प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ
   

Font Problem

३.कवित्व

       श्रीतुकोबाराय कवित्व करूं लागल्यावर प्रथम त्यांनीं ओव्याचे अभंग केले, त्यांतून कवित्वाचा जो अनुभव आला, त्या अनुभवानें बालक्रीडा बनली. यानंतर श्रीहरीचे कीर्तनास सुरवात झाली. हें  कीर्तन सुरू झालें तेव्हां प्रेममूर्ति श्रीपंढरीनाथ व बोधरूपी नामदेवराय यांच्या मूर्ति तुकोबांच्या मनश्चक्षूपुढें उभ्या होत्या, असें त्यांच्या अभंगांतील शब्दयोजनेवरून वाटत आहे. ताप हें हरण श्रीमुख । या अभंगांची शब्दयोजना तशी  आहे. गुरूपदेश झाल्यावर आपणास देवदर्शन व्हावें म्हणून (७५१) तुकोबाराया जो टाहो करीत होते तो पाहून रखुमादेवीवरांनीं त्यांचे हातीं प्रेमाचें भातुकें दिलें, बोलावयास बोल शिकविले. ते बोल तुकोबांच्या तोंडून नीट बाहेर पडलेले पाहून तुकोबांचे पंढरीनाथांनीं कौतुक केलें, अशा त-हेनें आपली करमणूक पंढरीनाथ करून घेत आहेत अशी तुकोबांची निष्ठा होती. नामदेवरायांनीं आपणास एकाएकीं आपल्या मिराशीचा धनी करून आपल्या वाणीस कवित्वाचा अलंकार चढविला, असें हि तुकोबांस वाटत होतें. ज्ञानीयाचे गुरु ज्ञानेश्वर माउली यांनीं, त्यांचेकडे धरणेकरी आला तेव्हां त्यास तुकोबांकडे पाठविलें, त्या कार्यास्तव ''भातुकें'' दिलें म्हणून क्रीडा करीत असतांना-म्हणजे अभंग स्फुरत असतांना ज्ञानेश्वरमहाराज आपणास आड घालून बोलताहेत (२३८) (तुजवीण सत्ता नाहीं वाचा वदविता । तुका म्हणे आड । केलों मी हे तुझें कोड) अशी तुकोबांची खात्री होती. त्यांस असें हि वाटें कीं, (२३४) आपल्या डोळयांत कृष्णांजन मायबापांनीं घातलें आहे. त्यामुळें आपली द्दष्टि सोज्वळ झाली, तेव्हां कोणता हि जिन्नस बरा किंवा वाईट, सरस कीं निरस आपणास चटकन कळतो. श्रहरीस, जनास निरोप सांगण्याची त्वरा झालेली असते तेव्हां तो गडबड फार करतो, माझी वाणी मला आवरत नाहीं असें होतें. तसेंच मला स्वामीच्या सत्तेनें (११६) रोज नव्या नव्या गोष्टी स्पष्ट होत जातात. श्रीहरी आपलें मन माझ्या मनांत मिळवितो व त्यामुळें अंतरांत प्रत्येक गोष्टींतील वर्माची खूण प्रगट होते. आपणास नारायणाची जोडी झाली आहे. ही जोडी म्हणजे हातीं वैरागारमणी यावा तशी आहे. या वैरागारमण्याच्या पोटीं रत्नांच्या खाणी (१४८) आहेत. तेव्हां येथें तर्कवितर्कास वाव नाहीं.  या रत्नांच्या खाणी ज्या भांडारांत ठेविल्या आहेत त्या भक्तिप्रेमसुखाच्या भांडाराची किल्ली माझे हातीं आहे. तेव्हां तें भांडार उघडून मी हा त्या धन्याचा माल विकावयास (१५१) आणला आहे. त्यासाठीं ऐसपैस दुकान घातलें आहे; त्यांत निरनिराळे-उत्तम-मध्यम-कनिष्ट-असे जिन्नस (२००) निवडून सांठविले आहेत. तुम्ही जेवढया मोलाचा जिन्नस घ्यावयास याल तेवढया मोलाचा जिन्नस देण्यास तुका दुकानीं बसला आहे. सर्वत्रांस विनवणी करून अहो श्रोते-वक्ते तुमच्या पायांवर मी मस्तक ठेवून एकच गोष्ट सांगतों कीं (१५१) माल खरा घ्या व तो बरा पारखून घ्या. येथें (७०१) माझें असें सांगावयास कांहीं नाहीं. पण (६९३) तुम्हांस एवढेंच सांगतों कीं यासारखे जिन्नस कोठें मिळाले नाहींत, पुढे मागें कधीं हि मिळणार नाहींत. कारण मीं भांडारांतील सर्व माल झाडून आणला आहे. तेव्हां तुम्हांस जी जी गोष्ट हवीशी वाटेल अशी प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ सिध्द आहे. या सर्व जिन्नसा मला गोळा करून आणतां आल्या  याचें कारण एकच कीं माझ्या अंतरांत चिन्मणी दीप लागला असल्यामुळें -मला या भांडारांत विश्वासानें हा चिन्मणी दीप हातीं देऊन सोडलें, मीं सर्व जिन्नस गोळा केले. संतजनांनीं माझ्यावर कृपा केली. (१) माझ्या वाणीवर कवित्वाचा अलंकार चढविला. पंढरीनाथानें मला मोठया कौतुकानें (२२४) जगास नीति काय -८३४(शा) हें सांगण्याच्या कामावर नेमलें. इतकेंच नव्हें तर जे चुकत असतील त्यांची फजिती करावयास हि सांगितलें आहे. (पं. १७७५)

     ॥ सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोवरी हा प्राण जाय त्याचा

     ॥ आणीकांचा धाक न धरावा मनीं । नीरोपा वचनी टळो नये ॥धृ॥

     ॥ समय सांभाळूनि आगळे उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ॥

     ॥ तुका म्हणे तरी ह्मणवावे सेवक । खादलें तें अन्न हक होय ॥

१७७५ (शा)

     त्या जगदीशाची सत्ता माझ्या पाठीशी असतांना-कोणी रागावेल की काय अशी भीति बाळगण्याचें मला कारण नाहीं. रागावोत बापडे ! त्यांची पर्वा नाहीं. या जगदीशाचा निरोप लोकांस सांगतांना-रामकृष्ण नाम हा तीक्ष्ण बाण माझे हातीं असतांना अविद्या आंत शिरेल कशी ? येईल कोठून ? तशी वेळ आली तर वज्रा प्रमाणें कठीण उत्तर योजावें अशी श्री विठ्ठलाजी आज्ञा आहे या दुकानीं फक्त ख-याचा च विकरा होणार-येथें खोटा माल ख-यासारखा खपविण्याचें कारण नाहीं. शिवाय या दुकानीं सर्व माल (२३१) सवंग आहे. येथें (पं. ३३९५) आम्हां घरी शब्दाची रत्नें मिळतात. तुम्हांस कांही शस्त्र हवें तर आम्ही शब्दच देतों. हे शब्द (१५०) देवाच्या कृपेचा प्रसाद आाहे. तो जगांत आनंद वाढवावा म्हणून देवांनीं माझे हातीं दिला आहे. मी एक मोठें जहाज भरून हा माल या मनुष्य देहाच्या बंदरांत आणला आहे. हे जिन्नस अलभ्य आहेत व मी ते तुम्हांस फुकट देत आहे. शीग लावून जिहुवा व कान या मार्गांनीं पुरेपुर माप भरून घ्या. मी (१०९) हीं जीं शब्दरत्नें तुम्हांस देत आहे तीं (१०९) नारायणामिश्रित आहेत. त्यांत वचना वचनाला तुम्हांस नारायण भेटेल. माझ्या अंतरांत मनाच्या सिंहासनावर देवादिदेव पंढरीनाथ विराजमान झाले आहेत. (१५२) मी हात वर करून सर्वत्रांस ही गोष्ट सांगत आहे कीं जो जो येथें येईल तो कोणती हि इच्छा मनांत धरून येवो त्याची येथें हौस फिटेल. कारण एकाच्या कैवाडें म्हणजे पुंडलिकाच्या व माझ्या कैवारानें-सकळांच्या शिरावर बसून मी वचनें उच्चारीत आहे. (६०७) माझी वाणी प्रेम अमृतानें ओलावली आहे. (६०७) रामनामानें पिकली आहे. (पं. ३९१९) व विठ्ठल विठ्ठळ गजरानें गोडावली आहे. येथे सकल मंगलें वोळलीं व येथें आनंदाची च वृष्टि मेघवृष्टीसारखी अनिवार होत असते. भाग्यवंत जे असतील (३०८) त्यांनीं एवढें च करावें कीं आपल्या वाणीनें विठ्ठल नामाचें माप भरून घ्यावें. म्हणजे ते आनंदानें पुष्ट होतील व माझ्या बरोबर त्यांचा हि उध्दार होईल. माझे घरीं ब्रह्मरस पिकास आला आहे. तेव्हां पंगतीस सुकाळ आहे. (४१९) माझें भाग्य फळलें, गोविंदाची भेटी झाली. त्यानें आपला सर्व ठेवा माझे हातीं अवचित दिला. आतां दैन्य कसलें? चिंता तरी कसली करावयाची ? आम्हीं या नर देहाच्या क्षेत्रांत (६१३) संन्याशासारखे दिसत असलों, तरी इतर संन्याशांप्रमाणें आम्हीं आशा, काम, यांची होळी केली नाहीं. सर्व अंग प्रेमानें भरलेले-भारलेले आहे, पण मी वेशधारी संन्याशासारखा उगा च कांहीं तरी आहे असें समजूं नका-तर मी वेदांची बरी वाईट खंडें निवडतों. (१५३) क्षर अक्षरा वेगळा होऊन वेदांच्या सर्व कला पाहतो. विठ्ठलाच्या प्रसादानें तुम्हांस सांगत असतो. हे हाततुके म्हणजे अटकळीचे शब्द नाहींत. हे कोणाचे उसने आणलेले बोल नाहींत; येथें मतांतरें गोळा केलेलीं नाहींत; तर अन्तरीच्या ध्यानांत माझ्या जें अनुभवास आलेले असतें, तेवढेंच सांगतों. माझ्या अंतरांत सुखाचा झरा लागला आहे. तेव्हां माझ्या मुखावाटे जीं अमृतवचनें बाहेर पडत आहेत (२५६) त्या शब्दांच्या ओळी दिसल्या तरी त्या रत्नांच्या माळा आहेत. हें लक्ष्यांत ठेवा. सूर्य प्रकाशला (२५७) म्हणजे त्याचीं किरणें जशीं सर्वत्र पसरतात तशी या शब्दरत्नांची प्रभा पसरलेली तुम्हांस दिसेल. हे शब्द बोबडे आहेत असें तुम्हांस वाटलें तरी प्रेमानें ते बोबडे आहेत म्हणूनच देव गोड करून घेत आहे. त्यास शब्दरत्नांनीं वाहिलेली पूजा ही मोलाच्या मोत्यांनीं पूजा करावी अशी वाटते. हे शब्द तुम्हांस फुलासारखे सुशोभ्य दिसतील. (२९३) तसेच हे शब्द तुम्ही आदरयुक्त मनानें कानांत विसावलेत तर तुमच्या अन्तःकरणांत त्यांचा परिपाक होईल. त्यांचा परिणाम तुमचा तुम्हीच पाहून घ्या. श्रीहरीस तुमच्या हिताचा कळवळा आहे. तुम्ही काळाचे हातीं पडूं नये, म्हणून, तुमच्यांतील दोष निवडून, मी त्यांवर राम नाम बाण सोडतों. माझ्यासारखा तुम्हांस सखा दुसरा कोणी भेटणार नाहीं. मी सहज बोलत जातों. त्यांत तुमचे अंगीं जे दोष असतील त्यांची निंदा होते ती तुमच्या कोणाच्या वर्मास झोंबते. मी कांहीं एखाद्या सांप्रदायिकाप्रमाणें वाटेल (२१०) ती बाजू घेऊन हट्ट धरणारा खळ नव्हे; फक्त सत्याच्या सत्तेनें उपदेश करीत आहे. माझ्या शब्दांची जो साक्ष पाहील त्यास त्याचा परिणाम कळेल. (२५६) हा शब्द ब्रह्मांडास पुरून उरेल एवढा सामर्थ्यवान आहे. गंगा जशी आपल्या ओघानें वाहात जाते-तसा-मी गात जात आहें. तो बोल च लोकांना उपदेशासारखा पुरेल. जे कोणी भाग्यवंत असतील-त्यांस या उपदेशामृतांचें (५५२) सेवन होईल. पण हे लोक असे खमंग आहेत, कीं तोंडांत घास द्यावयास जावें तर तोंड पळवितात; पळवीत तोंड बापुडे-मी ही जी वाणी वदत आहे ती दुस-या कोणासाठीं नाहीं. मी स्वतःच्या आवडीनें विठुरायाची रोज पूजा नवी नवी करीत असतों.  माझे शब्द हे एवढे स्पष्ट, सोपे, आहेत कीं माझ्या वचनांची शब्दसृष्टि वाढवून कोणीहि उकल करावयास नको. (पं. १७७५)

     प्रेममूर्ति पांडुरंग हें जगाचें जिव्हार म्हणजे मर्म अन्तःकरण-बीज-आमच्या वाटयास बहुतांच्या भाग्यानें आलें आहे. (३६) त्यास मीं एकविधभावानें घट्ट धरून ठेविला आहे; त्यास रूपास आणून मीं जवळ उभा करून ठेविला आहे. तो माझ्या शब्दानें अंकित होऊन-वैकुंठ, क्षीरसागर सोडून या भूतलावर-चंद्रभागेच्या तीरीं उभा आहे. तेव्हां आमच्या फडावर येऊन त्यास देव भेटला नाहीं असें म्हणून कोणास हि निराश होण्याचें कारण नाहीं. (पं. ८९०/३७६७) कीर्तनांत स्फूर्तीनें आलेले अभंग म्हणत ही गोष्ट कोणी तत्कालीन माणसानें नमूद केली नाहीं. महिपतीबोवांनीं लिहिलें आहे कीं, तुकोबा स्फूर्तीनें अभंग करीत व ते संताजी तेली व गंगाराम मवाळ लिहून घेत. पण ही गोष्ट मला शक्य वाटत नाहीं - दोन्ही व्यक्ती फारशा शिकलेल्या नव्हत्या. त्यांतल्या त्यांत संताजी तेली यांस अक्षर ओळख किती होती हें आपण प्रत्यक्ष पाहून महिपतीबोवांनीं लिहिलेली गोष्ट अशक्य आहे, असें एका व्यक्तीपुरतें निःसंशय विधान करूं शकूं. या दोन्ही व्यक्ती कांहीं लघुलेखकाची कला शिकलेले नव्हते. तेव्हां एक तर अगोदर करून ठेविलेले अभंग तुकोबा कीर्तनांत किंवा भजनांत वापरीत असावेत किंवा हें भजन वा कीर्तन झाल्यावर तुकोबा हे अभंग स्वतः लिहून ठेवीत असावेत. स्वयंस्फूर्तीनें अन्तर्प्रतीतीनें प्रभावी व प्रयोगी शब्दरचना होऊन कीर्तनांत वा भजनांत ऐश्वर्याचीं वचनाक्षरें तुकोबांच्या मुखावाटें बाहेर पडत असावींत, त्या अभंगांचे आरंभ हे लेखक लिहून तरी किंवा ध्यानांत ठेवीत असावेत व त्या दिवशीं किंवा दुस-या दिवशीं तुकोबा स्वतः ती शब्दसृष्टि लेखनिविष्ट करीत असावेत. तुकोबा कीर्तन वा भजन करीत तेव्हां रसपरिपोष कसा करीत, रंग कसा भरीत, उपमा-अलंकार-दृष्टांत-कोठें व किती व कोणचे वापरीत-देवाची व संतांची आळवण कशी करीत-हें समजण्यासाठीं आज कांहीं हि साधन नाहीं. फक्त धरणेक-याचे अभंग आपणापुढें आहेत. त्यांत सुरवातीचे सात अभंग नमनाचे आहेत. पुढील अकरा अभंग उपदेशाचे आहेत. हे अभंग, ज्ञानोबांस पत्र, म्हणून केले. त्यांत सात व अकरा या अभंगाचेद्वारें हरिकथा केली असें म्हटलें आहे व तेथें या हरिकथेचें अति गोड वर्णन केलें आहेः- (सं. ९६२)

     ॥ परम अमृताची धार । चाले देवा हे समोर ॥

     ॥ धृ ॥ उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणी सकळां तीर्था ॥ धृ ॥

     ॥ शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥

     ॥ तुका म्हणे हरी । स्तुती वाणी इची थोरी ॥

     तेव्हां त्या धरणेक-यांसाठीं तुकोबारायांनीं कीर्तन केलें असावे-व ते अभंग लिहून त्यास दिले असावेत. येथें एक गोष्ट पाहण्याजोगी आहे व ती ही कीं तुकोबांनीं पंढरीनाथांची व ज्ञानोबांची आळवण पहिल्या सात अभंगांत केली आहे. या सात अभंगांत वापरलेलीं विशेषणें लक्ष्यांत घेतलीं तर पुढें जें कार्य करावयाचें आहे-त्यासाठीं शक्ति-स्फूर्ति-देऊन सांगावयाची गोष्ट काय तें सांगा अशी आळवण केली आहेसें दिसतें. त्या आळावणीप्रमाणें-माझ्या बापानें भातुकें दिलें म्हणून मीं क्रीडा केली--मीं जी आळी घेतली ती तुम्हीं पुरविलीत व हें उत्तम दान हातीं आलें म्हणून म्हटलें (२५०). हें उत्तम दान हातीं आलें तें पाहून पुढील अभंगांत तुकोबा म्हणतात-मायबाप-ज्ञानीयांचा तुं राजा महाराव-म्हणती ज्ञानदेव यैसें तुम्हां । तुम्हीं मला तुमच्या योग्यतेस आणून बसवितां यास काय म्हणावें ! मला कांहीं तुमच्यासारखी खोल युक्ति साधत नाहीं. तेव्हां आतां तुमचे पायावर डोकें ठेवतों. मी जीं वेडींवाकडीं वचनें-माझा अधिकार काय हें लक्ष्यांत न घेतां बोललो, हा माझा अपराध क्षमा करा. असें हें तुकोबांनीं नमूद केलेलें कीर्तन सुसूत्र आहे. प्रमाणबध्द आहे. परंतु या गोष्टींचा आजवर कोणी हि अभ्यास केला नाहीं. तेव्हां त्याबद्दलचे ज्यास्त शोध कोणी केले नाहींत. हें सांगावयास च नको.

     तुकोबारायांची शब्दसृष्टि पढिक विद्वानाची नव्हती. त्यांनीं विश्वासानें, आदरानें-जीं कांहीं संतांची वचनें पाठ केलीं होतीं, तेवढींच त्यांचीं शब्दसृष्टि ! ती संतांचीं वचनें कानांत विसावून मनांत परिपाक होऊन त्यांच्या अंतरांत जेव्हां सुखाचा झरा लागला, आनंदाला पूर आला तेव्हां प्रेमामृतानें ओलावलेल्या, हरिगुणगानानें गोडावलेल्या, विठ्ठल गजरानें पिकलेल्या वाचेच्याद्वारां तो प्रेमाचा पूर-तो सुखाचा झरा-वाट काढूं लागला; तेव्हां त्या निःशब्दाचे शब्दांनीं आळें करून परब्रह्म कवळावें अशी स्थिति झाली. प्रत्येक शब्द हा अरवस्थेच्या प्रतीतीनें स्थानापन्न असल्यामुळें तो ज्या कळकळीनें उच्चारला जाई तेवढया च  आर्ततेनें त्या समोरच्या श्रोत्यांच्या आर्त मनोभूमींत रुजे. त्यामुळें तुकोबांचें कीर्तन वा भजन परिणामकारक होई. अगदी बालपणांतच शिव छत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावांत सांपडले. त्यांनीं इतर उपदेशकांनीं सांगितल्याप्रमाणें सर्वसंग परित्याग करून भजन पूजन कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरू केला. तुकोबांस ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या  कामावर रहा आम्ही भजन कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत रवीचा प्रकाश पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा त-हेनें त्यांच्या विचारांच दिशा बदलविण्याच्या कामावर राहूं असें आपण एकमेक एकमेकांस सहाय्य करूं व सर्व जण सुपंथ धरतील असें वागूं; असें म्हणून तुमच्या कार्याच्या पाठीशीं मी आहें याची खूण म्हणून तुमच्या सहका-यांना प्रसाद म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग आहेत. आज जरी स्वराज्य आहे तरी सध्याचे सरकार त्या अभंगांचें निरूपण पटवून घेऊन पचवितील अशी मला खात्री देववत नाहीं. असो, तात्पर्य काय, कीं अभंगवाणी ही फार प्रतापवंत व प्रभावी होती. याची साक्ष रामेश्वर भटाची फिर्याद, ''गुरुत्व गेले नीच याती'' अशी रामदासांची पोटदुखी, मंबाजीबोवांचा तडफडाट, व चिंतामणी देवांची परीक्षा अशा गोष्टी देत आहेत. अशीं आणखी हि कांहीं उदाहरणें झालीं असतील. पण अशा अडथळयांस न जुमानतां देवा हातीं रूप धरवूं आकार  नेदु निराकार होऊं त्यासी । या बाण्यानें तुकाराम महाराज वागत होते.

     तुकोबारायांनी अभंग रचण्यास सुरुवात करण्यापूर्वी, अभंग हें जो तो निरनिराळया त-हांनीं परंतु अक्षरांची संख्या कमीजास्त करून करीत होते. त्यांत गोडवें म्हणजे धृपद कोठें यावयाचें यास नेम नसे. नामदेवरायांचे असे कित्येक अभंग आहेत कीं, त्या अभंगांत पहिलें चरणच गोडवे होण्याच्या लायकीचें आहे. ज्ञानेश्वर माउलीच्या कांहीं अभंगांच्या चाली चरणा-चणास बदलाव्या लागतात. निवृत्तिनाथांचे अभंग हे कोणी गाऊन म्हटले असतील असें मला वाटत नाहीं. तीच गत सोपानकाकांच्या अभंगांची व मुक्ताबाईंच्या अभंगांची. त्यावेळीं कांहीं सांगावयाचें तर तें पद्यांत सांगावें लागे म्हणून या मंडळींनीं आपलें म्हणणें छंदोबध्द केलें आहे एवढेंच. या उलट मृदंग लावून गात नाचत विनोदें । टाळ घाग-यांच्या छंदे । असे म्हणून सर्व महाराष्ट्रास सादावीत तुकोबाराय निघाले व कीर्तन व भजन हें एवढेंच साधन अभंगद्वारा ते वापरूं लागले, तेव्हां, आपलें सांगणें परिणामकारक व्हावें येवढयासाठी त्यांनीं अभंगांची मांडणी व्यवस्थित केली. सात्विक व प्रेमळ असे द्दष्टांत घेऊन-घरगुती नातीं-गोतीं, नित्यपरिचयांतील प्रत्येक चीजवस्तु-चंद्र सूर्य, राजाराणी, यच्चावत प्रत्येक गोष्ट, त्यांनीं द्दृष्टांस वापरली. प्रत्येक द्दष्टांतांत द्रष्टा जो श्रीहरी तो कोठें पहावा हें लोकांस शिकवलें. राजापासून रंकापर्यंत सर्व दर्जाचे लो त्यांचेकडे उध्दारार्थ येत. तेव्हां त्यांनीं मानव जातींतील सर्व वर्णाचे, सर्व दर्जाचे, लोक दाखल्यास घेतले. बालशिवाजीराजा व मातोश्री जिजाबाई यांस एकाच अभंगांत दृष्टांतासाठीं घेऊन लोक, शहाजीराजांनीं बायको टाकली, मुलगा वांड निघाला म्हणून जें कांहीं वावदुकपणानें, बेजबाबदारपणानें, बोलत होते त्यांच्या तोंडास कुलूप घातलें. (पं. २३९३)

     ॥ प्रीती नाहीं वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥ २३९४ (शा)

     ॥ धृ ॥ तैसे दंभी जालो तरी तुझें भक्त । वास यमदूत न पाहती ॥ धृ ॥

     ॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणीका दंडवेल ॥

     ॥ बाहात्तर खोडी तरी देवमणी कंठीं । तैसा जगजेठी म्हणे तुका ॥

     पक्षिणी व पिल्लें, दुकान-धनको-ऋणको-गाय व वत्स, माउली व लेकरुं, पति-पत्नी, सासू, जार-जारिणी. हे सर्व दृष्टांतात घेतले आहे. मानवी प्राण्याच्या सर्व खोडया लक्ष्यांत घेऊन दृष्टांतासाठीं वापरल्या आहेत.

     मानवी नात्यागोत्याचे घरगुती दृष्टांत तुकोबा येवढया बारीक नजरेनें वापरीत कीं त्या दृष्टांतांतून तुकोबा द्रष्टा, पांडुरंग, न सांगतां श्रोत्यांस न समजतां, हातीं देत, तेव्हां तो पुनः श्रोत्यांच्या हातून निसटत नसे.

     सर्व धंदे दृष्टांतास घेतलेले आहेत. प्रत्येक धंद्यातील कला-कुसरी लबाडया-लाचाडया सर्व कांहीं दृष्टांतात वापरलें आहे. रोज खावयाचा भात दृष्टांतास घेऊन भक्ति, ज्ञान, व वैराग्य यांची मिळणी एका अभंगांत स्पष्ट केली आहे (भक्ति ते, नमन, वैराग्य तो त्याग ! ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्म तनु ।

     आम्हां घरी धन । शब्दाचीच रत्‍नें

     तुकोबारायांनीं, अभंग, हें सहज सुलभ असें वृत्त वापरलें, सर्व जग दृष्टांतास घेतलें तशी त्यांची शब्दसृष्टि त्या वेळच्या शेतकरी-कुळंबी-माळी-सुतार, गवंडी, पाथरवट व थोडया फार अंशानें पांढरपेशा वर्ग यांच्या नित्याच्या वापरांत असलेली होती. ते कांहीं पढीक शास्त्री पंडीत नव्हते, पुराण-कीर्तन ऐकून व कांहीं संतांचीं वचनें विश्वासानें, आदरानें पाठ केलेले बहुश्रुत असे गृहस्थाश्रमी मराठे पण व्यवसायानें वाणी असे गृहस्थ होते. मर्यादित शब्दसृष्टीच्या भांडवलावर अफाट व्यापार करणारे ते स्फूर्तिवंत वक्ते होते. त्यांची स्फूर्ति जिवंत होती. यामुळें नित्याच्या वापरांतील साध्यां शब्दांना त्यांनीं धीरगंभीर अर्थ सूचित करण्याचें साधन बनविलें. उदाहरणार्थ माउली हा एकच शब्द घेऊं. हा शब्द साडेचार हजार अभंगांच्या गाथ्यांत २५/३० वेळां आला आहे, तेव्हां माउली हा शब्द कोठें आला तर तो एवंगुणविशिष्ट असा स्थानापन्न आहे. असें समजावें. तुकोबांनीं आम्हां घरीं धन । शब्दाचीच रत्नें । म्हणून म्हटलें, त्यांतील हा अत्यंत देदीप्यमान हिरा आहे रत्नासारखे चमकणारे तुकोबांच्या शब्दसृष्टींत खालील शब्द आहेत. त्या प्रत्येकास विशिष्ट अर्थ आहे.

     भक्तिप्रेममुख, प्रेमबोध, प्रेमखुण, संतांचा पढिया, सोलीव सुख, तीळ तांदळया, निःशब्दाची वाणी, प्रेमपान्हारस, नामामृतगोडी, निज, सोय इ. आळी, जोडी, लडिवाड, कौतुक, डौरणे, दसरा, सोवळा, माहेर, निजबोध, वोरस, इ. इ.

     याप्रमाणें त्यांनीं विषय, प्रतिपादनाच्या, सहज ओघानें शेपन्नास शब्दांच्या व्याख्या साधल्या आहेत. त्यांतील नमुन्यासाठीं कांहीं खालीं देत आहे. त्या एखाद्या कायद्याच्या पुस्तकांत सुरवातीस जशा शब्दांच्या व्याख्या दिलेल्या असतात तशा रेखीव व स्पष्ट आहेत असें दिसून येईल. अभंगांचें रूपांतर करतांना अशा व्याख्या भिजल्या वहींत जेवढया आल्या त्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत.

पंडित :

       ॥ आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥

     ॥ धृ ॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढुनि पंडित ॥ धृ ॥

     ॥ श्वानाचिया परी । मिष्टान्नासी विटाळ करी ॥

आवडी:

॥ जिवीच जाणावें या नांवें आवडी ।

आचार्य:    

॥ भाग्यवंता हें चि काम । मापी नाम वैखरी ।

     आनंदाची पुष्टी अंगीं । श्रोते संगें उध्दरती ।

     पिकला तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ।

गाढव:

     आधींच आळशी । वरी गुरुचा उपदेशी ।

     मग त्या कैची आडकाठी । विधीनिषेधाची भेटी ॥

     नाचरवे धर्म । न करवे विधी कर्म ।

     तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवे धांव

चाट:

॥ कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाटत्या परतें आणीक नाहीं ॥

देव ॥ नामाची आवढी तो चि जाणावा देव ।

     अशाच सहजसुलभतेनें अभंगांतून कित्येक म्हणी साधल्या गेल्याचें आढळेल. अशा म्हणी साडेचार अभंगांच्या गाथ्यांत ५/६ शें आहेत, व भिजल्या वहींत जेथें जेथें आल्या आहेत तेथें त्याचेकडे लक्ष्य वेधावें म्हणून त्या म्हणी वेगळया दाखविल्या आहेत. येथें ४/५ नमुना म्हणून देत आहे.

     (१२) क्षणभंगूर हा येथीचा पसारा । आलीया हाकारा अवघे राहे ।

     (७१) नेम नाहीं लाभ हानी । अवचीत घडती दोन्ही ।

     (१०३) क्षीर मागे तया रायते वाढी । पाधाणी गधडी ऐशा नांवें ।

     (१०४) विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे आंगीं ।

     (१०४) मधुरा उत्तरीं । रावां खेळे उरावरी ।

     याशिवाय तुका म्हणे माझी केळवते वाणी । असे कांहीं नवे शब्दप्रयोग हि  अभंगांतून आहेत. अभंगांत ठिकठिकाणीं विनोद, धट्टा वक्रोक्ति, उपहास, या वक्तृत्वाच्या अंगांना हि स्थान मिळालेलें आहे.

४.कारुण्यरस-करुणापर अभंग