सन 1932 मध्यें श्री. ह. भ. प. बाबासाहेब देहूकर यांच्या घराण्यांत
परंपरेनें पूजेंत असलेल्या वहीचें मला प्रथम दर्शन झालें. त्यावेळी श्री
तुकोबारायांच्या अभंगांच्या वहीचा मला त्यांनीं फोटो घेऊं दिला व पुढें अभंगांचे
शोधार्थ ठिकठिकाणीं जाऊन संशोधनासहि मदत केली. संशोधनार्थ पंढरींत आम्ही जुन्या
गाथ्यांचा शोध करीत होतों, तेव्हां हृ.भ. प. सख्या हरि शिंपी यांच्या घराण्यांत
पूजेंत परंपरेनें आलेली एक वही मला त्यांनीं पहावयास दिली. त्या वहीची मीं त्यावेळीं
नकल करून घेऊन त्यांची वही त्यांस परत केली. पुढें कांहीं वर्षांनीं म्हणजे सन 1940
च्या सुमारास श्री. सद्गुरु दादामहाराज सातारकर मुंबईस राहूं लागून त्यांचे तोंडून
श्री तुकोबारायांच्या अनेक अभंगांचें निरूपण ऐकण्याचा योग आला. तेव्हां मी नकल करून
घेतलेल्या सख्या हरि शिंपी यांच्या वहींत मला ज्या ओळी आढळत त्या त्यांचे नजरेस
आणून, त्यांचेकडून या वहींतील अभंगांचें निरूपण ऐकावें अशा इच्छेनें ही वही
पंढरपुराहून पुनः आणून ती श्री. दादामहाराज यांस दाखविली. त्यांस रोज तुकोबांचें
वचन नव्या उल्हासानें भोगण्यास हवेंच होतें. या वहींतील अभंगांचें त्यांनीं वही परत
मागितली व मीं परत केली. पण रोज सकाळीं तुकोबारायांचा अभंग सांगण्याचा क्रम श्री.
दादा महाराजांनीं सुरू केला होता, तो त्यांनी कृपाळूपणानें तसाच चालू ठेविला.
त्याशिवाय त्यांस करमेना. पुढें आजारानें प्रकृति फार बिघडली, तरी सकाळीं अभंग
सांगण्यास ते ताजेतवाने होऊन आमची वाट पाहात बसत. तो सकाळचा औषधाचा डोस आहे असें
म्हणत. येवढे ते अभंग सांगण्यास, तुकोबारायाच्या वचनासी संग करण्यास, आषख होते. त्या
दीड पावणेदोन वर्षांत तुकोबारायांच्या ओळी असलेले, पंडित प्रतींतील बरेचसे अभंग
झाल्यावर, करुणापर, संतपर, पंढरीपर असे अभंग होऊन त्या सर्व निरूपणावर श्री
ज्ञानेश्वर माउलीच्या विरहिण्या सांगण्यानें कळस चढवून श्री. दादामहाराज आळंदीस
जाऊन कायमचे बसले. तेव्हां सकाळचा अभंग ऐकण्याची संवय स्वस्थ बसूं देईना. या दीड
दोन वर्षांच्या श्रवणानें मनांत ज्या गोष्टींचा ठसा उमटला होता, त्या गोष्टी या
भिजल्या वहींतील अभंगांचा अर्थं स्पष्ट करूं लागल्या. अशा स्थितींत या भिजल्या वहीचीं
अनेक पारायणें केलीं, तेव्हां त्यांत ब-याचशा ठिकाणीं ओळी आहेत असें वाटूं लागलें.
1947 सालीं उन्हाळयाच्या सुट्टींत श्रीक्षेत्र आळंदी येथें मी श्रीविष्णुमंदिरांत
राहावयास गेलों. तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया । - तसा
मी चित्ताच्या समाधानानें श्री ज्ञानेश्वर माउलीच्या सान्निध्यांत राहात होतों. तेथें
सुखासहि कांहीं उणीव नव्हती - अशा सुखासमाधानाच्या स्थितींत या भिजल्या वहींतील
अभंगांचें रूपांतर ''माउली''च्या सहवासांत झालें. अन्तर्गत दुवेहि स्पष्ट झाले. वही,
रूपांतर, त्याबद्दलची थोडी चर्चा येवढें लिहून झाल्यावर ती हस्तलिखित प्रत माझेजवळ
तशीच संग्रहास होती, 1948-49 मध्यें संताजीच्या वह्यांचें रूपांतर केलें. भिजल्या
वहींतील अभंग या महागाईच्या दिवसांत छापले जातील अशी कल्पना मला केव्हांच नव्हती.
गेल्या (1949) वर्षीं याच सुमारास मुंबईस श्री. धनंजय
रामचंद्र गाडगीळ यांस भेटावयास गेलों असतांना आम्हां उभयतांचें दुस-या कांहीं
गोष्टींवरून बोलणें होता होता श्री तुकोबारायांच्या अभंगावर आलें-तेव्हां मी सहज
भिजल्यावहीचें महत्त्व माझे मतें काय आहे हें त्यांस सांगितलें व छापखान्यास
छापावयास देतां येईल अशी हस्तलिखित आणून त्यांस पहावयास दिलें. त्यांचा मुक्काम
त्यावेळीं 1/2 दिवस मुंबईस होता. पुण्यास परत येतांना त्यांनीं माझें हस्तलिखित परत
केलें. पुढे महिन्या दीड महिन्यानें मला श्री. धनंजयराव गाडगीळ यांचें पत्र आलें
कीं भिजल्या वहीचे अभंग छापले जावेत म्हणून मीं कांही जणांना विचारलें. त्यांचीं
अनुकूल उत्तरें आलीं नाहींत. तेव्हां वही आपणच छापावी असें ठरविलें आहे. याप्रमाणें
आर्यभूषण छापखान्यांत छापवून श्री. धनंजयराव गाडगीळ भिजल्या वहीचे अभंग प्रसिध्द
करीत आहेत. ही वही महाराजांच्या निर्याणाच्या सोहळयाचे वेळी प्रसिध्द करावी असा
विचार होता. परंतु पुष्कळ प्रकाशक पुष्कळशीं पुस्तकें तीनशें वर्षांच्या
महोत्सवाच्या संधीचा फायदा घेऊन प्रसिध्द करीत आहेत असें ऐकून आम्ही प्रकाशनाचा बेत
पुढें ढकलला, व तें काम आतां आषाढीच्या निमित्तानें होत आहे. अभंगांचा अर्थ, टिपा -
निरूपणें श्री. दादामहाराजांच्या तोंडून ऐकलेल्या संतबोधाचें, प्रेमबोधाचें व
त्यांच्या कृपेचें वैभव आहे. ग्रंथाचें प्रसिध्दीकरण हें श्री. गाडगीळ यांच्या
सौजन्याचें व लोभाचें फळ आहे.
आर्यभूषण छापखान्यानें पुस्तक तांतडी करून वेळेवर
छापून दिलें याबद्दल श्री.
वि. अ. पटवर्धन यांचा आभारी आहे.
ह. भ. प. सख्या हरि शिंपी यांचा मी वही वापरावयास, नकल करावयास दिली याबद्दल आभारी
आहें.
श्री. ह. भ. प. बाबासाहेब देहूकर यांनीं पूजेंतील वही या
ग्रंथांत छापावयास व त्या बरोबर च वहींतील एका पृष्ठाचा ब्लॉक करून छापावयास परवानगी
दिली याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मूळ वहींतील अभंग ** अशा खुणांनीं या
ग्रंथांत छापले आहेत व ब्लॉक मध्यें आलेले अभंग 360 - 64 आहेत.
|