महाकवींची
जन्मक्षेत्रं धर्मनिरपेक्ष अर्थानं तीर्थक्षेत्रं असतात. शेक्सपिअरवर इंग्रज इतकं
प्रेम करतात, त्याहूनही जास्त प्रेम आम्ही
ज्ञानदेव-तुकोबांवर करत असू, पण अर्थातच आमच्या या
प्रेमाला धार्मिकतेची काहीशी झालरसुध्दा आहे. कारण आमच्या या प्रेमाला धार्मिकतेची
काहीशी झालरसुध्दा आहे. कारण आमच्या मातृभाषेतलं वाङ्मय वारकरी संतांनी आम्हाला
दिलं आणि त्यामुळे आमच्या जुन्यात जुन्या संस्काराशी ते निगडीत झालं. यामुळे धर्म
आणि काव्य, जीवन आणि वाङ्मय,
भाषा आणि परंपरा यांची सहजासहजी फारकत करणं आम्हाला जमत नाही.
मराठी भाषेतले सर्वश्रेष्ठ कवी तुकाराम महाराज. जगातल्या महान कवींमध्ये त्यांची
गणना होईल आणि हे मान्य करायला वारकरी किंवा हिंदू भारतीयच असलं पाहिजे,
असं नाही. तुकोबांच जन्मस्थान देहू. पुणे शहरापासून ते जवळच
आहे. देहू हे नुसतंच तुकोबांच जन्मस्थान नाही, तर ती
त्यांची कर्मभूमीसुध्दा आहे. याच देहू गावी इंद्रायणी नदीच्या डोहात तुकोबांच्या
कवित्वाच्या बुडवलेल्या वह्या तेरा दिवसांनी पुन्हा कोरडया निघण्याचा चमत्कार झाला.
या चमत्कारावर एवढंच भाष्य करावंसं वाटतं की, येशू
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाइतकंच तुकोबांच्या काव्याचं पुनरुत्थान मानवतेचे
अंतश्चक्षू उघडण्याला समर्थ आहे.
तुकोबांचं
१६४९
मध्ये निर्वाण
झालं. या घटनेला आता
340 वर्षे उलटून गेली. त्यानंतर पुढे देहूहून तुकोबांच्या
पादुकांची पालखी प्रत्येक आषाढीला पंढरीची वारी करू लागली आणि आजही परंपरा अव्याहत
टिकून आहे. आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची, देहूहून
निघणारी तुकोबांची, आणि वेगवेगळया ठिकाणांहून निघणाऱ्या
इतर पालख्या आणि दिंडया मिळून केली जाणारी वारी ही महाराष्ट्राची एक वैशिष्टयपूर्ण
परंपरा आहे. सर्व जगाचं लक्ष ती हळूहळू वेधून घेत आहे.
याचं
ताजं उदाहरण म्हणजे डॉ. गुंथर साँथायमर या जर्मन भारताभ्यासकाने लिहिलेल्या
भाष्यानुसार,
हेन्निंग ष्टेगमुलर या चित्रपट - दिग्दर्शकाने निर्माण केलेला
'वारी' हा माहितीपट. या
माहितीपटाची मूळ लांबी नव्वद मिनिटं असून, यंदाच्या
म्युनिख माहितीपटोत्सवात. तो प्रथम प्रदर्शित होत आहे. या माहितीपटाची दूरदर्शन
आवृत्ती साठ मिनिटांची असून, अलिकडेच जर्मन चित्रवाणीवर
तो प्रदर्शित झालेला आहे.
एका
प्रमुख युरोपीय देशातल्या चित्रवाणीवर एक तास लांबीचा माहितीपट जेव्हा दाखवला जातो,
तेव्हा त्या विषयाला फार मोठं सांस्कृतिक महत्त्व दिलं जाण्याचं
ते द्योतक मानावं लागतं. 'वारी'
या चित्रपटाच्या ध्वनिपट्टीवर जे भाष्य आहे,
ते जर्मन भाषेत असलं, तरी त्या
चित्रपटातल्या सर्व मुलाखती, सर्व संभाषणं,
सर्व भजनं-कीर्तनं, सर्व घोषणा मूळ
मराठीतच आहेत. अस्सल माहितीपटाचं पोत मूळच्या संस्कृतीचंच असावं लागतं,
तसं या चित्रपटाचं आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे,
तर भारतभर दूरदर्शनवर दाखवला जावा आणि त्यासाठी त्यातल्या जर्मन
भाष्याचा खास हिंदी - मराठी अनुवाद करण्यात यावा, अशी
दूरदर्शनला जाहीर विनंती करावीशी वाटते, इतका तो
महत्त्वाचा आहे.
साँथायमर आणि ष्टेगमुलर यांनी जेव्हा या चित्रपटाचं चित्रण केलं,
तेव्हा त्यात त्यांनी तुकोबांच्या काव्याविषयी माझी एक छोटीशी
मुलाखत घेतली. या मुलाखतीचा एक भाग देऊळवाडयात पाणी दरवाजाच्या अलीकडेच ओसरीवर
चित्रित केला, तर एक भाग इंद्रायणीचा डोह जिथं
तुकोबांच्या वह्या बुडवण्यात आल्या होत्या त्या तरंगून आल्या अशी आख्यायिका आहे -
ही वस्तुत: देहूतली फार महत्त्वाची जागा; पण या स्थानाची
दुर्दशा पाहवत नाही. जुनं, पडीक मंदिर,
इतस्तत: विखुरलेले भग्नावशेष, छपराचे
पत्रे उडालेले. तुकोबांच्या वह्या ज्या डोहातून कोरडया निघाल्या,
त्यात आज गावतलं सांडपाणी साचतं आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी तर
जलप्रदूषणामुळे या डोहातले हजारो मासे तडफडून मेले. सुदैवाने त्यांचा संपूर्ण क्षय
अजून झालेला नाही. इंद्रायणीत आज या डोहात आणि इतरत्र चोरून मासेमारीसुध्दा चालते.
माशांचा क्षय झाल्यास पाण्याचं प्रदूषण जास्तच वाढणार हे उघड आहे. या माशांविषयी
इथल्या भाविकांची अशी श्रध्दा आहे की, ते 'वारी'
करतात ! कार्तिकीला देहूहून मासे आळंदीला जातात अशीही समजूत
आहे. आणखी एक लोकपरंपरा अशी आहे की, जेव्हा तुकोबा
वैकुंठाला गेले, तेव्हा त्यांची कन्या भागीरथी ही आपल्या
सासरी म्हणजे डोहापलीकडे एलवाडीला होती. तुकोबांच्या वियोगाची कल्पना सहन न होऊन
तिने जीव देण्यासाठी याच डोहात उडी घेतली. त्या वेळी या डोहातल्या माशांनी तिला
वरच्यावर झेलून पुन्हा सुखरूप काठावर आणली.
बाबा
गेले कोण्या गावा
भागीरथी करी
धावा
उडी डोहात
टाकिली
वरी मत्स्यांनी
झेलिली
अशी अनामिक
पारंपरिक रचना आजही गायिली जाते.
लोकांच्या या
श्रध्दांची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलिस
ऍक्टान्वये देहू येथे इंद्रायणी नदीत मासेमारीला बंदी आहे. डोहाच्या खालीसुध्दा
इंद्रायणी संगमापर्यंत हे माशांना अभयक्षेत्र आहे. पूर्वी देहूच्या पुलापाशी फलकावर
या ऍक्टान्वये मासेमारीविरध्द सार्वजनिक इशारा दिलेला होता. आज तो फलकच गायब झालेला
असून,
पुन्हा नवा फलक लावण्याची दक्षता कोणीच दाखवलेली नाही.
आळंदी
किंवा
इतर काही क्षेत्रांप्रमाणं देहू गावचं धार्मिक व्यापारीकरण झालेलं नाही,
ही गोष्ट जरी भाग्याची असली, तरी
वस्तुत: महाराष्ट्राच्या लेखी शेक्सपियरचं जन्मस्थान स्ट्रॅटफर्ड - ऑन - ऍव्हन -
इतकंच तुकाबांचं जन्मस्थान महत्त्वाचं हवं. तसं ते आज तरी दिसत नाही.
मुंबई
राज्याचे पहिले 'प्रधानमंत्री'
(मुख्यमंत्री) कै. बाळासाहेब खेर यांनी तुकोबा आणि देहू यांचं
महत्त्व ओळखून चाळीस वर्षांपूर्वी इंद्रायणीवर पूल बांधला,
कै. पु. मं. लाडांकरवी शंकरपांडुरंगी गाथेची नवी शासकीय आवृत्ती
प्रकाशित केली. (आज प्रचंड मागणी असूनही, शासकीय गाथेचे
पुनर्मुद्रण झालेले नाही.) कै. खेरांच्या कारकीर्दीत तुकोबांच्या निर्वाणाला तीनशे
वर्षं झाली आणि त्यानिमित्तानं वरील गोष्टींखेरीज तुकोबांच्या जन्मस्थान -
मंदिराचाही जीर्णोध्दार झाला. आता पुढच्या सुधारणांसाठी चारशेव्या निर्याणदिनाची
वाट पाहायची म्हटल्यास 2049 पर्यंत थांबावं लागेल !
ज्ञानेश्वरीच्या जन्मशताब्दी वर्षात यंदा तरी आळंदी,
नेवासे, पैठण वगैरे ज्ञानदेवांच्या चरित्राशी संबंधित
स्थानाच्या बाबतीत आपण काय केलं ? ज्ञानदेव किंवा
ज्ञानेश्वरी अजून भारतीय टपालाच्या खास तिकिटावरसुध्दा झळकली नाहीत !
तुकोबांच्या चरित्राशी संबंधित स्थानांचा निर्देश करणारे फलक देहूत दिसत नाहीत.
मराठी,
हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ते हवेत. देऊळवाडा,
जन्मस्थान, गोपाळपुरा आणि डोह अशी जी
चार प्रमुख स्थानं आहेत, तिथं त्यांचं तुकोबांच्या
चरित्रातलं महत्त्व विशद करणारे फलक हवेत. काही ठिकाणी गाथेतले संबंधित अभंग
मार्मिकपणे उध्दृत करता येतील. मराठीतील आणि अन्य भाषांमधील तुकारामविषयक वाङ्मयाचे
एक कायम प्रदर्शनसुध्दा देहूत हवं. तेही वरीलपैकी महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी.
देहू
गावात येणाऱ्या पर्यंटकांना उतरण्याच्या किंवा राहण्याच्या फारशा सोयी नाहीत.
स्वच्छ उपाहारगृहाचीसुध्दा उणीव आहे.या बाबतीत सुध्दा आधुनिक नागरिक आणि
प्रशासकांपेक्षा जुने भाविक आणि दानशूर आश्रयदातेच उजवे ठरतात. खेड तालुक्यातील
महाळुंगे गावचे सरदार इंगळे - जे शिंद्यांचे सरदार होते - त्यांनी पूर्वी
श्रध्देपोटी देहूची अर्धी पाटीलकी विकत घेतली. त्यांनी मंदिराच्या परिसरातली जागा
खरेदी केली,
तटबंदी बांधली, घाट बांधला. तसाच
देहूत नगारखाना आणि एक घाट अहिल्याबाई होळकरांनीही बांधला. पुढच्या काळात,
म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी,
श्रीजंगली महाराज यांनी धर्मशाळा तर बांधलीच; पण
निर्वाणस्थळापर्यंत सावलीसाठी झाडे लावली. आता त्यांची तोड झालेली आहे. निदान
सामाजिक वनीकरणाचा या परिसराला स्पर्श होवो. अलिकडच्या काळात संत गाडगेमहाराजांनी
आपल्या परीनं देहूत सोयी केल्या.
वस्तुत:
देहूकडे खुद्द महाराष्ट्र शासनानं लक्ष पुरविणं आवश्यक आहे. या गावाचं ऐतिहासिक आणि
सांस्कृतिक महत्त्व ओळखून अधोरेखित करणं आणि त्याच्याकडं केवळ भाविकांच्या
मेळाव्याचं एक स्थान म्हणून न पाहता राष्ट्रीय सांस्कृतिक स्मारकक्षेत्र म्हणून
पाहणं आवश्यक आहे.
जे
शेक्सपियच्या भाग्यात आहे,
ते तुकोबांच्या नशिबी नाही, असे
म्हणण्याची पाळी आमच्यावर येऊ नये |