वरील सर्व प्रतींपैकीं (16वी प्रत वगळून) नीट छापलेली व व्यवस्थितरीतीनें
पाठांतरें दिलेली प्रत अनुक्रमांक 3ही होय. प्रकाशकांनीं आपण ही प्रत कोणत्या
प्रतीवरून छापीत आहोंत, पाठांतरे कोणत्या प्रतीवरून दिलीं ही माहीती ग्रंथास
Critical Preface जोडून इंग्रजींत दिली आहे. त्यावरून ही प्रत त्र्यंबक कासार याच्या
वही बरहुकूम छापली आहे, असें वाटतें. ही वही प्रकाशकांस तळेगांव येथें मिळाली, व
त्यांस पाठांतरें देण्यास, (1) देहूची हस्तलिखित प्रत (2) कडूस येथील मवाळांची
हस्तलिखित प्रत, व (3) पंढरपूरची गंगुकाकांची प्रत मिळाली होती. अनुक्रमांक 3ही
इंदुप्रकाश किंवा पंडित यांची प्रत म्हणून प्रसिध्द आहे. ही प्रत त्यावेळचे
Oriental Translator शंकर पांडुरंग पंडित यांचे सहाय्यानें विष्णु परशुराम शास्त्री
पंडित यांनीं शुध्द करून छापण्याकरितां तयार केली असें मुखपृष्ठावर म्हटलें आहे. ही
प्रत त्र्यंबक कासार याच्या वहीवरून छापली आहे. त्र्यंबक कासारानें आपल्या वहीच्या
68 व्या पृष्ठावर ही वही 40 वर्षे अभंग गोळा करून शके 1709 मध्यें संपविली असें
म्हटलें आहे.
या सर्व प्रतींत अनुक्रमांक 1/2/3/5 या प्रती फार उपयुक्त आहेत. अनुक्रमांक 1 च्या
प्रतींत अभंग संख्या 3228 आहे. देहूस थोडया वर्षांपूर्वीं मी एक 3।3॥ हजार अभंगांची
हस्तलिखित प्रत पाहिली होती. तिचीच नक्कल अनुक्रमांक 1 असावी असें वाटतें. आज ती
हस्तलिखित प्रत उपलब्ध नाहीं. अनुक्रमांक 1 असावी असें वाटतें. आज ती हस्तलिखित
प्रत उपलब्ध नाहीं. अनुक्रमांक 2 व 12 या प्रती पंढरपुरास भागवत बोवा बेलापुरकर
यांची प्रत आहे, त्याच्या नकला असाव्यात. यंदा ती प्रत केमकर यांनीं प्रसिध्द केली
आहे. अनुक्रमांक 4/6 ही अनुक्रमांक 3ची नक्कल आहे. अनुक्रमांक 5चीं कांहीं पाने
देहूस थोडया वर्षांपूर्वीं पाहिलीं होतीं. पण अनुक्रमांक 1च्या प्रतीप्रमाणें च
सध्यां तीं पृष्ठे हि उपलब्ध नाहींत. अनुक्रमांक 11ही प्रत गंगुकाकांच्या प्रतीवरून
देवडीकरांनी छापली आहे. तुकोबारायांचे टाळकरी संताजी तेली जगनाडे यांच्या दोन
वह्यांवरून कै. वि. ल. भावे यांनीं आर्यभूषण मध्यें छापलेल्या प्रतीचें विवेचन
पुढें स्वतंत्र येणार आहे, तेव्हां पुढील विवेचन हें संताजीची प्रत वगळून आहे,
म्हणून समजावें.
माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी व तुकाराम तात्या, यांनीं आपल्या प्रती कोणत्या
पोथीवरून छापल्या आहेत, याचा कोठें च उल्लेख केलेला नाहीं. पुढें ज्या प्रती
निघाल्या त्यांनीं हि आपण कोणती प्रत वापरली तें प्रसिध्द केलें नाहीं. मला वाटतें,
छापण्याची कला ही गाथा छापण्याच्या कामीं वापरण्यास त्या वेळचे मठाधिपति विरूध्द
असावेत म्हणून हे उल्लेख केलेले नसावेत. अनुक्रमांक 9 ही जगध्दितेच्छूनें छापलेली
प्रत आळंदीस हैबत बोवांची जी प्रत आहे, त्या प्रती वरून छापली आहे असें वाटतें. जवळ
जवळ अशी च प्रत 1913 मध्यें गोडबोले यांनीं जगध्दितेच्छु छापखान्यांत छापली व
प्रसिध्द केली. ही प्रत माळेची प्रत माळेची प्रत किंवा ओळीचा गाथा म्हणून समजला
जातो. या प्रतींत शब्द तोडलेले नाहींत. या प्रतीचें पुनर्मुद्रण सन 1936 सालीं
झालें. व त्या प्रतीच्या मुखपृष्ठावर ह. भ. प. देहूकर महाराज, भागवत बोवा बेलापूरकर
व वासकर यांच्या फडांतील वारकरी सांप्रदायिक ओळीचा गाथा-असें या प्रतीचें वर्णन
केलें आहे. या च प्रतीची आणखी एक नवी आवृत्ति यंदा केमकर आणि मंडळी यांनीं प्रसिध्द
केली आहे. सन 1901 मध्यें जोग व गुळवे यांनीं इंदिरा छापखान्यांत छापून प्रसिध्द
केलेल्या गाथ्यांत पहिल्या प्रथम अभंगांत वर्गवारी (रूपाचें-नामपर-संतपर-करूणापर
अशी वर्गवारी करून) केली; व या नव्या प्रथेची टूम प्रत्येकास आपण करावी असें वाटूं
लागलें. ही गोष्ट निर्णयसागर प्रतीच्या दुस-या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत स्पष्टपणें
नमूद केली आहे. प्रकाशक म्हणतात कीं-
''आमची तुकारामाच्या गाथेची पहिली आवृत्ति ईशकृपेनें लवकर च संपल्यामुळें हल्लीं
पुनः दुसरी आवृत्ति छापली आहे. पहिली आवृत्ति बाहेर पडतां च रा. रा. त्र्यंबक हरि
आवटे, इंदिरा प्रेसचे मालक, पुणें यांनीं आपल्या पुस्तकांत ठेविलेल्या
क्रमाप्रमाणें च या हि पुस्तकाचा क्रम असावा अशा अनेकांकडून सूचना आल्या व विशेषें
करून स्फुट अभंग या सदरा खालील अनेक अभंग फोडून ते निरनिराळीं प्रकरणें करून त्यांत
घालावे अशी श्री. तुकारामाच्या अभंगांचें निरंतर परिशीलन करणारे रा. रा. दादा
बाळाजी पाटील मु. जोपुळ व कै. रा. रा. बळवंत खंडुजी पारख वगैरे मंडळींनीं फार
अगत्याची सूचना केली व थोडी माहिती हि दिली त्यावरून आम्हीं या आवृत्तींत अनेक
प्रकरणें करून त्या त्या प्रकरणांत ते ते अभंग घालून हें पुस्तक छापलें आहे.''
तेव्हां अनुक्रमांक 1 - 5 या गाथ्यांतून कोणती तरी जुनी हस्तलिखित प्रत मिळवून गाथा
छापावयाची रीत प्रथम इंदिरा प्रेसनें मोडली व त्या नव्या रीतीचा स्वीकार करून पुढील
ब-या च प्रकाशकांनीं इंदिरा प्रेसचा कित्ता गिरविला आहे. इंदिरा प्रेसनें ही प्रथा
कां सुरू केली याचें नीटसें उत्तर त्या प्रतीच्या प्रस्तावनेंत सांपडत नाहीं.
त्यांस उत्तर नीटसें देतां आलें असतें असें हि वाटत नाहीं. कारण पूर्वींच्या माहीत
असलेल्या प्रती अगोदर च प्रसिध्द झाल्या होत्या व त्या सर्व प्रती Copy Right Act
प्रमाणें नोंदविलेल्या होत्या, शिवाय इतर ज्या हस्तलिखित प्रती उपलब्ध असतील त्या
तेवढयाशा प्रसिध्द घराण्यांतील नसाव्यात. शिवाय जो कोणी मठाधिपति आपली प्रत वापरूं
देण्यास तयार झाला असता त्यानें त्या प्रतीवर आपला व आपल्या मठाचे स्वामित्वाचा असा
साहजिक च हक्क सांगितला असावा. त्या बरोबर थोडी दक्षणा हि मागितली असावी. अशा सर्व
अडचणी (कायद्याच्या व इतर) चुकविण्याची शक्कल (अभंगांची वर्गवारी करावी ही) कोणा
कायदा जाणणा-या माणसानें सुचविलेली असावी. तेव्हां जोग व गुळवे यांनीं माधव
चंद्रोबा, गणपत कृष्णाजी, पंडित या तीन प्रतींची वर्गवारी करून नवी प्रत छापली. अशी
प्रत आजवर प्रसिध्द झाली नव्हती, शिवाय त्यावेळीं पहिल्या तीन्ही प्रती बाजारांत
मिळत नाहींशा झाल्या होत्या. अशा दोन्ही कारणांनीं या प्रतीचा बोलबाला झाला असावा.
याचें प्रत्यंतर निर्णयसागर छापखान्याच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत (वर उध्दृत
केलेल्या) पाहावयास सांपडतें. माडगांवकर यांनीं पहिल्यानें निर्णयसागर छापखान्यांत
जी प्रत छापली ती पंडितांच्या प्रतीची नक्कल होती, पण त्यांनीं हि पुढें एक प्रत
छापली ती इंदिरा प्रेसचे मालक यांनीं जी नवी टूम काढली, ती त्या वेळच्या मंडळीस
पटली असावी. कारण तशा वर्गवारीचा एक उपयोग असा आहे कीं, कीर्तनकारास कोणत्या हि एका
विवक्षित विषयावरील एका त-हेचीं वचनें फार श्रम न करतां चटकन् सांपडतात. पण या
नव्या प्रथेनें एक नुकसान झालें व तें हें कीं माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी व
पंडित यांच्या प्रतींत चुकत माकत ज्या तुकोबारायांच्या ओळी (ओळ म्हणजे ज्या
क्रमानें तुकोबास अभंग स्फुरून ते लिहिले गेले ती ओळ, ती माळ, तो क्रम,) शिल्लक
राहिल्या होत्या त्या नष्ट झाल्या; व मौज अशी कीं त्याची क्षिती कोणास हि वाटली
नाहीं, इतकेंच नव्हे तर वर उध्दृत केलेल्या निर्णयसागराच्या दुस-या आवृत्तीच्या
प्रस्तावनेंत म्हटल्याप्रमाणें ''श्रीतुकारामाच्या अभंगांचें निरंतर परिशीलन
करणारें'' वारकरी च ही नवी टूम स्वीकारा म्हणून अधिकारयुक्त वाणीनें सांगण्यास
पुढें यावेत याहून दुसरी खेदाची व नवलाईची गोष्ट कोणती असणार ! छापील गाथ्यांच्या
बहुतेक सर्व प्रतींच्या प्रस्तावना वाचून मला असें वाटूं लागलें आहे कीं, या
प्रकाशकांनींच काय पण वर उल्लेखिलेल्या व त्या सारख्या इतर हरिभक्तपरायण वारकरी
मंडळींनीं, तुकोबारायांचे अभंग मुळांत कसे प्रगट झाले असावेत, ते लेखनिविष्ट
केव्हां व कोणीं केले असावेत, त्या अभंगांत विषयवारीनें किंवा कीर्तनाच्या
अनुसंधानानें क्रम काय असावा, तसेंच एका वेळीं एका कीर्तनांत वा भजनांत कांहीं
वृत्तींच्या आविष्करणास, एकाद्या रसाच्या परिपोषास, अनुसरून कांहीं क्रम असावा का,
या गोष्टीचा कोठें हि केव्हां हि विचार केलेला दिसत नाहीं. या सर्व मंडळींनीं
जुन्या प्रती डावलून जी नवी प्रथा पाडली ती गोष्ट परिस टाकून कांच पदरांत घ्यावी
तशी झाली. नुसते सुटे सुटे अभंग छापून मोकळें होण्याची ही नवी प्रथा ह. भ. प.
विष्णुबोवा जोग यांनीं स्वतः (1901 मध्यें) पाडली व अभंगांचा शब्दशः अर्थ देऊन गाथा
छापण्याचें काम त्यांनीं (सन 1909 मध्यें) पत्करलें तेव्हां आपण च मुळांत अभंग
स्फुट आहेत, म्हणून तक्रार करण्यास सुरवात केली. पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेंत
कै. विष्णुबोवा जोग म्हणतात कीं :-
''ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथांची भाषा जरी निराळी भासते तरी अर्थ समजूत
तुकाराम महाराजांच्या गाथ्यापेक्षां लवकर पटते, कारण त्यांत एक वेळ विषयसरणी किंवा
कोणत्या विषयावर तें लिहिलें आहे, हें कळलें म्हणजे अर्थज्ञान होण्यास साधारण
मनुष्यास सुध्दां सोपें पडतें. परंतु तुकाराम महाराजांच्या गाथ्यासंबंधानें तसें
नाहीं; (1) त्यांच्यांत मुळींच अभंग स्फूट आहेत; (2) अभंगांत जरी विषयवारी लाविली
तरी ती संगतवार जुळत नाहीं. (3) एका अभंगाचा अर्थ पुढच्याच्या अर्थास जुळत नाहीं,
म्हणून अर्थ समजण्यास पुष्कळ कठीण पडतें. (4) कांहीं कांहीं रूपकें फारच कठीण आहेत.
(अभंग होत असतांना जशी तुकाराम महाराजांची वृत्ती कशी होत असत. त्यांच्या वाणींत
अभंग प्रगट होत असतांना त्यांची वृत्ती कशी असावी, हें ज्यास ताडतां येईल त्यासच
त्यांच्या अभंगांचें खरें रहस्य कळेल.''
विष्णूबोवा जोग यांनीं त्यांस ज्या अडचणी जाणवल्या त्यांची नोंद प्रांजलपणानें केली
आहे. याबद्दल त्यांस धन्यवाद दिले पाहिजे. कारण आपणास अमुक एक गोष्ट नीट समजली
नाहीं, उमजली नाहीं, असें कबूल करण्यास अहंकार गिळावा लागतो, तेवढा प्रांजलपणा
विष्णुबोवांनीं दाखविला आहे. परंतु या नडी आपण (1901 मध्यें) स्वतः उत्पन्न केल्या
हें त्यांच्या गावीं होतेंसें कोठें हि दिसत नाहीं. त्यांस आढळलेल्या नडींतून बाहेर
पडण्याचा प्रयत्न त्यांनीं केल्यासारखा दिसत नाहीं. तुकोबारायांचें एक वचन असें आहे
कीं :-
भुकेचे सन्नीध वसे स्तनपान उपायांची भिन्न चिंता नाहीं तसें या वचनावर टेकून
विष्णुबोवांनीं आपल्या शंका-अडचणी फेडून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीं.
विष्णुबोवा जोगांनीं आपली सार्थगाथ्याची प्रत बहुतांशीं पंडितांच्या प्रतीची नक्कल
केलेली आहे. त्यांनीं आपल्या प्रतींत फरक करून दाखविला आहे व तो हा कीं जेथें जेथें
एखादें स्वतंत्र प्रकरण पंडित प्रतींत आलें तें जोगांनीं उचलून शेवटीं अगर
निरनिराळी वर्गवारी केलेसें दाखवून दुस-या ठिकाणी छापलें आहे. या दृष्टीनें जो कोणी
दोन्ही प्रतींची तुलना करून पाहील त्याच्या ही गोष्ट सहज लक्ष्यांत येईल
विष्णुबोवांनीं आपली प्रत (नक्कल) लिहून तयार करण्याचें काम दुस-या कोणाकडून करवून
घेतलें असावें, कारण पंडितांच्या प्रतीवरून स्वतः नक्कल करतांना त्यांच्या एक गोष्ट
लक्ष्यांत आली असती कीं पंडितांच्या प्रतींत कांहीं अभंगांच्या शेवटी आंकडे घातलेले
आहेत. त्या आंकडयांचा अर्थ काय असा त्यांनीं आपणा स्वतःस प्रश्न विचारला असता तर
त्या प्रश्नाचें उत्तर हि त्यांस सहज सुचलें असतें कींः- हे जे मधून मधून
पंडितांच्या प्रतींत आकडे आहेत ते अभंगांचे लहान मोठे गट असून त्या अभंगांत
अन्तर्गत दुवा आहे. विष्णुबोवांनीं म्हटल्याप्रमाणें त्या गटांत परस्पर विरोधीं
वचनें येत नाहींत, इतकें च नव्हे तर तो अभंगांचा गट कोणत्या मनस्थितींत स्फुरला
आहे, याचा हि निर्देश तुकोबारायांनीं कोठें केलेला आहे.
तुका म्हणे येथें करावा उकल । लागेची ना बोल वाढउनी । (पंडित प्रत 2706)
स्वतः तुकोबारायांची वरील चरणांत म्हटल्याप्रमाणें इच्छा असतांना विष्णुबोवा सारख्या
अधिकारी पुरूषांस अर्थज्ञान होण्यास नडी व अडचणी कां जाणवाव्यात ? त्यांत त्यांची
चूक नव्हती. तुकोबारायांच्या अभंगांची महाराष्ट्राकडून हयगय फार झाली.
तुकोबारायांच्या अभंगांच्या व्यवस्थित केलेल्या नकला आज हि उपलब्ध नाहींत, इतकेंच
नव्हे तर मुळांत तुकोबारायांचे अभंग कसे असावेत, किती असावेत याची हि कोणी क्षिती
बाळगली नाहीं. सत्य ज्ञानाची महाराष्ट्रास चाड आहे कोठें ! समारंभ पार पाडावेत,
दिवस साजरा करावा, आली वेळ निभावून न्यावी, चार वचनें गोळा करून कीर्तन, व्याख्यान
व प्रवचन वक्तृत्वाचा पाऊस पाडून शेवटास न्यावें व लोकांकडून वाहवा म्हणवून घ्यावी
या पलीकडे कितीसे सुशिक्षित लोक खोल पाण्यांत शिरण्याचा प्रयत्न करीत असतांना
आढळतात ! भोळया वारक-यांबद्दल बोलावयास च नको. आपला परंपरागत नित्यक्रम पार पडला
म्हणजे त्यानां आजचा दिवस पदरांत पडला, असा त्यांचा विश्वास ! तेव्हां
त्यांच्याबद्दल ज्यास्त कांहीं एक न लिहितां सुशिक्षित पदवीधर वर्गानें आपलें
कर्तव्य कां ओळखलें नाहीं याचा आपण विचार केला पाहिजे. असा विचार करूं लागावें तर
असें आढळून येतें कीं आपला पूर्वकालीन पदवीधर वर्ग संस्कृत व इंग्रजी या भाषांच्या
दास्यत्वांत होता. त्यांना असें केव्हां च वाटल्या सारखें आढळत नाहीं कीं
ज्ञानेश्वरी व तुकोबारायांचा गाथा हे दोन ग्रंथ जगाच्या उत्कृष्ट वाङ्मयांत गणले
जातील च. व आपलें भाग्य थोर, असें कीं, हे ग्रंथराज आपल्या मराठी भाषेंत आहेत.
त्यांची गोडी, त्यांचा रस, हा केव्हां हि भाषांतरांत चाखतां येणार नाहीं. इतके ते
ग्रंथ मराठी, अव्वल, अस्सल, आहेत. हे दोन्ही ग्रंथ वाचण्यास-शिकून-आपलेसे करण्यास
आपण व्यर्थ आटाआट करावयास नको. आपली जन्मभाषा मराठी आहे. पण कोणा, किती, पदवीधरांस
आंग्लाईत मराठी भाषेबद्दल एवढा अभिमान वाटला आहे ! नाहीं म्हणावयास आपल्या
महाराष्ट्रांतील तिन्ही महापुरूष या दोन्ही ग्रंथांची योग्यता ओळखून होते व ते
म्हणजे (1) महादेव गोविंद रानडे. (2) डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व (3) बाळ गंगाधर
टिळक. रानडयांनीं या ग्रंथांच्या आधारें भागवतधर्मावर व्याख्यानें दिलीं, तीं
ग्रंथ-रूपानें प्रसिध्द आहेत. भांडारकरांनीं प्रवचनें व किर्तनें केलीं, व
टिळकांनीं प्रत्येक अध्यात्मिक गोष्टीचा अनुभव सांगतांना गीतारहस्यांत ज्ञानोबांचें
किंवा तुकोबांचें वचन उध्दृत करून अत्यंत आदरानें वापरलें. असो.
सुशिक्षित पदवीधरांनीं तुकोबारायांच्या अभंगांची संस्कृत व इंग्रजी या दोन
भाषांच्या सासुरवासानें कशी उपेक्षा केली हा भाग वर आला आहे. त्यांचें विस्तरशः
जास्त वर्णन नको. पदवीधरांमध्यें जो परस्पर पत्र-व्यवहार होतो तो पुष्कळ अंशीं
इंग्रजींतून च होतो, हें एक प्रमाण बौध्दिक दास्यत्व सिध्द करण्यास पुरेसें आहे.
असो, जे थोडेफार सुशिक्षित व पदवीधर या दास्यत्वांत न सांपडतां मोकळे राहिले व
संतवाङ्मयाकडे वळले अशांतील प्रमुख नांव श्री. लक्ष्मणराव पांगारकर यांचें आहे.
यांनी बहुतेक सर्व संत वाङ्मयावर कांहींना कांहीं लिहिलें नाहीं असें झालें नाहीं.
या परिस्थितीमुळें रात्र थोडी व सोंगें फार अशी पांगारकरांची स्थिती झाली. त्यांनीं
कोणत्या हि प्रश्नाचा सखोल विचार केला नाहीं. प्रत्येक गोष्ट ही महिपतीबोवांच्या
हरिदासी कोटयांप्रमाणें झाली आहे, हें सिध्द करण्याची त्यांची केवढी आटाआटी !
विष्णुबोवांच्या सार्थ अभंगांच्या गाथ्यास पांगारकर यांनीं लिहिलेलें तुकोबांचें
चरित्र जोडलें आहे. तेव्हां पांगारकर यांना विष्णुबोवांनी उत्पन्न केलेल्या
प्रश्नांस उत्तर देणें, निदान ते प्रश्न लक्षांत घेणें, भाग होतें. पांगारकर यांनीं
या प्रश्नांचा कसा निकाल लाविला तो आतां पाहूं.
''कोणत्या प्रसंगीं, कोणत्या अवस्थेंत, त्यांच्या मुखांतून, कोण कोणते अभंग बाहेर
आले, ते संगतवार पध्दतीनें देणारा गाथा जर छापतां आला असता तर किती बहार झाली असती
बरें !! पण येवढें भाग्य आम्हां मर्त्यांचें नाही. त्यामुळें परंपरागत आलेल्या साडे
चार हजार अभंगांवरच भिस्त ठेवून आम्हीं राहिलें पाहिजे.'' पांगारकरांच्या या
निरूपणानें कोणाचें समाधान होणार असेल तें होवो, पण माझें कांहीं त्यानें समाधान
झालें नाहीं. पांगारकर स्वतः तुकाराम चरित्र लिहावयास बसले, तेव्हां विष्णुबोवा
जोगांनीं उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याचा कसा बसा प्रयत्न करणें त्यांना प्राप्त
होतें, व तसा त्यांनी प्रयत्न केला आहे. पांगारकर यांनीं तुकोबांच्या चरित्राचा
मुख्य आधार म्हणजे अभंग होत असें म्हणून तुकाराम चरित्राच्या प्रस्तावनेंत पुढें
गाथ्यांची चर्चा केली आहे ती अशीः-
''इंदुप्रकाश गाथा, दोन सांप्रदायिक गाथे, संताजीचा गाथा, बहिणाबाईंचा गाथा, हे
पांच गाथे मुख्य आहेत. थोडे फार पाठभेद आहेत. शुध्दाशुध्दतेंत फरक आहेत. पण
तात्पर्यार्थाच्या बाजूनें पाहतां गाथ्या-गाथ्यांत डोंगराएवढे फरक आहेत, असें
नाहीं. सांप्रदायाचे सिध्दांत माहीत असले, तुकोबांच्या विचारांचा व भावनांचा अंतरंग
परिचय असला, निदान विचारांचा एकसूत्रीपणा पटलेला असला, म्हणजे कोणताहि गाथा वापरला
तरी परमार्थाची विशेष हानि होण्याचा संभव आहे, असें मला वाटत नाहीं. अभंगांचे शुध्द
पाठ मिळण्यास एक तुकोबांच्या हातचा, निदान त्यांना सर्वतोपरी मान्य असलेला गाथा तरी
मिळाला पाहिजे. किंवा हे चारपांच गाथे बारकाईनें अभंगशः तपासून व आणखी शोध करून, एक
सर्वजन मान्य होईल असा एक नवीन गाथा परंपरेच्या व संशोधनाच्या अशा दुहेरी
द्दृष्टीनें तयार झाला पाहिजे. मीं हे सर्व गाथे पाहिले आहेत. विशेष महत्त्वाचे व
मर्माचे अभंग प्रत्येक गाथ्यांत ताडून पाहिले आहेत. व अशा द्दष्टीनें
सांप्रदाय-परंपरा यांच्या द्दष्टीनें, वारक-यांत प्रेमानें मिसळून वागल्यानें व
आळंदी, देहू, पंढरी येथील परंपरेप्रमाणें कथा, कीर्तनें व पुराणें ऐकल्यानें व
केल्यानें सांप्रदाय शुध्द विचारसरणी कळून येऊन तदनुरोधानें अभंगांचा अभ्यास व मनन
माझें (पांगारकर) झालें आहे.''
वरील विवेचनांत विष्णुबोवा जोग यांच्या प्रश्नास उत्तर आहे असें मला वाटत नाहीं.
अभंग हा च जर चरित्राचा मुख्य आधार तर मग सांप्रदायिक व संशोधक द्दष्टीनें गाथा
तयार करून त्या गाथ्यास धरून त्यांनीं चरित्र लिहिलें नाहीं. तसे करण्यास पांगारकर
असमर्थ होते असें हि नाहीं. ते स्वतःस सांप्रदायिक म्हणवीत होते, व होईल तें संशोधन
हि करीत होते. त्यांनीं मर्माचे अभंग ताडून पाहिले म्हणून म्हटलें आहे. परंतु
संताजीचा गाथा त्यांनीं इतर गाथ्यांशीं ताडून पाहिला असतां, तर त्यांस कांहीं नवे
विचार सुचले असते. पण गाथ्या-गाथ्यांत डोंगराएवढे फरक आहेत हें दाखविण्यासाठीं आहे.
व या विवेचनांत विष्णुबोवांच्या प्रश्नांस मला सुचलेली उत्तरें येणार आहेत.
येथ वर ज्या लोकांनीं तुकोबांच्या गाथ्याचा विचार केला अशा दोन्ही लेखकांचें
अभंगांबद्दलचें म्हणणें वर दिलें आहे. त्याचा निष्कर्ष एवढा च कीं त्यांनीं या
विषयाचा जेवढा खोल विचार करावयास हवा होता, तेवढा केलेला दिसत नाहीं. असो, तो विचार
आपण या प्रस्तावनेंत करण्याचा प्रयत्न करूं.
तुकोबारायांस कवित्वस्फूर्ति होऊन ते कवित्व करूं लागले तेव्हां त्यांस बाळबोध
लिहिण्याची संवय नव्हती. ती संवय व्हावी म्हणून त्यांनीं एक वही तयार करून
बालक्रीडा लिहावयास सुरवात केली, असें विधान महिपतीबोवांनीं आपले संतलीलामृतांत
केलें आहे. मी तें विधान बरोबर आहे असें मानीत नाहीं. कवित्वस्फूर्ति होण्यापूर्वी
तुकोबांनीं कांहीं पाठ केलीं संतांचीं वचनें, म्हणून स्वतः म्हटलें आहे. तीं वचनें
त्यांनीं मोडींत लिहून घेतलीं होतीं कां? मी कां ? महिपतीबोवांचें वचन एवढया च
पुरतें उध्दृत केलें आहे कीं कवित्वस्फूर्ति होऊन तुकोबांस जेव्हां अभंग स्फुरत
तेव्हां ते अभंग तुकोबा स्वतः लिहून ठेवीत होते. अशाबद्दल वह्या बुडविल्यानंतर
तुकोबांनीं जेव्हां पांडुरंगावर वह्या तारण्याचा भार घालून, अन्नपाणी वर्ज करून,
धरणें धरून, दिव्य केलें तेव्हां एका अभंगांत म्हटलें कीं हातीं न धरी लेखणी, (पं.
2228)तेव्हां तुकोबा स्वहस्तें अभंग लिहीत होते ही गोष्ट त्यांच्या अभंगानें सिध्द
होत आहे. याशिवाय तुकोबांचें ''बुडविल्या वह्या बैसलों धरणें (पं. 1333 चरण 16) हें
हि वचन अभंगांतील आहे. तेव्हां या दोन चरणांवरून येवढें अनुमान करतां येतें कीं
तुकोबा स्वहस्तें अभंग लिहीत होते व अशा अभंग लिहिलेल्या वह्या एकाहून कांहीं तरी
ज्यास्त बुडविल्या गेल्या होत्या. अशापैकीं तुकोबारायांच्या नंतर उपजलेले
नारायणबोवा गोसावी यांच्या घराण्यांत एक तुकोबारायांच्या हातची म्हणून पूजेंत आहे.
या वहींतील बरचिंशीं पृष्ठें दक्षणा देऊन नात्यागोत्याच्या किंवा इतर पैसेवाल्या
लोकांनीं काढून प्रसाद म्हणून नेलेलीं आहेत. त्यांपैकीं जेवढीं पृष्ठें आज उपलब्ध
आहेत, त्यांत असलेले सर्व अभंग त्याच क्रमानें यापुढें छापले आहेत. त्यावर **अशी
खूण केली आहे. वहींतून प्रसाद म्हणून बाहेर गेलेलीं दोन पृष्ठें मला मिळालीं आहेत,
त्यावरील अभंग हि पुढें 108-118 व 354-57 असे छापले आहेत. तुकोबांनीं ही वही
स्वहस्तें लिहिलेली, बुडविली होती. अशी पूर्वीपासून वारकरी सांप्रदायांत ही
परंपरागत हकीगत माहीत होती. यामुळें ज्यांना या वहीवरून नकल करून घेतां येत असेल
असे कांहीं विशेष भाविक लोक या वहीवरून नकल करून घेतां येत असेल असे कांहीं विशेष
भाविक लोक या वहीवरून नकला करून घे असावेत. मला अशी एक नक्कल सख्या हरि शिंपी या
पंढरीच्या आस्थेवाईक वारकरी गृहस्थांकडे आढळली. ती त्यांनीं मला कांहीं दिवस कृपाळू
होऊन वापरावयास दिली. त्यावेळीं मीं त्या वहीची नक्कल करून घेतली. या वहींतील
पहिल्या पृष्ठावर ''भिजल्या वहींतील अभंग'' म्हटलें आहे. या दोन्ही वह्यांचें वर्णन
पुढें देणार आहे. पण येथें अभंगांबद्दल जें विवेचन करीत आहे तें पुरें करून घेऊं.
तेव्हां तुकोबांनीं ज्या वह्या बुडविल्या त्या खात्रीनें च अस्सल वह्या समजण्यास
प्रत्यवाय नाहीं. या वह्या एकाहून कांहीं तरी जास्त होत्या याबद्दल हि संशय नाहीं.
तेव्हां त्या सर्व वह्या अस्सल आहेत. यानंतर या वह्यांवरून केलेल्या नकला, नकला
बरोबर केल्या गेल्या असल्या तर, अस्सल, पण दुय्यम प्रतीच्या, म्हणून समजण्यास हरकत
नाहीं. वह्या तरल्यावर गांवोगांवचे लोक येऊन नकला करून घेऊन गेले असें
महिपतीबोवांनीं म्हटलें आहे. अशा पैकीं एक नकल येथें छापली जात आहे.
सख्या हरीच्या ज्या पूर्वजानें ही नक्कल स्वतः किंवा लेखकाकडून करवून घेतली,
त्यानें ही नक्कल तेवढया काळजीपूर्वक केली आहे असें मला म्हणवत नाहीं. आज
देहूकरांच्या घराण्यांत पूजेंत असलेल्या वहींत जे अभंग आहेत ते हि सख्या हरीच्या
पूर्वजानें किंवा त्याच्या लेखकानें सर्वच्या सर्व लिहून घेतले नाहींत. परंतु त्या
लेखकानें एक गोष्ट नक्कल करतांना संभाळली आहे. ती ही कीं लेखकानें अभंगांत शब्द
बदलल्याचें उदाहरण कोठें हि आढळलें नाहीं. तेव्हां सख्या हरि शिंपी याच्या
पूर्वजांनीं स्वतः केलेली किंवा करविलेली नक्कल ही अस्सल वह्यांच्या खालच्या
पायरीवर आहे.
या वही शिवाय संताजी तेली जगनाडे हे तुकोबारायांचे टाळकरी होते. त्यांनीं स्वहस्तें
लिहीलेल्या दोन त्रुटित वह्या छापवून प्रसिध्द करून कै. विनायक लक्ष्मण भावे यांनीं
मराठी सारस्वतावर फार थोर उपकार केले. पांगारकर यांना संताजीच्या वह्यांचा सुगावा
लागला व ती अदभुत गोष्ट त्यांनी सन 1903 मध्यें केसरींत प्रसिध्द केली. त्यानंतर
विश्वनाथ काशिनाथ राजवडे यांनी जगनाडा म्हणून एक लेख ग्रंथमालेंत लिहिला. त्यानंतर
राजवाडे यांच्या सांगण्यावरून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनीं कांहीं अभंग
भारत-इतिहास-संशोधक-मंडळाच्या इतिवृत्तांत छापले पण तुकोबारायांचे संताजीच्या
वह्यांत आढळले ते सर्व अभंग गोळा करून अस्सल बरहुकूम नकल करून घेऊन भावे यांनीं
छापले. या संताजींच्या दोन्ही वह्या त्रुटित आहेत त्यांचीं सुरवातीचीं व शेवटची
पृष्ठें हि प्रसाद गेलेलीं आहेत. संताजीबोवा हे तुकोबांचे एक टाळकरी होते. ही गोष्ट
स्पष्ट आहे. तेव्हां त्यांस स्वतः करून घेतल्या आहेत. देहूकर घराण्यांत जी वही आज
विद्यमान आहे, त्या वहीशीं जर संताजींची वही लावून पाहिली तर जे थोडे अभंग दोन्ही
वह्यांत समान आहेत. त्यांत किरकोळ लेखनाच्या चुका पलीकडे दोन्ही वह्यांत फारसा फरक
आढळत नाहीं. पण फरक नाहीं, असें नाहीं पुढें छापलेल्या अभंगांत * * असे
नक्षत्रांकित अभंग हे देहूकरांच्या घरीं जेवढी वही आज विद्यमान आहे, त्या वहींतील
आहेत. तेव्हां ज्या वेळी कोणत्या एखाद्या वहींत या नक्षत्रांकित अभंगांच्या क्रमाशी
जुळत असलेला अभंगांचा क्रम आढळेल तेव्हां सकृद्दर्शनीं ते अभंग केव्हां तरी मूळ
वहीवरून नकल करून घेतले होते असें गृहीत धरून ती वही काळजीपूर्वक तपासली पाहिजे.
दुसरी गोष्ट आपण अशी लक्ष्यांत ठेविली पाहिजे कीं संताजी तेली व गंगाराम मवाळ हे
तुकोबांचे लेखक होते. ते कीर्तनांत अभंग स्फुरत तेव्हां लिहून घेत असें वर्णन
महिपतीबोवांनीं केलें आहे. तें विधान विश्वासार्ह आहे असें वाटत नाहीं. परंतु तें
विधान विचारांत घेण्याजोगें आहे येवढें खरें. तें विधान विचारांत घेऊन मी एवढें
अनुमान करतों कीं संताजी तेली व गंगाराम मवाळ या उभयतांस तुकोबारायांच्या वह्या या
केव्हां हि नकल करून घेण्यास उपलब्ध होतील त्या वह्या अस्सल पण दुय्यम प्रतीच्या
म्हणून समजण्यास हरकत नाहीं. संताजी सारखी गंगाराम मवाळानें स्वहस्तें लिहिलेली एक
हि वही आजवर उपलब्ध झाली नाही. मवाळांच्या घराण्यांत एक गाथा दाखवितात पण तो पंढरीत
देहूकरांच्या घराण्यांत जो गाथा आहे त्या च वेळचा आहे. पंढरींत तुकोविप्राचें एक
घराणें आहे. तुकाविप्र हा तुकोबांच्या नंतर 100-125 वर्षांनीं झाला. त्यावेळचा
त्यांच्या घराण्यांत गाथा आहे. परंतु तो गाथा मवाळांचा गाथा,
देहूकरांच्या,-(पंढरींतील) घरांतील गाथा, हे सर्व कोणी तरी अभंग गोळा करून
व्यवस्थित लावून, सर्वत्रांस उपयोगी पडावा, म्हणून जो गाथा तयार केला त्याच्या नकला
आहेत. या नकलांत संताजीच्या वह्यांत अभंग जसे होत गेले तसे लेखनिविष्ट झालेले
सांपडतात तसे सापडत नाहींत. या तिन्ही प्रतीबद्दल पुढें जास्त विवेचन करूं. पण
त्यापूर्वी संताजीच्या वह्यांचें विवेचन पूर्ण करून घेऊं.
संताजी तेली हा त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणें सुरवातीस साक्षर असावा असें मला वाटत
नाहीं. संताजीच्या वह्यांत एक च शब्द दोन-क्वचित्-तीन त-हांनीं लिहिलेला आढळतो.
याचा अर्थ एवढाच समजावा कीं संताजीबोवा हे जेव्हां समोर दुसरी वही ठेवून नकल करीत.
-तेव्हां नक्कल बरीचशी शुध्द करीत; व जेव्हां पाठ केलेले-झालेले-अभंग लिहीत तेव्हां
नक्कल बरीचशी अशुध्द होई. कै. विनायकराव भावे यांनीं संताजीच्या वह्या हाच अस्सल
गाथा होय, ही गोष्ट सिध्द करण्याचा जो अट्टाहास केला, त्या प्रयत्नांत, त्यांनीं
दोन्ही वह्या छापवून महाराष्ट्रास आदरयुक्त भावनेनें न दिल्यामुळें त्या वह्यांचा
महाराष्ट्रांत व्हावा तसा प्रसार झाला नाहीं. तसा प्रसार होऊन दुस-या जुन्या वारकरी
घराण्यांतील विद्यमान पुरुषांस आपल्या संग्रहीं असलेल्या वह्या
भारत-इतिहास-संशोधक-मंडळांत नेऊन दाखवाव्यात असें हि वाटलें नाहीं. भावे यांनी
वह्या छापून प्रसिध्द केल्या हे महाराष्ट्रावर उपकार झाले. परंतु त्या वह्यांस जी
प्रस्तावना जोडली आहे ती येनकेन प्रकारेण तुकोबांस कमीपणा देण्याच्या उद्देशानें
लिहिलेली असल्यामुळें भावे यांच्या हातून नुकसान हि फार झालें. असो. भावे यांनीं
ज्या वह्या छापल्या आहेत त्या संशोधनाच्या द्दृष्टीनें जेवढया व्यवस्थित छापल्या
जावयास हव्यात तशाच म्हणजे ओळीस ओळ, अक्षरांत, यत्ंकिचित् फरक न करतां अक्षर बरहुकम
अक्षर, अशा छापल्या गेल्या आहेत. त्या दोन्ही भागांस त्यांनीं अभंगांची अनुक्रमणिका
जोडली नाहीं, येवढा च त्या प्रतींत दोष आहे. संताजीच्या हस्ताक्षराचा नमुना म्हणून
त्यांनीं एका पृष्ठाचा फोटो हि दिला आहे. दोन्ही भाग प्रसिध्द करतांना त्यांनीं
वेगवेगळाले प्रसिध्द केले होते. व पुढें दोन्ही भाग एकि बांधून प्रसिध्द केले आहेत.
या दोन्ही वह्यांपैकीं दुस-या भागाची वही आज हि संताजी तेली जगनाडे यांचे विद्यमान
वंशज मनोहर हरिश्चंद्र जगनाडे, तळेगांव दाभाडे, यांचेकडे कोणास हि पाहावयास सापडते.
पहिला भाग ज्या वहीवरून छापला, ती वही, पनवेल येथील जगनाडे यांच्या हातून
दुस-याच्या हातीं गेली आहे; व तो मनुष्य त्या वहीची कोणास हि दाद लागूं देत नाहीं.
कांहीं हि सबब सांगून झुकांडी देतो. पनवेल येथील जगनाडे यांनीं ती वही परत आणून मला
दाखविण्याचा फार प्रयत्न केला पण हा गृहस्थ कांहीं त्या माणसास बधत नाहीं. असा हा
गृहस्थ त्या वहीचा स्वतः उपयोग करीत नाहीं. दुस-यास करूं देत नाहीं. तेवढयानें
कांहीं बिनसणार आहे, असें मला वाटत नाहीं. कारण वर म्हटल्याप्रमाणें ही नक्कल अस्सल
बरहुकूम झाली आहे. हें मीं स्वतः पाहिलें आहे.
पहिली वही प्रसिध्द करतांना रा. भावे यांनीं विज्ञाप्ति म्हणून लहान च दोन
पृष्ठांची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत भावे यांनीं खालील उद्गार काढले आहेत.
(1) ''तुकारामाच्या अभंगांना नीटनेटकें नागर स्वरूप रामेश्वर भटानें दिलें. व मग
नागर स्वरूपांत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. अशी एक आख्यायिका महाराष्ट्रांत ऐकूं
येते. ही रामेश्वर भटाची झिलई चढण्यापूर्वीचें अस्सल रूप आपणांस या जगनाडी संहितेंत
पाहण्यास सांपडेल. तुकाराम महाराजांच्या मुखांतून या बहुमोल अभंगांची वाणी कोणत्या
स्वरूपांत प्रगट होई याचा हि अंदाज बांधण्यास यापासून मदत होईल.'' दुस-या भागास
अस्सल गाथा म्हणून भावे यांनीं जी प्रस्तावना जोडली आहे, त्यांत खालील विधानें
केलीं आहेत.
(2) महिपतीबोवा ताहराबादकर यांनीं गंगाराम मवाळ व संताजी तेली जगनाडे हे तुकोबांचे
लेखक होते म्हणून म्हटलें आहे.
(3) तेव्हां गंगाराम मवाळ यांच्या हातचा किंवा इतर कोणा टाळक-याच्या हातच्या गाथा
सापडल्यास तो हि या (संताजीच्या) गाथ्याच्या तोलाचा समाजावा लागेल.
(4)कदाचित् पुढें मागें खुद्द तुकारामाच्या हातचा गाथा सांपडल्यास तो मात्र या
(संताजी) हून निःसंशय वरच्या दर्जाचा अस्सल होय हें निर्वीवाद होय.
(5) असें दिसतें कीं संताजी हा तुकारामाच्या सेवेंत राहूं लागला तेव्हां त्याचें वय
20/25चे सुमारास होते.रत्त
(6) अनेक वर्षें तुकारामाच्या निकट सान्निध्यांत भक्तिप्रेमानें राहिल्यावर या
चुणचुणीत तरुण मुलानें आपल्या गुरूजीची प्रत्येक गोष्ट पूर्णपणे उचलली असली पाहिजे.
(7) संताजीच्या शुध्दलेखनापेक्षां तुकारामाचें लिखाण कांहीं विशेष निराळें असेल
असें मला वाटत नाहीं.
(8) तुकारामास लिहिता येत होतें हें अगदीं निःसंशय आहे. परंतु स्वतःचें कवित्व तो
लिहून ठेवीत असेल असें मला वाटत नाहीं.
(9) तो कीर्तनांत उभा राहिला म्हणजे तेथल्या तेथेंच अभंग रचून म्हणे व ते टाळकरी
पाठ करीत किंवा मागाहून लिहून ठेवीत असा क्रम असावा.
(10) तुकारामानें स्वहस्तें लिहून ठेविलेल्या त्याच्या अभंगांच्या वह्या तेव्हां
नव्हत्या, हल्लींहि नाहींत व तशा उपलब्ध होतील असा संभव दिसत नाहीं.
(11) संताजीनें एकंदर चार वह्या लिहिल्या होत्या असें त्याचे वंशज सांगतात.
(12) या वह्या संताजीने कशा लिहिल्या तें समजण्यास साधन नाहीं.
तेव्हां वर भावे यांचीं जीं मुक्ताफळें उध्दृत केलीं आहेत ही त्यांच्या
बुध्दिमत्तेची आतषबाजी आहे ! ती त्यांस उत्तम साधली आहे ! भावे यांच्या विधानांचा
आतां थोडक्यांत विचार करूं. तुकोबारायांच्या अभंगांस रामेश्वर भट झिलई चढवीत होते,
ही आख्यायिका मला देहू, आळंदी व पंढरपूर येथें कोठें हि ऐकूं आली नाहीं व तशी
आख्यायिका प्रसृत होणें शक्य नाहीं; कारण रामेश्वर भटाची तुकोबारायांशीं गांठ
पडण्यापूर्वी च तुकोबांच्या अभंगांची कीर्ति महाराष्ट्रभर पसरली, सर्व साधारण लोक
तुकोबांस मानूं लागले, तेव्हां कपाळाची तिडीक उठून रामेश्वर भटानें दिवाणांत
फिर्याद दाखल केली. तुकोबांस देहू सोडावें लागलें, कवित्व बुडवावे लागले. तेव्हां
भावे यांनीं नमूद केलेली ही आख्यायिका स्वकपोलकल्पित लोणकडी आहे. बरें रामेश्वर
भटानें ठेवी मस्तकी हात-अशी विनंती केली त्या वेळीं पण दुस-या प्रसंगानें
तुकोबांच्या कवित्वाबद्दल जे उद्गार काढले आहेत कींः-तुकोबा-
॥ अमृताची वाणी । वरूषाला शुध्द । करी त्या अशुध्द । ऐसा कोण । या उद्गारानें
तुकोबारायांच्या वचनास हात लावून झिलई चढविण्याचा प्रयत्न रामेश्वर भटानें केला
असेल असें वाटत नाहीं. आतां प्रचलित आख्यायिका च पहावयाची तर अशी आहे कीं
रामेश्वरभटाचें पुस्तकी ज्ञान हें कांहीं दुरुस्त्या अभंगांत सुचवूं लागलें.
तेव्हां त्यास द्दृष्टांत होऊन त्यांची समजूत घातली गेली. ॥ ''मिळोनी गौळणी यशोदे
देती गा-हाणीं'' ॥ या गवळणींतील तिस-या चरणांत ''मुखमळीण उभा हाडतीय घोणे'' ॥
(पंडित 388) असे शब्द आहेत. रामेश्वर भटानें ''मळीण'' याबद्दल ''म्लान''असा पाठभेद
सुचविला तेव्हां त्यास द्दृष्टांतांत असें सांगण्यांत आलें कीं, ''बा, मला असें काय
कमी आहे कीं त्या विचारानें माझें मुख 'म्लान' व्हावें. मी गोपाळांबरोबर मातींत
खेळत होतो, तेव्हां माती तोंडावर उडून मुख मलीन झालें होतें, तें मी जाऊन यशोदेच्या
पदरानें पुसलें.'' मला वाटतें हा किंवा असा कांहीं द्दष्टांत पोटी धरून रामेश्वर
भटानें अमृताची वाणी वरुषला शुध्द असा मुद्दाम च शब्द योजला असावा. तेव्हां भावे
यांनीं दिलेली आख्यायिका कशी हि पाहिली तरी चूक आहे. संताजीबोवा व तुकोबाराय यांचे
संबंध काय होते याबद्दल महिपतीबोवा ताहराबादकर यांनीं जें लिहिलें आहे त्या पलीकडे
कोणास कांहीं जास्त माहिती नाहीं. तेव्हां संताजी हा 20/25 वर्षांचा होता,
तेव्हांपासून तुकोबांच्या सेवेंत राहूं लागला वगैरे ज्या अघळपघळ गोष्टी वाचकांनीं
सोडून द्याव्यात. ''तुकोरामाचें लिखाण संताजी पेक्षां निराळें असेल असें मला वाटत
नाहीं.'' असें भावे यांनीं ठासून विधान केलें आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिति अशी आहे
कीं, देहूकरांच्या घरांत पूजेंत असलेली वही व संताजी यांची वही या दोन्ही वह्या मी
एकमेकांस लावून पाहून सांगत आहें कीं, तत्कालीन लेखनपध्दती प्रमाणें तुकोबांच्या
लेखनांत शुध्दलेखनाची चूक नाहीं; तुकोबा स्वतःचें कवित्व स्वतः लिहून ठेवीत होते व
त्यांनीं स्वहस्तें लिहिलेल्या एकाहून जास्त वह्या होत्या.
तुकोबा स्वतःचें कवित्व स्वतः लिहून ठेवीत नव्हते असें जें भावे यांनीं लिहिलें आहे
तें चूक आहे हें मीं सप्रमाण वर दिलें आहे च. तुकोबा कीर्तनांत अभंग करून म्हणत व
केव्हां लिहीत याचें विवेचन पुढें योग्य स्थळीं केलें आहे. तेव्हां त्याची
द्विरुक्ती येथें करीत नाहीं. तुकोबा स्वतः अभंग लिहीत असत व अशा अभंग लिहिलेल्या
वह्या त्यांनीं बुडविल्या ही गोष्ट मीं वर अभंगांतील वचनें दिलीं आहेत त्यावरून
स्पष्ट आहे. तेव्हां भावे यांनीं भाषेच्या रूपापलिकडे व ओबडधोबड लिहिण्यापलिकडे
जावून संताजीच्या वह्यांत काय नाविन्य आहे हें शोधलें असतें तर त्या वह्यांत त्यांस
रत्नांच्या खाणी सापडल्या असत्या. पण त्या खाणी भावे यांस नको होत्या, त्यांस
प्रस्तावनेचे निमित्त करून तुकोबांवर राजवाडे कंपूंतील एक म्हणून तोंडसुख
घ्यावयाचें होतें, तें त्यांनीं यथेच्छ पोटभर घेतलें. असो, आतां संताजीच्या वह्यांत
अपूर्व काय आहे तें आपण पाहूं.
संताजी हे कांहीं पढीक विद्वान शास्त्री पंडित नव्हते; व्यवसायानें तेली
असल्यामुळें त्यांस कांहीं अक्षर ओळख असेल असें हि गृहित धरावयास नको. ते केव्हां
तरी कीर्तनांत वा भजनांत आकर्षिले गेले, त्यांचें मन कीर्तनांत समाधान पावलें व ते
तुकोबारायाकडे येऊं जाऊं लागले असावेत; संताजी मुळचे चाकणचे. तेव्हां ते सदा
सर्वकाळ तुकोबाचे जवळ राहत असावेत असें म्हणावयास कांही आधार नाहीं. संताजी व
तुकोबा यांच्या एकमेकांच्या वयांत अंतर किती होतें हें सांगण्यास कांहीं साधन
नाहीं. परंतु तुकोबांच्या निर्याणानंतर ते पुष्कळ वर्षे हयात होते. तेव्हां ते
तुकोबांपेक्षा असले च तर थोडे फार लहान होते असें आपण गृहीत धरूं. अभंगांची गोडी
लागल्यावर संताजी अभंग पाठ करूं लागले असावेत. तेव्हां त्यांनीं पाठ केलेले अभंग ते
लिहीत तेव्हां तोंडीं उच्चार बसला असेल तसें अशुध्द लिहीत व जेव्हां दुस-या
पोथीवरून नकल करीत तेव्हां शुध्द लिहीत. संताजी केव्हां हि तुकोबांचे स्वतःचे लिखाण
समोर ठेवून नकल करून घेण्यास मोकळे होते म्हणून त्यांनीं आपले कडून नकल कसोशीनें
केली आहे. देहूकरांच्या घराण्यांतील मूळ वहींतः दोन शुन्यांची खूण करून चरण
तोडण्याची जी त-हा आहे. ती त-हा संताजीनें बरोबर उचलली आहे. संताजींनीं काळी व
तांबडी शाई अशी मूळ वहीची नक्कल केली नाहीं संताजींची तळेगांव येथील वही देहूच्या
इनामदारांच्या घराण्यांतील त्रुटीत मूळ वहींत नसलेली एक गोष्ट संताजीनें केली आहे व
ती ही कीं त्यांनीं ठिकठिकाणीं कांहीं अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे घातले आहेत.
यामुळें तुकोबांनीं कोणत्या निमित्तानें कोणते अभंग केलें हें कळतें. (मूळ वहींत
अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे नाहींत.) संतांजींच्या या अभंग वेगळे दाखविण्याच्या
पध्दतीनें एखाद्या वेळीं एक अभंग झालेला असला तर तो त्यांनीं तसाच लिहून शेवटीं 1
असा आकडा घातलेला पाहिला कीं त्यावेळेपुरता तो विषय द्दष्टीआड झाला असें समजावयास
हरकत नाहीं. एक हा आकडा 722 / 741/749 व 1294 या अभंगांचे शेवटीं आहे. असेच 2/3/4/5
असे हि आकडे ठिकठिकाणीं आहेत. कांहीं अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे घालावयाचे राहिले
आहेत. पण एका ओघानें बरेचसे अभंग आपण वाचीत आलों तर ओघ कोठें बदलतो हें चटकन
लक्ष्यांत येते. लहान मोठया गटा गटांच्या पुष्कळशा अभंगांच्या अभ्यासानें
तुकोबांच्या कवित्वाची झरवणी कशी झुळू झुळू वाहत होती हें लक्ष्यांत येतें. ही
गोष्ट दुस-या कोणत्या हि गाथ्याच्या अभ्यासानें होणारी नाहीं. संताजीच्या गाथ्यांत
ठिकठिकाणीं सरस पाठ आहेत. ते सरस पाठ चुकलेले असावेत असें वाटून नक्कलकारांनीं
विध्दतशुध्दी केलेलीं दोन स्थळें उदाहरणार्थ देतो. संताजीमधील 652 वा अभंग पहा-जाणे
भक्तीचा जीव्हाळा । तो ची देवाचा पुतळा ॥1॥ हा पाठ पंडीत यांच्या प्रतींत (730) असा
च आहे. पण ओळीचा गाथा, (1153) निर्णयसागर (2057) देवडीकर 374 यांत दैवाचा पुतळा असा
पाठ आहे. या अभंगांतील तिसरे चरण नामरूपी मीनलें चीत । असें आहे-तें सर्व प्रतींत
जडलें असें बदललें आहे. मीनलें व जडलें यांत फरक आहे. व तो फरक अर्थपूर्ण आहे. (2)
संताजीमधील अभंग 1126 हरी तुझी कांती रे सावळी । मी रे गोरी चापयाची कळी । तुझीया
स्परूशें होईन काळी । यातील ''स्परूशे'' हा शब्द पंडीत 390, ओळींचा गाथा 651,
देवडीकर 3790 निर्णयसागर 125 व इतर गाथे यांत ''दर्शनें'' असा येतो. या दोन
शब्दांतील भेद स्पष्ट आहे. व ''स्परुशे''हा पाठ निःसंशय श्रेष्ठ आहे.
असे श्रेष्ठ पाठ संताजीच्या गाथ्यांत ठिकठिकाणीं आहेत. संताजीच्या गाथ्यांत अभंग हे
असे गटागटानें आलेलें असल्यामुळें त्या अभंगांत एकमेकांस जोडणारा दुवा आपल्या
लक्ष्यांत येतो. व त्या एका प्रसंगाच्या अभंगांचा गट आपण अभ्यासिला तर अभंगाच्या
एकमेकांच्या संदर्भानें अर्थ लागण्यास फार मदत होते. याची दोन उदाहरणें देतों.
(1) संताजी अभंग 305 ज्ञानीयांचे धरीं चोजवितां देव । हा अभंग पंडीत 1536 ओळीच्या
गाथा 1892 देवडीकर 1040 निर्णयसागर 1297 असा आला आहे. पण एका हि प्रतींत या
अभंगापूर्वी आम्हां घरीं गाये । येकी दुभता हे । हा अभंग आलेला नाहीं. संताजी
गाथ्यांत अभंग 296 पासून जो ओघ वाहतो आहे, त्याचा कळस-आम्हां घरीं येकी गांय दुभता
हे । हें सांगण्यांत होतो व लगेच ज्ञानीयांचें घरीं चोजवीतां देव । असें म्हणून फरक
दाखवून ती ओळ 307 या अभंगाशीं संपते. आम्हां घरी येकी गाय दुभताहे । व
ज्ञानीयांच्या घरीं चोजवीतां देव । हे एकमेकांस परस्पर विरुध्द अभंग आहेत. ही गोष्ट
दुस-या कोणत्याहि कारणानें लक्ष्यांत येण्याजोगी नाहीं.
(2) संताजी अभंग 930 भक्ती प्रेमसुख नेणवे आणीकां । हा अभंग पंडीत 3048 ओळीचा गाथा
2013 निर्णयसागर 3215 देवडीकर 1099 असा आला आहे. पण कोणत्या हि गाथ्यांत
संताजीमध्यें आहेत असे आधींचे 2/3 अभंग नाहींत. संताजीमध्यें अभंग 928 मध्यें, तुका
म्हणे मुगुट मणी हे भक्ती । असें सांगून 929 मध्यें भक्तांचा महिमा भक्तची जाणती ।
असें सांगून भक्त सुख कोणते भोगतात तें सांगून पुढें अभेदूनी भेद राखीयेला अंगी
वाढावया जगीं प्रेमसुख । असें सांगितलें व या अभंगाचा शेवट तुका म्हणे हे आहे तया
ठावे । जीहीं एकाभावे जाणीतले या उलट भक्ती प्रेम सुख नेणवे आणीका । पंडीत वाचका
ज्ञानीयांसी ॥धृ॥ आत्मनिष्ठ ज-ही जाले जीवन्मुक्त । त-ही भक्तीसुख दुर्लभ त्या ॥धृ॥
संताजीच्या तिस-या चरणांत व इतर गाथ्यांतील तिस-या चरणांत हि फरक आहे. तसेंच पुढील
अभंग भक्ती प्रेम सुख ज्यांना लाभलें (931) त्यांनीं साठविला हरी जीहीं हृदय मंदीरी
व या च ओळीचें आणखी तीन अभंग पुढें आहेत. पांगारकरांनीं सर्व वर्माचे अभंग सर्व
गाथ्यांत ताडून पाहिले म्हणून म्हटलें, पण हें संताजीच्या गाथ्यांत आढळणारे
भक्तीप्रेम सुखाचें निरूपण त्यांच्या तुकारामचरित्रांत कोठेंच आढळत नाहीं. तात्पर्य
संताजीच्या गाथ्याचा कोणी तितक्या कसोशीनें अभ्यास च केला नाहीं. संताजीच्या
गाथ्यानें इतर गाथ्यांत ओळी कशा बदलत गेल्या हें समजण्याचें साधन सांपडतें तें साधन
असें कीं, संताजी मधील एक ओळ घेऊन ती दुस-या गाथ्याशीं लावून पाहिली म्हणजे संताजी
व पंडित, ओळीचा गाथा व इतर हस्तलिखीत गाथे यामध्यें फरक कसा पडत गेला तें लक्षांत
येतें. संताजीमध्यें 765-770 ही एक ओळ आहे. हे अभंग पंडीतांच्या प्रतींत 2309/10
असे आहेत. त्यापुढील चारी अभंग त्र्यंबक कासाराच्या संग्रही पूर्वीच 361 । 1143 ।
1144 । 1145 या क्रमानें होते. तेव्हां ते अभंग त्यानें 2310 नंतर लिहून घेतले
नाहींत, तशी कांहीं नोंद हि केली नाहीं; व तुकोबांची संताजीच्या गाथ्यांत संग्रहीत
झालेली ओळ जी एकदां बिघडली ती कायमची बिघडली. संताजी 475-482 ही हि एक ओळ आहे. यांत
लक्षांत ठेवण्याजोगा गोष्ट अशी आहे कीं, 475 व 476 हे अभंग पूर्वी 302 व 303 असें
आले आहेत. तरी ते संताजीनें या ओळींत पुनः उध्दृत केले आहेत. कारण असें कीं या
दोन्ही प्रसंगांचे वेळीं या अभंगानीं निरनिराळें कार्य होत होतें. ते उपटसुंभासारखे
- अनारिसे दिसत नव्हते, हे संताजींनीं प्रत्यक्ष पाहिलें असल्यामुळें, त्यांनीं आळस
केला नाहीं. दोन्ही कीर्तनें-भजनें त्यांनीं वेगवेगळीं लिहून घेतलीं. 475-82 हे
अभंग वरील दुस-या कोणत्या छापील किंवा हस्तलिखित प्रतींत या ओळींनें आले नाहींत.
765-70 या अभंगांबद्दल जें वर विवेचन केलें आहे तें या अभंगांस हि लागू आहे असें
आढळेल. असा या संताजीच्या गाथ्याचा गाथ्या-गाथ्यांत फरक कसा पडत गेला हें समजण्यास
मला फार उपयोग झाला. संताजीनें आरत्यांच्या शेवटी 1568 पार्थिव संवत्सर आश्विन
शुध्द पौर्णिमा व तीर्थावळीचे अभंगाचे शेवटीं शके 1610 विभवनाम संवत्सरे अमावास्या
शुक्रवार मिती दिल्या आहेत. यावरून मी येवढें च अनुमान काढावयास तयार आहे कीं
तुकोबारायांच्या निर्याणापूर्वी कांहीं वर्षे संताजी बोवा अभंग लिहूं लागले होते व
तें काम 40/45 वर्षे चालूं होतें. तेव्हां भावे यांनीं नमूद केल्याप्रमाणें
संताजीनें लिहिलेल्या तुकोबांच्या निर्याणानंतर संताजीनें मिळतील तेवढे महाराजांचे
अभंग गोळा करून संग्रहीत केलेले असावेत व रोज नित्य नेमानें त्यांची उजळणी करीत,
तुकोबांचीं कीर्तनें, भजनें, आठवीत संताजी बोवा आपल्या आयुष्याचे दिवस कंठीत
असावेत. संताजींनीं नकला केल्या. त्या मुळावरून केल्या व कोणती ओळ कुठें सुरू होते,
व कोठें संपते, हें सांगण्यास कांहीं दिवस लेखक च स्वतः हजर होते. तेव्हां त्यांनीं
अभंगाचे शेवटीं घातलेला आंकडा पाहून त्या वेळेपुरता तो विषय संपला असें समजलें
पाहिजे. संताजीस अस्सल वह्या नकल करण्यास उपलब्ध होत्या, संताजींनीं पुष्कळशा
भजनांत आज क्षेपक म्हणून गणलें जातात, अशा अभंगापैकीं अभंग आले तर ते क्षेपक अभंग
निवडणारांची चूक आहे असें खुशाल समजावें. येथवर संताजींच्या प्रतींत मला आढळणारे
गुण सांगितलें. त्या वहींत दोष दाखवावयाचा तर सर्व च अभंगांचे गटाचे शेवटीं आकडे
घालण्यास हे भक्त विसरले कसें येवढा च दोष आहे. त्यांनीं अभंग काय कारणानें झालें
हें सांगितलें असतें तर दुधांत साखर पडल्या सारखें झालें असतें.
महाराजांच्या निर्याणानंतर संताजीसारख्या निस्सीम भक्तानें अभंगाचा संग्रह गोळा
करून जे अभंग लिहून घेतले असतील ते वगळले तर तुकोबांच्या घराण्यांत किंवा दुस-या
कोणा हि टाळक-याच्या संग्रहीं अभंगांचा संपुर्ण संग्रह सापडूं नये याचा खेद वाटतो,
लाज हि वाटते. मराठी राज्यांत संस्कृताची व इंग्रजी राज्यांत इंग्रजीची सुशिक्षित
वर्गाच्या मनावर एवढी छाप होती कीं कोणा हि थोर सुशिक्षित पुरुषास तुकोबांचे अभंग
रत्नभांडार गोळा करावें अशी इच्छा झाली नाहीं. वारकरी मंडळींत हि एका पुढें एक
शिष्यपरंपरा तेवढया अधिकाराची, आस्थेची, असते च असें नाहीं. तात्पर्य तुकोबांस
ज्यांनीं प्रत्यक्ष पाहिलें होतें अशा संताजींसारख्या व्यक्ती नाहींशा झाल्यावर
म्हणजे तुकोबांच्या निर्याणानंतर सुमारें 50/75 वर्षांनीं पंढरीची वारी करणा-या 1/2
मठाधिपतीस तुकोबांचा जो कांहीं अभंगसंग्रह मिळेल तो गोळा करावा असें वाटलें असावें
व त्याप्रमाणें जेवढे म्हणून या कल्पनेस अनुकूल लहान मोठे दिंडीवाले, मठाधिपती
असतील, अशांनीं आपापला संग्रह एकत्रित करून 4।4॥ हजार अभंगांचा एक गाथा कोणा तरी
त्यांतल्यात्यांत श्रेष्ठ अशा मठाधिपतीच्या देखरेखीखालीं तयार केला असावा व मग त्या
मूळ गाथ्याच्या ज्यानें त्यानें नकला आपल्या सोईप्रमाणें केल्या असाव्यात.
सोईप्रमाणें म्हणण्याचें कारण त्या दिंडीवाल्यास किंवा मठाधिपतीस स्वतः जवळ जो
संग्रह होता तो लिहून घेण्याचें कारण नव्हतें. स्वतः जवळ नसेल असा भाग प्रत्येक जण
लिहून घेत असावा. पंढरीतील देहूकरांचा, मवाळांचा, देहूंत 3।3॥ हजार अभंगांचा गाथा,
होता तो, असें कांहीं गाथे मी पाहिले तेव्हां मला कांहीं ठिकाणीं तेंच हस्ताक्षर
पुनः पुनः आढळे. यावरून 4।4॥ हजार अभंगांची संख्या ठरली त्यानंतर तोच लेखक सवडी
सवडीनें नकला करून देत असावा. असा एकजुटीनें वागून कांहीं मठाधिपतींनीं मिळून
साडेचार हजार अभंगांचा गाथा तयार केला. हे दोन निरनिराळे प्रयत्न कसे ओळखावेत तेंमी
खालीं देत आहेः- नमनाचे (1) समचरण द्दष्टी (2) सुंदर तें ध्यान हे दोन अभंग
झाल्यावर जुन्या हस्तलिखीत गाथ्यांतून बालक्रीडा येते, त्यानंतर ओवीचे तीन अभंग,
येवढें झाल्यावर एका गटाच्या गाथ्यास सुरवात यारे हरिदासांनो जिंको कळीकाळा । अशी
होते. असे गट माधव चंद्रोबा, ओळीचा गाथा, व गणपत कृष्णाजी - या पोथ्यांच्या
मालकांचा व दुसरा गट पहिले दोन नमनाचे अभंग झाल्यावर बालक्रीडा घेवोत. किंवा
त्र्यंबक कासाराप्रमाणें विराण्या घेवोत. पण अभंग लिहिण्यास सुरूवात नये जरी तुज
मधुर उत्तर । येथून होते. आतां या दोन्ही गटांपैकीं सर्व नकलकारांनीं आपण दुस-याची
नक्कल करीत आहोंत असें दिसूं नये म्हणून खालचे अभंग वर, वरचे खालीं, लिहून घेतलें
आहेत. कांहीं बहाद्दर याहि पुढें गेले. त्यांनीं अभंगांचे चरण खालचे वर केले !!
पंडितांच्या प्रतीचा व देवडीकरांचा क्रम बहुतेक एक आहे. परंतु पंडितांच्या गाथ्यांत
अंतरीची घेतो. गोडी (35) यानंतर सुखें वोळंब दावी गोहा हा अभंग येतो. देवडीकरांच्या
किंवा गंगुकाकांच्या गाथ्यांत सुखें ओळंब हा अभंग पावलें या अभंगानंतर येतो. पुढें
गंमत पाहण्याजोगी आहे. पंडितांच्या प्रतींत पावलें पावलें नंतर वंदू चरण रज सेवूं
उष्टावळी हा अभंग आहे. व त्यांतील चवथा चरण गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला
जाऊं माग घेत आम्हीं ॥ असा आहे. या चरणांत गेलें पुढें याच्याबद्दल पुढें गेलें
त्याचा । अशी त्याच अभंगास सुरवात देवडीकरांच्या गाथ्यांत आहे. कोणी कोणाची नक्कल
केली व आपला गाथा निराळा दिसावा म्हणून चरण व अभंग खालचे वर व वरचे खालीं केले हे
दोन्ही गाथे तपासले तर सांगतां येईल; तेव्हां या निरनिराळया प्रतीतींल क्रमातील
फरकास किंवा पाठांतरास काय किंमत द्यावयाची याचा ज्यानें त्यानें विचार ठरवावा. वर
वर्णिलेल्या शितावरून भाताची परीक्षा ज्यांना करतां येईल त्यांनीं तशी करावी.
तेव्हा असे साडे चार हजार अभंगांचे दोन निरनिराळे पण जवळ जवळ त्याच अभंगांचे गाथे
तयार झाले व त्याच्या नकला होऊं लागल्या, तेव्हां आपल्या संग्रही असतील तेवढे अभंग
वगळून प्रत्येक नकलकार बाकीचे अभंग मिळतील तसे संग्रहित करूं लागला. अशा त-हेनें
कोणासच (तुकोबांच्या खास टाळक-यानंतर) तुकोबांच्या ओळी कायम ठेवाव्यात अशी आस
नसल्यामुळें अस्सल ओळीचे अभंग न मिळतां गाथ्या-गाथ्यांत फरक पडत गेला; हे दोन गाथे
तयार होत असतांना संताजीच्या वह्या अस्सल समजून कोणी वापरल्या असतील असें मला वाटत
नाहीं. कारण संताजी मधील 288 व 289 हे अभंग मला कोठच्याहि गाथ्यांत सांपडले नाहींत.
फार काय पण तुकाराम तात्यांच्या 8441 अभंगांच्या गाथ्यांत हि हे दोन अभंग नाहींत.
या दोन अभंगांबद्दल कोणा हि मठाधिपतीस आज विचारावयास जा तर हे अभंग क्षेपक आहेत असे
तो सांगेल. संताजीच्या वहींतील अभंगांस केव्हां हि कोणास हि क्षेपक म्हणतां येणार
नाहीं. असेंच जयरामस्वामी वडगांवकर यांचें मठांत तुकोबारायांचे कांहीं नवीन अभंग
आढळले. त्यास हि हे लोक क्षेपक म्हणणारच. पण ज्यांनीं कोणी चार साडेचार हजार
अभंगांची गाथा तयार केली त्यांनीं जुने अभंग जमेस धरले नाहींत, जुन्या वह्या
शोधल्या नाहींत तेव्हां त्यांचे म्हणणें प्रमाण कसें मानावयाचे? ही चार साडेचार
हजार अभंगांची संख्या कोणी व कशी ठरविली याचा शोध झाला पाहिजे. त्यांनीं कोणत्या
प्रती वापरल्या हें हि कळलें पाहिजे. असो.
या दोन गटांतून अभंग मिळवून नकल करून घेतांना पंडित प्रतीचा मूळ मालक व लेखक
त्र्यंबक कासार यानें चाळीस वर्षे मेहनत करून प्रत तयार केली म्हणून गंथाचें शेवटीं
म्हटलें आहे; हें काम त्यानें काळजीपूर्वक केलें आहे हें हि खरें. त्र्यंबक
कासारानें संताजीच्या वह्या वापरल्या होत्या असें दिसतें. त्यानें एकच गोष्ट केली
नाहीं व ती ही कीं, त्यानें संताजीची ओळ जशीच्यातशी ठेविली नाहीं. पूर्वी त्याचे
संग्रहीं जे अभंग होते ते वगळून नकल केलेली ओळ हि तीच ठेविली पण क्रम बदलला.
त्र्यंबक कासारानें नकल करतांना एक अति उत्कृष्ट गोष्ट केली, जेथें त्यास शक्य
होतें तेथें कांहीं अभंगांचे गटाचे शेवटी आंकडे घातले आहेत. ही रीत त्यानें
संताजीवरून उचलली. म्हणजे तेवढयापुरती ती ओळ शाबूत राहिली. असे आकडे घातलेले गट
पंडित प्रतींत पुष्कळच आहेत. त्यांत कांहीं चुका आहेत. (1975-1980) या अभंगांचे
शेवटी 6चा आकडा आहे पण तो चुकीचा आहे. 1975-78 हे अभंग एका ओळीत आहेत; पुढील दोन
नाहींत. तसेंच नकल करून घेतांना हि कांहीं अभंग मध्येंच येतात. 1659-1692 ही ओळ आहे
पण त्या ओळींत 1667।1668 व 1690 हे अभंग उत्कृष्ट असले तरी भलत्या ठिकाणीं आले आहेत
असें वाटतें. तेव्हां पंडितांची प्रत सुध्दां जरा विचार करून च वापरावी लागते.
परंतु संताजीचिी प्रत वगळून सर्व छापील प्रतींत पंडिताची प्रत उत्कृष्ट आहे याबद्दल
वाद नाहीं.
माधव चंद्रोबा, गणपत कृष्णाजी, पंडित, ओळीचा गाथा, देवडीकरांचा गाथा या छापील प्रती
व 4।4॥ हजार अभंगांच्या इतर हस्त लिखीत प्रती यांमध्यें मूळ ओळी मुद्दाम होऊन
संग्राहकांनीं मोडल्या नाहींत. पण कांहीं गट या ओळी आहेत. हें ओळखून त्यांनीं जी
खबरदारी घ्यावयास हवी होती. ती त्या लोकांनीं घेतली नाहीं हें खरें पण या सर्व ओळी
मोडून व जेणें करून कोणती प्रत आपण वापरली हें सांगावयास लागूं नये. म्हणून कै.
विष्णूबोवा जोग व गुळवे यांनीं चार साडे चारहजार अभंगांच्या सर्व छापील प्रती गोळा
केल्या, त्या अभंगांची विषयवारी केली, व एक नवीन त-हा करून दाखविली. हे गृहस्थ
प्रस्तावनेच्या सुरवातीस लिहितात की ''महासाधू तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या
गाथा अनेक लोकांनीं छापून प्रसिध्द केल्या आहेत. ह्यापैकीं सुमारें साडेचार हजार
अभंगांच्या गाथा वारकरी सांप्रदायी मंडळीस मान्य आहेत. या साडेचार हजार अभंगांच्या
गाथा वारकरी सांप्रदायी मंडळीस मान्य आहेत. या साडेचार हजार अभंगांतून विषयवारीनें
प्रकरणें पाडून छापण्याचा प्रयत्न केलेला आढळून येतो, परंतु बहुतकरून दीड हजार
अभंगांचीच बरोबर विषयवारी लावून बाकीचे सुमार तीन हजार अभंग ''स्फुट अभंग'' या
सदरांत घातलेले आढळतात. तुकाराम महाराजांनी निरनिराळया प्रसंगीं केलेलें अभंग
निवडून काढून त्यांचीं प्रकरणें पाडण्याचा हेतु, एका विषयावरील त्यांचे अभंग एके
ठिकाणीं पहावयास मिळावें हा होय. हा हेतु उपलब्ध गाथा पाहिल्या म्हणजे जसा जावा तसा
शेवटास गेलेला दिसत नाहीं. ही उणीव दूर होऊन हल्लींच्या गाथांतील दुर्बोधत्व होतां
होईल तितकें कमी करावें ह्या हेतूनें आम्ही ही गाथा प्रसिध्द केली आहे.'' येथें
तुकोबारायांच्या, किंवा त्यांच्या टाळक-यांच्या, अगर त्यांच्या शिष्यांच्या वह्या
मिळवून ग्रंथ छापावा असा उद्देशच नव्हता. या गाथा प्रकाशकांस तुकोबारायांच्या
अभंगाच्या ओळी असतील अशी कल्पना हि शिवलेली त्यांच्या प्रस्तावनेवरून दिसत नाहीं.
ही वर्गवारीनें गाथा छापण्याची त-हा पूर्वीच्या सर्व छापील गाथ्यांच्या मुळावर आली.
एतावता भावे यांनीं काढलेली संताजीची गाथा वगळून कोणा हि गाथा प्रकाशकांस मुळांत
तुकोबांचे अभंग कोणत्या स्वरूपांत असतील, आपल्या गाथेंत ते तसे कां नाहींत असला
विचार स्पर्श हि करून गेला नाहीं. तसा विचार पुढें आला असतांना पांगारकरांसारख्या
सुशिक्षित पदवीधर हरिभक्तपरायण माणसानें कशी बगल मारून नेली हें आपण पाहिलें. असो.
आतां यापुढें देहूकर इनामदार यांच्या घराण्यांत जी मुळ वही आजपर्यंत 8/10 पिढया
महाराजांच्या हातची म्हणून पूजेंत आहे व जी या गाथ्यांत* * अशा नक्षत्रांकित
खुणांनीं छापली आहे. तिचें वर्णन थोडक्यांत करतों.
ही वही सुमार 1932 सालीं प्रथम पाहिली. संताजीच्या दोन्ही वह्या पूर्वी पाहिल्या
होत्या, तेव्हां त्या वेळची अक्षरें लिहिण्याची रीत मला माहित होती, वही पाहतां च
ती वही समकालीन आहे याबद्दल मला शंका हि आली नाहीं. या पोथींतील दोन अभंगांचा फोटो
पांगारकर यांनीं श्री तुकाराम चरित्रांत छापला होता. तो फोटो पाहून भावे यांचें मत
''हें अक्षर तुकारामकालीन असावें असें तो फोटो पाहून माझें मत झालें आहे.'' असें
त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत लिहिलें आहे. नारायणबोवा (निर्याणानंतर जन्मलेले)
देहूकर यांच्या घराण्यांत पिढयानुपिढया ही पोथी स्वतः महाराजांच्या हातची म्हणून
पूजेंत ठेविलेली आहे. ही वही जुन्या जुन्नरी घोटीव कागदावर लिहीलेली आहे. वही 11इंच
लांब व 7इंच रूंद आहे. प्रत्येक पानाच्या दोन्ही कडांस तांबडया शाईच्या दोन दोन
रेघा आहेत; वही पाठपोठ लिहिलेली आहे. वहीच्या प्रत्येक पृष्ठावर 23 ते 25 ओळी असून
प्रत्येक ओळींत सरासरी 24 अक्षरें आहेत. अभंगांच्या लहानमोठेपणाप्रमाणें प्रत्येक
पृष्ठावर 3/4/5/6 असे अभंग आहेत. दोन अभंगामध्यें छ छ छ अशा खुणा करून एकेक ओळ जागा
सोडली आहे. या वहींतील विशेष गुण असे कीं, (1) अभंग एका पृष्ठावर सुरू होऊन पुरा
झाला नाहीं. म्हणून अभंग दुस-या पृष्ठावर न्यावा लागला नाहीं. (2) अभंग हे काळया व
तांबडया अशा दोन रंगांच्या शाईनीं लिहिलेले आहेत. (3) अभंगांतील चरण जेथें तुटतो
तें स्थान दोन शून्यांची ः अशी खूण करून दाखविलें आहे. (4) या वहीच्या लेखकाचें
हस्ताक्षर संताजीच्यापेक्षां किती तरी पट चांगलें आहे. (5)या वहीच्या लेखकाच्या
त्या वेळच्या शुध्दलेखनाच्या कल्पना स्पष्ट आहेत. (6) त्याप्रमाणें जोडक्षरें
केव्हां हि संस्कृत उच्चाराप्रमाणें न लिहितां त्या वेळच्या प्राकृत
उच्चाराप्रमाणें अक्षरें फोडून लिहिलेलीं आहेत. (7) वहीच्या लेखकाच्या -हस्व दीर्घ
जोडाक्षरें व संस्कृत शब्द लिहिण्याच्या कल्पना अगदीं स्पष्ट व निश्चित आहेत; एकदां
एक शब्द एका त-हेनें व दुस-या वेळीं निराळया त-हेनें लिहिलेला आढळत नाहीं. (8) या
वहींत दोन स्थळें वगळून कोठें हि -हस्व इकार नाहीं. (9) अभंगांचा अन्वय अर्थ
लावतांना शब्दांची ओढाताण न करतां अर्थ बरोबर लागतो. (10) वहींतील
17/18/19/20/22/30 येवढे च लेखकानें घातलेले पृष्ठांक शाबूत आहेत पण जेवढी वही आज
शाबूत आहे तेवढयांत अभंगांचा क्रम उत्तम लागतो व असा क्रम संताजी शिवाय दुसरीकडे
कोणत्या हि गाथ्यांत पहावयास सांपडत नाहीं. (11) ही वही खतावणीसारखी बांधलेली आहे व
(12) या पोथीची जुनी बांधणी अद्याप शाबूत आहे. (13) या वहींत अनुक्रमांक नाहींत.
(सध्याच्या व तुकारामकालीन लिपींत, शब्दांत, जो फरक आढळून येतो. त्याची यादी
प्रस्तावने नंतर दिली आहे.
श्री. ह. भ. बाबासाहेब देहूकर इनामदार (नारायणबोवा गोसावी) यांचे विद्यमान वंशज) व
मी महाराजांच्या जुन्या गाथ्यांचा शोध करीत होतों. त्या वेळीं पिढयानुपिढया वारकरी
असलेल्या घराण्यांतील विद्यमान वंशज सख्या हरि शिंपी या आस्थेवाईक वारकरी
गृहस्थांकडे पंढरींत एक जुनी वही सांपडली. या वहीच्या मुखपृष्ठावर ''भिजल्या
वहींतील अभंग'' म्हणून लिहिलेलें आहे. व आंतील पृष्ठावर भिजल्या वहींतील अभंग
जुने-अभंग असे म्हणून नकल करण्यास सुरवात होते. ही नकल खतावणीसारखी केली नसून
पुस्तकासारखी केली आहे. ही नकल ज्यानें केली आहे, त्याचे हातून अभंग गळणें, वाचनाची
चूक होणें, शब्दाचें आधुनिकीकरण होणें या चुका झाल्या आहेत. परंतु सर्व वहींत
त्यानें शब्द किंवा व्याकरणाचें रूप पालटलें नाहीं. अभंग गळले आहेत. पण खालीवर केले
नाहींत. केव्हां हि पदरचा चरण-प्रचलीत असलेला चरण-घातला नाहीं. आपण पूजेंतील
भिजल्या वहीची नकल करीत आहोंत म्हणून जेवढा आदर मूळ ग्रंथ जशाचा तसा उतरून घेतांना
नकलकरांच्या ठिकाणीं असावा तेवढा त्याच्या ठिकाणीं होता. म्हणून मूळ वहींत 'बरें
झालें देवा बाईल कर्कशा' हा चरण नाहीं तसा या नकलेंत हि नाहीं. या वहींत 112 वा
अभंग व मूळ त्रुटित वहींतील पहिला अभंग हे बरोबर जुळतात व तेथपासून पुढें मूळ वहींत
जेवढीं पृष्ठें शिल्लक आहेत, तेवढया पुरते ते अभंग या नकलेशीं जुळते आहेत. क्रम हि
तोच आहे. नकलकारांच्या हातून अभंग गळले आहेत, ही गोष्ट मूळ वहींतील पृष्ठें या
वहींतील अभंगांशीं ताडून पाहिलीं तेव्हां लक्ष्यांत आलें, तसेंच पतिव्रते आनंदमनी ।
हा अभंग या वहींत नकलकारानें कसा लिहून घेतला याचें मला आर्श्चय वाटतें. ही नकल
आजवर कोणास हि माहित नव्हती. ज्यांनीं साडेचार हजार अभंगांचा गाथा बनविला, त्यांस
या वहीचा सुगावा नव्हता व सख्या हरीस मी या वहीचें महत्त्व सांगेपर्यंत कोणास
कांहीं त्या वहीची कल्पना च नव्हती. ज्यांनीं साडेचार हजार अभंगांचा गाथा बनविला,
त्यांस या वहीचा सुगावा नव्हता व सख्या हरीस मी या वहीचें महत्त्व सांगेपर्यंत
कोणास कांहीं त्या वहीची कल्पनाच नव्हती. ही वही जुन्नरी घोटीव कागदावर लिहिलेली
आहे; पण लेखकाच्या अक्षराचें वळण तितकेसें रेखीव व घोटीव नाहीं. या वहींत 673 अभंग
होईपर्यंतची नकल एका हातानें केलेली आहे. पुढें मागच्या च अभंगाची पुनः नकल एका
हातानें केलेली आहे. पुढें मागच्या च अभंगाची पुनः नकल केलेली आहे. व इतर संतांचे
अभंग येथें छापले आहेत. या सर्व अभंगांची नकल मूळ वहीच्या नकलेशीं ताडून पाहिली
तेव्हां मूळ वहींतील कांहीं अभंग नकल करून घेण्यास हा जुना नकलकार विसरला किंवा
चुकला आहे असें आढळून आलें. तेव्हां मूळ वहींतून ते अभंग जागचे जागीं घातले.
सन 1947 उन्हाळयाच्या सुट्टीत या अभंगांचें शब्दशः रूपांतर स्पष्टीकरण-अन्तर्गत दुवा
कोठें आहे, हें दाखविण्याच्या उद्देशानें मीं केलें. हा नकलकार अभंग लिहून घेतांना
कांहीं अभंग गाळतो असें लक्ष्यांत आले होतें म्हणून छापील गाथ्यांतील उत्कृष्ट
गाथ्या-(पंडित प्रत) शीं या वहींतील प्रत्येक अभंग लावून पाहिला. हेतु हा कीं त्या
(पंडित) प्रतींत चुकत माकत ज्या ओळी शाबूत आहेत, त्या पाहून त्यांतून कोठें कोठें
या नकलकाराच्या हातून गळलेले अभंग आढळले तर ते अभंग घ्यावेत. तसे कांहीं अभंग मला
आढळले व ते मीं येथें घेतले आहेत. मूळ वहींतून नक्कल करतांना गळलेले अभंग मी
पूर्वीच जागचे जागीं उध्दृत केले होते. नंतर पंडित प्रतींतून कांहीं अभंग घेऊन,
केलेलें रूपांतर मला थोडें फार सुधारतां आलें. हे सर्व अधिक अभंग घेऊन, केलेले
रूपांतर मला थोडें फार सुधारतां आलें. हे सर्व अधिक अभंग सख्या हरीच्या वहीचा क्रम
कायम रहावा म्हणून जेथें अभंग जास्त घालावा लागे तेथें अ.आ. असें म्हणून घाली. ही
वही छापून काढण्याचें ठरल्यावर माझी नकल ही सख्या हरीच्या पूर्वजांच्या नकलेपेक्षां
केव्हां हि निःसंशय श्रेष्ठ आहे अशी खात्री होऊन मी माझ्या नकलेंतील अभंगांचा
अनुक्रमांक बदलला आहे. या ज्यास्त अभंगांची यादी ग्रंथाचे शेवटीं दिली आहे. तेव्हां
ग्रंथाचें संशोधन व संपादन करतांना खरी अस्सल संहिता लोकांचे हातीं पडावी म्हणून
जेवढी खबरदारी घेता आली तेवढी घेतली आहे. मूळ वहींतील अभंग पहिल्या प्रथम च या
ग्रंथांत जशेचे तसे छापले जात आहेत. त्यांत हि मीं प्रचलीत लिपी वापरली आहे.
रूपांतर करून खालीं सारांश देऊन स्पष्टीकरण देत आहें. तेव्हां अभंगांचा अर्थावबोध
होण्यास अडचण होणार नाहीं म्हणून व्याकरणाची-जोडाक्षरांचीं रूपें जशींचीं तशींच
ठेविलीं आहेत. मुख या बदल मुष हें मुळ वहींतील रूप दिलें नाहीं, मुख असाच शब्द
येथें दिला आहे.
असो, अभंगांच्या ओळीबद्दलच्या विवेचनाचा सारांश देऊन प्रस्तावनेंतील हें प्रकरण
संपवितों.
(1) तुकोबाराय स्वहस्तें अभंग लिहीत होते याबद्दल संशय घेण्यास जागा नाहीं.
(2) स्वहस्तें अभंग लिहिलेल्या वह्या डोहांत बुडविल्या होत्या याबद्दल वाद नाही.
(3) या वह्या तरल्यावर ठिकठिकाणचे लोक येऊन त्यांच्या नकला करून नेत होते असें
विधान महिपतीबोवांनीं केलें आहे.
(4) त्याप्रमाणें पंढरपुराच्या एका वारक-यानें एका वहीची करून नेलेली नकल,
भिजल्यावहीची नकल, म्हणून आतां छापीत आहें.
(5) संताजी तेली जगनाडे व गंगाराम मवाळ, हे दोघेजण अभंग लिहून घेत असत असे
महिपतीबोवांनीं नमूद केलें आहे.
(6) संताजीच्या दोन त्रुटित वह्या भावे यांनीं प्रसिध्द केल्या आहेत. संताजीच्या
वह्या चार होत्या अशी भावे यांना माहिती कळली होती तेव्हां इतर वह्यांचा शोध झाला
पाहिजे.
(7) गंगाराम मवाळ यांच्या संग्रहीं असलेल्या अभंगांच्या वह्यांचा अद्याप कांहीं च
तपास लागला नाहीं. त्याप्रमाणें इतर टाळक-यांच्या संग्रहीं जे थोडे फार अभंग असतील
त्यांचा हि आजवर कांहीं शोध झाला नाहीं, लागला नाहीं.
(8) बुडविल्या वह्यांचा हि आजवर कांहीं शोध लागला नाहीं. त्या वह्यांवरून केलेल्या
नकलांचा हि कांहीं शोध लागला नाहीं. त्या वह्यांवरून केलेल्या नकलांचा हि कांहीं
शोध झाला नाहीं.
(9) साडेचार हजार अभंगांचा गाथा कोणी व केव्हां निश्चित करून प्रचलीत केला याचा शोध
कोणीं केला नाहीं. परंपरेप्रमाणें हा मोघम शब्द प्रत्येक जण वापरीत आला आहे.
(10) साडेचार हजार अभंगांचा गाथा परंपरागत मान्य होता म्हणून प्रत्येकानें म्हटलें
होतें तरी हि तुकाराम तात्यांस 8441 अभंगांची एक प्रत मिळून छापता आली.
(11) तुकोबारायांची अपार कवित्त्व शक्ती होती. त्यांनीं नामदेवरायांची बाकी फेडली
म्हणून प्रसिध्दि आहे तेव्हां तें कवित्व साडेचार हजार किंवा आठ हजार अभंगापुरतें च
होतें असें म्हणण्यास सबळ कारण नाहीं.
(12) साडेचार हजार अभंगांचा गाथा तयार झाल्यावर त्याच्या नकलांच्या प्रतींची तुलना
करून कांहीं ओळी निश्चित करतां येतील असें मला वाटत नाहीं.
(13) परंतु ज्या इतर वह्या बुडविल्या त्यांचा किंवा त्यांच्या नकलांचा शोध झाला
पाहिजे.
(14) त्यांत संताजीच्या वह्याप्रमाणें किंवा या वहीच्या ओळीप्रमाणें ओळी सांपडल्या
पाहिजेत.
(15) असल्या नकलांच्या वह्या निर्याणानंतरच्या 25/30 वर्षांच्या काळांतल्या
सांपडल्या तर महाराष्ट्राचें निजधन हातीं येईल, सध्यां तरी आपल्या पूर्वजांच्या
हलगर्जीपणानें, उदासीनतेनें, तें धन आपण गमावून बसलों आहोंत. |