अभंगवाणीनें तुकोबारायांनीं श्रीपंढरीनाथाची पुष्कळशी आळवण केलेली आहे;
ती आळवण करुणापर अभंगांत सर्वत्र पसरलेली आहे. त्यांतून कारुण्यरस
वाहात असलेला आढळेल. हा कारुण्यरस काय आहे याबद्दलची कल्पना स्पष्ट नसल्यामुळें हें
अभंग अपूर्ण स्थितींतील असे शेरे कांहीं पदवीधर व्यक्तीनीं मारले,
कवित्वाच्या स्फूर्तीचें मूळ लक्ष्यांत न ठेविल्यामुळें त्यांची ही
गैरसमज झालेली होती. पंडित गाथ्यांतील 525-37 अभंगावरील
चर्चा अभंग चर्चा या पुस्तकांत (229-41) पाहावी तर त्या
चर्चेंत भक्ती प्रतिपाळे, दीनवो वत्सले,
विठ्ठले, कृपाळे,
माये, हीं विशेषणें प्राप्त पुरुषानें अनुभवलेलीं,
अनुभवानें सिध्द झालेलीं विशेषणें, आहेत
असा विचार त्या थोर विद्वान पंडितास शिवला नाहीं. कमुदिनी व भ्रमर हा दृष्टांत
प्राप्त पुरुषाशिवाय कोण वापरूं शकेल ! असा विचार ती चर्चा करणा-या विद्वानांस
शिवला नाहीं.
तुकोबारायांनीं अभंग द्वारां जी विठ्ठलाची करुणा भाकली ती कशाबद्दल भाकली ?
ती अशाबद्दल भाकली कीं, सर्व सत्ता हातीं
आल्यावर ज्ञानानें द्दष्टि चोख झाल्यावर असें लक्ष्यांत आलें कीं,
सर्व कांहीं बा विठ्ठला तुझे आहे. सर्व सत्ता तुझी आहे,
मी, माझे, हे शब्द
फोल आहेत, असें असून हि जिव्हेस लागलेली संवय सुटत नाहीं.
ते शब्द समोर येतातच तेव्हां तशी वृत्ति जागृत होऊं नये,
तसा शब्द मुखावाटे बाहेर पडूं नये म्हणून श्री. विठ्ठलाची करुणा भाकावयाची. करुणा
म्हणजे भीक नव्हे. समोर आई दिसते आहे. स्वतःस थंडी लागत आहे,
आई मला थंडी लागत आहे म्हणून उचलून कडेवर घेण्यासाठीं घाई करीत
आहे. ती उचलून कडेवर घेणार आहे याबद्दलहि खात्री आहे. अशा वेळी त्या सोनुल्या
बालकाचे तोंडून जे कांही हट्टाचे-कांहीं रागाचे-कांहीं सत्तेचे शब्द बाहेर पडतात-
ती करुणा समोर ताटांत पेढा दिसत असतांना तोंडांत लाळ येऊन ''वाटा
पेढे लवकर'' म्हणून जेव्हां एखादा मनुष्य सत्तेनें सांगतो
त्याचें नांव करुणा. पाट ताटें मांडलीं आहेत, जेवण सर्व
सिध्द आहे, त्या जेवणाचा परिमळ बाहेर येत आहे अशा वेळीं
घरचा मालक, पानावर बसून बायको, मुली,
सुना या आपलें कर्तृत्व दाखविण्यासाठीं चटण्या,
कोशिंबिरी वाढण्यांतच वेळ फुकट दवडताहेत,
तेव्हां कांहीं प्रेमाने कांहीं रागानें बोलतों त्याचें नांव करुणा. मूल आईच्या
कडेवर आहे पण ती शेजारणीशीं गप्पांचा पट्टा चालविण्यांत गुंग आहे. तिचें अशावेळीं
मूल रडून-रागावून-तोंड धरून-तिच्या सर्व लक्ष्यांस वेध मी व्हावा म्हणून इच्छा करून
जेव्हां तो बालहट्टाचे बोबडे शब्द उच्चारतो, त्याचें नांव
करुणा. प्रत्येक नात्यांत नित्य नवा रंग भरावा, व त्यामुळें
सुख वाढीवर असावे, म्हणून प्रेमाच्या सत्तेनें जेव्हां
माणसें-कधीं हासून, कधी रुसून-कधीं खेळत-तर कधीं खोडया करीत
प्रेम भोगतात, आनंद लुटतात, त्या
वेळीं जी शब्दसृष्टी निर्माण होते ती करुणा. तेव्हां तुकोबांचें म्हणणें असें की
देवा, शास्त्रें तुम्हीं निर्माण केलींत,
त्यांत संसार वाईट म्हणून तुम्ही शिकवलेत. आम्ही ते अनुभवानें
शिकलों. पण तुम्ही संसाराची गोष्ट नित्य नवी गोडी उत्पन्न करून समोर उभी करतां हा
तुमचा नष्टपणा, खाष्टपणा,
कृष्णावतारांतील खोडकर स्वभाव ! आतां या भोगास काय करावें ! म्हणून बा. तुझी करुणा
भाकतो. तुला नित्य भेटावें, तुझ्याशींच नित्य
बोलावें-तुझ्या संगतींत सदा असावें असा साच संकल्प असतांना देवा तुम्ही त्या
संकल्पाप्रमाणें मन-बुध्दी अचल राहूं देत नाही म्हणून करुणा. लहान मुलास आपण
मांडीवर बसविलेलें असावें त्याच्या अंगाभोवतीं आपले हात असावेत. पण त्यास कांहीं
कारणानें जी प्रेमाची उकळी आलेली असते ती एवढी अनिवार असते कीं त्या बाळाचे
मुखावाटा जी गोड वाणी बाहेर पडते तिचें नांव करुणा. प्रीयु व प्राणेश्वरी (अशा
नात्यानें वागणारी पतिपत्नी किती असतील ! ) ही अधीर होऊन एकमेकांपाशीं ज्या गोडीनें
बोलत असतात-ती करुणा. प्रीय एखादी अति गोड गोष्ट-सुखावह वृत्त,
प्राणेश्वरीस सांगण्यास अधीर झालेला असतो. तें वृत्त काय आहे हें
ओळखून-ती कांहीं तरी कामांत गुंतल्यासारखी दाखवून एकांतास उशीर करते त्यावेळीं
उत्पन्न होणारी शब्दसृष्टी करुणा. आई बराच वेळ बाहेर गेलेली असावी,
मूल दारांतच वाट पाहात बसलेलें असतें- एवढयांत आई परत येते व
आपल्याच रंगांत इतर गोष्टींत दंग होते, पण बाळास उचलून
आवळून कवळून घेत नाहीं त्यावेळीं, रागाचें,
रडण्याचें, जे शब्द बालाचे मुखावाटा बाहेर
पडतात ती करुणा. आपली प्रेमाची सत्ता असतांना ती सत्ता चालविण्यास उशीर झाला कीं
करुणा उत्पन्न होते. तात्पर्य उत्कटत्वाची अधीरता,
अतिस्नेहाच्या पोटीं उपजणारी अनिश्चितता, सत्तेची
निश्चितता-अशा सर्व गुणांत झुळुझुळु वाहणारी अनन्यता-अशा सर्व गुणांनीं सुखानेंच पण
घायाळ झालेली मनाची स्थिती-ती करुणा. या कारुण्यरसानें मन जेव्हां घायाळ अवस्थेंत
प्रेमानें वाहत असतें तेव्हां त्या प्रेमाच्या पुरांत देवास जन्म घेण्यास जागा
होते.
सांपडे भरलीये
वाहीं । भाव शुध्द पाही याचे भातुकें ।। (2)664(शा)
म्हणून
तुकोबांनीं आपला अनुभव नमूद केला आहे. तुका वेडा अविचार । या अभंगांत तुकोबांनीं
आपली घायाळ स्थिति वर्णिली आहे. पण ही अवस्था काय आहे. याचें आकलन नीट न
झाल्यामुळें, प्रार्थना समाजाच्या सभासदांनीं चालविलेल्या
तुकाराम चर्चा मंडळानें लाविलेले अभंगांचे अर्थ चुकीचे आहेत. तसेंच ख्रिश्चन
मिशन-यांना या अभंगांत पापाची कबुली, दुर्गुणांची कबुली
दिसली.
(1)
पतीत मी पापी शरण आलो तुज ॥
(2)
पतित पतित । परी मी त्रिवाच्या पतित ॥
असल्या
अभंगांचा अर्थ, कारुण्य म्हणजे काय रस आहे हें न कळल्यानें
त्यांचे अर्थ चुकले आहेत. असो, या रसांत सारखे अठरा दिवस
देवाचा धावा करीत तुकोबा शिळेवर पडून राहिले. तेव्हां पांडुरंग बाळमूर्ति प्रगट
झाली. वह्या रक्षिल्या आहेत म्हणून म्हणाली. तेव्हां देवा हातीं रूप-धरवूं आकार-ही
गोष्ट ज्या रसानें सिध्द होते तो रस केवढया उत्कटत्वांत-केवढया अनन्यत्वाच्या
घायाळपणांत उत्पन्न होतो हें या उदाहरणानें लक्षांत यावें. ही गोष्ट आपण कोणा
तज्ज्ञ माणसाचे तोंडून समजून घेतली पाहिजे, इ्तकेंच नव्हे
तर तशा घायाळ स्थितींत असणा-या एखाद्या महापुरूषाची गांठ पडणें जरूरीचे आहे. त्या
महापुरूषास आपला विश्वास पटला पाहिजे, आपण सांगूं त्या
गोष्टीचा हा श्रोता विपर्यास करणार नाहीं, भलतीच शंका
मध्यें घेणार नाहीं, असें त्यास अंतरांत पटलें पाहिजे,
शिवाय तो मनमोकळा असावा, चोरटा नसावा,
तसा तो महापुरुष उदासीन हि नसावा, या
दृष्टीनें संतभेटी बहू अवघड आहे असें तुकोबारायांनीं म्हटलें आहे. असा महापुरुषच
अनुभवलेलें सुख पोटीं घेऊन जेव्हां अभंगांचें निरूपण करील,
तेव्हांच या अभंगांचें वर्म पडे ठावें । त्या शिवाय
उड रे उड रे काऊ ।
तुझें सोन्यानें मढवीन पाऊ ।
ही
स्थिती समजणार नाहीं. तें भावगीत वाटेल तसें तें चरण भावगीत नाही. ती अन्तर्यामींची
विरहावस्था आहे. त्या अभंगाचा शेवटचा चरण
ज्ञानदेव म्हणे
जाणीजे ये खुणे । भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥
अंन्तर्यामीं ही एवढी घायाळ स्थिति झाली आहे का ? तर मग
पंढरीराणे भेटतीलच अशी खात्री असूं द्यावी, असें ज्ञानदेव
म्हणें. हा कारुण्यरस तुकोबांच्या कवित्वांत सर्वत्र पसरलेला आहेच पण या 751
अभंगांत तर तो ओतप्रोत आहे. आजवर हे करुणापर अभंग सुट्टे सुट्टे वापरले जात. परंतु
या वहीच्या आधारानें आपणास यापुढें या कारुण्यरसाचा परिपोष अभंगा-अभंगानें कसा होत
गेला हें सुरवातीपासून अखेरपर्यंत पहावयास सांपडेल. आजवर ही गोष्ट वक्त्याच्या,
कीर्तनकाराच्या मर्जीवर असे. तो अभंगांची निवड करून विषय प्रतिपादन
करितांना जसा रंग भरील तें तुकोबांचें निरूपण असें समजावें लागे. आतां या
750 अभंगांपुरते तसें करावयास नको. उदाहरणार्थ,
स्त्री-पुत्रादिकीं राहिला आदर हा अभंग घेऊं. पूर्वी हा अभंग
वैराग्य अंगी बाणावें म्हणून घेऊन वक्ता त्याचें रसभरित वर्णन चरणा-चरणास करीत
असे-आतां निरूपण निराळया त-हेनें करावें लागेल. या अभंगाच्या वरचा अभंग गंगेचिया
अंतावीण काय चाड असा आहे. त्यांत वर्णिल्याप्रमाणें आनंदसोहळयांत असतांना
देवा-मध्येंच स्त्रीपुत्रांदिकांबद्दल मनांत आदर डोकावतो याचें कारण काय,
असें म्हणून देवास धावा म्हणतात- धावा म्हणण्याचें कारण मी असा
स्वतंत्र पाईक नाहीं-कीं-या गोष्टी स्वतः करूं शकेन. पुढें
24-25-26-27-28-29-30 एवढे अभंग एकापुढें एक पण चढत्या प्रमाणांत
होऊन पुढें म्हणतात.
भोगावरी आम्ही
घातला पाषाण । मरणा मरण आणीयेले ।।
856(शा)
स्त्रीपुत्रादिकीं
राहीला आदर अशी सुरवात होऊन एकापुढें एक चढत्या प्रमाणानें अभंग होऊन
आमुच्या हें आलें
भागा । जिव्हार या जगाचें ॥
889(शा)
म्हणून
सांगितलें तेव्हां या 8/10 अभंगांतील रसपरिपोष नवीन आहे. हा
प्रथमच या स्वरूपांत आपल्यापुढें येत आहे. असो. येथें,
स्त्रीपुत्रादिकीं राहीला आदर, या अभंगापासून कारुण्यरसास
जी सुरवात आहे. त्याच रसांच्या ओघांत तुकोबा 751 व्या
अभंगापर्यंत आहेत. |