपणाला वेदांचा अधिकार
नसूनही आपण ज्ञानी आहोत, असा तुकोबांचा धाडसी दावा होता
असे मोरे सप्रमाण दाखवतात.
हेच तुकोबा
ज्ञानदेवांना कशी मानवंदना देतात व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार अन्य कोणीही अजून
सांगू शकले नाहीत अशा अचूकपणे आणि कमीत कमी शब्दांत कसे मांडतात हे मोऱ्यांनी अगदी
दुसऱ्या लेखातच आग्रहाने व आवर्जून सांगितले आहे. म्हणूनच मुलाला जसे आईबाप प्रिय,
तसे वारकऱ्यांना ज्ञानोबा - तुकाराम प्रिय असतात. आणि या
धारणेच्या अधिष्ठानावर वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाच्या
समंधांची आपल्यापुरती वाट केव्हाच लावली आहे असा निष्कर्ष ते आपल्याला सादर करतात.
सामाजिक - राजकीय कार्य निरपेक्षपणे पार पाडणारे कार्यकर्ते व त्यांच्या घरातील
मंडळी यांच्यातील नात्याच्या संदर्भात लोकांची या प्रश्नाकडे पाहण्याची रीत किती
बोथट व अजब असते याची जाण मोऱ्यांना आहे. आणि म्हणूनच तुकोबा व त्यांचे बंधू
कान्होबा आणि त्याहूनही मुख्य म्हणजे तुकाराम व जिजाई यांच्यातील परस्परसंबंधाचे व
भावभावनांचे एक अतिशय हृद्य, संवेदनशील,
ताणतणावांमागील माणुसकीचा गहिवर टिपणारे चित्रण त्यांनी
आपल्याला दिलेले आहे.
तुकोबांचे समकालीन रामेश्वर भट हे ज्ञानदेवांचे भक्त होते.
परंतु वारकरी नव्हते. ज्ञानदेवांचा अर्थ सांगण्याचा तुकोबांचा अधिकार हळूहळू
ब्राह्मणांना मान्य होऊ लागला होता म्हणून त्यांनी तुकारामांना कडवा विरोध केला. पण
काही चमत्कारांनी रामेश्वरांना तुकोबांची खात्री पटली. हा जसा तुकोबांचा वैयक्तिक
प्रभाव होता, तसाच तो ज्ञानोबा - तुकाराम या वारकरी
परंपरेचाही होता असे मोरे आवर्जून सांगतात.
हिंदु
- मुस्लिम संघर्षाचा आणि संबंधाचा मराठी अनुभव हा अन्य ठिकाणच्या अनुभवापेक्षा
निश्चित वेगळा आहे. मराठयांनी इस्लामाला आत्मसात केले. म्हणून त्यांचे स्वतंत्र
राज्य उभे राहू शकले. मराठे कोणत्याही प्रकारच्या इस्लामगंडापासून मुक्त राहिले.
दरबारी लाळघोटेपणा किंवा अलिप्तपणा या दोन्ही प्रतिक्रिया मराठयांच्या नव्हेत.
मराठी संस्कृती आणस इस्लाम यांच्यात एक प्रकारचे निकोप राज्य साकार झाले. या
संस्कृतीची जडणघडण करण्यात वारकरी पंथाचा व साधुसंतांचा मोठा वाटा होता हा
मोऱ्यांचा सिध्दांत तुकोबांची दख्खनी हिंदीतली रचना,
कबीरांना वारकरी परंपरेने संत म्हणून सामावून घेणे,
तुकोबांनी कबीर आणि इतर मुस्लिम साधुंची घेतलेली दखल तसेच तुकोबांचे समकालीन शेख
महंमद हे श्रीगोंद्याचे संत, पेशवाईतला सगनभाऊ हा
मुसलमानी शाहीर, या दोघांचे वारकरी परंपरेबद्दलचे उद्गार,
मालोजीराजांनी स्वीकारलेले शेख महंमदांचे शिष्यत्व यांच्या
प्रकाशात तुकोबा व त्यांच्या परिसरातील अनघडशा फकिर यांच्यातील प्रेममय नात्याचा
उलगडा ते करतात. जाताजाता असले चमत्कार व कथा याविषयी संशय व्यक्त करण्याऱ्या वा.
सी. बेंद्रेसारख्या इतिहास संशोधकांच्या 'पॉझिटिव्हिस्ट'
भूमिकेवर तडाखेही हाणले आहेत !
त्यानंतर
तुकोबांच्या ब्राह्मण शिष्या बहिणाबाई, त्यांचे वारकरी
वर्तुळाला मान्य असणाऱ्या वज्रसूचीचे मराठी भाषांतर, आणि
त्यांना स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी अवकाश देणाऱ्या वारकरी परंपरेच्या थोरपणाचा
परामर्श मोरे घेतात. मात्र तुकारामोत्तर वारकरी संप्रदायाला बहिणाबाई पचनी पडल्या
नाहीत. निदान आजच्या वारकरी नेतृत्त्वाने तरी बाईंची उपेक्षा थांबवली पाहिजे असे
प्रांजळ व स्पष्ट मत व अपेक्षा ते व्यक्त करतात.
नंतर समकालीन राजसत्तेच्या संदर्भात मुसलमानी सत्तांकडून इनामे मिळवण्यात दंग
झालेल्या समकालीन महंतांच्या संदर्भात आपुलकीवर आधारलेली समाजाभिमुखता राखून सुध्दा
आचरणात आणलेला अंतिम टोकाचा निःस्पृहपणा तुकोबा या ध्रुवताऱ्याने कसा सिध्द केला
याचे फार मनोज्ञ दर्शन डॉ. मोरे आपल्याला सादर करतात,
त्याचवेळी ही गोष्ट वरवर जरी थोडी विसंगत भासली तरी पेशवे सोडून सर्व मराठी
सत्ताधाऱ्यांनी तुकारामांच्या वंशजाकडे कसे आपुलकीने पहिले याची कहाणी सांगतात. हे
सूत्र ते पार श्री. शरद पवार यांजपर्यंत आणून पोहचवतात.
डॉ.
मोरे यांनी तुकोबा आणि शिवाजी या दोन मराठी महापुरुषांची एक अभिनव तुलना केलेली
आहे. तुकोबांपुढे राज्य राजकारण अशा बाबी प्राधान्याने नसल्यामुळे तुकोबांपुढे
राज्य, राजकारण अशा बाबी प्राधान्याने नसल्यामुळे
तुकोबांनी परंपरेला शरण जाऊन 'मीही क्षत्रिय आहे,
द्विज आहे, मला जनकादिकांप्रमाणे
वेदाचा अधिकार आहे' असा युक्तिवाद न करता ईश्वरी
प्रसादाचा दावा सांगून केला सामरस्ये अभिषेक अशी भूमिका घेतली. तो मान्य करणारे व
इतरांनाही मान्य करायला विनादक्षिणा सांगणारे ब्राह्मण तुकोबांना भेटले. म्हणून
त्यांचे कार्य अधिक बिकट न होता दिग्विजयी ठरले. पण स्वजातीय रांगडया सरंजामदारांना
मोडणाऱ्या शिवरायांना समर्थ रामदासांसारख्या समर्थकांनी ठाम भूमिका न घेतल्याने व
त्यांचे क्षेत्रच राजकारणाचे असल्याने सनातनी पंडितांशी तडजोड करावी लागली. यामुळे
तुकोबांच्या भूमिकेमुळे मराठी संस्कृतीला जणू शुध्द जीवनरसच लाभला,
तर शिवाजी महाराजांच्या तडजोडीने महाराष्ट्र शक्तीचा अगदी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अमाप अपव्यय झाला, असा
निष्कर्ष डॉ. मोरे काढतात.
देहू
व देहूकरांच्या संदर्भात डॉ. आंबेडकरपूर्व दलित समाज हा बहुसंख्येने वारकरी होता.
आंबेडकर आणि वारकरी हा वेगळया अभ्यासाचा विषय आहे असे सांगून काळाच्या गरजा ओळखून
काही पारंपरिक मर्यादा ओलांडून व्यापक द्दृष्टी स्वीकारली,
तर देहूकर फडांकडून भरीव कामगिरी होऊ शकेल असे सुचवले आहे.
आजरेकर फड हा वारकरी संप्रदायाचे मूळ रूप जास्तीत जास्त जपणारा फड आहे असा
अभिप्रायही मोरे यांनी नमूद केला आहे.
शैव आणि
नाथ परंपरेतील वामाचार टाळून ज्ञानदेवांनी केवळ मातृभावाचा पुरस्कार केला. या नैतिक
उत्थानाचे वारसदार तुकाराम शाक्त तांत्रिकावर कसे तुटुन पडतात हे मोरे दाखवतात. या
संदर्भात तंत्र म्हणजे ब्राह्मणी वर्णव्यवस्थेला विरोध करणारा मार्ग असे सांगणाऱ्या
कॉ. शरद पाटील यांच्या सिध्दांतनातील धोकेही ते प्रगट करतात. या उलट
1681 ते
1850 इतक्या व्यापक कालखंडात बहुसंख्य समर्थ संप्रदायात
प्रवेश करुनही ते नित्यनियमाने पंढरीची वारीही करणारे होते आणि रामदासानंतर आपला
सुजाण पूज्यभाव त्यांनी तुकोबांविषयीच व्यक्त केलेला दिसून येतो. ही वस्तुस्थिती
डॉ. र. रा. गोसावी यांच्या मौलिक संशोधनाच्या आधाराने डॉ. मोरे यांनी आवर्जून
सविस्तर मांडली आहे. राजवाडेपूर्व समर्थ सांप्रदायिकांचे रामदासांचे आकलन आणि
राजवाडयांपासूनचे रामदासांचे आकलन यांच्यामधील भेद स्पष्ट होण्याच्या द्दृष्टीने
फार योग्य व प्रशंसनीय गोष्ट केली आहे. पण त्याचवेळी वारकऱ्यांनी रामाला महत्त्व
दिलेले असले, तरी त्यांचा भर कृष्णावर आहे. पण त्यांचा
हा कृष्ण उत्तर पूर्व भारतातील भागवतपंथीय पण रासक्रीडेत गुंतलेला कृष्ण नसून
गीतेचा प्रतिपादक तत्त्वज्ञ आणि नीतीच्या साह्याने धर्माची संस्थापना करणारा कृष्ण
आहे, हा मुद्दाही फार मार्मिकपणे मांडला आहे.
कृष्णाच्या, देवाच्या अवताराचे जे प्रयोजन म्हणजे
धर्मरक्षण हे आपले जीवितकार्य असल्याचे तुकोबा घोषित करतात. दुसऱ्या बाजीरावाची
तुकोबांकडे, वारकरी परंपरेकडे पाहण्याची,
वागण्याची रीत अधम होती. पण तुकारामांच्या कार्याचे मर्म
समजलेल्या मोरोपंतांनी पेशव्यांवर सडेतोड टीका केली व उलट तुकारामांची भरघोस
प्रशंसा केली. पंत परंपरेतील आर्यासम्राट मोरोपंतांनी संतपरंपरेच्या कलशस्थानी
असलेल्या तुकोबांची श्रेष्ठ अशी वाखाणणी केली.
तुकोबांच्या आधुनिकपूर्व कालखंडातील चरित्रलेखनाच्या संदर्भात त्या त्या
चरित्रलेखकांचे व त्यामागील समूहांचे सिंहावलोकन केल्यावर डॉ. मोरे यांनी उत्तर
पेशवाई काळातील शाहिरांचे वारकरी परंपरेशी असलेले नाते उलगडून दाखवले आहे. आधुनिक
अभ्यासक या दोन्ही परंपरा पूर्णपणे अलग करू पाहतात हा मोठाच प्रमाद आहे. पण
दोघांचीही पाळेमुळे मराठीच्या मातीत खोलवर रुजलेली असल्याने देशीपणाचा समान धागा
त्यांच्यात आहे. संतपरंपरा आणि शाहिरी काव्य, तसेच
त्यांच्या संगीतपरंपरा यांच्यातील अनुबंध मराठी संस्कृतीच्या जडणघडणीच्या
द्दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत याचे अतिशय अपूर्व,
मौलिक, मनोज्ञ आणि प्रतिभावंत विवेचन मोऱ्यांनी या
निमित्ताने आपणा सर्वांपुढे ठेवले आहे.
सरते
शेवटी डॉ. सदानंद मोरे यांनी एक महत्त्वाची मीमांसा आपल्याला सादर केली आहे. मराठी
समाजाची सांस्कृतिक व नैतिक इयत्ता ठरविण्याचा तुकोबा हा मानदंड आहे. मराठी
समाजाच्या उन्नत सांस्कृतिक अवस्थेत तुकोबांना मिळणारा प्रतिसाद आणि अधःपतित
अवस्थेत त्यांची होणारी किंमत शिवकालीन आणि बाजीरावकालीन समाजांची तुलना केली तर
स्पष्ट दिसते. पेशवाईतील अधोगतीची कठोर समीक्षा करणारा तुकोबांसारखा नैतिक वचक
असलेला कोणी महापरुष त्या काळात झाला नाही. नेमक्या याच काळापासून मराठी सत्तेला
उतरती कळा लागली. भजन / कीर्तन /
राजकीय / आर्थिक मसलती,
कुस्त्या-आखाडा व तमाशा हे मराठी संस्कृतीचे चार फड इतर फडांत
काय चालते आहे याचा कानोसा घेऊन त्याची समीक्षा करणे हे एक श्रेष्ठ कर्तव्य आहे. ते
तुकोबांनी पार पाडले. पण अठराव्या शतकात महाराष्ट्राबाहेर सर्वत्र पसरलेल्या मराठ्यांची
अर्थ,
कला व बळ या तिन्ही क्षेत्रात भरभराट झाली. परंतु नेमक्या याच
वेळी ते आध्यात्मिक - नैतिक क्षेत्रात खचले.
वास्तविक नव्या राजकीय संबंधांना पूरक नवे नैतिक संबंध निर्माण करण्याची क्षमता
संतवाङ्मयात व परंपरेत होती. पण वारकरीही तुकोबांचा बाणा विसरले. त्यांनी
समाजसमीक्षेचे काम झटकून टाकून केवळ आध्यात्मिक व्यवहारांवर लक्ष सीमित केले.
अर्थात अशा अवस्थेत देखील जी काय थोडीबहुत समीक्षा झाली ती वारकऱ्यांकडूनच वारकरी
पंथ हाच अवनतीच्या काळात सामाजिक चिकित्सा वगळता संतांचा परिपाठ जपणारा व म्हणून
मराठयांचे मूळ सत्त्व निदान जिवंत ठेवणारा घटक ठरला.
तुकोबांच्या वाणीने आधुनिक काळात वेगवेगळया तापांनी पोळलेल्या समाजाला,
जनसमूहांना व व्यक्तींना कायकाय विश्राम दिला याचा हा आढावा मी
होता होईल तो डॉ. मोरे यांच्याच शब्दात मांडला.
३
आता डॉ. सदानंद
मोरे तुकोबांचे शत्रू - मित्र,
परंपरा, विचारप्रणाली आणि त्यांची
जडणघडण व त्यामुळे झालेला इष्टानिष्ट परिणाम हा
१८१८
ते
१९४७
च्या पारतंत्र्याच्या व नंतर स्वातंत्र्योत्तर साडेचार
दशकांच्या संदर्भात मांडतात. तुकाराम हाच या सर्व खेळाचा केंद्रबिंदू आणि तोच
त्याचा परीक्षकही.
धर्म ही
समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असलेली बाब असून धर्माच्या पायावर सुधारणा हवी. भागवत
धर्माचे प्रवर्तक,
ज्ञानदेव, नामदेव,
एकनाथ, तुकाराम यांच्यामध्ये ज्ञान,
वैराग्य, समताबुध्दी आणि धर्मश्रध्दा
हे गुण किती व कसे जागृत होते यांचे भान असलेल्यांना आमच्या सामाजिक चालीरीतीत
फेरबदल कसा घडवता येतो हे समजते हा लोकमान्य टिळकांचा मार्ग समाजिक परिवर्तनाच्या
कार्यात डॉ. मोरे यांना एक आदर्श प्रारूप वाटतो. व्यक्तिगत चारित्र्य,
स्वार्थत्याग, समत्व आणि विशेषतः
त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती, हे
सुधारक संतांचे गुणधर्म त्यांना भावतात.
या प्रकाशात
मुद्रणकलेचा परिचय झालेल्या वासाहतिक राजवटीतील पहिल्या पिढीने साधलेल्या
तुकारामबोवांच्या गाथेच्या प्रकाशनाचा इतिहास सांगून सर अलेक्रझांडर ग्रँटसारखे
काही दूरद्दृष्टीचे शासक,
तुकारामाच्या सेतूवरून खिस्ताला मराठी माणसाच्या हृदयात प्रवेश
मिळवू पाहणारे मिशनरी, नवजागृत स्त्रीशूद्रादि पददलित
समाजाला चेतना देणारे आद्य प्रवर्तक, सर्वांगीण
विकासाकरिता आत्मटीकेची गरज मनोमनी पटलेले पांढरपेशा तत्त्वचिंतक यांनी अनेक
समकालीन विद्वानांप्रमाणे प्रवाहहतित होऊन आपली मराठी नाळ तर तुटून दिली नाहीच,
पण संतपरंपरेशी व विशेषतः तुकोबांशी असलेल्या मराठी माणसाच्या
स्वाभाविक नात्याची पुनःस्थापना त्यांनी कशी केली याचा एक सुसंगत,
माहितीपूर्ण आणि त्याचवेळी विश्लेषक असा आढावा डॉ. मोरे घेतात.
यामुळे संस्कृतनिष्ठ आणि इंग्रजीवर भक्ती असणाऱ्या दोन्ही वर्गातील विद्वानांना
धक्का बसला. त्यांच्या व विशेषतः भाषेच्या व काव्याच्या पातळीवर तुकोबांऐवजी
मोरोपंतांना 'प्रोजेक्ट' करू
पाहणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात जातिवाचक
ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला कसा हातभार लागला याचे चित्रण ते करतात. तुकोबामय
वातावरणात तुकारामप्रबोधनामागे उभ्या होत्या दोन संस्था. एक म्हणजे प्रार्थना समाज
आणि दुसरा म्हणजे सत्यशोधक समाज. त्यामागे पार्श्वभूमी होती अत्युत्साही परंमहंस
सभेची. आजरेकर फडाच्या प्रभावाखाली वाढलेले महादेव गोविंद रानडे यांनी
ऍरिस्टॉटलच्या चौकटीत भागवत धर्माची मांडणी करुन मिल -बेंथामप्रणीत उपयुक्ततावादी -
सुखवादी नीतिशास्त्राला पर्याय उभा केला. परमहंसमंडळीतल्या काही नामवंत व्यक्तींचे
तुकारामप्रेम, मिशनरी मरे मिचेलची तुकोबांच्या चाहत्याची
भूमिका, फुल्याच्या निस्सीम हितचिंतकापैकी काहींची
वारकरी उत्सवातील ये - जा यामुळे जोतिराम फुले यांनी तुकारामगाथेचा बारकाईने अभ्यास
केला. वारकऱ्यांची अस्सल मराठी पोताची शब्दकळा, शैली,
वृत्ती फुल्यांच्या नसानसात भिनलेली आहे. वारकरी संप्रदाय आणि
संत यांच्या बाबतची फुल्यांची भूमिकाव्यामिश्र आहे.
वारकरी
पंथाच्या विचारात जातीयता आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात उभे राहण्याची बीजरूप
क्षमता आहे. पण प्रत्यक्षात समकालीन वारकऱ्यांची प्रवृत्ती मात्र ईश्वरसाधना आणि
नामस्मरण यांच्यात दंग होती. बाहेरील कोणाला संप्रदायात प्रविष्ट होऊन नेतृत्व
काबीज करणे अशक्य होते. संप्रदायाचा मूळ ब्राह्मण्यविरोधी रोख फिरवून त्याचे
ब्राह्मणीकरण करण्याची प्रक्रिया त्याच सुमारास सुरू झाली होती. तेव्हा फुल्यांनी
आपला मोर्चा वारकरी सांप्रदायिकांकडेच वळवला यात नवल नाही. फुल्यांचा श्रोता
/ वाचक
हा वारकरी पार्श्वभूमी लाभलेला होता आणि स्वतः फुल्यांवर तुकोबांचा प्रभाव होता. या
कारणाने जातिप्रथेने गांजलेले व सांप्रदायिक साचेबंदपणामुळे कोंडी झालेले अनेक
वारकरी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत उतरले. पण फुल्यांच्या रणनीतीमुळे फुल्यांनी
ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज यांच्या शुध्द हेतूंचा अभद्र विपर्यास केला याची
नोंद विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतली. अर्थात असे का घडले याबद्दल शिंदे यांनी
घेतली. अर्थात असे का घडले याबद्दल शिंदे आणि मोरे यांची कारणमीमांसा पूर्णपणे
भिन्न आहे. फुल्यांनी चळवळीच्या द्दृष्टीने इतिहासाची फेरमांडणी केली. त्यांचा
शिवाजी हा शेतकऱ्यांचा राजा होता, तर तुकोबांकडे ते
शेतकऱ्यांचा संत म्हणून पाहातात. राजसत्ता ज्या सामाजिक गटामधील आहे त्याच सामाजिक
गटामधील वैचारिक नेतृत्व असले पाहिजे असे महत्त्वाचे सूचनही फुल्यांच्या
तुकारामदर्शनातून घडते हा नवा व धाडसी सिध्दांत मोरे मांडत आहेत.
अभंगांचे अस्सल मराठी सामर्थ्य जाणणाऱ्या या आधुनिक कवी
क्रांतीकारकाचे हे नवे चित्रण पोथीनिष्ठ फुलेवाद्यांन मान्य होणे कठीणच आहे,
पण आपण सत्यशोधकांचा वारसा सांगत असू तर फुल्यांमधील पारंपरिक
सूत्राला सामोरे जाण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे असे आव्हान ते असल्या
कर्मठांना देतात.
'जातिभेद
विवेकसारा'
चे लेखक
तुकारामतात्या पडवळ,
जोतिराव
फुले व 'व्रजसूची'
चे प्रकाशक
वासुदेव बाबाजी नवरंगे या त्रिकूटाला एकत्र आणणारा धागा तुकोबा होता. तुकोबांनी
ब्राह्मण्याची सडेतोड चिकित्सा केली. जातिभेदाविरुध्दची चळवळ नव्हे,
हे डॉ.
मोरे आवर्जून सांगतात. मुळात फुल्यांचा सत्यसमाज व्यापक सकारात्मक भूमिकेवरच उभा
होता. ब्राह्मण्याची चिकित्सा हा त्याचा तात्कालिक व विध्वंसक भाग होता. पुढे
ब्राह्मणेतरांच्या चळवळीत या भागाला मुख्य मानण्यात आले. तेव्हा फुल्यांची भूमिका
काही प्रमाणात सुटली असे मोरे म्हणतात.
तुकोबा ही
प्रार्थना समाजिस्टांनी केलेली एक जाणीवपूर्वक व विचारपूर्वक निवड होती. ही गोष्ट
रामकृष्ण गोपाळ भांडारकर,
त्यांचे चिरंजीव प्र. रा. भांडारकर,
नारायण गणेश चंदावरकर इत्यादींच्या तुकोबाभक्तीच्या प्रवासाच्या आधाराने सांगता
येते. सतत आत्मपरीक्षण करणाऱ्या तुकोबांच्या धर्माला बौध्द,
खिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या तुलनेत विश्वधर्म करण्याचा पण
प्रार्थना समाजाने प्रयत्न करावा असे रा. गो. भांडारकरांचे कळकळीचे व अपूर्व असे मत
होते. रानडे, भांडारकर, शिंदे
हे वीर तुकोबांच्या प्रकाशात शर्तीचे जीवन जगले. म्हणून ते समाजाला चिरप्रकाश देऊ
शकतात असा डॉ. मोरे यांचा निष्कर्ष आहे. विष्णु मोरेश्वर महाजनी प्रार्थनासमाजिस्ट
नव्हते. पण लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या'
ची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या महाजनींनी टिळकांचे व
वेदांत्यांचे मोक्ष हे ध्येय अमान्य केले. येथे त्यांनी तुकोबांचाच मार्ग अनुसरला
अशीच मांडणी वारकऱ्यांच्या फडावर होत असते असेही मोरे सांगतात.
मध्यंतरी ब्राह्मो आणि प्रार्थना समाजातील आदानप्रदानात तुकोबांना महत्त्वाचे स्थान
होते. शहाजी प्रतापसिंह सातारकर महाराज,
रवींद्रनाथ टागोरांचे बंधू सत्येंद्रनाथ आणि गुजरातमधील भोलानाथ
साराभाई यांच्यावरील तुकोबांचा खोल प्रभाव व त्याचा अन्वयार्थ व परिणाम
सांगितल्यावर डॉ. सदानंद मोरे लोकमान्य टिळक व तुकोबा या विषयाकडे वळतात. टिळकांचे
'ज्ञानेश्वरी' चे आकलन
निर्दोष नव्हते. पण निष्काम कर्म हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला तुकोबांनी.
'गीतारहस्यात' जास्तीत जास्त
अवतरणे असतील तर ती तुकोबांच्या अभंगांची वारकरी पंथ हा समाजाच्या तळागाळात
पसरलेला पंथ असल्यामुळे त्याचा उपयोग स्वातंत्र्यासाठीची राजकीय चळवळ उभारण्याकरता
व्हावा म्हणून टिळक बहुजन समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहिले. पण
विष्णुबुवा जोगांचा अपवाद सोडला तर विनायकबोवा सारवऱ्यांसारख्या वेदांती परंपरेतून
वारकरी संप्रदायात शिरलेल्या सनातनी विद्वानांच्यामुळे टिळकांचा हिरमोड झाला. टिळक
त्यांचे गुरु विष्णुशास्त्री चिपळूणकर व शिष्य यांच्या कैचीत सापडले. एरव्ही वरच्या
वर्गाच्या लोकांनी भक्तिमार्गी मोठया जनसमूहांपासून तुटक राहू नये असेच त्यांना
वाटत होते. कर्माशी विरोध नसणाऱ्या भक्तिमार्गाचे आचार्य,
अशी टिळकांसमोरील तुकोबांची प्रतिमा आहे,
असे सांगून मोरे टिळकांची एक अनोखी भूमिका सादर करतात.
मिलबेंथामस्पेन्सरमुळे आलेल्या बधिरतेमुळे; कमालीचे
स्वार्थत्यागी जीवन जगलेले गोपाळ गणेश आगरकर धरून उदारमतवादी उच्चभ्रू बहुजनांपासून
व वारकऱ्यांपासून दूर राहिले. तर टिळक मात्र सतत परंपरांचा शोध घेत काही सापडते का
हे शोधीत राहिले.
या
आधुनिक तुकोबाप्रेमी व्यक्तींच्या कार्याची समालोचना करून डॉ. मोरे सरतेशेवटी
राजारामशास्त्री भागवतांकडे वळतात. एका बाजूला वारकरी संप्रदायात चालू असलेले
ब्राह्मणीकरण,
दुसऱ्या बाजूला आगरकरवाद्यांनी परंपरेकडे केलेली डोळेझाक,
तिसरीकडे प्रार्थना समाजिस्टांनी वारकऱ्यांची ज्ञानोबा-तुकोबा
ही जोडी फोडून तुकोबांवर लक्ष केंद्रित करणे, तर आणखी
एका बाजूने टिळकांनी प्राचीन धर्मोत्सव सोडून नवा सार्वजनिक गणेशोत्सव करणे,
या बाबींविरुध्द परखड प्रतिक्रिया नोंदवणारा एकच विचारवंत
महाराष्ट्रात होऊन गेला. तो म्हणजे राजारामशास्त्री भागवत. त्यांचे वारकरी
संप्रदायाचे व मराठी संस्कृतीचे आकलन सम्यक् आणि योग्य होते. त्यांचे
तुकारामप्रेमही तितकेच विलक्षण होते. ज्ञान व भक्ती यांची सांगड घालणाऱ्या वारकरी
प्रस्थानाला मानणे म्हणजे अस्सल मराठीपण असणे हीच त्यांची समजूत होती.
४
त्यानंतर वारकरी संप्रदायाची मूळ प्रेरणा सामाजिक घडामोडींपासून अलिप्त अथवा
विन्मुख राहण्याची कधीच शक्यता नव्हती. पण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र
हा संप्रदाय एक प्रकारच्या आध्यात्मिक आवर्तात सापडलेला दिसतो. त्याचे कारण नव्या
इंग्रजी शिक्षणाचा अभाव असो,
किंवा अन्य काहीही असो. तत्कालीन उदासीन,
अलिप्त वारकरी नेते पाहून त्यांच्या संबंधीची आपली निरीक्षणे
राजवाडेप्रभृतींनी व त्यांच्याच जोडीला बुध्दिप्रामाण्यवादी आधुनिक विचारवंतांनी व
नेत्यांनी संतांवर व संतांच्या शिकवणुकीवर लादली. उलट संप्रदायाशी अधिकृत संबंध
नसलेल्या विचारवंतांनी व नेत्यांनी संताच्या साहित्यातून व चरित्रातून नव्या
प्रेरणा शोधल्या, याचा एक तपशीलवार,
चौफेर, सुसंगत व चिकित्सक असा
अर्वाचीन महाराष्ट्रातील यच्चयावत सर्व लहानथोर व्यक्ती,
विचारवंत, नेते, अभ्यासक व
परंपरा यांना सामावणारा विश्लेषक वृत्तांत डॉ. सदानंद मोरे आपल्यापुढे यानंतर
ठेवतात. तो तुकोबा नावाच्या एका चौकटीत अगदी
काळजीपूर्वक व साक्षेपाने रचलेल्या महाराष्ट्राच्या अर्वाचीन सामाजिक - सांस्कृतिक
- भाषिक व विविध ज्ञानशाखात्मक जडणघडणीचा जणू काही एक लघुकोशच बनला आहे. त्यातल्या
फक्त दोनचार गोष्टींची मी इथे नोंद घेऊ शकतो.
वारकऱ्यांच्यात एकोणिसाव्या शतकापासून तीन परंपरा आढळतात. उत्तरकालीन दुय्यम
ग्रंथांच्या साह्याने वारकरी दर्शनाला वेदांती चौकटीत कोंबू पाहणारी आत्मलोप झालेली
विनायकबुवा साखऱ्यांची ब्राह्मणी परंपरा,
या कोंडीतून पूर्णपणे बाहेर न पडता आलेली जोग महाराज परंपरा. तर
आजरेकरांचा धागा पकडून ब्राह्मणेतर नेतृत्त्व लाभलेली दादामहाराज सातारकर परंपरा.
या तिन्ही परंपरांचे प्रवर्तक पारंपरिक वारकरी नसूनही त्यांनी वारकरी होऊन आपापली
स्वतंत्र स्थाने निर्माण केली. या सदर्भात चिपळूणकरी मराठी व दादामहाराज
सातारकरांची मराठी यांची एक मनोज्ञ तुलना मोरे करतात. सत्यशोधक व ब्राह्मणेतर
परंपरेतील सत्यशोधक नवलकर पितापुत्र व कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या
तुकोबाधिष्ठित कार्याचीही ते दखल घेतात. पण असे अपवाद सोडले तर अनेक
ब्राह्मणेतरांनी तुकोबांचा उपयोग ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादात तेल ओतण्याकरता केला
व तो अजूनही तो थांबलेला नाही ही गोष्ट अगदी स्पष्टवक्तेपणाने मोरे सांगतात. कोलते
प्रभूतींनी चक्रधर आणि त्यांचा पंथ यांचा अभ्यास करताना जी विचारपध्दती पुढे आणली
तिचाच उपयोग हे नवब्राह्मणेतर वारकरी पंध आणि तुकोबा या अभ्यासक्षेत्रात करतात. या
मांडणीचा फोलपणा लक्षात घेऊन कुणी कुणाला काय सांगायचे असे उद्गार मोरे काढतात.
बुध्द व
तुकोबा यांच्यातील दुवा जोडणारी परंपरा म्हणून डॉ. सदानंद धर्मानंद कोसांबींचेही
स्मरण करतात. आणि मग ओघानेच ते पोहचतात विठ्ठल रामजी शिंदे या अतिश्रेष्ठ पण
उपेक्षित कर्मवीराकडे धर्मचिंतक,
भारतवेत्ता, समाजशास्त्रज्ञ,
शेतीतज्ञ, तत्त्वचिंतक,
कार्यकर्ता या नात्याने हिमालयाच्या उंचीचा हा मनुष्य. भागवत
धर्माविषयी शिद्यांनी केलेले संशोधन अत्यंत नाविन्यपूर्ण,
स्वतंत्र आणि रूढ समजुतींना धक्का देणारे आहे. वारकरी पंथ हा
आधुनिक भागवत धर्माचे शुध्द व विकसित रूप आहे. त्याच्या लोकसत्तात्मकतेचा विकास
पंजाब सोडून महाराष्ट्राइतका कोठेही झालेला नाही. संतमालिकेत ब्राह्मण -
ब्राह्मणेतर वाद माजविणे वारकरी वर्गात मोठे पाप मानले जाते. येणेप्रमाणे नामदेवाने
स्थापिलेला भक्तिमार्ग प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या व अप्रत्यक्षपणे पंजाबच्या
उध्दाराला आणि ह्या दोन स्वराज्यसंपन्न राष्ट्रांच्या द्वारा अखिल भारताच्या
उध्दाराला एके काळी कारण झाला. महाराष्ट्र धर्म व भागवत धर्म यांच्यात गल्लत
केल्याबद्दल न्यायमूर्ती रानडे यांना दोष देऊन भागवत धर्माचे आकाश महाराष्ट्र
धर्माच्या मुठीत मावणार नाही असे एक प्रज्ञावंत विवेचन कर्मवीर शिंदे आपल्यापुढे
ठेवतात. शिद्यांना तुकोबा भावले ते तुकोबांच्या भक्तिमूलक कर्मयोगामुळे.
शिंदे
यावेळी शिवाजीचे हिंसात्मक राजकारण व गांधीजींचे अहिंसात्मक राजकारण यांच्यात
अनुस्यूत असलेले सूत्र तुकोबांच्या आधारे उलगडून दाखवतात. विशेष म्हणजे त्यात ते
वैचारिक व व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवर यशस्वी होतात. शिवाजीचा वारसा अभिमानाने
मिरवणारा महाराष्ट्रातील बहुजनसमाज गांधीजींचे नेतृत्व पत्करून काँग्रेसच्या
झेंडयाखाली सामील झाला. या मागची वैचारिक जागृती शिद्यांनी घडवून आणली असे डॉ.
सदानंद मोरे जिव्हाळयाने सांगतात. शिंदे हे अभिजनवादी आणि प्रतिक्रियावादी
ब्राह्मणेतर या दोघांनाही परवडत नाहीत.
त्यानंतर ते आधुनिक महाराष्ट्रातील तुकोबा व रामदासांच्या चारित्र्यहननाचा विषण्ण
करणारा इतिहास सारांशाने आपल्यापुढे मांडतात. काळया-पांढऱ्या रंगांनी रेखाटलेली
तुकाराम-रामदासांची ही भडक चित्रे दोघांवरही अन्याय करणारी आहेत. पण तुकोबांवर
मात्र त्यामुळे मोठाच अन्याय झाला. महाराष्ट्रातील गेल्या दीड शतकांमधील राजकारण,
समाजकारण आणि अभ्यासकारण यांच्यामधील निकट नाते समजण्यास या
तुलनेचा चांगलाच उपयोग होऊ शकतो हे मात्र मोरे यांनी थोडक्यात पण सप्रमाण सिध्द
केले आहे. तुकोबांचे अवमूल्यन करणारी मंडळी संकुचित राष्ट्रवादी,
पुनरुज्जीवनवादी, अभिजनवादी,
वर्णजातीअभिमानांनी ग्रस्त अशी होती त्यामुळे त्यांच्या
राष्ट्रवादी व स्वातंत्र्योत्सुक वृत्तींवर कृष्णछाया पडली.
'हा
कोठला भागवत धर्म'
या
एकोणसत्तराव्या लेखाच्या प्रारंभी आधुनिक महाराष्ट्रातील पाच प्रवाहांची एक
वर्गवारी डॉ. सदानंद मोरे यांनी केली आहे. तिच्या अनुषंगाने त्यांनी तुकोबांच्या
प्रकाशात या साऱ्या विचारधनाचा परामर्श घेतला आहे. विसाव्या शतकाच्या
उत्तरार्धापर्यंत ते आपल्याला घेऊन येतात.
1920
नंतरच्या
महाराष्ट्रातील इतिहाससंशोधन त्याचप्रमाणे समाजशास्त्र आणि इतर समाजविज्ञाने या
संदर्भात जे प्रमुख वाद झाले ते सर्व आपल्या डोळयांपूढे असल्याने या संदर्भात या
सर्व वादांचे तुकोबांच्या कार्याच्या संदर्भात डॉ. मोरे यांनी एकही ठळक मुद्दा
किंवा कळीचा तपशील न विसरता विवेचन केले आहे. एवढे नमूद करूनच मी पुढे जातो. तसेच
1920
नंतर
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विचारधारा आणि त्यांचे प्रणेते यांचेही तुकोबांविषयीचे
आकलन काय होते आणि तुकोबांच्या चष्म्यातून या विचारधारांचा आणि व्यक्तींचाव्यवहार
कसा दिसला असता हेही मोरे यांनी फार तपशीलाने मांडले आहे. इंग्रजीत ज्याला
मिस्टिसिझम म्हणतात किंवा ज्याला मराठीत आजपर्यंत तरी साक्षात्कारवाद म्हटले जाते
त्याही क्षेत्राचा त्यांनी आपल्या पध्दतीने आढावा घेतला आहे. या सर्व संदर्भातील
फक्त एक दोन मुद्यांच्या बाबतीतील मोरे यांची मते मात्र आवर्जून लक्षात घेतली
पाहिजेत.
महाराष्ट्रातील दलित चळवळ आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात
दलितांना तुकोबा कसे दिसतात आणि वारकरी संप्रदायाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरते.
डॉ. मोरे यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉ. आंबेडकरपूर्व दलित समाज हा वारकरी पंथाने
देवू केलेल्या अल्पस्वल्प धार्मिक आणि आत्मिक संधींवर संतुष्ट होता. चोखामेळा,
आजरेकर फडावरील
शिवबा दरेकर इत्यादी मंडळींचा वारसा महार समाज अभिमानाने गौरवित असे. पण डॉ.
आंबेडकरांसारख्या पाश्चात्य विद्येने क्षितीज व्यापक झालेल्या नेत्याने आपल्या
स्वाभिमानी कार्याला सुरूवात केली तीच मुळी अस्पृश्यांच्या या वारकरी किंवा
चोखामेळा या आयडेंटीटीला आव्हान देवून. डॉ. मोरे यांच्या या संदर्भातील विश्लेषणाचे
थोडक्यात सार असे की चोखामेळयाचा आदर्श आणि दलितांची भागवत धर्माकडे असलेली ओढ
यांचा प्रतिकार करणे बाबासाहेबांना चळवळीची गरज म्हणून अपरिहार्य ठरले. परंतु
त्यांची या संबंधीची सर्वच मत परमार्थाने घेणे चुकीचे होईल. वारकरी पंथाशी व
संतांशी आंबेडकरांचे नाते दोन प्रकारचे आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सद्यकालीन
मर्यादांमुळे ते व्यथीत
झालेले दिसतात. डॉ. मोरे पुढे सांगतात की, बौध्द
धर्माच्या वारकरी संतांशी असलेल्या आंतरिक नात्याची पुनःस्थापना करण्याचे त्यांच्या
मनात होते हे खास. पण अपवाद वगळता, डावपेचात्मक भूमिका
आणि वास्तविक मत यांच्यात फरक करता न आल्याने त्यांच्या अनुयायांनी संतांकडे पाठ
फिरवलेली दिसते.
या सर्व
लेखमालेच्या संदर्भात डॉ. मोरे यांनी आणखी एका प्रश्नाला तोंड फोडले आहे. त्यांनी
स्वतःच असा प्रश्न उपस्थित केला आहे की,
हिंदुत्ववादाच्या बुध्दिवादी आणि परंपरावादी शाखांचा विचार
करताना असा प्रश्नही विचारता येईल की,तुकोबादि संतांच्या
बाजूने हिंदुत्वाची मांडणी करता येईल काय ? तसा प्रयत्न
कोणी केला आहे काय ? अशी मांडणी हिंदुत्वाच्या प्रचलित
मांडणीपेक्षा किती वेगळी असेल ? नंतर डॉ. मोरे
स्वतःच म्हणतात की, सावरकरादिकांनी अर्थातच हा प्रयत्न
केलेला नाही. ब्राह्मणेतर मंडळींनी केलेला प्रयत्न अत्यंत क्षीण व विस्कळीत आहे.
नंतर महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी इत्यादींची याबाबत
तपासणी केल्यावर श्री. मोरे म्हणतात, ''आता संतांच्या
पध्दतीने विचार करून हिंदुत्वाची मांडणी केली, तर
आपल्याला एक चोख हिंदुत्व मिळू शकेल आणि मग या संदर्भात आपल्या 'धर्म,
राष्ट्रधर्म आणि लोकधर्म' या लेखात
हिंदुत्व आणि तुकोबा यांच्याबद्दलची एक महत्वाची मांडणी केली,
तर आपल्याला एक चोख हिंदुत्व मिळू शकेल आणि मग या संदर्भात
आपल्या धर्म, राष्ट्रधर्म आणि लोकधर्म या लेखात हिंदुत्व
आणि तुकोबा यांच्याबद्दलची एक महत्वाची मांडणी वंगदेशीय लेखक योगेंद्रनाथांचे
त्यांनी आवर्जून उद्धृत केलेले म्हणणे असे,
हिंदुत्वरक्षण ही गोष्ट जोवर हिंदूंना गौरवास्पद व अगत्याची आहे असे वाटत राहील.
तोपर्यंत खऱ्या हिंदुधर्माची जाणीव देणाऱ्या तुकाराम महाराजांचा गौरवच होत राहील,
नव्हे तो तसा होत राहिला पाहिजे. प्रत्येक हिंदु संतान तुकाराम
महाराजांबद्दल कृतज्ञताच बाळगील.
डॉ.
मोरे यांनी 1818
पासून ते थेट अगदी आजच्या घटकेपर्यंत तुकाराम विषयक मीमांसा
लिहिली आहे. त्या मागची वैचारिक भूमिका आपण सुरूवातीला पाहिली पण या विवेचनाच्या
शेवटीही ती मांडून पुढे जाणे अगत्याचे आहे. प्रा. म. पुं. रेगे यांचा 'नवभारत'
मधील संपादकियांचा संग्रह 'हिंदु
धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन' या नावाने
प्रसिध्द झाला आहे. त्यातील मांडणी आपल्याला मान्य आहे असे सांगून डॉ. मोरे म्हणतात,
जोपर्यंत सामाजिक भेद वास्तवात अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्या
भेदांकडे मानवी द्दृष्टीने पाहून त्यांचा परिणाम भेदांमुळे ज्यांना कनिष्ठपणा
प्राप्त झालेला आहे त्यांच्यावर जुलूम न करणे, त्यांचे
शोषण न करणे, त्यांना तुच्छ न लेखणे इत्यादि गोष्टी याला
जोपर्यंत असे भेद वास्तवात अस्तित्वात आहेत तोपर्यंत महत्त्वच आहे. समतेचा हा एक
महत्त्वाचा अपरिहार्य पर्याय आहे. मोरे पुढे उद्गारतात की,
दरम्यान कोणी हे सर्व भेद मोडीत काढून नव्या प्रकारचा
समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे कार्य हातात घेतले तर,
संतांना त्याचे दुःख व्हायचे कारण नाही.
५
त्यानंतर डॉ. सदानंद मोरे यांनी जवळजवळ
30-35
लेखांत मराठी साहित्यकारांनी आणि समीक्षकांनी तुकोबांकडे कवी म्हणून कसे पाहिले,
त्यांना काय प्रतिसाद दिला याचा एक अत्यंत व्यापक,
सर्वसमावेशक, चिकित्सक,
अभिनव आणि वर्तमानकालीन चिंतन व संशोधनाला नवी दिशा सुचविणारा
विचार मांडला आहे. या सर्व लेखांमध्ये डॉ. मोरे यांची प्रतिमा आणि मांडणीतला
सूक्ष्मपणा यांचा ठसा आपल्यावर स्पष्टपणे उमटतो. मुख्य म्हणजे भाषा विज्ञानाच्या
संदर्भात गेल्या एक-दोन दशकांमध्ये जी बहुमोल मांडणी आज जगभर चालू आहे तिचे
अनुसंधान राखून मोरे यांनी हे फार मोठे काम केले आहे . वाङ्मय हे भाषेमध्ये निर्माण
होत असते. भाषा ही एक सार्वजनिक आणि सामुदायिक बाब आहे. यामुळे सामाजिक,
सांस्कृतिक, वाङ्मयीन अभ्यासकाला
भाषाशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग होतो या सर्व गुंतागुंतीच्या अभ्यासपध्दींचा
संदर्भ मनामध्ये नीट बाळगून मोरे यांनी तुकाराम आणि त्यांच्या प्रकाशात मराठीतील
आधुनिक साहित्यव्यवहार याविषयी फारच मनोज्ञ विवेचन केले आहे.
६
डॉ.
सदानंद मोरे
यांचा
हा
ग्रंथ मला फार महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक परंपरेचा एक
दमदार आणि त्याच वेळी सडेतोड असा वेध घेऊन पुढची वाटचाल कशी व्हावी याचे स्पष्ट
दिग्दर्शन करणारा त्यांचा हा लेखनव्यवहार आपल्याला मोठा दिलासा देतो. बहुजन
समाजातून आलेल्या आणि सूक्ष्म चिंतनाचे सामर्थ्य अंगी बिंबविलेल्या पिढीचा हा एक
पथदर्शक आविष्कार आहे असे मला वाटते. साहसवादी एकांगी भूमिका टाळून आत्मटीकेचे
महत्त्व जाणून त्याच वेळी सांस्कृतिक संचिताचे प्रेरणादायी असे विवेचन करणे ही
गोष्ट मुळात फार कठीण आहे पण डॉ. मोरे यांनी ती समर्थपणे पार पाडली आहे.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहार हा खराखुरा स्वातंत्र्यशील,
समतावादी आणि जीवनाच्या लोकशाहीकरणाला पोषक असा व्हावयाचा असेल
तर तुकोबा केंद्रस्थानी मानून खूपच मोठे कार्य निश्चित पार पाडता येईल. जनसमूहांना
विश्वासात घेऊन आणि अलगपणाची बेटे न रचता, आत्मटीकेची
जबाबदारी न विसरता क्रांतिकारकांना परंपरेशी जिव्हाळयाने जोडून घ्यावे लागेल ही
गोष्ट निश्चित. पण या संदर्भात क्रांतिकारक शक्तीच्या जोडीला आजचा राज्यकर्ता
समूहही तुकोबांच्या या वारकरी संतपरंपरेचा वापर आपल्या प्रभुत्ववादी नीतीकरिता
राबविणार ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. अशा वेळी वारकरी परंपरेविषयी प्रेम
राखूनही तुकोबांच्या पावलांवर पाऊले टाकून आजच्या प्रस्थापितांविषयी तुकोबाप्रेमी
विचारवंत व जनसमूहांना बरोबर घेऊन पुढे गेले. पण ते करताना त्यांनी प्रस्थापितांचे
वाभाडे तर काढलेच पण जनसमूहांच्या आंधळया व उदास भूमिकेचाही गौरव न करता त्यावर
आपल्या वाणी व कृतीचे हत्यार उचलले. ही गोष्ट लक्षात ठेवून जर महाराष्ट्रातील आजचे
कार्यकर्ते पुढे गेले तरच परत एकदा तुकोबांच्या वाणीचा व जीवनाचा परिसस्पर्श आमच्या
जीवनाला खरोखरी लाभला असे म्हणता येईल. डॉ. मोरे यांचा हा ग्रंथ फारच मोठया
दर्जाचा आहे, आणि महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांतील
सार्वजनिक कार्यकर्ते, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाविषयी
ओढ असणारे सामान्य वाचक आणि इतकेच नव्हे तर शिक्षणाच्या सर्व पातळयांवर कार्य
करणारे अभ्यासक त्याची जाणतेपणाने दखल घेतील अशी आशा बाळगून मी हे विवेचन
संपवतो. |