प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ
   

Font Problem

१.चरित्र

       माऊली श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांस त्यांच्या भक्तांनीं विचारिलें कीं ''माउली, आपण तर शुद्र वंशांत जन्मलेले, व्यवसायानें वाणी असें असून आपल्या ठिकाणीं ही हरिभक्ति उपजली कशी ? आपणास या विठ्ठलाच्या नामाची आवडी कशी उत्पन्न झाली ?  आपले सद्गुरू  आपणास कसे भेटले ? आपणास कवित्व स्फूर्ति कोठून व कशी झाली? आपणांस प्रत्येक वेळीं नवे नवे विचार कोण सुचवितो ? आपण ग्रंथाध्ययन, शास्त्रसंशोधन, भाषाशास्त्र,  व्युत्पत्ति, योग, कांहीं याग, असें जें कांहीं केलें असेल तें आम्हांस मोकळेपणानें कृपाळू होऊन सांगावें. कारण, आम्हांस असें खरेंच वाटतें कीं, आम्ही आपल्यासारखे हरिभक्त व्हावें. पण तें कांहीं जमत नाहीं. आपणास आम्ही लहानपणीं आमच्याच सारखे वागतांना पाहात होतों. आपलें स्थित्यंतर आम्ही आपल्या डोळयांनीं पाहात आहोंत. पुराणांतरीं कोणी हजार पांचशें वर्षें तपश्चर्या केली, मग इंद्राला त्या तपश्चर्येचा धाक पडला, त्यानें तपश्चर्येचा भंग करवावा, त्यास त्याच्या तपश्चर्येचें फळ हातीं लागूं नये, तपश्चर्या सिध्दीस जाऊं नये, असले दाखले पुराणिक पोथी सांगतांना आम्हीं ऐकतों. पण आपण तर ''याची देहीं याची डोळां भोगूं मुक्तीचा सहळा'' । मुक्ताबाईशीं मीं लग्न लाविलें आहे, माझ्या घरीं-वेदांत पाणी वाहतो, ''ब्रह्मरस पिका आला,'' म्हणून सांगतां, आम्ही ऐकतों. आपला भक्तीचा कळस झालेला आम्ही पहातों, तेव्हां-इतर पुराणांतरींचे दाखले नकोत, पूर्वींच्या सत्पुरुषांच्या रम्य गोष्टी नकोत, आपण आपलें चरित्र आम्हांस एकवार सांगा म्हणजे आपल्या सहज बोलण्यांत तुम्हां आम्हांत फरक कोठें पडत गेला तें लक्ष्यांत येऊन आम्हांस हितोपदेश होईल.'' ''आत्मचरित्र सांगणें हें एक अवघड काम आहे. त्यांत आपण निराळा मार्ग कसा काढीत गेलों, तुम्हांस ज्या गोष्टी रम्य वाटून समाधान वाटे, त्यांतून माझें मन कसें सुटलें-हें-सांगूं जावें-तर चर्चेला-विचाराचा फाटा फुटण्यास वाव होते, त्यांत कोणास आत्मश्लाघा वाटते. बरें त्या गोष्टी सांगूं नयेत तर जीवाच्या कळवळयानें आलेल्या आर्त माणसाची फसवणूक केल्यासारखें व्हावयाचें. अशा या गडसंदीच्या अवघड स्थितींत 6/7 अभंगांत तुकोबांनीं आपलें चरित्र सांगितलें आहे. त्यांतील कांहीं अभंग या छापलेल्या भिजल्या वहींत आले आहेत. (अभंग 177-181) (1)-याती शुद्र वैश्य केला वेवसाय (2)ऐका वचन हे संत (पं. 1333-4) हे दोन अभंग या वहींत आले नाहींत, पण हे दोन अभंग, येथें आलेले पांच अभंग, असे हे सात आत्मचरित्रपर अभंग तुकोबांच्या चरित्राचा पाया समजण्यास कांहीं हरकत नाहीं. स्वतःच्या स्तुतीपर शब्द उच्चारूं नये; ती आत्मश्लाघा होते. पण प्रश्न विचारणारांचा भाव शुध्द आहे. आर्तता खरीच आहे असें पाहून तुकोबा म्हणाले कीं-

       ॥ नये बोलो परी पाळीलें वचन । केलीयाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥

       तुम्ही शुध्द भावानें, ख-या अवस्थेनें प्रश्न विचारला आहे. तेव्हां तुमचें वचन पाळावें म्हणून मी चार शब्द बोलतों. एरव्हीं ही गोष्ट बोलूं नये अशी आहें. हे सहासात अभंग उभयपक्षीं उत्कट शुध्द भावनेच्या अवस्थेंत स्फुरलेले असल्यामुळें ते साहजिक च मोठे उद्बोधक व अर्थपूर्ण असे असे आहेत; त्यांतील प्रत्येक चरण हा महाराजांच्या सिध्दपंथाचा एकेक टप्पा आहे. त्यांतील प्रत्येक शब्द स्थानापन्न आहे, आत्मचरित्राची फलश्रुति ॥

       ॥ भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले ॥

अशी आहे. नये बोलो असें म्हणून आत्मचरित्र सांगण्यास जी सुरवात झाली. तो ओघ हि ॥

       ॥ वीस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥

       असें म्हणून तुकोबांनीं आवरला आहे. तात्पर्य हें कीं, हें आत्मचरित्र अति संक्षिप्त आहे. तरी हि जिज्ञासु माणसास या चरित्रापासून वर वर्णिलेली फलश्रुति लाभेल या बद्दल शंका नको. चरित्र विस्तारपूर्वक सांगावयास लागलों तर त्याचे बहुत प्रकार होतील. तेव्हां आतां पुरे असें म्हणून तुकोबांनीं लेखणी आवरण्याचें कारण असें कीं, अभंग जे स्फुरत आहेत, ते एकप्रकारें प्रकट चरित्र कथन च  आहे. ही गोष्ट या समोरच्या मूर्तीस ज्या अर्थी उमगली नाहीं तेव्हां आपण स्वचरित्र अभंगांत कसें सांठविलें आहे, तें विस्तारशः सांगावें लागलें असतें.  तसें न करितां या सहा सात अभंगांत चरित्राची रूपरेषा सांगून ठेवावी व ती जो नीट आकलन करील तो सर्व अभंग कोणत्या द्दष्टीनें पहावयाचे यावर नजर ठेवील या उद्देशानें हे सहा सात अभंग झाले असावेत.

       तुकोबारायांचा जन्म देहू गांवीं मोरे यांच्या कुळींत बोलोबाचे पोटीं झाला. बोलोबास पुत्र तीन. वडील सावजी, मधले तुकोबा व धाकटे कान्होबा. बोलोबांचे कुळांत विठोबा-रखुमादेवींची उपासना, पंढरीची वारी व वैश्यवृत्ति होती. हें घराणें संपन्न असावें. कारण या घराण्यांत महाजनकीचें वतन वडिलोपार्जित होतें, व त्याची खूण म्हणून या घराण्यांतील पुरुष सही करतांना निशाणी तागडी लावीत, शिवाय घरांत विठोबारखुमाईचें मंदिर होतें. तुकोबारायांचा जन्म केव्हां झाला याची निश्चित तिथि मास व वर्ष हें सांगतां येत नाहीं. त्याबद्दलचे वाद पुष्कळ आहेत. परंतु, त्यांतून फलनिष्पत्ती कांहीं झाली नाहीं. वादे वादे जायते तत्त्वबोधः  असें एक वचन नेहमीं उच्चारलें जातें पण तुकोबारायांच्या जन्मशकाबद्दलच्या गुरूपदेशाच्या शकाचा व निर्याणाच्या शकाचे वाद-अद्याप अनिर्णीत आहेत. तात्पर्य, वरील वचन तुकोबांच्या चरित्रापुरतें निरूपयोगी आहे. गुरूपदेशाची मिति माघशु. 10 गुरूवार हा योग शके 1541 व शके 1561ला येतो. महाराष्ट्रांत दुष्काळ पडला तीं वर्षें 1551/1552 हीं आहेत. त्यानंतरचा माघशु. 10 गुरुवार हा योग 1561 ला येतो. तें च वर्ष गुरूपदेशाचें मानावें असें वाटतें. पांगारकरांनी 1554 हें वर्ष दिलें आहे. त्याबद्दल सूक्ष्म गणित केल्याचें म्हटलें आहे. तुकोबारायांनी येवढें सूक्ष्म गणित केलें असेल, त्यांस त्यावेळीं तसें सुक्ष्म गणित केलें असेल, त्यांस त्यावेळीं तसें सूक्ष्म गणित करण्यास साधनाची अनुकूलता होती असें वाटत नाहीं. निर्याणाचा शक 1571 फाल्गुन वद्य 2 या दिवशी सोमवार येत नाहीं, शनिवार येतो. परंतु साधारणपणें विचार करतां माणसांच्या लक्ष्यांत वर्ष महिना तीथ राहते. वार तेवढा राहत नाहीं. तेव्हां शके 1571 फाल्गुन वद्य 2 शनिवार विरोधीनाम संवत्सरे हा शक निर्याण शक मानावा असें वाटतें. संतलीलामृतांत महिपतीबुवा ताहराबादकर यांनीं तुकोबारायांचें चरित्र रसाळ भाषेंत गाइलें आहे. महिपतीबुवांनीं त्यांना त्यावेळी मिळवितां आली ती सर्व परंपरागत माहिती मिळवून चरित्र लिहिलें आहे. बहुतेक सर्व चरित्रकारांनीं आपापल्या आवडी नावडीप्रमाणें तीच माहिती रंगवून निरनिराळीं चरित्रें लिहिलीं आहेत. तुकोबारायांच्या चरित्राचा पाया त्यांचे अभंग होत. असें प्रत्येक लेखकानें वरकरणी म्हटलें आहे. पण प्रत्येक अभंगांतून चरित्र गोळा करण्याचें  अवघड काम आजवर कोणी केलें नाहीं.  तेव्हां तसा प्रयत्न यापुढें करून पाहूं.

       (पं. 1333) याती शुद्र, वैश्य व्यवसाय । आदि तो हा देव कुळपूज्य। ही परंपरा बोलोबांच चालूं होती. या परंपरेप्रमाणें, बोलोबांचें वय होत चाललें, तेव्हां मुलांनीं व्यवसाय संभाळावा व आपण हरि हरि म्हणत स्वस्थ बसावें. अशी बोलोबास इच्छा झाली. वडील मुलगा सावजी हा संसाराची धुरा अंगावर घेईनाः सावकारींतील-वैश्यव्यवसायांतील दगदग व लटपट तो पत्करीना. तेव्हां तुकोबांनीं तें काम अंगावर घेतलें, व आईबापांच्या देखरेखीखालीं तुकोबा वैश्य व्यवसाय करूं लागले. या वेळीं बोलोबांच्या घरांत ती नवरा बायको, सावजी व त्याची बायको, तुकोबा व त्यांची बायको रुक्मिणी, कान्होबा व त्याची बायको येवढी मंडळी असावीत. तुकोबा व्यवसाय करूं लागल्यावर थोडया दिवसांत त्यांना त्यांतील खाणा-खुणा डावपेंच समजून ते तुकशेट या पदवीस चढले.  या सुमारास तुकोबांच्या बायकोस रुक्मिणीस धापेची व्यथा आहे असें दिसून आलें. तेव्हां उत्साही व कर्तृत्ववान मुलास संसारांत उदास वाटूं नये म्हणून पुण्याच्या आप्पाजी गुळवे सावकारांची मुलगी मागणी घालून बोलोबांनी नवी सून करून आणली. हीच प्रसिध्द आवली किंवा जीजाई होय. सवत जीवंत असतांना पुण्याच्या संपन्न सावकारांनी आपली मुलगी दुसरेपणावर दिली यावरून तुकोबांच्या घराण्याची सांपत्तिक स्थिति त्यावेळी चांगलीच असावी, व तुकशेट व्यवसायांत दक्ष आहेत, असें ऐकून बोलोबांस सुख होई. पण हि स्थिति फार दिवस टिकली नाहीं. अशा संसाराच्या सुखांत बोलोबाचा काळ झाला. तुकशेट यांस डोक्यावर विचारण्यास वडील होते हा मोठा आधार वाटे, त्यामुळें या मृत्यूच्या घाल्यानें त्यांचें चित्त दुखावलें. पण झाली गेली गोष्ट कांहीं परत येत नाहीं या विचारानें तुकशेट संसार-सावकारी नीट चालवीत होते. त्यांतच याच सुमारास सावजीची बायको निवर्तली म्हणून तो उदास होऊन तीर्थयात्रेस निघून गेला. याच सुमारास आई हि गेली असावी. कारण पुढील चरित्रांत आईचा उल्लेख कोठें च येत नाहीं. अशा त-हेनें तुकशेट वाणी व त्यांच्या दोन्ही बायका, रुक्मिणी व आवली ऊर्फ जीजाई व रुक्मिणीचा मुलगा संतु असा तुकशेट यांचा संसार होता.  तुकशेट संसार दक्षतेनें करून थोडीफार पुंजी गोळा करूं लागून त्यांची भरभराट होत होती. याच सुमारास महाराष्ट्रभर दुर्गादेवी या नांवाचा भयंकर दुष्काळ पडून सर्वत्र हाःहाःकार झाला. हीं वर्षे शके 1551/52 हीं होत. त्यांतच आई गेली, बाप गेला. भावजय गेली म्हणून भाऊ घर सोडून गेला. भरभराटीचा म्हणून जो काळ सुखाचा त्यावेळीं वाटत होता-त्याचें पुढें संतपणाची जोड झाल्यावर तुकशेट तुकोबा झाल्यावर त्यांनीं वर्णन खालीलप्रमाणें केलें आहे. अर्थात् वैराग्यानें संसार कडू वाटूं लागल्यावरचें हें वर्णन आहे. एवढी गोष्ट जमेस धरून खालील वचनें पहावयाचीं आहेत. तुकशेट दोन्ही बायका सुखानें नांदवीत होते. त्याबद्दल पुढें आपल्या गत आयुष्याकडे वळून पाहून तुकोबाराय म्हणतात.--(पं. 1237)

       ॥ एका पुरुषां दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥1॥

       ॥ पाप न लगे धुंडावे । लागेल तेणें तेथें जावें ॥धृ॥

       ॥ कांहीं दुसरा विचार । न लागे करावा चि फार ॥2॥

       ॥ असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥3॥

       ॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती तीं सुखें ॥4॥

       ॥ तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभ हानी ॥5॥

       सावकारीचा, देण्या-घेण्यांचा तुकशेट वाणी यांचा जम चांगला बसला होता म्हणून तुकशेट यांची स्तुति-इष्ट-मित्र-गण-गोत बोलोबांस ऐकवीत होते व त्या स्तुतीच्या श्रवणानें बोलोबांच्या कानाचें पारणें फिटे पण तुकशेट यांच्या मीपणाबद्दल तुकोबाराय म्हणतातः--(पं. 2834)

लक्ष्मीमदें मातें घडले महादोष । पत्नी दोन्ही भेदाभेद ॥

पितृवचन घडली अवज्ञा अविचार । कुटिल कुचर वादी निंद्य ॥

                                  --           --           --

        भूतदया उपकार नाहीं शब्दाधीर । विषयीं लंपट हीन ॥

       मोठया नेकीनें चालविलेला संसार दुर्गादेवीच्या दुष्काळांत सुखाच्या ऐवजीं दुःखास कारणीभूत झाला. याबद्दल तुकोबा समोरच्या श्रोत्यांस सांगतात कीं :---

       1333

संवसारें जालों अति दुःखें दुःखी । मायबाप सेखीं क्रमीलीया ॥

       दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥

       लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां ॥

       हें च वर्णन पुढील (1334) व्या अभंगांत आलें आहे.

       बहु पीडीलों संवसारे । मोडी पुसे पीटी मेली ढोरें ।

       न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥

       सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही ॥

                           ----         ---          ---

       प्रिया पुत्रं बंधु । यांच्या तोडीला संबंधु ॥

       सहज जालो मंदु । भाग्य हीन करंटा ॥

       तोंड न दाखवें जना । शिरें सांदी भरें राणां ॥

       एकांत तो जाणा । तयासाठीं लागला ॥

       पोटें पीटिलों काहारे । दया नाहीं या विचारें ॥

वर जे उतारे दिले आहेत ते स्वचरित्राचें सिंहावलोकन आहे व त्यांतल्या त्यांत संतांनीं मुद्दाम विनयपूर्वक सांगितलेलें व्यवसायी संसारिकाचें वर्णन आहे. तेव्हां तें चित्र थोडें फार भडक रंगवलें असण्याचा संभव आहे. वरील उता-यांत स्वदोषांची निंदा थोडया अतिशयोक्तीनें केली नसेल असें मला म्हणवत नाहीं. दोन जिवंत बायकांना नांदवितांना त्यांच्यांतील मत्सरास सांभाळण्यासाठीं ह्या दादल्यानें जेवढी लपंडाई-खरें खोटें करावयास हवें तेवढें तुकशेट करीत होते, असें आपण गृहीत धरूं. कर्तृत्ववान मनुष्य उमेदीनें, धिटाईनें, उडी टाकून व्यापार करीत असतांना, ज्यांच्या नाडया थंडावल्या आहेत, अशा वडिलांचें जेवढें वचन मोडतों. तेवढी तुकशेट पितृवचन मोडून अवज्ञा करीत होते असें हि आपण गृहीत धरूं. पण त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणें त्यांनीं नांव व भूषण मिळविलें होतें. ही हि गोष्ट आपण जमेस घेऊं. अशा मनुष्यास स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली. व पोटें पीटिलो काहारें या गोष्टी केव्हां हि जिव्हारीं लागतीलच. तशी ती तुकशेट यास जिव्हारीं जखम झाली असावी. तेव्हां कोणाशीं संबंध नको. असें वाटून एकांत आवडावा हें सहज आहे. अशा एकांतांत असतांना आपलें काय व कोठें चुकलें हा विचार कोणी हि करणार च. मनुष्य अशा त-हेंने आपली चूक शोधीत असतांना, आपण उत्साहानें ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या कोठें-घसरल्या-फसल्या सिध्दिस कां गेल्या नाहींत, या सर्वांचें कारण दुष्काळ हें लक्ष्यांत आल्यावर हा दुष्काळ निवारण करणें हें कांहीं माझ्या हातचें नाहीं-हा दुष्काळ कांहीं मी आणला नाहीं तेव्हां दुष्काळें आटीलें द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करीतां मेली, याबद्दल एकबार बुध्दिनिश्चय झाल्यावर, परंपरागत समजुतीप्रमाणें, ईश्वरी क्षोभानें, ही अवनत अवस्था आली आहे, असें पटल्यावर, लज्जा वाटे जीवा । त्रासलो या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां ही अवस्था प्राप्त झाली. तेव्हां घराण्यांत परंपरेनें आलेलें (1) हरिनाम (2) पंढरीची वारी व (3) विठोबा रखुमाईचें देऊळ होतें इकडे तुकशेट यांची द्दष्टि वळली. तेव्हां खालील शब्दांत नव्हे (कारण ही शब्दरचना-पुढें देशाउर झाल्यानंतरची आहे.) पण खालील अभंगांत जो अर्थ सांठवला आहे त्या अर्थानें तुकशेट यांनीं देवास म्हटलें असावें कीं-बा पंढरीनाथा-तुम्ही उभयतां आमच्या घराण्याचें सात पिढया संरक्षण करीत आहांत. माझी स्थिति अति बिकट झाली आहे-यांतून बाहेर पडण्याचा मला तर मार्ग दिसत नाहीं. जो जो उपाय करावा, तो तो अपाय होतो, तेव्हां बा मी तुला मी शरण आहे ही स्थिति तुम्ही आणली आहे. तेव्हां ती कशी निवारावयाची तें तुम्ही पाहून घ्या. मी परंपरेनें आलेलें तुमचें नाम गाईन, नाम ध्याईन. हा संसाराचा भार माझ्यानें पेलवत नाहीं. यावेळीं तुकशेट यांनीं खालील शब्दांनीं नव्हे पण या अवस्थेनें विठोबास म्हटलें असावें कीं :- (पं. 3631)

॥ माझीये बुध्दीच्या खुंटला उपाव । करसील काय पाहेन तें ॥ 1 ॥

 ॥ धृ ॥ सूत्रधारी तूं हें सकळ चाळीता । कासया अनंता भार वाहों ॥ धृ ॥

॥ वाहीले संकल्प न पवती सीध्दी । येऊं देह बुध्दी वरी नये ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे दुःखी करीती तरंग । चिंतूं पांडूरंग आवरूनी ॥ 3 ॥

मनांत जे निरनिराळे तरंग येऊनी दुःख होई, तें निवारण्यास्तव आपण केलेले सर्व उपाय निरुपयोगी झाले असें पाहून-वाहीले संकल्प न पवती सीध्दी । अशी स्थिति झाली असतांना करशील काय पाहेन तें । असें म्हणून देवावर भार घालून तुकशेट स्वस्थ झाले. तेव्हां देवानें उपाय करण्यास सुरवात केली. देवानें पहिली गोष्ट केली ती ही कीं, देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेसें ॥ 5 ॥

देवाचें देऊळ भंगलें आहे. तसा च आपला संसार हि भंगला आहे. यांच्या संबंध कांहीं असेल काय, नसेल हि, पण आतां तें देऊळ स्वतः अंगमेहनत करून दुरुस्त करावें. अशी च वृत्ती-अशा च मनाच्या स्थितींत च्ठ्ठत्दद्य क़ध्दठ्ठदड़त्द्म दृढ ॠद्मद्मत्द्मद्मत् या संतास आली होती. परंपरेनें चालत आलेलें हरिनाम घ्यावें व तें घेत घेत देवाचें देऊळ दुरुस्त करावें असा हातापायांस व वाणीस व्यवसाय सुरू झाला. यापूर्वीं परंपरेनें आलेली एकादशी तुकशेट पाळीत होते. हरिकीर्तनास हि जात होते. परंतु संतवचनें पाठ करावीं. त्यांचा अभ्यास करावा अशी बुध्दि झाली नव्हती. परंतु मुखीं नाम वास करूं लागल्यावर पुढची पायरी आपोआप पुढें आली ती ही कीं :-

॥ कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । वीश्वासें आदरें करूनीयां ॥

ही वचनें नीट पाठ व्हावींत, त्यांचा भाव मनीं नीट ठसावा म्हणून

॥ गाती पुढें त्यांचे धरावें ध्रुपद । भावें चित्त शुध्द करूनीयां ॥

तुकोबांनीं विश्वासानें व आदरानें संतांचीं कांहीं वचनें पाठ केलीं. या वचनाचा आधार घेऊन कै. ल. रा. पांगारकर यांनीं तुकोबांचें ग्रंथाध्ययन असें एक सहासष्ट पृष्ठांचें रसभरीत प्रकरण लिहिलें आहे. पण देहूसारख्या ठिकाणीं येवढे ग्रंथ त्यावेळीं मिळणें शक्य होतें का ?  बरें ग्रंथ होते असें जरी मानलें तरी ते ग्रंथ तुकोबांस वाचावयास मिळण्यासारखे होते का- ? कोणी वाचूं दिले असते का ? ग्रंथाध्ययन करण्याजोगें तुकोबांचें  बाल वय होतें का ? जाती वगैरे मनांत न आणतां ग्रंथाध्ययन करण्याजोगें तुकोबांचें बाल वय होतें का ? जाती वगैरे मनांत न आणतां ग्रंथांतील रहस्य उकलून सांगतील असे महात्मे देहूच्या आसपास कोणी होते का ? या गोष्टींचा पांगारकरांनीं विचार करावयास हवा होता. पण यांपैकीं एक हि विचार त्यांना शिवला नाहीं. अभंगांत आलेल्या विचारासारखा विचार एखाद्या ग्रंथांत आलेला पाहिला कीं तो ग्रंथ तुकोबांनीं अभ्यासिला होता, असें म्हणण्यास पांगारकर तयार !! सुमारें 100/125 वचनें अभंगांत व बायबलमध्यें सारखीं आहेत. एवढयानें तुकोबा बायबल शिकले होते असें का म्हणावयाचें ? अध्यात्माचा विचार करूं लागावें तों कांहीं श्रुतींच्या वचनांप्रमाणें अभंगांचे चरण सांपडतील, यावरून तुकोबांनीं उपनिषदांचा अभ्यास केला होता असें का म्हणावयाचें ? शिवाय कांहीं पाठ केली यापेक्षां, विश्वासें आदरें करूनीयां, हें चरण जास्त महत्त्वाचें आहे. तुकोबांनीं पाठ केलीं अशीं जीं ''कांहीं'' वचनें असतील, तीं निवडक असतील. वचनें नारायणाची जोडी करून देणारीं असतील हें खरें, पण तीं वचनें कांहीं म्हणजे थोडीं याचा अर्थ केव्हां हि पुष्कळ असा होत नाहीं. ग्रंथाध्ययनाबद्दल तुकोबांचें मत  काय होतें तें त्यांनीं धरणेक-यास उपदेश केला तेव्हां पहिल्या च वाक्यांत ''नको कांहीं पडो ग्रंथाचीये भरी'' असें निश्चित सांगितलें आहे. तेव्हां समग्र साडेचार हजार अभंगांत ग्रंथाध्ययनाबद्दल आलेले सर्व उल्लेख (अभंग 423-426) येथें आले आहेत ते विचारांत घेतले पाहिजे. 423 अभंगांत तुकोबा म्हणतातः- आपण पाठांतर करावयाचें तें असें करावयाचें कीं, तीं वचनें करुणापर असावींत, त्या वचनांत देव प्रत्यक्ष भेटावा, त्या वचनांनीं कैवल्याच्या सोज्वळ वाटा स्पष्ट व्हाव्यात, व त्या पाठांतराचा उपयोग ती जोडी मला व्हावी असा हेवा उत्पन्न करण्यास व्हावा. या पुढील अभंगांत स्पष्ट म्हटलें आहें कीं :- (424)

॥ पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐसी मती अर्थ कळें ॥

शिवाय ग्रंथाध्ययन केलें तरअंगासी एखादा येईल प्रकार । तेव्हां पुढील अभंगांत म्हणतात कीं (426)
॥ तुका म्हणे बहुं सांडीयली मतें । आपुल्या पुरतें धरूनी ठेलो ॥

तेव्हां मतांतरें गोळा न करितां अभंग 423-426 या वचनांस धरून तुकोबांनीं कांहीं पाठ केलीं संतांचीं वचनें,  विश्वासें आदरें करूनीयां । हीं तुकोबांनीं पाठ केलेलीं वचनें कोणतीं असावींत हें समजणें केव्हां हि तुकोबांच्या चरित्रलेखनास अत्यंत आवश्यक आहे. तीं वचनें अभंग 423 च्या कसोटीस उतरलीं पाहिजेत. सध्यां ती यादी आपणास उपलब्ध नाहीं. परंतु पूर्वीच्या संतांच्या वचनांतून कांहीं वचनें त्यांनीं विश्वासें आदरें पाठ केलीं हा चरित्रांतील एक टप्पा आहे. हरिपाठ (ज्ञानेश्वर), श्रीज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पासष्टी, श्रीज्ञानेश्वर अभंग-निवृत्तिनाथ-अभंग, नामदेवराय (अभंग), जनाबाई (अभंग), एकनाथ, भागवत रामायण, अभंग-व कबीर यांच्या वचनांचा तुकोबारायांच्या मनावर पुष्कळच संस्कार झाला असणार. ग्रंथांचे इतर पढीक विद्वान व तुकोबा यांत मुख्य फरक विश्वासें आदरें व भावें चित्तशुध्द करोनिया । या वृत्तींत आहे. तुकोबारायांनीं विश्वासें आदरें पाठ केलेल्या वचनांचा संग्रह आज तरी काळयाच्या उदरांत गडप झाला आहे, पण यदाकदाचित् तसा हस्तलिखित संग्रह, त्यांनीं वापरलेले ग्रंथ, कदाकाळी उपलब्ध होतील, तर त्या वचनांच्या आधारें किती तरी अभंगांचा अर्थ स्पष्ट होईल ! सध्यां त्याबद्दल अनुमान च कलं पाहिजे, पण तें अनुमान च केलें पाहिजे, पण तें अनुमान असें केलें पाहिजे कीं, आज तुकोबांचे जे अभंग उपलब्ध आहेत, तें ज्या वचनांचें फळ शोभेल अशीं बीज-वचनें तुकोबारायांनीं आपल्या मनोभूमींत रूजत घातलीं असावीत. तीं वचनें कोणतीं असावींत अशा विचारानें पूर्वीच्या संतांचे ग्रंथ आपण जरूर पाहावे.

तेव्हां माझीया बुध्दीचा खुंटला उपाव । असें म्हणून तुकोबांनीं जेव्हां घरच्या कुळदेवतेस-करशील काय पाहेन तें । असें म्हटलें-व देवावर भार घालून राहिले. तेव्हां हरिमुखें म्हणा-हरिमुखें म्हणा । या ज्ञानराज माऊलीच्या उपदेशाप्रमाणें तुकोबांचा आचार होता, हा आचार त्यांनीं (179)

॥ बोलावा वीठल पाहावा वीठल करावा वीठल जीवभाव ॥

असा पाळला. करावा वीठल जीवभाव। हें चरण मोठें च अवघड आहे, व त्याची साक्ष ज्याची त्यानें च द्यावयाची असते. पण हा आचार असा साच भावानें वागून संभाळला म्हणून काय झालें तें पुढील चरणांत त्यांनीं सांगितलें आहे.

॥ धृ ॥ येणें सोसें मन जालें हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥

॥ बंधनापासुनी उकलली गांठी । देतां आली मिठी सावकासें ॥

॥ तुका म्हणें देह भरीला वीठलें । कामक्रोधीं घर केले रीते ॥

संतांचीं वचनें विश्वासानें व आदरानें पाठ करीत असतांना त्या ऐश्वर्यवंत वचनाचा प्रभाव दिसूं लागून तुकोबांचा आचार बदलला. त्यांनीं स्वचरित्रपर अभंगांत म्हटलें आहे कीं, 1333

॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुध्द करोनियां ॥

भावें चित्तशुध्द करोनिया । हा चरण विश्वासें आदरें करोनिया या चरणाचा च पाठचा भाऊ आहे.

॥ संतांचे सेवीलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली. ॥

या लाजेवर पुढें 3/4 अभंग झणझणीत च केले आहेत.

॥ ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवुनी ॥

हा उपकार शरीर कष्टवून कसा केला हें सांगतांना महिपतीबोवांनीं तुकोबांनीं एका वृध्द ब्राह्मणीस तेल आणून दिलें. तें पुष्कळ दिवस पुरलें. तेव्हां गांवच्या सर्वच बायका आपली तेलाची बुधली व पैसे तुकोबांजवळ देऊं लागल्या, तुकोबा ते पैसे व बुधले गळयांत अडकवून तेल्याकडे जात; तेल्यापुढें ते पैसे व बुधले टाकीत. तेली ज्याचे जेवढे पैसे तेवढें च तेल अन्तज्र्ञानानें प्रत्येक बुधल्यांत बरोबर भरी-असें मोठे चटकदार वर्णन महिपतीबुवांनीं केलें आहे. पण मला ही हरदासी कोटी आहे असें वाटतें. अंतरीं ज्ञानज्योती प्रकट होत असतांना मनुष्य गाफील-उदास व पिसा होतो कीं काय? तेव्हां तुकोबांस गांवच्या (महिपतीनें म्हटल्याप्रमाणें) बायकांनीं वेठीस धरलें असेल हें संभवत नाहीं. त्यांच्या ज्ञानांत जास्त जास्त स्पष्टता होत होती म्हणून ते केव्हां हि-ऐकावें जनाचें करावें मनाचे या वृत्तीचे होते म्हणून तुकोबा स्वचरित्रपर अभंगांत पुढें सांगतात कीं,

वचन मानीलें नाहीं सुहृदाचें । समूळ प्रपंचे वीट आला ॥

सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानीयलें नाहीं बहुमता ।

तुकोबा होयबा नव्हते ही गोष्ट त्यांनी वचन मानीयलें नाहीं सुहृदयाचें । या शब्दांत स्पष्ट सांगितली आहे. अत्यंत उत्साहानें संसार करीत असतांना आपल्या बुध्दीचे सर्व उपाव कुंठीत जाले, तेव्हां जो माझ्या जीवाचें सूत्र हालवीत आहे, तो आपलें काम कसें करतो हें पाहण्याचें काम कांहीं माझें नाहीं. तो मज व्हावा । तो मज व्हावा । अशी मला आतां आस लागली आहे-तेव्हां त्याचें काम तो करो-माझें काम मी करतों. अशा निश्चयानें तुकोबा वागत म्हणून संसारांत काय किंवा परमार्थांत काय, त्यांस कोणी कांहीं हि सांगून भुलवूं शकेल, कोणी कांहीं शिकवूं शकेल अशी स्थिति उरली नव्हती. त्यांनीं स्पष्ट सांगितलें आहे कीं,
सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानीयलें नाहीं बहुमतां ।
 या एका वचनांत केवढा अर्थ सांठविला आहे ! हें वचन बहुंशीं ज्ञानेश्वर माउलीचे शिकवणीवर आधारलेलें आहे. श्रीज्ञानेश्वरींत नवव्या अध्यायांत
खालील ओव्या आहेत. म्हणौनि ज्ञान तें चि आंधारें । ज्ञानासि करिति ॥ 170

         *                        *                         *

 आंधलेया गरूडाचे पांख आहाति । ते कोण्हाहि उपेगां जांती ।
तैसे सत्कार्याचे उपखे ठांती । अज्ञानां तेवी । 303 ।

         *                        *                         *
ऐसे दीक्षीत जे सोमप । जे आपण चि यज्ञाचें रुप ।
तीहीं तेया पुण्याचेनि नांवें पाप । जोडीलें देखै ॥ 306 ।
जे श्रुतीत्रयींतें जाणौनि । शतवे-हीं यज्ञ करुनि ।
यजियेला हि मातें चुकउनी । स्वर्गु वशंति ॥ 307 ।
जैसें कल्पतरु तळवटीं । बैसोनि झोलीये पाडी गांठी ।
मग निर्दे निगे किरीटी । दैन्य करूं ॥ 308 ।
तैसें शतक्रतु याजिले मातें । कीं इच्छिताती स्वर्गादि सुखाते ।
आतां हें पुण्य कीं निरुतें । पाप नोहे ॥ 309 ॥
म्हणौनि मजवीण पावीजे स्वर्गु । तो अज्ञानाचा का पुण्यमार्गु ।
ज्ञानीये तेयातें उपसर्गु । हाणि म्हणती ॥ 310 ॥
ए-हवीं तरी नरकीचें दुःख । पाहूनि स्वर्गा नांव की सुख ॥
वाचूनि नित्यानंद निर्दोष । तें स्वरुप माझें ॥ 311 ॥
मज येतां पै सुभट । हा द्विविधु गा अव्हांटा ।
स्वर्ग नरक इगा वाटा । चोरांचिया ॥ 312 ॥
स्वर्गा पुण्यात्मकें येईजे । तें शुध्द पुण्य ॥ 313 ॥
आणि मज चि माझि असतां । जेणें मी दूरी होये पांडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न झडे ॥ 314 ॥
 

         *                        *                         *

मग तेया पुण्याची पाहुती सरे । सवें चि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणिं येवो लागती माघारे । मृत्यु लोका ॥ 325 ॥
जैसा भाडीचा कवडा वेचे । मग दार ही चेपूं नैये तेयाचें ।
ऐसें लाजीरवाणें दीक्षीताचें । काइ सांधो ॥ 326 ॥
         *                        *                         *

अर्जुना वेदु ज-ही जाला । त-ही मी नेणतां वाया गेला ।
कनु सांडौनि उपणीला । कोंडा जैसा ॥ 329 ॥
         *                        *                         *
आतां आणीक संप्रदाये । परी माते नेणति समवाए ।
जे अग्नये इंद्राय अर्यमणें सोमाय ॥ म्हणौनि भजती ॥ 340 ॥
तें हि कीर मातें चि होये । कां जें हें आघवें मी चि आहे ।
परि भजती उजिरी नोहे । विखम पडे ॥ 341 ॥
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे न्हवति येका चि बीजाचे
परी पाणी घेणें मुलांचें । ते मुलीच घापे ॥ 342 ॥
कां दाही इंद्रियें आथि । इयें ज-ही एकीची देहिचिं होति ॥
आणि इहीं सेविले विखम जांती । एका चि ठाया ॥ 343 ॥
तरी करूनि रसोये बरवी । कानि केवी भरावी ।
फूलें आणुनु बांधावी । डोलां केवि ॥ 344 ॥
तेथ रसु तो मुखे चि सेवावा । परिमलु तो घ्राणें चि घेयावा ।
तैसा मी तो यजावा । मी चि म्हणौनि ॥
येर मातें नेणौनि भजन । तें वाया चि गा आनीआन ।
म्हणौनि कर्माचे डोले ज्ञान । तें निर्दोष होआवे ॥ 349 ॥
तसें च तेराव्या अध्यायांत खालील ओव्या आहेतः
नीच आराधन माझें । कां जी कुलदेवतीं भजे ।
पर्व विशेषें भोजें । पूजा आन ॥ 814 ॥
माझें आधिष्ठान घरीं । आणि वौरो आनाचे करी ॥
पितर कार्य अवसरी । पितराचा होए ॥ 815 ॥
एकादशीच्या दिसीं । जेतुला पाडु आमसीं ।
तेतुला चि नागासी । पंचमीसी ॥ 816 ॥
चौथि मोटकी पाहे । आणि गणेशांचा हि होए ।
चाउदसिं म्हणें माए । तुझा चि वो दुर्गे ॥ 817 ॥
नवमीतें मांडी । आणि बैसे नवचंडी ।
आदित्यावारिं वाढी । भैरवा भरी ॥ 818 ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेेंसि लिंगा धावे ।
ऐसें एकला चि आघवें । जोगावी जो ॥ 819 ॥
अखंड भजन करी । उगा न राहे क्षणभरीं ।
आघवेति गांवंदारी । ऐहेव जैशी ॥ 820 ॥
तैसेनि जो गा भगतु । वेखासि सैरा धावंतु ।
जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतारु तो ॥ 821 ॥

याशिवाय अमृतानुभवांत खालील ओव्या आहेत.
आणि ज्ञानबंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितले असें । सदाशिवें ॥ प्र. 3।16 ॥
आणि वैकुंठीचे हि सुजाणें । ज्ञानापाशीं सत्वगुणें ।
बांधिजे हें बोलणें । बहु केलै ॥ 17 ॥
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलील येणें चि लोभें ।
मानु तें हि लाभे । न बोलतां हि ॥ 18 ॥
जें आत्मज्ञान निखळ । तें हि घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ॥
ज्ञानें श्लाघ्यतु आहे । तें ज्ञानपण धाडीले वाये ।
दीप वाचूंन दिवा लाहे । तै अंग भुलला चि कीं ।
आपण चि आपणापाशीं । नेणता देशोदेशीं ।
आपण पें गिवशीं । हें कीरु होय ।
परिबहुता कां दिया । आपणापें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझो ॥
तैसा ज्ञानरुप आत्मा । ज्ञानें चि आपली प्रभा ।
करीतसे सोहं मा । ऐसा बंधु ॥
या शिवाय ज्ञानोबारायांचें (1) कां सांडीसी गृहाश्रम । व (2)घरदार वोखटे त्यजूं म्हणसि । हे व असले इतर अभंग हि तुकोबांनीं नीट मनन करून म्हटलें कीं :-

॥ सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानीयले नाहीं बहुमतां ॥

मानीयलें नाहीं बहुमतां । ही गोष्ट तेव्हां आचरण्यास अवघड होती व आज हि अवघड च आहे. पण हा च तुकोबारायांचा दंडक होता. म्हणून ते परमार्थाच्या नांवानें शाक्त, संन्यासी, जटाधारी, कानफाटे, मलंग, महानुभव, जंगम, मुद्राधारी असल्या कोणत्या हि फंदांत अगर छंदांत सांपडले नाहींत. त्या सर्वांस त्यांनीं ओळखून ठेविले. पुढें जगास नीती शिकविण्याची कामगिरी अंगावर आली त्या वेळीं प्रत्येकास तुझें कोठें चुकतें आहे हें हि बुक्का लावून अचुक सांगितलें. तुका म्हणें हे मावेचे मइंद । या पाशीं गोविंद नाहीं नाहीं (पं. 3939) असें दोनदा ठासून सांगितलें व वर म्हणाले कीं सोंगें छंदें कांहीं देव जोडे ऐसा नाहीं । (पं. 1507)

तात्पर्य ज्ञानोबारायांचीं कांहीं वचनें पाठ केलीं त्यावरून ज्ञान च बंध कसा होतो हें तुकोबांनीं समजून घेतलें असावें,  वाटेल त्या देवतेचें रोज नवेपणानें केलेलें भजन पूजन उपयोगी पडत नाहीं, इतकें च नव्हे तर तें भजन ऐहेव जैसी । असें होतें; विखम पडे, अशा सर्व वचनांचें वर्म लक्ष्यांत घेऊन तुकोबांची सर्व भजन पूजना बद्दलची ज्ञानदृष्टी चोख झालेली असावी. अशा चोख दृष्टीनें विश्वासें आदरें जीं संत वचनें गाऊन विठू आळवीत  असतील तीं ऐश्वर्याचीं वचनाक्षरें मनांत खोल रुजून-आपला प्रभाव दाखविल्याशिवाय कशी राहणार ! रोज इंद्रायणींत स्नान करावें. देवपूजा करून-एकांत साधावा म्हणून भंडा-यावर (बसून वा उभ्याने कधीं नाचून) भजन करीत असतील त्यावेळची त्यांची एकतानता, एकविधता व उत्कटता केवढी असेल ! त्या उत्कट भजनांत डोळा लागला तर झोप; नाहीं तर आहे च अखंड मुखीं नाम. अशा स्थितींत असतांना एका गुरूवारीं (तो दिवस माघ शुध्द दशमी हा होता) तुकोबास एक दिव्य स्वप्न पडलें. त्या स्वप्नांत त्यांनीं असें पाहिलें कीं - आपण गंगेवर - इंद्रायणीवर - स्नानास जात आहोंत - अशा स्थितींत कोणी तरी मुद्दाम येऊन आपणांस गांठलें - व मस्तकावर हात ठेवून (संत गुरुरायांनीं) कृपा केली. आपलें नांव बाबाजी असें सांगितलें. राघो चैतन्य व केशव चैतन्य अशी आपल्या मालिकेची खूण सांगितली. मला रामकृष्ण हरि हा मंत्र दिला. हा मंत्र संत गुरुरायांनीं माझ्या मनींचा भाव ओळखून माझ्या आवडीचा सोपा ज्यांत कोठें गुंतांगुंत नाहीं असा मंत्र मला सांगितला. सर्व साधुसंत हा भवसागर या मंत्राच्या साहाय्यानें च पैलपार झाले आहेत, मग तो मनुष्य जाणता असो वा नेणता असो. हा मंत्र च त्याला भवसागर तरून जाण्यास सांगड झालेला आहे असें सांगून संत गुरूरायांनीं मला कृपेचा सागर पांडुरंग दाखविला व भोजनासाठीं पावशेर तूप मागितलें तें मी आणावयास गेलों. येवढयांत त्यांचे मनांत काय आलें नकळे; पण त्यांस जाण्याची त्वरा झाली. ते गेले. मी जागा झालों. या दिवशीं माघ शुध्द दशमी होती. त्या दिवशीं संत गुरूरायांनीं माझा अंगीकार केला.

हा दृष्टांत संताजीच्या गाथ्यांत अभंग 215-16 असा आलेला आहे. गुरूकृपेचे म्हणून सर्व गाथ्यांतून चार अभंग एकत्रित केलेले आढळतात. (1) घालुनियां भार बैसलों निश्चिंतीं । (2) माझीया मनाचा जाणा हा निर्धार । हे अभंग संताजीचे गाथ्यांत 400-01 असे आहेत. तेव्हां हे चारी अभंग एका वेळीं झालेले नसावेत असें वाटतें. 216 व्या अभंगाचे शेवटीं 2 चा आकडा घालून तो विषय संताजीनीं संपला असें दाखविलें आहे. अन्तर्गत पुराव्यानें असें हि वाटतें कीं - घालुनीया भार । हा अभंग विठोबाशीं तक्रार केल्यासारखा दिसत आहे. त्यांत असें म्हटलें आहे कीं- देवा मी तुमच्यावर भार घालून निश्चिंत बसलों आहे याचें कारण असें कीं, पूर्वी संतांनीं मला माझा माथा हातानें कुर्वाळला व विठोबा दाखविला यास मला निरविलें व सांगितलें कीं चिंता करूं नयें तेव्हां घालुनीया भार । व माझीया मनाचा जाणा हा निर्धार । हे अभंग वेगळे आहेत. तेव्हां स्वप्नांतील दृष्टांताचे दोन्ही अभंग आपण जास्त बारकाईनें पाहूं.

संताजीमधील संत गुरुराये-हा पाठ गुरु हा संत कुळीचा राणा-या ज्ञानोबांच्या अभंगास ज्यास्त जुळता आहे. तेव्हां हा पाठ सत्य गुरुराये व सदगुरुराये या पाठांतरापेक्षां निःसंशय श्रेष्ठ आहे. तुकोबांस जो गुरु हवा होता तो नुसता ब्रह्मज्ञान करून देणारा नको होता तर तो विठोबाची प्रेमखूण सांगणारा हवा होता. तसा संत गुरु बाबाजी यानें- तुका म्हणे मज दावियेला तारु । कृपेचा सागर पांडुरंग । सद्गुरुयाये व सत्यगुरुराये असे पाठ आजवर कसे प्रचलीत झाले याचें मला आश्चर्य वाटतें. कारण पुढील अभंगांत गुरु व संत यांतील फरक तुकोबांनीं स्पष्ट मांडला आहे. (पं. 4406)

॥ गुरुचीया मुखें होईल ब्रह्मज्ञान । न कळे प्रेमु खुण वीठोबाची ॥

॥ वेदांतें वीचारा पुराणां ते पुसा । वीठोबाचा कैसा प्रेमभाव ॥

॥ तुका ह्मणे सांडा जाणीवेचा शीण । वीठोबाची खूण जाणती संत ॥

तेव्हां हाताने विठोबाकडे बोट दाखवून-विठोबावर भार घालून कसली हि काळजी करूं नको म्हणून सांगणारा नुसता गुरु नव्हता तर तो संत होता असें घालुनीया भार । या अभंगांत निरविलें संतीं । असें च म्हटलें आहे. तेव्हां सत्य गुरुराये किंवा सद्गुरुराये हे पाठ अस्सल पोथी केव्हां हि पुढें न आल्यामुळें कोणा तरी विद्वानाचे शोध आहेत. सत्य गुरुरायांनीं किंवा सद्गुरूरायांनी तुकोबांच्या पाठीस ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेचा शीण लावला असतां तो शीण हातानें विठोबा दाखवून संत गुरुरायानें चकविला व विठोबाची प्रेमखूण हातीं दिली. या पुढील गोष्ट पहावयाची तर ती ही कीं या संतांनीं आपण होऊन तुकोबांस गाठलें. आपण होऊन त्यांनीं रामकृष्ण हरि हा मंत्र दिला. आपलें नांव, आपली गुरु परंपरा सांगितली. भवसागर तरून जाण्यास चंद्रभागेच्या तीरीं कटीं कर धरून जी नाव उभी आहे तें उत्तम तारु आहे असें सांगितलें, म्हणजे ज्ञानोबारायांनीं म्हटल्याप्रमाणें दाविलें निधान वैकुंठीचें ।

सद्‍गुरु सारिखा सोयरा सज्जन । दावीलें निधान वैकुंठीचें ॥ 1 ॥

सद्‍गुरु माझा जीवीचा जिवलग । फेडीयेला पांग प्रपंचाचा ॥ 2 ॥

सद्‍गुरु हा अनाथ माऊली । कृपेची साउली केली मज ॥ 3 ॥

ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें । निवृत्तीनें दिधलें निज बिज ॥ 4 ॥

ज्ञानोबांनीं म्हटलें कीं निवृत्तिनाथांनीं निज बिज मला दिलें ही गोष्ट अवचित घडली. तसें च बाबाजी चैतन्यांनीं तुकोबांस आपण होऊन गांठलें, स्वतःहोऊन मंत्र दिला, विठोबा दाखविला, ही गोष्ट हि अवचित घडली. स्वचरित्रपर अभंगांत तुकोबा म्हणतात कीं :-

॥ मानीयेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरीला विश्वास द्दढ नामीं ॥

       गुरुपदेशानें एक गोष्ट झाली ती ही कीं आपण जो मार्ग आक्रमत आहोंत तो देवा घरीं रूजू आहे याची प्रतीति आली. गुरुपदेशाच्या अनुभवानें साक्षात्कारानें तुकोबांचा नामावरील विश्वास द्दढ झाला.

॥ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ॥ करावा विठ्ठल जीव भाव । 1336( शासकीय )

       यापुढें ती च गोष्ट गुरूपदेशानंतर ते सोसासोसानें करूं लागले असावेत व मनांत सारखी हाव भरून वाहात असावी व हा सोस एवढा वाढला असावा कीं तुका-वेडा झाला आहे, अशी समजूत प्रचलत झाली असावी. कारण ही गोष्ट तुकोबांनीं एका अभंगांत कवतुकानें सांगितली आहे.  त्या अभंगाचा मागचा पुढचा संबंध जुन्या अस्सल वह्या सांपडतील तेव्हां स्पष्ट होईल. तोपर्यंत खालील अभंगाच्या आधारें आपणास येवढें म्हणतां येईल कीं तुकोबांस नामाचा छंद एवढा जबरदस्त लागला कीं लोक हा वेडा आहे, बडबड फार करतो,  असें म्हणूं लागले. या अभंगावरून तुकोबांस त्यावेळीं गुरुज्ञानाशिवाय दुसरें कांहीं दिसत नव्हतें-सुचत नव्हतें-दुसरी कोणती हि गोष्ट ते ऐकावयास तयार नव्हते-विदवान् माणसांस तुका थुंकोन टाका-म्हणजे तुका हें नांव च वाचेनें उच्चारूं नका, माझें नांव सोडा असें सर्वत्रास सांगत होते. क्षो अभंग हा. (पं.2868)

 ॥ तुका वेडा अवीचार । करी बडबड फार ॥ 1 ॥ 2839( शासकीय )

॥धृ॥ नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥धृ॥

॥ धरी पांडुरंगीं भाव । आणीक नेणें दुजा देव ॥ 2 ॥

॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥ 3 ॥

॥ बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥ 4 ॥

॥ संग उपचारे कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥ 5 ॥

॥ कांहीं उपदेशीले नेणें । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥ 6 ॥

॥ केला बहुतीं फजीत । परी हें चि करी नित्य ॥ 7 ॥

॥ अहो पंडित जन । तुका टाकावा थुंकोन ॥ 8 ॥

       या अभंगांत रामकृष्ण हरि हा मंत्र आहे. गुरुज्ञानाचा उल्लेख आहे. संत गुरुरायानें कृपेचा सागर पांडुरंग म्हणून सांगितलें त्या गोष्टीचा उल्लेख आहे, व विठ्ठल विठ्ठल असा मनास छंद लागला होता असें हि म्हटलें आहे. तेव्हां हा अभंग गुरुपदेशानंतरच्या व देवदर्शनापूर्वींच्या स्थितीच्या वर्णनपर आहे. तुका वेडा अवीचार असें लोक म्हणत होते. त्याबद्दल तुकोबांस काय वाटत असावें हें खालील अभंगांत लोक वेडा कोणास म्हणतात. तें सांगतांना स्पष्ट झालें आहे. तो अभंग खालीलप्रमाणे :- (पं. 4350)

 ॥ कोटीजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हातां आलें हरिदास्य ॥ 1 ॥

॥ धृ ॥ रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचा मन भगर्वेतीं ॥ धृ ॥

॥ ऐसीया प्रेमळा म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडवीला ॥ 2 ॥

॥ एकवीस कळें जेणें उध्दरिली । हे तो न कळे खोली भाग्यमंदा ॥ 3 ॥

॥ तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे । भव भय पळे र्वेदीता चि ॥ 4 ॥

       वरील अभंगांतील पहिल्या दोन चरणांत जें शब्दचित्र रेखाटलें आहे त्यास तुकोबा प्रेमळ म्हणतात. एवढेंच नव्हें तर यानें संसार बुडविला म्हणून नांवें ठेवतात. तुकोबा म्हणतात अरे मी सर्व पूर्वजांचा उध्दार केला आहे हें या बुध्दीहीन जीवांस कळत नाहीं. नुसता मला नमस्कार केलात, नुसते माझे चरणरज, तुमचे अंगावर आले, तर तुमचे भव भय नाहींसें होईल. तुमचें भवभय पळेल. तेव्हां आपण त्यांची पायधुळी मिळावी-त्यांच चरणरज अंगावर यावेत म्हणून आस धरून राहूं या. वर उध्दृत केलेल्या अभंगावरून एवढी गोष्ट स्पष्ट होत आहे कीं, गुरुपदेशानंतर कांहीं दिवस तरी लोक तुका, वेडा, अविचारी, समजत होते व तुकोबा (पं. 4348)

 कोटीजन्म पुण्यसाधन साधीलें । तेणें हातां आलें हरीदास्य ॥

रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । काया वाचा मन भगर्वेतीं ॥

       लावून होते. अशा स्थितींत किती दिवस गेले हें कांहीं सध्यां सांगतां येत नाहीं. याबद्दल कोणी कांहीं शोध केला नाहीं. महिपतीबोवांनीं कांहीं लिहिलें नाहीं या अभंगाकडे त्यांचें लक्ष्य वेधलें नव्हतें तेव्हां याबद्दल कांहीं वाद हि नाहींत. पण अशा स्थितींत कांहीं दिवस गेल्यावर स्वचरित्रपर अभंगांत तुकोबा म्हणतातः-

यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरीले चीत्तीं विठोबाचें ॥

       तुकोबांस कवित्वस्फूर्ती स्वप्नांत दृष्टांत होऊन झालेली आहे. त्याबद्दलचा खालील अभंग स्पष्ट आहेः-(पं. 1320)

॥ नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥

॥ धृ ॥ सांगितलें काम करावें कवित्व । वाऊगें निमित्य बोलो नये ॥ धृ ॥

॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ।

॥ प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥

       हा अभंग संताजीबोवांच्या गाथ्यांत सांपडता तर त्याचा अर्थ करणें सोपें झालें असतें. असो, या अभंगाचा अर्थ असा कीं-स्वप्नांत-नामदेवांनीं मला जागें केलें. बरोबर पांडुरंगराय होते. नामदेवांनीं मला थापटोनि सावधान केलें व सांगितलें, यापुढें तुम्ही काम करावें, व्यर्थ बोलूं नये. काम जें करावयाचें तें कवित्व करावयाचें आहे. मी शतकोटी अभंग करीन म्हणून प्रतिज्ञा केली होती.  तें काम माझे हातून पुरें झालें नाहीं. तें काम पुरें व्हावें अशी सळ म्हणजे अभिमान विठ्ठलानें धरिला आहे. एवढें नामदेवरायांचें भाषण होतां च उरले शेवटी लावी तु कां ? हे शब्द पांडुरंगरायांनीं उच्चारिले असावेत व देवाच्या तोंडचा तुका हा शब्द आपलें नाम असें सदरहु भक्तांनीं मानलें असावें असें मला वाटतें. ज्ञानेश्वर महाराजांचें ज्ञानदेव हें नाम गुरूकृपेनें च साधलेलें आहे.

 विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु । पूर्णें पूर्ण भरीला घटु ।

हळू हळू बिंदु उदारु । वरुषला लिंगावरी तेणें तुष्टला श्रीगुरु ।

प्रसन्न निवृत्तीराजा ज्ञान देऊनी उदारु ॥ 1 ॥

या लागी ज्ञान-देव नाम गुरुकृपेनें पावलों ॥

ज्ञानेश्वर महाराजांस ज्ञान-देव असें नांव जसें गुरूकृपेनें प्राप्त झालें तशीच  निवृत्ती, सोपान, मुक्ताई हीं नांवें हि गुरुकृपेची आहेत. पांडुरंगरायाच्या तोंडची तुका हीं अक्षरें टोपण नांव-लाडकें नांव घेणें ही कांहीं कोणा हि अनन्य भक्तांच्या ठिकाणीं वावगी गोष्ट होणार नाहीं.

कोणत्या हि घराण्यांतील पुरुषांचीं व बायकांचीं नांवें- मागील बायका पुरुषांची पुनः पुनः येतात. मोरे यांच्या घराण्यांत पूर्वीचीं नांवें पाहावींत तर त्यांत तुकाराम असें नांव नाहीं. बोलोबा किंवा दामशेट यांच्या पूर्वीचीं नांवें-विश्वंभर-हरि-मुकुंद-विठ्ठल-पदाजी-शंकर-कान्हया अशी आहेत. या व्यक्तीच्या वडील भावाचें नांव सावजी म्हणजे शंकर असें ठेविलें होतें. ही व्यड़ती जन्मली त्यावेळीं बोलोबांचे वडील कान्हया हयात असावेत. त्यामुळें तें नांव ठेवितां येईना. तेव्हां या व्यक्तीचें नांव राम असें ठेविलेलें असावें. व या व्यड़तीनें त्यास तुका जोडून उत्तम नांव बनविलें. खुद्द देहूकरांच्या घरांत या व्यक्तीच्या पूर्वीचा कागद एक हि नाहीं. समकालीन कागद हि नाहींत. तेव्हां मला सुचलेला नवा विचार येथें प्रथमच मांडला आहे. तुकाराम असें नांव या व्यक्तीच्या वेळीं प्रचलीत होतें असें समकालीन पत्रव्यवहारांत आढळलें तर मी सुचविलेल्या नव्या कल्पनेस वाव होणार नाहीं. व तुकाराम असें या व्यक्तीचें प्रथम पासून नांव असेल हि. पण सरळ गोष्ट सांप्रदायिक अभिमानानें मनुष्य उलटी कशी सांगतो-याचा धडधडीत नमुना दास -विश्राम-धाम या रामदासी अगडबंब भारूडात पहावयास सांपडतो. त्यांत असें लिहिलें आहे कीं या व्यक्तीचें नांव पूर्वी तुका-तुकावा असें कांहीं तरी होतें. पण ही व्यक्ती समर्थ रामदास यांच्या भेटीस गेली तेव्हां समर्थ रामदासांनीं तुकोबांस तेराक्षरी (श्री राम जय राम जय जय राम) मंत्र देऊन सनाथ केलें व तुका याचे पुढें  राम हीं अक्षरें जोडिली. तुकोबांनीं केव्हां हि त्रयोदशाक्षरी मंत्र घेतला नाहीं. ते सज्जनगडावर गेले असले तरी सज्जनगड स्थापन होण्यापूर्वी, फार काय, पण नारायणाचा रामदास होण्यापूर्वी च तुकोबांस साक्षात्कार झाले होते. शिवाजी राजा त्यांचे कडे कितीतरी पूर्वी आला होता. त्याचे सैनिकांस प्रसाद म्हणून पाइकीचें अभंग झालेले होते. तेव्हां दास-विश्राम-धाम या भारूडाच्या अजब कल्पनेचा जेव्हां मी शोध करूं लागलो तेव्हां तुकाराम असें नांव जुन्या कागदांत आढळलें. तुकाराम या नांवाबद्दल दास-विश्राम-धाम कर्त्यांचे वेळीं मी वर सुचविली आहे अशा अर्थाची कांहीं दंतकथा प्रचलित असावी त्यास दास-विश्राम-धाम कर्त्यानें निराळें स्वरूप दिलें असावें असो.

नामदेवरायांनीं "माप टाक" असें म्हटल्यावर तेथें हो-ना असें कांहीं करावयाचें नव्हतें च. तशी हो ना करावयास जागा राहूं नये म्हणून नामदेवरायांनीं आधीं च सांगून ठेविलें कीं सळ धरीली विठ्ठलें । माझी बाकी फिटावी, प्रतिज्ञा फोल होऊ नये, अशी सळ म्हणजे आग्रह विठ्ठलानें धरिला आहे. इतर लोक सळ याचा अर्थ माप असा करितात. पण कवित्वाबद्दल काळजी नको. ती बाकी कशी फिटेल याबद्दल शंका नको. या सर्व गोष्टी ध्वनित करण्यासाठीं सळ या शब्दाचा अर्थ आग्रह-अभिमान असा घ्यावा, असें वाटतें. व तसा अर्थ जास्त च चांगला लागतो. सळ धरिली विठ्ठलें । एवढें च सांगून नामदेवराय थांबले नाहींत. तर त्यांनीं काय केलें असावें. हें सुचविणारा एक अभंग संताजीच्या गाथेंत द्याल ठाव तरी । या पूर्वी आलेला आहे; तेव्हां संताजीमध्यें द्याल ठाव तरी या अभंगापूर्वी आलेला अभंग नामदेवें केलें स्वन्पामाजी जागे या नंतर घ्यावा असें मला वाटतें. तो अभंग खालीलप्रमाणे  (संताजी 283)

॥ बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळऊनी ॥ 1 ॥

॥ धृ ॥ येकायेकीं केलों मिराशीचा धनी । कडीये वागवुनी भारखांदी ॥ धृ ॥

॥करूनीया पाहे डोळां अलंकार । ठेवा दावी थोर करुनीयां ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे नेदी गांजुं आणीकासी । उदार जीवासी आपलीया ॥ 3 ॥

3267( शासकीय )

       तेव्हां  " उरलें तें सेंवटीं लावी तुका " ?  हा जो प्रश्न विचारला, त्यास हो म्हणून उत्तर देतां यावें म्हणून नामदेवरायांनीं या व्यक्तीस (1) येकायेकीं केलों मीराशीचा धनी । (2) करूनीयां पाहे डोळा अलंकार (3) ठेवा दावी थोर करूनीयां व आपल्या जीवावर उदार होऊन मला कोणी गांजूं नये गांजणार नाहीं असें केलें. विठ्ठलाचें नाम विठ्ठलाचें प्रेम विठ्ठलाची भक्ति-या सर्वांतून उत्पन्न होणारें भक्तिप्रेमसुख ही नामदेवरायाची मिरासी. त्याचा धनी तुकोबांस-एकाएकीं केला. जसा एखादा मुलगा दत्तक घ्यावा व तो सर्व मिराशीचा एकाएकी धनी होतो  किंवा दत्तक घेणारा त्या मुलास करतो तसा, आपण जो थोर भक्तिप्रेमसुखाचा ठेवा, करून ठेविला होता तो दाखविला. करूनियां पाहे डोळा अलंकार । म्हणजे तुकोबांनीं म्हटल्याप्रमाणें-कृपा या केली संतजनीं । माझी अलंकारियेली वाणी । प्रीत ही लाविली कीर्तनीं । असा, करूनीयां पाहे डोळा अलंकार । या चरणाचा अर्थ करावा असें मला वाटतें. तेव्हां हा अभंग नामदेवरायांनीं सर्वआयुष्यभर आपली करवंडी (पोटाची खळगी) वाळवून जी भक्तिप्रेमसुखाची जोडी केली ती निमिषार्धांत तुकोबांस (दत्तक घ्यावा) तशी दिली. आपला मिराशीवरचा हक्क सोडून त्या गादीवर तुकोबांस बसविलें. पहिल्या अभंगांत नामदेवरायांनीं म्हटलें होतें कीं, तूं माप टाकूं लाग. तसें तुकोबा माप टाकूं लागले. तें खालील वचनानें.

॥ पांडुरंगा करूं प्रथम नमना । दुसरें चरण संतांचीया ॥ 4505 ( शासकीय )

॥ यांच्या कृपादानें कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरूदास तुका ॥

॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवुं चित्तासी आपुलीया ॥

॥ या मनासी लागो हरीनामाचा र्छेद । आवडी गोविंद गावयासी ॥

॥ सीण जाला मज संसार संभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥

॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥

महिपतीबोवा ताहराबादकरांनीं बालक्रीडा हा पहिला प्रयत्न व तो बाळबोध लिहिण्याचा सराव नव्हता, तेव्हां नवी वही घालून केला, असें पदरचें तिखटमीठ लावून, वर्णन केलें आहे. परंतु वरील नमन व बालक्रीडेचें नमन हीं दोन्हीं नमनें पाहून मला या ओव्या अगदीं पहिलें कवित्व असावें असे वाटतें. तेव्हां नामदेवरायांनीं या ओव्या पहिल्या करून घेतल्या असाव्यात. यापुढें बालक्रीडा झाली असावी व मग या भिजल्या वहींतील अभंग झाले असावेत. नामदेवरायांचे शंभर शंभर ओव्यांचे कांहीं अभंग आहेत. तसे पहिले दोन तुकोबांचे आहेत. त्यापुढें ही ओव्यांची संख्या कमी होत होत-बालक्रीडेच्या अखेरी आटोपशीर प्रमाणबध्द अभंग होऊ लागले व तेथून या वहीस सुरूवात आहे.

नामदेवरायांनीं एकाएकीं मिराशीचा धनी करण्याचे वेळीं काय क्रिया केली असेल ती त्यांची त्यास माहीत. पण तुकोबावर त्या गोष्टीचा परिणाम एवढा झाला कीं त्यांनीं अत्यंत विनयपूर्वक उत्तर दिलें (पं. 1321)

॥ द्याल ठाव तरी राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥ 1 ॥

॥ आवडीचा ठाव आलोसें ठाकून । आतां उदासीन न धरावें ॥ धृ ॥

॥ शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती । आधारें वीश्रांती पावईन ॥ 2 ॥

॥ नामदेवापायीं तुकया स्वन्पीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहीलासे ॥ 3 ॥

या अभंगाचा अर्थ स्पष्ट आहे व तो हा कीं तुकोबांनीं नामदेवरायांची बाकी आपल्या कृपेनें, आपण दिलेला प्रसाद पोटीं साठवून, फेडीन असें म्हटलें.

ओव्यांच्या तीन अभंगांची ठेवण, घडण, पहावी तर ओबडधोबड शब्द ओवीमध्यें कसे तरी बसविल्यासारखे वाटतात. शिवाय विषय हि तेवढा मुद्देसूद रीतीनें, सुटसुटीतपणानें, मांडलेला नसतो. शंभर-शंभर ओव्यांचे दोन अभंग होतांच तिसरा अभंग 31 ओव्यांचा होतो. बालक्रीडेत जास्तींत जास्त एका अभंगांत ओव्या 30/31 आहेत. व शेवटास अभंग लहान लहान आटोपशीर आहेत. ओव्यांच्या अभंगाचें नमन व बालक्रीडेचें नमन यांत फरक आहे. ओव्यांचे नमन समोरच्या व्यक्तीस नमन करावें तसें आहे. ओवीच्या अभंगांत आत्मचरित्रपर ओव्या ब-याच आहेत. बालक्रीडा ही पूर्वीच्या संतांचीं वचनें पाठ करून जें कृष्णचरित्र मनांत साठविलें होतें, त्याचें प्रतिबिंब आहे, असें समजावयास हरकत नाहीं.

       अशा त-हेनें नारायणाची जोडी झाल्यावर, आपणास सर्वतोपरी त्राहे, त्राहे, त्राहे-सोडवी अनंता अशी जी स्थिति झाली, त्यामुळें च पूर्ण निराशेनें हरिनाम मुखानें घेऊं लागलों, व तें अट्टाहासानें घेऊं लागलों-तेव्हां विठोबानें आपणास वाट दाखवीत दाखवीत- आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । या कामावर नेमलें-तेव्हां सहज च तुकोबांस म्हणावेसें वाटलें कीं:- (177)

॥ बरें जालें देवा नीघालें दीवाळें । बरी या दुहकाळें पीडा केली ॥ 1 ॥

॥ धृ ॥ अनुतापें तुझें राहीलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ धृ ॥

॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥ 2 ॥

॥ बरें जालें नाहीं धरीली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥ 3 ॥

॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेकरें बाईल उपेक्षीली ॥ 4 ॥

॥ तुका म्हणें बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण ॥ 5 ॥

       ही च  गोष्ट पुनः केव्हां तरी सांगण्याची वेळ आली तेव्हां ती गोड करून निराळया शब्दांत तुकोबांनीं सांगितलीः- (पं. 231)

अवघेची गोड जालें । मागीलीये भरी आले ॥ 1 ॥

॥धृ ॥ साह्य जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥ धृ ॥

॥ थडीये पावतां तो वाव । मागें वाहवतां ठाव ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे गेले । स्वप्नींचे जागें झालें ॥ 3 ॥

       मानीयेला स्वप्नी गुरुचा उपदेश । असें जें तुकोबांनीं म्हटलें आहे-त्याचें कारण असें कीं जें मनीं वसे-तें स्वप्नीं दिसे अशी त्या गोष्टींचा निजध्यास लागून आपली स्थिति झाली नाहीना ? असें साहजीक च मन साशंक झालें. पण स्वप्नांत जो उपदेश झाला होता त्याप्रमाणें वागू लागले.  तरी गुरुपदेशाच्या ज्या खुणा अनुभवांत यावयाच्या त्या खुणा त्यांस जेव्हां रोज स्पष्ट होऊ लागल्या व त्याचा कळस नामदेवराय व पांडुरंग यांच्या दर्शनानें झाला, तेव्हां म्हणाले-''मानीयेला'' स्वप्नीं गुरूचा उपदेश या गुरूपदेशाच्या खुणा नामदेवरायांनीं व ज्ञानेश्वरमाउलीनीं प्रगट केल्या आहेत.

       तुकोबारायास जो गुरूपदेश झाला व नामदेवराया समवेत श्रीपंढरीनाथाचें दर्शन झालें त्याचें वर्णन त्यांनीं पुढील प्रमाणें केलें आहे (181)

॥ मीच मज व्यालों । पोटाआपुलीया आलों ॥ 1 ॥

॥ धृ ॥ आतां पुरला नवस । नीरसोनी गेली आस ॥ धृ ॥

॥ आलों बारांबळी । गेलो मरोन ते काळीं ॥ 2 ॥

॥ दोही कडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥ 3 ॥

       तुकोबांनीं कवित्व करावें म्हणून नामदेवरायांनीं त्यांस मिराशीचे एकाएकी धनी केलें. संतांनीं म्हणजे नामदेवरायांनीं त्यांचे वाणीवर कवित्वाचा अलंकार चढविला. तो अलंकार ते हरिकिर्तनांत मिरवूं लागल्यावर तें कवित्व जीवंत झ-याचें होतें म्हणून चमकूं लागलें. देव व संत यांचें गुणगान भाट होऊन करावें, असें च तुकोबांस भक्तिसुखानें डवरल्यामुळें झालें असावें. तेव्हां त्या वेळचें त्यांनीं स्वतःचें वर्णन खालीलप्रमाणें केलें आहे. (पं. 3495)

॥ मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट ।

पडीयेली वाट । येची चाली स्वभावें ॥ 1 ॥

॥ धृ ॥ बोले देवाचे पवाडे । नित्य नवेची रोकडे ।

ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनी ॥ धृ ॥

॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार ।

॥ करावें उत्तर । सेवा रुजू करुनी ॥ 2 ॥

॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयकरें ।

॥ अंगीच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥ 3 ॥

       माझें मन च देवाचे भाट होऊन त्याची मोठयानें व सतत कीर्ति गाऊं लागलें. रोज नवा देवाच्या प्रत्यक्षतेचा पवाडा स्वतःस आवडेल असा करावा, प्रत्यक्ष समोर उभा राहून म्हणून दाखवावा  अशी माझी नित्याची चालीरहणी होऊन बसली. देवाच्या प्रत्यक्ष समोर उभे राहिल्यावर मागचा पुढचा विचार करावा लागत नसे.  देवांनीं हि संतुष्ट होऊन आपल्या देकाराचा पूर वाहवावा व त्यामुळें स्वतःच्या अनुभवानें तुका स्वामीस शृंगारतो आहे. तेव्हां कवित्व कसें स्फुरें याचें हे स्पष्टीकरण आहे. हा  जो स्वामीच्या कृपेचा, देकाराचा, पूर वाही त्याचें वर्णन तुकोबा खालीलप्रमाणें करितातः- (संताजी 1073)

॥ पुर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ 1 ॥

॥ धृ ॥ बांधो वीठल सांगडी । पोहोन जाऊं पैलथडी ।

॥ अवघे जन गडी । घाला उडी भाईं नो ॥ धृ ॥

॥ हें तो नाहीं सर्वकाळ । अमुप आनंदाचें जळ ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे बहुते पुण्यें । बोध आला पंथे येणें ॥ 3 ॥

       हा महापुण्यानें जो ओघ तुकोबांवर आला होता, तो आनंदाच्या जळाचा ओघ अंगावर घेऊन ''डौरलों भक्तीसुखें'' असें होऊन तुकोबा विठोबास म्हणत आहेत कीं, (पं. 3594)

॥ पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कार्यी देहाकडे नांवलोकीं ॥ 1 ॥

॥ धृ ॥ म्हणवूनी मागे कंठीचा सौरस । पावतील नास वीघ्ने पुढें ॥ धृ ॥

॥ कृपेच्या कटाक्षें न भे काळीकाळा । येतां येत बळाशक्ती पुढें ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । जगा होईल सोपें नाम तुझें ॥ 3 ॥

 

॥ धरील्या देहाचे सार्थक करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ 1 ॥

॥ धृ ॥ लावीन निशाण जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ धृ ॥

॥ नामाचीया नौका करीन सहस्त्रवरी । नावाडा श्रीहरी पांडुरंग ॥ 2 ॥

॥ भाविक हो येथें धरारे आवांकां । म्हणे दास तुका शुध्द याती ॥ 3 ॥

   अवांका हा शब्द जुना व सुंदर आहे. ही गोष्ट तुमच्या आवांक्यांतील आहे म्हणजे वैकुंठास जावयास निशाण लावणें तुमच्या हातचें आहे. तुम्हांला शक्य आहे व तें कसें शक्य आहे तें सांगतात कीं, तुम्ही मी दाखवितों त्या वाटेनें चला. (पं. 3739)

॥ करणे न करणें वारलें जेथें । जातो तेणें पंथें संतसंगें ॥ 1 ॥

॥ धृ ॥ संतीं हें पहीले लावीलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जे नाम ॥ धृ ॥

॥ तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । भरंवशानें भेटे पांडुरंग ॥

      पूर्वीच्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटांत पुंडलिकाचे समोर भक्तिप्रेमसुखाचें जें निशाण रोविलें होतें त्या पूर्वींच्या संतांच्या बोध, प्रेमाच्या निरनिराळया खुणा, जशा तुकोबांस प्रतीत होत, तसतसे तुकोबा त्या संतांच्या नामाचा व पंढरीनाथाच्या नामाचा कृतज्ञतेनें गजर करीत.

॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । भरवंशाने भेटे पांडुरंग ।

       असें सांगत. एवढें करून वर तुकोबा जेव्हां म्हणूं लागले कीं भरंवशानें भेटे पांडुरंग । मला देव भेटला आहे. व तो मी योगयाग करून ज्यांना भेटला नाहीं, तपतीर्थाटण करून ज्यांना आढळला नाहीं, दानधर्म हीं ज्यांचीं फुकट गेलीं आहेत, अनंत वाचाळांची बरळ जेथें फुकट गेलीं आहे, अशा ज्यांनीं ज्यांनीं म्हणून देव पाहिला नाहीं, त्या प्रत्येकास नामसंकीर्तनानें प्राप्त करून देईन कारण भगवंत जाणीव व नेणीव ओळखीत नाहीं. फक्त नुसतें एक नाम घे; हरीला तुझी करूणा येईल व तुला जवळ कसा करावयाचा याचा उपाय त्याचा तो च योजील. संतांचे संगतींत श्रीपती कसा आकळावा हें तुम्हांस मी शिकवितों, देव त्वरित प्रसन्न कसा होतो हें तुम्हांस सांगतों. तुम्ही मला गुरु करा असें मी मुळींच म्हणत नाहीं.  पण माझ्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट सांगतो. देव हा कांहीं एकांतांत कान फुंकून, चोरून गुपचूप दाखविण्याचा विषय नव्हे. ही जादु नव्हे, टाणाटोणा नव्हे, माझें जीवनवृत्त जरा विश्वास ठेवून ऐका तर खरें.

॥ नेणें फुंकूं कान । नाहीं येकांताचें ग्नान ॥ (2774)

॥ तुम्ही आईका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ धृ ॥

॥ नाहीं देखीला तो डोळा । देव दाखउं सकळा ॥

॥ चींतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखे ॥ 3 ॥

       अशा विश्वासानें-धैर्यानें-स्वानुभवानें-तुकोबा जेव्हां (सं.402) देव घ्या कोणी । देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी । म्हणून प्रत्येकाच्या पाठीस लागले तेव्हां देव नलगे । देव नलगें । साठवणेचे रुधले जागे । प्रत्येकजण पूर्व संस्कारानें जखडलेला होता तेव्हां तो देव नलगे । देव नलगे । म्हणून म्हणे. पण त्यांत कांहीं नव्या रक्ताचे होते, त्यांनीं म्हटलें कीं, तुकोबांच्या जिवंत वाणीचा प्रभाव काय आहे हें एकवार पहावें तर खरें. देवाच्या घरीं उपाध्यासारखा, गुरुसारखा, बडव्यासारखा, वकील नको; आपण सरळ जाऊन त्याच्या पायीं मिठी घालावी, त्याच्या नामाचा उच्चार अट्टाहासानें करावा; म्हणजे त्याचा तो च सरळ रस्ता दाखवील, असें म्हणून तुकोबा कीर्तनांत, भजनांत, रोज नवा रंग खेळूं लागले. तेव्हां तें वक्तृत्व जिवंतपणानें प्रभावी होऊ लागलें. एकास अनुभव आला. सुख झालें, कीं, तें त्यानें दुस-यास सांगावें असें होऊन, (पं. 2664)

॥ चंदन तो चंदनपणें । सहजगुणें संपन्न ॥ 1 ॥

॥ धृ ॥ वेधलीया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥

       अशी नवीं माणसें सन्मुख होऊं लागलीं. तसेंच (पं. 289/90)

नलगे चंदना सांगावा परीमळ । वनस्पती मेळ हाकारुनी ॥ 1 ॥

॥ धृ ॥ अन्तरीचें धांवें स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ धृ ॥

॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हणु ॥ 3 ॥

॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ 4 ॥

*                 *              *

॥चंदनाचे हात पाय हि चंदन । परीसा नाहीं हीन कोणी अंग ॥

॥ धृ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साखर अवघी गोड ॥ धृ ॥

*                 *              *

     (सं. 201)

॥ नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावीते मनीं शुध्द होतां ॥ 1 ॥

॥ धृ ॥ वा-याहातीं माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ धृ ॥

प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तवं जन सकळ साक्षी ॥

       नारायणानें जशी कवित्व स्फूर्ति दिली, तसाच नारायण स्वतः तुकोबांची कीर्ति पसरविण्यास कारण झाला. त्यानें तुकोबांच्या कवित्वाची कीर्ति, संतपणाची साक्ष, वा-याहातीं पसरविली. त्यासाठीं त्यांना कोणा हि वर्तमानपत्राची आराधना करावी लागली नाहीं. अशी सर्वत्र कीर्ति पसरत होती. पण जो आपला वाणी वदवितो आहे तो च ही कीर्ति पसरवीत आहे या विचारानें तुकोबा करशील काय पाहेन तें । असें विठोबास म्हणत स्वस्थ होते. ते म्हणतात, (पं. 695)

॥ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ 1 ॥

॥ धृ ॥ नेलें वा-या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ धृ ॥

कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदवीता ॥ 2 ॥

तुका म्हणे या निश्चये । माझें निरसलें भय ॥ 3 ॥

       तुकोबांची अशी सर्वत्र वा-याहातीं कीर्ति पसरूं लागली, तेव्हां देव हा पोथ्या पुराणांत, श्रुतींत, राउळांत, बडव्यांच्या, उपाध्यायांच्या, शास्त्रीपंडितांच्या सोवळया ओवळया आचारांत, पापपुण्याच्या विचारांत, गुरफटलेला आहे असें समजणा-या प्रत्येक व्यक्तीचें धाबें दणाणलें असावें. त्यांतल्या त्यांत पुराण सांगणें, हव्यकव्य करणें, पूजा करणें, यज्ञयाग करून पोट भरणें, शास्त्राधार काढून देणें, या वृत्तींवर ज्यांचें पोट अवलंबून होतें अशांना तर तुकोबा हा सनातन धर्मास, चातुरर््वण्यास शत्रू च वाटला असावा. तेव्हां यापैकीं एकानें - रामेश्वर भट वाघोलीकर यानें - ग्रामाधिका-यांकडे तक्रार केली कीं यानें धर्माचा उच्छेद मांडला आहे. याच्या प्राकृत कवित्वांत श्रुतींचा अर्थ सांगितलेला असतो. या वेळचें वर्णन महिपतीबोवांनीं केलें आहे तें असें.

रामेश्वर भट

॥ म्हणे तुका शुद्र जातीचा निश्चीत । आणि श्रुती मथीतार्थ बोलतो ॥

॥ हरिकिर्तन करून तेणे । भावीक लोकांसी घातलें मोहन ॥

॥ त्यासी नमस्कार करिती ब्राम्हण । हें आम्हां कारणें अश्लाघ्य ॥

॥ सकळ धर्म बुडउनी निश्चित । नाम महिमा बोले अभ्दुत ॥

॥ जनांत स्थापिला भक्तिपंथ । पाखंड मत हें दिसे ॥

॥ ऐसें सांगतां रामेश्वरीं । चित्तीं क्षोभला ग्रामाधिकारी ॥

॥ मग देहूच्या पाटलास ताकीद करी । कीं तूकयासी बाहेरी दवडाया ॥

॥ चिठी देखोनि ग्रामाधिकारी । दाखविते झाले तुकयासी ॥

       रामेश्वर भट हा दशग्रंथी ब्राम्हण असल्याचा लौकिक होता. त्याची वृत्ति जोशीपणाची, पुराणिकाची अशी कांहीं तरी असावी. तेव्हां पुराणास हव्यकव्यास ही आड येणारी भानगड मिटवा म्हणून त्यानें त्या वेळच्या मोकाशास कळविणें अगदीं साहजिक आहे. त्यानें पाटलास या धर्माच्या विरुध्द असलेल्या गोष्टीची व्यवस्था लावा म्हणून ताकीद पत्र पाठविणें हें हि रितसर होतें. तसें पत्र देहूच्या पाटलास गेल्यावर राजाज्ञा प्रमाण म्हणून त्यानें तें तुकोबांस दाखवून तुमचीं कीर्तनें थांबवा, तुमचें कवित्व बंद करा, असें म्हणणें हें त्याचें काम च होते व तें त्यानें बजावलें. पण तुकोबा कीर्तनें करीत, कवित्व करीत हें कांहीं स्वतःच्या बुध्दीनें करीत नव्हते. त्यांचा बोलविता धनी वेगळाच होता. तेव्हां पाटलानें ताकीदपत्र दाखवितां च तुकोबांस वाटलें असावें कीं मोकाशास, कमाविसदारास, दिवाणांत जाऊन भेटावे व त्यांची समजूत घालावी. मी जें कवित्व करीत आहे तें विठोबाच्या आज्ञेनें करीत आहे. तेव्हां ती गोष्ट पदरीची होईल कशी ?  तेव्हां पुण्यास कमाविसदाराकडे किंवा मोकाश्यांकडे जाण्यापूर्वीं त्यांनीं खालील अभंग केला. (पं. 676)

॥ काय खावें आतां । कोणीकडे जावे । गावांत राहावें । कोण्या बळे ॥

॥ धृ ॥ कोपला पाटील । गावचे हे लोक । आतां घाली भीक । कोण मज ॥ धृ ॥

आतां येणें चवी । सांडीली म्हणती । निवाडा करिती । दिवाणांत ॥ 2 ॥

भल्या लोकीं यास । सांगितलीं मात । केला माझाघात । दूर्बळाचा ॥ 3 ॥

तुका म्हणे याचा । संग नव्हे भला । शोधींत विठला । जाऊं आतां ॥ 4 ॥

       हे ताकीद पत्र आल्यावर गांवच्या लोकांनीं-पंचांनीं-कीं ज्यांनी तीं कीर्तने ऐकिलीं असतील आशा कोणी हि किंवा त्या गांवाच्या पाटलानें असें मनांत आणलें नाहीं कीं आपण जाऊन दिवाणांत सांगावें कीं तुकोबा विठुचें सप्रेम भजन करतात. विठु कनवाळु, कृपाळु कसा आहे, किती आहे. तो केव्हां हि जीवास सोडून नसतो, असें तुकोबा सांगतात तें आम्हांस पटतें. असो, आपण कीर्तन करीत आहोंत. तें जर विठ्ठलाच्या आज्ञेनें करीत आहोंत तर मग तो अधर्म होईल कसा? तेव्हां मी म्हणतों त्याप्रमाणें ते विठोबाचे शब्द आहेत, ते शब्द ख-या अवस्थेचे आहेत, असें पाहून कांहीं ब्राम्हणांनीं ते शब्द खरोखर च विठुचे आहेत असें पटून ज्या मुखांतून ते शब्द बाहेर आले त्या देहास वंदन केलें, तर तो अधर्म होतो-असें म्हणणारा हा दुसरा देव कोणचा ? तेव्हां चला आपण मला बोलविणारा देव खरा-कीं मी कीर्तन करीत आहे म्हणून अधर्म होत आहे असें म्हणणारा देव खरा. त्याचा निर्णय करूं या. असें म्हणून तुकोबा ताकीदपत्रानंतर जे 4/2 लोक त्यांस चिकटून राहिले असतील-त्यास म्हणाले असतील. शोधीत विठ्ठला जाऊं आता --

       तुकोबा व त्यांचे अनुयायी हे कमाविसदाराकडे किंवा मोकाशाकडे गेले असतील. त्यांस तुकोबांनीं आपला सविस्तर वृत्तांत सांगितला असेल. त्यांनीं सरळ सांगितलें असेल कीं - आम्हांस एवढया खोलांत शिरतां येत नाहीं. शिरण्याचें कारण नाहीं. आमच्याकडे जी फिर्याद-अर्जी आली आहे ती ही. रामेश्वर भट यांचा अधिकार हा असा आहे. तेव्हां तुमचें म्हणणें त्यांस पटवा व आमच्याकडे तुमचें म्हणणें बरोबर आहे-तुम्ही अधर्म करीत नाहीं, असें त्यांचें पत्र आणा म्हणजे मग आम्ही ताकीदपत्र फिराऊन देऊं. तेव्हां तुकोबा रामेश्वर भटाकडे गेले असावेत. व त्यांनीं आपला सविस्तर वृत्तांत रामेश्वर भटास सांगितला असावा. रामेश्वर भटानें तुझ्या कवनांत श्रुतीचा मथितार्थ उमटतो. श्रुति उच्चारण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांस तेवढा शास्त्रतः आहे. शुद्रास तो अधिकार नाहीं. असें म्हटलें असावें. तों तुकोबा म्हणाले असणार च कीं अहो, मी कधीं हि श्रुती ऐकिल्या नाहींत, मी वेदाचें अक्षर पाहिलें नाहीं, दुरून सुध्दां ऐकलें नाहीं. एवढयानें रामेश्वर भटास असा विचार सुचावयास हवा होता कीं,खुद्द देहू गांवांत ब्राम्हण आहेत किती, तेथें श्रुतींचा वेदघोष कोठें तरी होतो कां ? तसें जर नाहीं तर मग या स्वयंभू श्रुती तर नसतील ना ? पण सत्तेपुढें कधीं शहाणपण उपयोगी पडलें आहे का ? तुकोबांनीं परोपरीनें सांगितलें असेल कीं. (पं. 1007)

॥ करीतो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ 1 ॥

॥ धृ ॥ माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वभंर बोलवितो ॥ धृ ॥

॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥ 2 ॥

॥ निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हे स्वामी सत्ता ॥ 3 ॥

॥ तुका म्हणे आहे पाइक चि खरा । वागवितो मुद्रा नामाची हें ॥ 4 ॥

       तुम्ही रागावला आहांत-पण मी तुम्हांस खरंच सांगतों कीं, तुम्ही या कवनांत श्रुतींचा मथितार्थ उमटतो म्हणून म्हणता पण मी काय बोलतों किंवा लिहितों-हें मी लिहीपर्यंत माझें मला च माहीत नसतें. (पं. 1790)

॥ नेणें अर्थ कांहीं नव्हती माझें बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥ 1 ॥

॥ धृ ॥ नव्हती माझे बोल पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनियां ॥ धृ ॥

॥ मज मूढा शक्ती कैंचा हा विचार । निममादिका पार बोलावया ॥ 2 ॥

॥ रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी । बोबडया उत्तरी हें चि ध्यान ॥ 3 ॥

॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥ 4 ॥

       या अभंगावरून तुकोबांनीं आपणावर प्रथम गुरूकृपा कशी झाली. त्या नंतर साक्षात्कार होऊन आपण पंढरीनाथाच्या आज्ञेनें कवित्व कसें करूं लागलों व त्यांत नामदेवांनीं दिलेलें धन आपण कसें वापरतों-असें आळवीन, आळवून, रामेश्वर भटास सांगितलें असेल. ( पं. 2014 )

॥ बोलीलो जैसें बोलवीलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥ 1 ॥

॥ धृ ॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ धृ ॥

॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥ 2 ॥

॥ तुका म्हणे घडे अपराध नेणता । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥ 3 ॥

       श्रुतींचा मथितार्थ कवित्वांत नकळत कसा उमटतो याची प्रतिती पाहण्यासाठीं रामेश्वर भटानें एक कीर्तन आपल्यासमोर करावयास सांगितलें असावें. तेव्हां तुकोबांनीं रामेश्वर भटास दंडवत घालून महिपतीबोवांनीं म्हटल्याप्रमाणें-

॥ सप्रेम नामाच्या गजरें जाण । ते स्थळीं मांडीलें हरिकीर्तन ॥

॥ कवीत्व बोले प्रसाद वचन । संकोच मनीं न धरीतां ॥

       तेव्हां आपणास जें कवित्व स्फुरतें तें कोठून स्फुरतें, कोण स्फुरवितो, हें सांगण्यासाठीं तुकोबांनीं वक्तृत्वाचा पाऊस पाडला असावा व विश्वाचें बीज जो ऊँकार तो कोणास व केव्हां स्फुरतो, याचें तुकोबांनीं भावारूढ अवस्थेंत अत्यंत सुरस वर्णन करून जेथून ऊँकार ध्वनि उत्पन्न होतो, त्याच ठिकाणीं म्हणजे क्षीरसागर नारायण यास आपण अध्यात्मविद्या प्रगट करावी असें मनांत येऊन त्यानें तें ज्ञान भक्तांच्या ध्यानांत प्रगट केलें, त्याचें नांव ऊँकारः तेंच सर्व ब्रह्मज्ञानाचें गूज होय-ते जेव्हां कांहीं भक्तांच्या अवचित कानीं पडतें. तेव्हां श्रुती या संज्ञेस प्राप्त झालें, त्याच नारायणास विवेक, वैराग्य, निजशांति याची साक्षात् मूर्ति म्हणजे हा पुंडलीक पुढें अनंत सुखाचा हारिख म्हणून पंढरीस उगवला. यानंतर सुचलीं तीं सर्व विशेषणेें लावून-देवा तूं अनंत अवतार धरणारा आहेस मग याच वेळीं तूं असा मुका कां असें त्या विठ्ठलास विचारलें आहे. भोळया भक्तांस तुझ्याशिवाय-दुसरा कोणीहि सौख्य देण्यास समर्थ नाहीं. तूं माझ्या मनाचा चित्तचालक आहेस. सर्व कांहीं दुस-यास करावयास लावून स्वतः अकर्ता राहतोस. देवा तूं केव्हां हि वर्णाश्रम धर्ममर्यादा पाळीत नाहींस मग याच वेळीं तूं मुका कां ?  या भूदेवास तूं साक्ष कां पटवीत नाहींस ? तुझा लौकिक तूं सकळ दुःखनिवारिता आहेस म्हणून आहे. मग तूं आतां माझ्यावर कां कोपलास ? देवा, तूं उलट सुलट अशा वाटेल त्या गोष्टी करवितोस व त्या श्रेष्ठ म्हणून संपादून हि नेतोस, देवाची वाणी हें वेदवाक्य म्हणून किंवा उपनिषद म्हणून तूं प्रगट केलीस तीच गोष्ट मी कांहींहि  वेदपठण, शास्त्राध्ययन न करितां माझ्या तोंडून उच्चारवितोस तेव्हां तो अधर्म होतो. देववाक्य हें वेदवाणीनें, ब्राह्मणाच्या मुखानें च बाहेर पडलें पाहिजे असा तूं च नियम घालून देतोस व माझ्या तोंडून तसे खुणेचे शब्द उच्चारवून ते नियम तूं च मोडतोस. तेव्हां हें तुझें विराट स्वरूप देववाक्य हें वेदांत च प्रगट झालें पाहिजे असें म्हणणा-या या भोळया भक्तास कळत नाहीं. त्याला तूं तुझ्या विराट स्वरूपांत हा काय खेळ करून आहेस हें कळत नाहीं तेव्हां

॥ सगुण रूप धरूनि त्यासी । लावि भजनासि तुका म्हणे ॥

       अशा अर्थाचे अभंग (पं. 672-3-4-5) करून तुकोबांनीं रामेश्वर भट हा भजन करूं लागला असें पुढें होणा-या गोष्टींचें चित्र मनापुढें आणून आळविलें खरें. पण देव प्रगट होणार होता, रामेश्वर भटास साक्ष पटविणार होता, पण त्यास थोडा अवकाश होता. तें विराट स्वरूप स्वतःस भारी च तुकोबांच्या इच्छेप्रमाणें बांधून घेणार होतें त्या विराट स्वरूपास आणखी थोडा ज्यास्त खेळ खेळायचा होता; त्या विराट स्वरूपानें कांहीं हि खूण दाखविली नाहीं. तेव्हां तुकोबांस रामेश्वर भट म्हणेल तें मान्य करणें प्राप्त होतें. रामेश्वर भट म्हणाले असावेत कीं, बा, तुझें हें कवित्व लबाडी लाचाडीचें नाहीं हें खरें, तुझें माझें कांहीं वाकडें नाहीं, पण तुझ्या या कवित्वांत वेदवाणी प्रगट होते यास मीं काय करावें? हा धडधडीत अधर्म आहे. शूद्राचे तोंडून वेदवाक्य देववाक्य बाहेर पडणें ही गोष्ट केव्हां हि शास्त्रविरूध्द आहे. तेव्हां तू असें कर-कीं यापुढें कवित्व करूं नको. हें कांहीं तरी कर्णपिशाच्च आहे म्हण, तुला कांहीं भूतबाधा झाली आहे खास. तेव्हां यापुढें कवित्व करणार नाहीं, असें तुला कबूल असेल तर माझें कांहीं म्हणणें नाहीं. मी तसें कमाविसदारास पत्र लिहून देईन. येवढें बोलणें झाल्यावर तुकोबांनीं विचारलें कीं पुढील कवित्वा बद्दल तुमची आज्ञा प्रमाण-पण आजवर जें कवित्व केलें आहे त्याचें काय करूं ? तेव्हां हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त ब्राम्हण दुसरें काय सांगणार त्यानें सांगितलें कीं ते कवित्व बुडवून टाक तुकोबांनीं हो म्हटलें. अशा त-हेंनें रूढीनें स्फुर्तीवर पहिल्यानें जय मिळविला. बहुधा या अर्थाचें पत्र कमाविसदारास रामेश्वर भटानें लिहून दिलें असावें. तें पत्र घेऊन तुकोबांनीं कबूल केलेल्या अटी लक्ष्यांत घेऊन कमाविसदारानें ताकीदपत्र परत घेतलें असावें. तुकोबा देहूस परत गेले. व कबूल केल्याप्रमाणें त्यांनीं केलेलें  कवित्व खालीवर दगड बांधून इंद्रायणींत बुडविलें. लोक काय बोलूनचालून दुतोंडी आहेत. त्यांनीं कवित्वाची हि वाहवा केली. पुढें राजसत्ता त्याविरूध्द आहे असें पाहतां च कवित्व पाखांड आहे म्हणून म्हणण्यास हि ते च लोक तयार होते बरं कवित्व बुडविलें तेव्हां या च मंडळींनीं तुकोबांची हुर्यो केली असेल व पुढें जीं कीर्तनें ऐकू येत होतीं, आनंद भोगावयास सापडे तो मिळेना, पुनः भेटेना. तेव्हां ती च  मंडळी वरवर हळहळण्याचा आव आणून म्हणूं लागली कीं तुम्ही पूर्वीं आपल्या वाटयाचीं खतें पत्रें बुडवून संसार आटोपलात, आतां कवित्व बुडवून, परमार्थ बुडवून, स्वस्थ झालांत, तेव्हां आतां जगलांत तरी कशास ? लोक काय बोलून चालून बेजबाबदार असतात, त्यांना काय माहीत कीं हें वाक्य या माणसाच्या मनास किती टोचेल वर्मी बाण लागावा तसे हे शब्द तुकोबांच्या हृदयास काटयासारखे टोचूं लागले. खरं च, संसार बुडविला व परमार्थाचें फळ जें हें कवित्व तें हि बुडविलें, पुढें कवित्व करणार नाहीं, हें हि कबूल केलें, तेव्हां खरोखर च यापुढें जगून तरी काय करावयाचें असा विचार त्यांचे मनांत आला. तेव्हां कवित्वाबरोबर च आपण हि स्वतःस बुडवून घ्यावें तर ती आत्महत्या होईल. हा विचार आड आला. तेव्हां विठुरायाचें मनोगत काय आहें ? त्यास हें कवित्व हवें आहे का नको ? याचा निर्णय करून घ्यावा असें म्हणून त्यांनीं देवापुढें जें वृंदावन  होतें त्या शिळेवर बसून वा निजून देवाचा धावा, देवाचें ध्यान, देवाचें अखंड नामस्मरण सुरू केलें. हा निर्धार वह्या बुडविल्यावर पांचव्या दिवशीं झाला. अशा स्थितींत असतांना तुकोबांस स्फुरलेले अभंग (वीस) प्रसिध्द आहेत. परंतु हे अभंग नंतर केव्हां तरी लिहून ठेविलेले असावेत. कारण कवित्व करणार नाहीं असें तुकोबांनीं कबूल केलें होतें. परंतु आपल्या जीवनयात्रेंतील ही मुख्य गोष्ट त्यांनीं पुढें नमूद करून ठेविली आहे. त्यांत त्यावेळीं मनांत घोळत असलेल्या विचारांचें शब्दचित्र (पं 2222 - 2240 व 2491) या वीस अभंगांत गंथित केलें आहे.

       मनांत विचार आणून व देवास आळवीत तुकोबा-अन्नपाणी वर्ज करून शिळेवर पडून दिवसा पाठीमागून दिवस कंठीत होते. तों रामेश्वर भटास स्वल्प श्रमानें मिळालेल्या मोठया जयानें हुरूप चढून ज्या आळंदीच्या अनुयायांनीं तुकोबांच्या कवित्वाचा निषेध केला होता, त्या आपल्या अनुयायांस व साथीदारांस झालेलें वृत्त सांगण्यास रामेश्वर भट हे वाघोलीहून आळंदीस यावयास निघाले. वाटेंत पुण्याजवळ एका चांगल्या तलावांत उत्तम पाणी आहे असें पाहून ते त्या तलावांत स्नानास उतरले. तों तलाव अनगडशा फकीराचा होता. त्याला या ब्राह्मणानें आपलें पाणी बाटवलें याचा आला राग. त्यानें रामेश्वर भटास शाप दिला कीं तूं ज्या शीतळ पाण्याच्या लोभानें या तलावांत शिरलास त्या पाण्यांतून बाहेर येतांच तुझ्या अंगाचा दाह होईल. तसा रामेश्वर भटास अनुभव आला. त्यानें ओलीं वस्त्रें अंगावर घेऊन आळंदीची वाट धरली. आळंदीस अजानुवृक्षाखालीं बसून अंगावर ओल्या वस्त्रांच्या घडया घेऊन अनुष्ठान आरंभिलें. त्यास कांही दिवसांनी स्वप्नांत ज्ञानेश्वर महाराजांनीं सांगितलें की

॥ तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर । कां जे अवतार नामयाचा ॥

॥ त्याची तुज कांहीं घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥

॥ आतां येक करी सांगेन तें तुला । शरणं जाई त्याला निश्चयेसीं ॥

॥ दर्शनें चि तुझ्या दोषा पंरिहार । होय तो विचार सांगितला ॥

       असा स्वप्नांत दृष्टांत झाला तेव्हां रामेश्वर भटानें आपले शिष्य देहूस तुकोबांस हें वृत्त सांगण्यास पाठविले. शिष्यांनीं हे वृत्त तुकोबास सांगितल्यावर तुकोबांनीं खालील अभंग शिष्यांजवळ लिहून दिला. (पं. 1751)

॥ चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हि न खाती सर्प तया ॥ 1 ॥

॥धृ॥ विष ते अमृत अघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृ॥

॥ दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नी ज्वाळा ॥ 2 ॥

॥ आवडेल जीवा जीवाचीये परी । सकळां अंतरी एकभाव ॥ 3 ॥

॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणीजेते येणें अनुभवें ॥ 4 ॥

       तेव्हां ज्या रामेश्वर भटाच्या आज्ञेने कवित्त्व करणार नाहीं म्हणून तुकोबांनीं कबूल केलें होतें त्याच्या च अंगास अग्नीज्वाळा होत होत्या त्या निवारण व्हाव्यात म्हणून तुकोबांनीं पहिला अभंग केला. तो अभंग घेऊन शिष्य आळंदीस गेले. तो अभंग रामेश्वर भटानें वाचतां च त्याचा दाह शमला. हा स्पष्ट साक्षात्कार स्वतःच्या अनुभवाचा साक्षात्कार पाहून, रामेश्वर भटाची वृत्ति पालटली. तुकोबांचें चित्त शुध्द होतें. तेव्हां रामेश्वर भट हा त्यांचा जो शत्रु होता तो भक्त झाला. रामेश्वर भटानें तुकोबांवर वार केला होता. ती च गोष्ट आघाता सारखी न होतां तुकोबांच्या नारायणाची कृपा झाली व त्यांस श्रीहरि  बाळवेश घेऊन, सगुण साकार भेटला. त्या नारायणानें तुझें कवित्व शाबूत जाहे. नदीवर तरंगत आहें काढ जा. असें सांगितलें. त्या पूर्वींच तसें स्वप्न इतर भक्तगणांस पडलें. त्यांनीं नदीवर जाऊन वह्या तरंगत आहेत असें पाहिलें, त्या पाण्यांत उतरून बाहेर काढल्या व तुकोबांचे पुढें ठेविल्या. हें शुभवर्तमान तुकोबांनीं 7 अभंगांत सांगितलें आहे. (पं. 2241-47) ते अभंग एवढे स्पष्ट आहेत कीं ते मुळांत च वाचणें ज्यास्त सोईचें होईल. तूं माउलीहुनी मवाळ । या अभंगांत देवाचें स्वरूप तुकोबांस कसें भेटलें तें त्यांनीं शब्दांत आणलें आहे.

 तूं माउलीहून मयाळ । चंद्राहुनी शीतळ । पाणीयाहुनी पातळ । कल्लोळ प्रेमाचा ॥

एवढे सुंदर वर्णन आपण किती जरी शोध केला तरी दुस-या भाषेंत संस्कृत, इंग्रजी, किंवा इतर दुस-या कोणत्याहि भाषेंत नाहीं. या सात अभंगांत मी हीन बुध्दीचा, मतिमंद, उतावीळ अशा सर्व कबुल्या देऊन तुकोबांनीं देवास एकच अवघड प्रश्न विचारला कीं, देवा, (पं. 2244)

 तूं देवांचा ही देव । अवघ्या ब्रह्मांडाचा जीव ।

 आम्हां दासां कींव । कां भाकणें लागली ॥

       या प्रश्नास देवानें काय उत्तर दिलें तें तुकोबांनीं नमूद केलें नाहीं. देव उत्तर काय देणार त्यानें तुकोबांची कीर्ति पसरावी म्हणून हा खटाटोप केला होता. चमत्काराशिवाय नमस्कार होत नाहीं. तेव्हां रामेश्वर भटासारख्या जाड बुडाच्या माणसास ईशसत्तेची चुणूक विठूनें दाखविली. पण या खेळांत तुकोबांचा जीव हैराण झाला. तेव्हां तुकोबांनीं तोच प्रश्न नेमका पुढें मांडल्यावर देव काय उत्तर देणार बहुधा देवानें लाजून मान खालीं घातली असेल

       वह्या तरल्या-कवित्वास मार्ग मोकळा झाला. जनापवाद् टळला या आनंदांत तुकोबा आहेत तों च  त्यांस कोणा भक्तानें सांगितलें कीं रामेश्वर भट त्यांचे दर्शनास आळंदीहून येत आहेत. तेव्हां तुकोबा त्यांस सामोरे गेले. त्यावेळीं रामेश्वर भट देहूस आले ते पुनः परत गेले च नाहींत. असें महिपतीबोवांनीं लिहिलें आहे. रामेश्वर भटानीं तुकोबारायावर कांहीं अभंग व दोन आरत्या केल्या आहेत. त्यांतील एक आरती खालीलप्रमाणें :-

तूंचि आत्माराम नव्हेसी देहधारी । स्तुती जरी होय झडो माझी वैखरी ॥

पातकी मूढ जन पडतील अघोरीं । या लागीं अवतार केला महीवरी ॥ 1 ॥

जय जय भक्तराया धर्ममुतिं तुकया । आरती ओवाळीभावें तुझीया पायां ॥

तुझे ठायीं असे भ्रम कोणा न कळे नेम । जन हे काय जाणे अनुभवितो राम ॥

टाकोनी अभिमान जीवीं धरिलें प्रेम । बोलोनि महिमा तुझा जना दिला विश्राम ॥

अद्भुत महिमा तुझा काय वर्णु दातारी । उदकेंवीण अन्न दिवस क्रमीले तेरा ॥

आतां हे ऐसी प्राप्ती काय घडेल येरा । उदकीं कागददीन रक्षिले अठरा ॥

ऐकतां तुझें वचन मन होय उन्मन । सच्चिदानंद गाभा तुजठायीं पूर्ण ॥

नित्य हे असों माझें तुझें पायीं अनुसंधान । करुनि कृपादान देई इतुके दान ॥

शास्त्र आणि वेदांत शिष्टाचारसमस्त । आणिला एकवाक्य जनलोक कृतार्थ ॥

       येवढयानें वाचकांच्या हें लक्ष्यांत येईल कीं तुकोबांचें चरित्र अभंग वाचून आपल्या जें लक्ष्यांत येईल तें च खरें चरित्र. असें चरित्र अभंगांतून निवडून काढून स्वतंत्र ग्रंथ च प्रसिध्द केला पाहिजे, पण त्याचे आधीं तुकोबा ज्या क्रमानें अभंग लिहीत, म्हणत, प्रगट करीत, त्या क्रमानें अभंग आपणापुढें आले पाहिजेत. हा क्रम कोणास हि स्वतःचे बुध्दीनें जुळवितां येणार नाहीं. ज्या वह्या बुडविल्या होत्या त्यांपैकीं एका वहीची नक्कल सख्या हरी शिंपी या आस्थेवाईक वारकरी गृहस्थाकडे आढळली. ती वही मूळ पूजेंत असलेल्या वहीच्या आधारें दुरुस्त केली व त्यानंतर पंडीत यांच्या प्रतीशीं ती नकल ताडून पाहतांना जे अभंग मूळ पोथींत असून नकलकाराच्या हलगर्जीपणानें गळले असें वाटलें, ते पंडितांच्या प्रतींतून घेऊन या ज्यास्त अभंगांची यादी शेवटीं जोडली आहे. ही प्रत तयार केली आहे. या प्रतींत जेथें जशा ओळी आढळल्या त्या तशा निरूपणांत स्पष्ट करून दाखविल्या आहेत. दोन अभंग कोणत्या अन्तर्गत दुव्यानें जोडले गेले आहेत. हें हि शक्य झालें तेथें दाखविलें आहे. पुढें छापलेल्या 751 अभंगांत नारायणाची व गोविंदाची जोडी, कवित्व, आत्मचरित्र, शिकवण, लोहगांवचा वेढा, धरणेक-यास उपदेश, देवाशीं अनन्यगतीनें केलेलीं भाषणें, भांडणें, आळवण, देवाचें भोगिलेलें सान्निध्य इत्यादि विषय आले आहेत. हे सर्व रूपांतरांत शब्दशः आलेले आहेत. तरी त्यांतील कांहीं प्रकरणें निवडून त्यांचें विवेचन-अर्थावबोध जास्त स्पष्ट व्हावा म्हणून पुढें केलें आहे.

टीप - पं. - पंडीत गाथा

      शासकीय  - महाराष्ट्र शासकीय गाथा.

२.अभंग वृत्त