Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

तुकारामांची प्रतिभा

- पुरुषोत्तम यशवंत देशपांडे

   

 

     कधीकधी कलावंताची पूर्णपणे पार्थिव अशी आंतरिक भावगतीची ओढ धार्मिक अथवा आध्यात्मिक स्वरूपांत प्रगट होते. पण तेवढामुळें कलावंताच्या वास्तवताप्रधान भूमिकेस बाध येईल, असें मला वाटत नाही. पुरातन कालीन आणि मध्ययुगकालीन, पूर्णपणे भौतिक असे अनेक सामाजिक कलह व समाजक्रांत्या, धार्मिक अथवा आध्यात्मिक स्वरूपांत प्रकट झाल्या; पण त्या कलहांची आणि क्रांत्यांची भाषा धार्मिक अथवा आध्यात्मिक होती म्हणून त्यांचे भौतिक स्वरूप निरर्थक ठरत नाही; त्याचप्रमाणे भूतकालांतील अनेक कलावंतांची आंतरिक ओढ धार्मिक अथवा आध्यात्मिक भाषेंत व्यक्त झाली म्हणून ते कलावंत कमी प्रतीचे ठरत नाहीत. अथवा केवळ धार्मिक अथवा अध्यात्मिक भाषा वापरली म्हणून त्यांचें वाङ्मय हें कलात्मक वाङ्मय नव्हे, असेंहि म्हणतां येणार नाही. कलावंत ही व्यक्ति इतर सामान्य माणसाप्रमाणें समकालीन समाजसंघर्षाच्या कलहपूर्ण वातावरणांत घडविली जाते. विशिष्ट कालखंडांत रूढ सामाजिक जाणिवा ज्या स्वरूपाच्या असतात त्या स्वरूपांतच कलावंताला आपली आंतरिक विरोधगतीची ओढ प्रगट करावी लागते. पुष्कळ वेळा जुन्या निष्ठांची जी रूढ भाषा असते तींतच नवा आशय ओतावा लागतो. जुन्या कलेचें आकलन करतांना भाषेपेक्षा आशयाकडे अधिक लक्ष दिल्यास कलावंताची भौतिक भूमिका सहज स्पष्ट होऊं शकते. कोणत्याही कलाकृतींतील आशय आकलन होण्यासाठी तत्कालीन समाजजीवनाच्या व्यावहारिक संघर्षांतील विरोधमय वातावरणांतच कलावंताचें व्यक्तित्व आकारास येत असतें. आपलें जुने संत वाङ्मय हें बहुतांशी आध्यात्मिक भाषेंत व्यक्त झालें आहे. तरीपण त्यांतील बराचसा भाग कलेच्या कसोटीस पूर्णपणें उतरण्यासारखा आहे. तुकारामाचें काव्य आजही मनाला आकर्षित करण्याइतकें सामर्थ्यवान् आहे. संत या नात्यानें तुकाराम कदाचित् विसरला जाईल. पण कवी या नात्याने तुकारामाचे महाराष्ट्राला विस्मरण पडणें दुरापास्त आहे. कारण तुकारामाच्या काव्यांतील वास्तवतेचा स्पर्श इतका प्रभावी आहे की, त्यामुळें धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पनांची गडद् नी गूढ आवरणें क्ष किरणांप्रमाणे आरपार छेदून त्यांतील विशुध्द मानवता आजही आपल्या नजरेसमोर मनोरम स्वरूपांत तरंगूं लागते. तुकारामाच्या आधी आणि तुकारामाच्या नंतरही अनेक संत उदयास आले. पण तुकारामाचें माहात्म्य दुसऱ्या कोणत्याही संताच्या वाटाला आलें नाही. याचें कारण तुकाराम सदेह स्वर्गाला गेला, या असंभाव्य आणि असत्य चमत्कारांत नसून समाकालीन समाजसंघर्षात झगडत असतां प्रत्यक्षपणें अनुभवास आलेल्या वास्तवतेच्या स्पर्शाचें त्याला कधीही विस्मरण पडलें नाही, हें होय. तुकाराम ज्या काळांत जन्मास आला तो काळ लोकभाषेच्या उदयाचा काळ होता. भारतीय संस्कृतीची मिरासदारी बळकावून बसलेल्या संस्कृत पंडितांनी आणि भटभिक्षुकांनी, ज्ञान हें संस्कृत भाषेंतूनच व्यक्त होऊं शकते अशा बथ्थड समजुतीला बळी पडून मराठी मायबोलीच्या असंख्य खेडुतांना अज्ञानांत खितपत पडूं दिलें होतें. तेराव्या शतकांत ज्ञानेश्वराने संस्कृत पांडित्याच्या पुरातन आणि अतिप्रतिष्ठा पावलेल्या प्रथे विरुध्द पहिलें प्रभावी बंड उभारलें, परंतु दोन तीन शतकेंपावेतो या सांस्कृतिक बंडाला सामुदायिक पाठिंबा मिळूं शकला नाही. सोळाव्या शतकांत तुकाराम जन्मास आला. जातीचा शुद्र पण धंदा उदीमपणाचा----

मातापीता बंधु सज्जन । घरीं उदंड धनधान्य ।

शरीरीं आरोग्य लोकांत मान । एकहि उणें असेना ॥

       अशा सुस्थितींत आणि श्रीमंतींत वाढलेल्या तुकारामावर तारुण्याच्या ऐन उमेदींत दारीद्राचें दैन्य अनुभविण्याचा प्रसंग आला आणि दारिद्राशीं झगडतां झगडतांच एक दुष्काळ पडला. त्यांत तुकारामाचें होतें नव्हतें तें सर्व गेलें. पुन्हा व्यापार थाटावा, मोडलेली घडी पुन्हा बसवावी या हेतूने त्याने प्रयत्न केले. परंतु ते सर्व निष्फळ ठरले. आणि शेवटीं,

सावकार पिशुन आणि खळ । गृहासी पातले जैसे काळ ॥

 अशी मरणप्राय स्थिति प्राप्त झाली. तुकारामाच्या जुन्या जीवनांतील सारें सौंदर्य विलयास गेलें. नव्या जीवनांतील नव्या सौंदर्याचा शोध त्याने सुरु केला. बेचिराख झालेल्या संसाराच्या थंड राखेंतून पुन्हा नवी ज्योत तुकारामाने पेटवावी यासाठीं अहोरात्र अट्टाहास करणाऱ्या बायकोला आणि मुलाबाळांना सोडून तुकाराम वेडासारखा वणवण भटकूं लागला !

     अशा आत्यंतिक विपन्नावस्थेंत आणि उदास मनःस्थितींत काळ कंठींत असतां तुकारामाला अखेरचा आसरा सापडला, तो संतवाणींत. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ यांच्या भक्ति - भाव - गीतांत तुकारामाने आपल्या भावनेचे तारू विमुक्तपणें सोडून दिलें. घरादाराला पारखा झालेला, समाजांतून पूर्णपणें उठलेला तुकाराम पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनी असें गुणगुणत तल्लीन होऊं लागला तेव्हा आरंभीं सर्व लोक त्याची कुचेष्टा करूं लागले. खुद्द त्याच्या बायकोने त्याचें जें वर्णन केलें आहे, त्यावरून त्या वेळीं त्याची किती निरर्भत्सना होत असेल याची चांगली कल्पना येते ---

न करवे धंदा । आईता तोंडीं पडे लोंदा ॥

उठितो तो कुटितो टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥

जिवंत असूनि मेले । लाजा वाटूनिया प्याले ॥

अशा गहिऱ्या शब्दांत ती आपल्या नवऱ्याचा उध्दार करीत असे !

     सर्व समाज आणि समाजांतील तत्कालीन सर्व रूढ व प्रतिष्ठित जाणिवा एकीकडे आणि एकटा तुकाराम दुसरीकडे, अशा दारूण संघर्षाच्या घणाचे घाव खात खात, तुकारामाने पांडुरंगाला आपल्या सर्व आंतरिक आकांक्षांचें प्रतीक कल्पून नव्या जीवनासाठीं नव्या सौंदर्याची मूर्ति घडविली. आपल्या वैयक्तिक संसारांतील विझलेल्या ज्योति पुन्हा चेतविण्यास असमर्थ ठरलेल्या तुकारामाने पांडुरंगाच्या पाषाणमूर्तीला पाझर फोडण्याचा अट्टाहास सुरू केला. पाषाणाला पाझर फुटणें अशक्य होतें. आणि पाषाणाला पाझर फुटण्याची वाट पहात तुकाराम बसला असता तर त्याच्या जीवदेहाचाच पाषाण बनून तुकारामाची नाव निशाणीहि आज बाकी उरली नसती. पण पाषाणाला जरी पाझर फुटला नाही, तरी भावनोत्कटतेच्या केंद्रीभूत प्रभावानें तुकारामाच्या प्रतिभेला मात्र नितांत सुंदर काव्याचे पाझर फोडले ! तुकारामाला मात्र आपलें काव्य सुंदर आहे अथवा त्यातील नितांतरम्य सौंदर्य म्हणजे आपल्याच प्रतिभेचा प्रभाव होय, असें कधींच वाटलें नाही. कारण आजकालच्या प्रथितयश लेखकांप्रमाणें त्याला कवि अथवा कलावंत म्हणून मिरवावयाचें नव्हतें. अथवा कलेकरतां कलाही निर्माण करावयाची नव्हती ! त्याला कथानक, गुंतागुंत, निरगाठ, सूरगाठ, उकल, इत्यादि यांत्रिक नि कृत्रिम साधनांच्या साहाय्यानें प्रतिभासधान करावयाचें नव्हतें ! त्याला केवळ आपल्या अवरुध्द भावजीवनाला वास्तवतापूर्ण व्यक्तता द्यावयाची होती. निर्दय संघर्षाचे घाव सहन करीत करीत तो आपल्या सौंदर्यप्रतीकाशी संपूर्ण आत्मसमपर्णानंतर, समरस होतांच,वसंतात निष्पर्ण मुळे निर्जीव झालेल्या आणि आंतल्याआंत गुदमरून मरूं लागलेल्या त्याच्या भावनोत्कटतेला काव्याचे नवनवे बहर येऊं लागले ! जीवनसंघर्षाच्या वणव्यांत सारा जीव होरपळून निघत असतांहि अनुभवांच्या साकल्यांतून द्दग्गोचर होऊं लागलेल्या सौंदर्यप्रतीकावरील आपली द्दष्टि जो क्षणभरही चळूं देत नाही, त्यालाच सौंदर्याची आत्मप्रतीति होऊं शकते. आणि सौंदर्याची आत्मप्रतीति ज्याला होते तोच अस्सल कला निर्माण करूं शकतो. सौंदर्यसाधन म्हणजे येराबाळाचें काम नव्हे !

      तुकारामाच्या अभंगवाणींत त्याचें भावजीवन सहजसौंदर्याने प्रकट होऊं लागतांच ज्या समाजाने त्याला झिडकारून वेडांत काढलें होतें. त्याच समाजापैकीं कांही लोक त्याच्या रसाळ वाणीने मोहित होऊन एका नव्या जाणिवेने त्याच्या - भोवती जमा होऊं लागले. संस्कृत पंडितांनी अवहेलिलेल्या आणि सत्ताधाऱ्यांनी आणि शेठ सावकारांनी पिळून काढलेल्या असंख्य अज्ञ खेडुतांना तुकारामाच्या वाणींत आपल्याच सुप्त भाव जीवनाचें सजीव प्रतिबिंब आढळून येऊं लागलें. तुकारामाचें सौंदर्यप्रतीक हेंच त्यांच्याहि निरस जीवनावर नवा प्रकाश पाडणारें सौंदर्यप्रतिक बनलें. गरीब बिचारे खेडापाडांतील लोक ! खडतर कष्ट करण्यापलीकडे त्यांच्या जीवनांत कसलेंहि सार उरलें नव्हतें. संस्कृत पंडितांनी उपेक्षिल्यामुळे शेकडों वर्षे ते अज्ञानाच्या गाढ अंधारात खितपत पडले होते. अखंड कष्टाच्या सहारा वाळवंटांत त्यांच्या सर्व भावसरिता विरून गेल्या होत्या. रुक्ष आणि खडतर व्यावहारिक जीवनाच्या कंटाळवाण्या घाण्यांतून बाहेर पडायला त्यांना मार्गच उरला नव्हता. आत्माविष्करणाचे सारे मार्ग अनेक शतकें बंद झाले होते. अशा परिस्थितींत ते असतांना त्यांच्या सुदैवाने तुकारामालाहि त्यांच्याच खडतर जीवनाचा कटुतम अनुभव घेणें भाग पडलें. वास्तवतेच्या वणव्यांत तुकारामाच्या पूर्वानुभूत वैभवसंपन्नतेवर आधारलेल्या, सर्व कल्पनांची राखरांगोळी झाली. खडतर आणि रुक्ष जीवनाचें दगडाशिवाय अधिक वास्तवताप्रधान असें दुसरें कोणतें प्रतीक बनणार ! समाजातील साऱ्या माणसांचे दगड बनले असतांना कोणत्याही व्यक्तीवर तुकारामाचें भावजीवन केंद्रित होणें त्या काळीं अगदी अशक्य होतें. दगडाभोवतीच सारी मानवता कोणत्याहि एकाच जाणिवेने एकत्रीत झाली तरच कदाचित् नव्या मानवतेचा उदय होण्याचा संभव अशीच तत्कालीन परिस्थिती होती. दगडाची पूजा आधीच रूढ होती. व्यावहारी जीवनांतील रखरखीत वाळवंटांत विरून गेलेली मानवता दगडी देवाविषयीच्या पूज्य भावांत कसाबसा जीव धरून तगून राहिली होती. तुकारामाने आपलें सारें उदास भावजीवन तिथेंच केंद्रीभूत केलें.

       पण तिथेहि समाज - संघर्षाने त्याला मोकळें सोडलें नाही. देवाच्या दगडी मूर्ती सभोवती पोटभरू पूजाऱ्यांचा, भटाभिक्षुकांचा, प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पंडितांचा, टिळेमाळा घालणाऱ्यांचा, मंत्रतंत्र करणाऱ्यांचा, जटावेषधारी भस्मासुरांचा, आणि साध्याभोळया लोकांच्या धर्मभावनेवर बाजार करणाऱ्या इतर अनेक प्रकारच्या पुंड - गुंडांचा गराडा पडला होता. धन- धान्य, मालमत्ता, व्यापार उदीम, घरदार गमावून बसलेला तुकाराम बाकी उरलेलें केवळ भावजीवन घेऊन देवाच्या दारीं उभा राहीला. त्या व्यावहारिक जीवनांत कवडीमोल ठरलेल्या भावजीवनाला देवाच्या दारीं तर मोल येईल या आशेनें तो देवाच्या मूर्तीकडे गेला. पण तिथेही कळकळीच्या शुध्द भावापेक्षा देवाचे दलाल बनलेल्या भोंदू लोकांच्या बाह्य सोंगाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली त्याला दिसून आली. देवाच्या दगडी मूर्तीवरहि मालकी हक्क प्रस्थापित करून बसलेल्या, आपमतलबी भोंदू लोकांनी तुकारामाला देवापाशी आपलें भावकथन करूं दिलें नाही. तुकारामाचा शेवटचा आसराही सामाजिक प्रतिष्टांच्या वेदीव चिरडला गेला. आता मात्र प्रत्यक्ष प्रतिकाराशिवाय त्याला जगणें अशक्य झालें. प्रतिष्ठा पावलेल्या धार्मिक दांभिकपणावर त्याने जोराचा हल्ला सुरूं केला. कोणापाशीहि कशाचीहि याचना न करणारें त्याचें भावजीवन रूढ सामाजिक प्रतिष्ठेच्या आघाताखालीं अन्यायाने चिरडलें जाऊं लागतांच त्याच्या अंतर्यामांतील प्रतिकारशक्ति खडबडून जागी झाली. त्याने दलितांच्या खडा बोलीत बेधडकपणें पाखंड खंडनाचा सपाटा सुरूं केला. धर्मभ्रष्ट व आचारभ्रष्ट झालेल्या परंतु केवळ परंपरेच्या जोरावर प्रतिष्ठेच्या दिमाखाने इतरांना तुच्छ लेखणाऱ्या ब्राह्मणसमाजाला उद्देशून तुकारामाने लिहिलेल्या अनेक अभंगांत ब्राह्मण्याचें हिडिस स्वरूप सडेतोडपणें उघडकीस आणलें आहे. देव म्हणवुनी न येती देवळा अशी त्यांची अहंता ! स्वार्थाकरतां विकी स्नानसंध्याजप अशी त्यांची धर्मपरायणता ! अनाचार इतका की करिती लेकीची धारणा टिळे लपविती पाताडी, लेती विजार कातडी ! इतकेच नव्हे, तर नीचांचे चाकर, चुकलिया खाती मार ही परकीय राज्य - कर्त्यांविषयीची त्यांची वृत्ति ! इकडे परकीय राजपुरषांचा लत्ता प्रहार सोसतील पण आपल्या देशबांधवांशी प्रसंग आला कीं, बैसोनि तक्ता, अन्यायविण पीडिती लोका अशी त्यांची बेशरम कृति । संस्कृत पंडीतगिरीवरही तुकारामाने तितक्याच निकराचा हल्ला चढविला.

     नाना मतान्तरें शब्दांची व्युप्तत्ति, पाठांतरें होती वाचाळ ते ........शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभवभेद नाही कोणा...........। कोडियाचें गोरेपण, तैसें अहंकारी ज्ञान अशा विदारक शब्दांत पंडीतगिरीवर तुकारामाने प्रहार केले. आणि पंडीतांच्या पांडित्याचा पिंडपोषकांच्या जळो ज्ञानगोष्टी असा मर्मभेद करून निःस्वार्थ, निरहंकारी आणि मानवी भावजीवनाचें, आत्मप्रत्ययाचें आणि अनुभवसाकल्याचें महत्त्व आपल्या रसाळ वाणीने, निरभिमान वृत्तीने आणि निर्मळ वागणुकीने त्याने प्रस्थापित केलें. पोटार्थी कथेकऱ्यांवर, ढोंगी गुरुबाजीवर, नवससायासादि वेडगळ रूढीवर, सारांश सर्व महत्त्वाच्या रूढ सामाजिक जाणिवांवर निकराचा हल्ला चढवून नव्या मानवतेच्या, विशुध्द भावजीवनाच्या , वस्तुनिष्ठ अनुभवाच्या बंडाचें निशाण तुकारामाने केवळ आपल्या व्यक्तित्वावर आश्वासून उभें केलें. या बंडखोरपणामुळें तुकारामाला अनन्वित छळ सहन करावा लागला. सर्व प्रतिष्ठित सामाजिक जाणिवा एकीकडे आणि तुकाराम दुसरीकडे असा तो अतीविषम समाज संग्राम होता. या संग्रामाच्या अखंड माऱ्याखालीं तुकारामाचें व्यक्तित्व आकारास आलें. सर्व प्रतिष्ठीत सामाजिक जाणिवांपेक्षा त्याला आपला अंतरीचा भाव अधिक वास्तवतापूर्ण वाटला. तीव्रतम सामाजिक विरोधाचे घण वारंवार सहन करतां करतां त्याच्या अंतरींच्या भावनेला अनेक पैलू पडून दैदीप्यमान हिरकणीप्रमाणें ती चमकूं लागली. विपरीत परीस्थितीतहि अनुभवजन्य वास्तवतेचा स्पर्श न सोडल्यामुळें त्याच्या अंधाऱ्या एकाकी जीवनांत नव्या जाणिवेचा प्रकाश पडला. देऊळींचा देव मेला अंतरींचा जागवारे असे दिव्य बोल त्याच्या मुखांतून बाहेर पडूं लागले.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणवी जो आपुले ॥

तोचि साधू ओळखावा । देव तथेचि जाणावा ॥

    हें नव्या जाणिवेचें नवें गमक प्रत्यक्ष व्यावहारीक जीवनांत त्यानें प्रसृत केलें. नव्या जाणिवेमुळें व्यक्ति आणि विश्व यांची नवीं संगती त्यांच्या अंतःकरणांत उदयास आली. नव्या द्दृष्टिकोनांतून तो जगाकडे आणि जीवनाकडे पाहूं लागला. आणि या नव्या द्दृष्टिकोनांतून जें तुकारामाच्या अनुभवास आलें तेंच त्याचें वास्तवता दर्शन ! या वास्तवतादर्शनामुळेच तुकारामाचें शब्द नव्या आशयाने परिपूर्ण झाले. देवाविषयींच्या निर्जीव झालेल्या जुन्या रूढभक्तीत नव्या भावाचा जीव ओतला गेला. रूढ सामाजिक जाणिवांच्या दडपणामुळे निर्जीव बनलेले असंख्याचे भाव, सजीव झाले. प्रतिष्ठितांचीं देवळें सोडून लोक तुकारामाच्या भोवती, अंतरींच्या देवाच्या कलात्मक प्रतिकाभोवती गोळा होऊं लागले. सारा दलित महाराष्ट्र व्यावहारिक जीवनाची गुलामगिरी बाजूस सारून रंजल्यागांजल्यांना जो आपला म्हणवूं लागला होता त्याच्याकडे भराभर जाऊं लागला. दलितांची खडतर व रूक्ष जीवनांतील स्थिति प्रधानता नाहीशी होऊन ते टाळमृदंग घेऊन तुकारामाच्याभोवती हर्षभराने नाचूं लागले. सात्विक आनंदाचा एक क्षणहि ज्यांना मिळेनासा झाला होता, त्यांच्या आनंदाला आता पारावार उरला नाहीं, सहानूभूतीचा एक शब्दहि ज्यांच्या कानावर पडेनासा झाला होता, त्यांच्या कानांत लक्षावधि लोकांच्या मुखांतून एकाच वेळीं निघूं लागलेला एकात्मभावाचा एकच एक रसाळ निनाद, अखंड दुमदुमूं लागला. तुकारामाच्या कलात्मक वाणीने देवाच्या दगडी मूर्तीभोवती सारी मानवता एका नव्या जाणिवेने एकत्रीत केली. असंख्य लोक एकाच जाणिवेने एकत्र येतांच एकेकाच्या जाणिवेच्या चिमुकल्या ज्योती एकजीव होऊन त्या असंख्य ज्योतींचा प्रचंड वणवा बनला. त्या वणव्यांत सर्व मानवताशून्य रूढ सामाजिक जाणिवा एका क्षणांत भस्म होऊन गेल्या !

  नव्या जाणिवेच्या त्या प्रचंड वणव्याचें दर्शन घेऊन आपापल्या लहान लहान खेडांकडे परत गेलेले शेतकरी आपल्या धन्याकडे, शेठ सावकाराकडे एका नव्या आत्मविश्वासाने पाहूं लागले. ब्राह्मण, पंडीत, भटभिक्षुक यांना नव्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगूं लागले. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या या सर्वांना, नव्या जाणिवेने उत्स्फूर्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड एकतेपुढें हळूहळू विनम्र व्हावें लागले. मानवामानवांत नव्या माणुसकीचें नातें उदयास आलें. तीनशें वर्षांपूर्वी ज्ञानेश्वराने आरंभिलेली सांस्कृतिक समाजक्रांति तुकारामाच्या कलात्मक वाणीने परिपूर्ण झाली. संतांच्या कलात्मक वाणीने निर्माण केलेल्या नव्या जाणिवेने महाराष्ट्रांतील मराठमोळा आधीच सचेतन झाला नसता तर शिवाजीला स्वराज्याची स्थापना करतां येणें अशक्य झालें असतें. नव्या जाणिवेने, नव्या स्वाभिमानाने, नव्या आत्मविश्वासाने उठून उभ्या झालेल्या, असंख्याबरोबर एकात्मभावाने चालूं लागलेल्या सत्ताधारी आणि प्रतिष्ठित वर्गाच्या धार्मीक, नैतिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाला झुगारून देऊन नव्या प्रतिकाराच्या भावनेने गतिमान झालेल्या मराठांना राजकीय स्वरूपाच्या प्रतिकारास सज्ज करणें फार प्रयासाचें काम नव्हतें. सांस्कृतिक क्रांतिचें लवकरच राजकीय क्रांतीत रूपांतर होऊन खेडाखेडांत कुजत पडलेला मराठा घोडावर स्वार होऊन हर हर महादेव अशी रणगर्जना करून अटकेपार गेला ! भारताच्या चारहि दिशा त्याने पादाक्रांत केल्या !