नामदेवरायांनीं कवित्व करण्याचा नि्श्चय केल्यावर त्यांस अभंग वृत्तांत कवित्व
करण्यास पंढरीनाथानें जी शिकवण दिली तें वृत्त नामदेवरायांनीं खालील अभंगांत गोविलें
आहे.
॥ अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशीराजे ॥ 1 ॥
॥ अक्षरांची संख्या बोलले उदंड । मेरु सुप्रचंड शर आदी ॥ 2 ॥
॥ सहा साडेतीन चरण जाणावे । अक्षरें मोजावी चौक चारीं ॥ 3 ॥
॥ पहिल्या पासोनी तिस-या पर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥ 4 ॥
॥ चौक चारी आधीं बोलीलों मातृका । बावीसावी संख्या शेवटील ॥ 5 ॥
॥ दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्ष विचार बोध केला ॥ 6 ॥
॥ नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरों आज्ञा केली ॥ 7 ॥
नामदेवराय म्हणतात कीं, मला अभंगाची कळा म्हणजे अभंग करण्याची कला अवगत नव्हती.
तेव्हां श्रीहरीनें मला स्वप्नांत सांगितलें कीं, अभंगाची मुख्य गोष्ट ही कीं
त्यांत अक्षरें उदंड आलीं तरी चालतील परंतु मुख्य (मेरू) गोष्ट ही कीं त्यांत
सहा-सहा अक्षरांचे तीन चरण करून पुढील अर्ध्या चरणाचीं चार अक्षरें असावींत. अशा त-हेनें
ओळींतील अक्षरांची संख्या बावीस असावी. दुसरी गोष्ट जी संभाळावयाची ती ही कीं दीड
चरण झाल्यावर जें अक्षर येईल तें दीर्घ असावें. (शर आदी या शब्दांचा अर्थ नीट
लक्ष्यांत आला नाहीं) हा नामदेवरायांस श्रीहरीनें घालून दिलेला नियम तुकोबांनीं
पुष्कळसा पाळला आहे. उदाहरणार्थ या वहींतील खालील अभंग आपण पाहूं :-
(1) लेकरा आईतें, पीत्याची जतन । दावी नीज धन, सर्व जोडी त्यापरी आमचा, जालासे
सांभाळ । दे.
येथें प्रत्येक ओळींत सहा सहा अक्षरांचे तीन चौक व चवथा चौक चार अक्षरांचा अशी
प्रतेक ओळ असून-दीड चरण झाल्यावर दीर्घ अक्षर दे हें आलें आहे.
(2) शुध्द चर्या हेंच संतांचें पूजन व (3) चीत्ताच्या संकोचे कांहींच न घडे या
अभंगांतून हि हा नियम पाळला आहे असें स्पष्ट होईल.
अभंगांच्या या प्रकाराशिवाय तुकोबांनीं आणखी हि अभंगांचे निरनिराळे प्रकार केले
आहेत व त्यांची म्हणण्याची पध्दत हि वेगवेगळी आहे.
उदाहरणार्थ
(1) होतों तें चिंतीत मानसीं
(2) एका हातीं टाळ, एका हातीं चिपळीया ।
(3) कोण आतां कळीकाळा । येऊ बळा देईल ।
(4) अंगीं देव खेळे ।
(5) माझे मज आतां न देखे निरसतां ।
(6) खेळ मांडीला वाळवंटी घाई ।
(7) पांगुळ जालो देवा । नाहीं हात ना पाय ।
याशिवाय आणखी 2/4 प्रकारचे अभंग आहेत.
- |