Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

 

५.शिकवण

 
 

      तुकोबारायांचीं लोकजागृतीचीं साधनें, भजन व कीर्तन हीं होतीं. या साधनांची मांडणी अशी आहे कीं, यांत मुळांत भजनद्वारा एकांत व्हावयाचा श्री विठुशीं व त्या भजनांत जो बोध पदरांत पडेल तो जनतेस द्यावयाचा हरिकीर्तनांत. जेव्हां कोणी आपलें मन उघडें करून स्वतःचें साकडें तुकोबारायास सांगून तें निवारण्याचा उपाय विचारावयास येई, तेव्हां त्या अडचणी तीं सांकडीं-ते अवघड प्रश्न विठुरायास सादर करावयाचे व तल्लीनतेंत-त्या प्रश्नांस जें उत्तर भावारूढ स्थितींत स्फुरे तें प्रगट व्हावयाचें कीर्तनांत. तुकोबा स्वतः ''नव्हे माझी वाणी पदरींची !'' अशी पदोपदीं ग्वाही देत असतांना आढळतात. तेव्हां जें कांहीं तत्त्वनिदर्शन व्हावयाचें, संतबोध प्रगट व्हावयाचा-तो कोणाच्या तरी गरजेनें-एखाद्याचें कोडें सोडविण्यास्तव-त्या त्या व्यक्तीच्या गरजेपुरता व्हावयाचा. तुकोबा कांहीं गंथकार नव्हते-कीं तेवढयासाठीं कोणत्या हि विषयाचें सांगोपांग विवेचन त्यांनीं करावें! त्यांचेकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचें जीवाचें कोडें ते उकलीत होते. एकाच्या कैवाडे उगवें बहुतांचें कोडे । या नियमानुसार त्यांच्या बोधवाणींत इतरांना ''कल्याणाचा ठाव'' सांपडे. त्यात्पर्य तुकोबारायांच्या अभंगांत केव्हांहि हा बोध, ही भक्ति, हें ज्ञान, हें वैराग्य, हा व्यवहार, हा उपदेश अशीं सदरें घालून अभंग केलेले सांपडणार नाहींत. तर एकाच अभंगांत गोडव्यांत अगर धृपदांत तत्त्व सांगितलेलें व त्या धृपदाच्या वरच्या खालच्या चरणांत त्या तत्त्वाचा विस्तार केलेला, त्यापुढें १/२ दृष्टांत समोरच्या श्रोत्यास पटतील असे व अखेर तुका म्हणे असें म्हणून या सर्व निरूपणाचा तूं बोध काय घे-हें सांगितलेलें असावयाचें. अशा २/४ अभंगांत शिकवण सांगविलेली, ती हि हंसत, खेळत, सहज हातीं दिलेली असावयाची. तेव्हां तुकोबारायांच्या शिकवणींतील बोधरत्नें हीं प्रत्येकानें आपापल्या जरूरीप्रमाणें गाथ्यांत (बोध रत्नांच्या खाणींत). ज्याची त्यानें आपल्या नडी प्रमाणें आपल्या जरूरी प्रमाणें, आपल्या जरूरी प्रमाणें, आपल्या योग्यते प्रमाणें निवडून घ्यावींत.

॥ माझा मज उपदेश । इतरां नाहीं त्याचा रीस ॥
॥ नाहीं मज कोणी उरला दुर्जन । माय बापावीण ब्रम्हांडांत ॥

      समोरच्या प्रत्येक व्यक्तीस प्रेमस्वरूप पांडुरंग, सच्चिदानंद गाभा, -असे पाहण्याची तुकोबांची रीत. जगांत वाईट मनुष्य असतोच कां-तर हा विठु कृष्णावतारांत फार खोडयाळ होता त्यास पूर्वाश्रमीची आठवण होऊन-आमची नजर चुकवून हा कांहीं तरी उपद्याप करून तें गा-हाणें, तें कोडें, ती उपाधी, आमचेपुढें उभी करतो. हेतु हा कीं त्या उपाधींत हें चैतन्य, हें सांवळें परब्रह्म, कसें गुप्त आहे तें, आम्हीं शोधून काढावें. तात्पर्य, तुकोबांच्या ज्ञान व प्रेम यांच्या संमिश्रणानें बनलेल्या बोधदृष्टींतून केव्हां कोणती गोष्ट सुटली आहे असें होत नाहीं. त्यांनीं अभंगद्वारा येवढा मोठा आरसा प्रत्येकाचे पुढें उभा केला आहे कीं, त्यांत प्रत्येकास आपला चेहरा पहावयास सांपडेल. तसा स्वतःचा चेहरा पाहिला कीं आपण संतबोध पदरांत घेऊन आपली चर्या-म्हणजे राहणी शुध्द कशी करावी याचा हि बोध आढळेल व हें सर्व, कांहीं हि मोल न घेतां सवंगपणानें कोणी वर्म हातांत द्यावें, तसे तुकोबा स्वतः देत आहेत असें आढळेल. ज्ञानेश्वरींत-ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी असें जें म्हटलें आहे, त्याप्रमाणें तुकोबा प्रत्येकाचा प्रश्न-ज्ञान व विज्ञान सांगून सोडवितांना आढळतील. असे एकेक, दोन दोन, तीन तीन, अभंगांचे सुटे सुटे गट संताजीच्या गाथ्यांत व्यवस्थितपणें पहावयास सांपडतात. ती सर्व शिकवणच आहे. या वहींत हि सुरवातीपासून अखेरपर्यंत नुसती, शिकवण काय, म्हणून कोणी शोधील त्यास २/४ अभंगांत मिळून कोठें तरी स्पष्ट शिकवणीच्या शब्दांच्या ओवणी रत्नांचीया माळा आढळतील. कोणा हि व्यक्तीस त्याच्या नडीस्तव गीतेसारखा ग्रंथ सांगावा लागत नाहीं. व समरांगणांत ७००/७५० श्लोक सांगितले नसावेत. तेथें झालेल्या संवादाचा तो व्यासांनीं केलेला विस्तार आहे. परंतु जेवढा प्रश्न अवघड-तेवढें विषयप्रतिपादन विस्तृत व सखोल तुकोबांचें झालें आहे असें आढळेल. तुकोबारायांची बोध दृष्टि जेव्हां एखाद्या प्रश्नावर पडे ' हा दिठीवा जयावरी झळके ' म्हणजे च पदकरु माथां पारुखे । तो जीव चि परी तुके महेशेंशीं. । तेव्हां ज्ञानस्वरूप नारायणानें तो प्रश्न सोडवून, बोधस्वरूप सदाशिवाचे हातीं तो लखोटा द्यावा, व त्या महेशानें तो बोध तुकोबांच्या मुखा वाटा (तूं बोलसी माझे मुखें) बाहेर द्यावा, स्पष्ट करावा, अशा अखंड समाधींत-तुकोबा होते. अशा स्थितींत तुकोबा असतांना त्यांच्याकडे बीड परगण्यांतील एक देशपांडया ब्राह्मण आला व त्यानें स्वतःचें वृत्त तुकोबांस सांगितलें. तें खालील प्रमाणेंः- मी पंढरपुरीं धरणें धरून बसलों होतों, हें धरणें मी उपाशी राहून करीत होतों, हेतु, हा कीं, मला व्युत्पत्तिज्ञान होऊन-पुराण सांगता यावें. तसा मी दहा दिवस बसल्यावर मला दृष्टांत झाला कीं-तुला जी कांहीं आराधना करावयाची ती आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांची करावी. व ते जे युक्ति सांगतील त्याप्रमाणें तूं वागलास तर तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्याप्रमाणें मी आळंदीस आलों व तेथें अन्नपाण्याशिवाय धरणें धरून बसलों. तेथें दृष्टांत झाला मी तुमचे कडे यावें व तुम्ही मजवर अनुग्रह कराल, तो मीं मानावा.
      हा वृत्तांत ऐकून व त्या माणसाचें वयोमान, बुध्दिमत्ता-सर्व कांहीं लक्ष्यांत घेऊन तुकोबांस मोठें संकट पडलें असावें. परंतु पंढरीनाथाचें कार्य ज्ञानराजांकडून आपणाकडे आलें तेव्हां तेथें हो ना करण्याची सोय नव्हती. तेव्हां तुकोबांनीं देवाच्या व संतांच्या सेवेस्तव कीर्तन केलें. त्यांत पहिल्या ७ अभंगांत पंढरीनाथाची व ज्ञानेश्वर माउलीची अत्यंत कळकळीची आळवण आहे व त्यापुढें त्यांस जो स्फुरला तो अकरा अभंगांत साठविला आहे. या अकरा अभंगांत तुकोबांनीं खालीलप्रमाणें बोध केला आहेः- बा, तुझे वय झालें आहे. तेव्हां तूं कांहीं साधन करून मोक्ष मिळविण्याच्या किंवा ग्रंथाध्ययन करून ज्ञान मिळविण्याच्या भानगडींत पडूं नकोस-साधनें हीं काळाच्या मुखांत नेऊन तुला घालतील. व ग्रंथ पाहून वेदपठण करून जी, गोष्ट व्हावी ती, मी तुला सांगतों कीं, तूं ग्रंथांच्या भानगडींत पडूं नकोस-साधनांच्या खटपटीस लागू नकोस, मोक्ष ही उधारीची व मेल्यावरची गोष्ट आहे. तर तूं एक च कर कीं:-

॥ देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनीया ॥

२३२४(शा)९४३(सं)

      हें तुला सांगण्याचें कारण असें कीं हा पांडुरंग नामासाठीं उडी घालतो व तसा तो तुझ्या हांकेसरसीं धावून आला कीं तो तुला भवनदीच्या पैलपार नेईल. बा तुला मोक्ष मिळावा अशी जी इच्छा झाली आहे ती तृप्त करावी म्हणून पांडुरंगाचे मनांत आलें तरी मोक्ष हें असें एखादें डबोलें-गाठोडें-नाहीं, जें तो तुला सहजच उचलून हातांत देईल. त्यासाठीं आपलें मन आपल्या ताब्यांत येऊन इद्रियें हीं आपल्या हातीं यावीं लागतात. असें आपलें मन निर्विषय होतें. म्हणजे कोणत्या हि विषयाचें त्या मनावर बळ चालत नाहीं. उपासतापास करून, अक्षरांची आटाआटी करून व सत्कर्म करून जें साधावें म्हणून साधनें करतात तीं एवढयाचसाठीं. तेव्हां कोणत्या हि गोष्टीचा आत्यंतिक आदर धरिला नाहींस कीं जी गोष्ट सहज आहे त्याचें दुःख होणार नाहीं. तूं इतरांचे शब्द ऐकून स्वप्नांत जसा एखादा मनुष्य-मेलों मेलों म्हणून विव्हळत असतो-तसा भाव-बंध-वगैरे शब्द शास्त्रीपंडितांचे ऐकून विव्हळतो आहेस-तेव्हां तुला जें फळ प्राप्त व्हावें अशी इच्छा आहे तें फळ ज्या मूळ-ईश-शक्तीस देतां येईल त्या ईशसत्तेस तूं शरण जा. म्हणजे ' देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देह भावा पाडोनीयां ॥-म्हणजे तुझें काम होईल. इतर साधनें करतांना कांहीं सोडा-कांहीं धरा-अशी सांडी मांडी करावी लागते; तसें आपण कांहीं टाकून दिलें, सोडून दिलें, असा जनांत डंका पिटवून उपयोग होत नाहीं. तेव्हां आपण देवास करुणा भाकून आळवावें. आपण देवाची करुणा साच भावानें भाकीत आहोंत किंवा नाहीं.-यांस आपलेंच मन आपणास साक्षी असतें. त्यासाठीं आपण कोणत्या क्षेत्रास जावयास नको. आपल्या अंतरांत-हृदयस्थ-जो आहे-तो आपल्या मनांत जो विचार उत्पन्न होतो-तो कोठून होतो काय विचारानें होत आहे, हें ओळखून असतो. हा जो हृदयस्थ आहे, तो कृपासिंधु आहे व तो आपणास बांधणारा भवबंध तात्काळ तोडतो, येवढयासाठीं मी तुला सांगितलें कीं ' देवाचीये चाडे आळवावें देवा । वोस देहभावा पाडोनीयां ।' अशी आळवण करून जर गोविंद-गोविंद हा एवढाच तुझ्या किंवा कोणाच्या मनाचा छंद होऊन बसला तर ती कायाच गोविंद होते-त्या व्यक्तींत व देवांत भेदभाव उरत नाहीं. याची खूण अशी कीं हा स्वतः च गोविंद झाल्यानें मन आनंदित होतें व डोळयावांटा प्रेमाचे पाझर वाहूं लागतात. बा, आळी जशी त्या फुलपाखराच्या ध्यासानें फुलपाखरूं होतें-तिला वेगळें राहतां येत नाहीं-तसें ज्या माणसास ज्याचा ध्यास लागेल तसें त्याचें मन होतें-तेव्हां इतर सर्व कांहीं बाजूस सार व पांडुरंग हा मनीं दृढ धर-त्याचीं सम पाऊलें विटेवर उभीं ठाकलीं आहेत. तो आकाशाहून मोठा व अणुहून हि लहान असा आहे. ग्रंथ पाहून वेदाध्ययन करून हरिगुणगान करावें अशी बुध्दि झाली तर ठीक, नाहीं तर ती नुसती तोंडपिटी व्हावयाची, तपतीर्थाटणें करून हरिनामीं बुध्दी स्थिर झाली तर ठीक, नाहीं तर ती पायपिटी व्यर्थ जावयाची. यज्ञयाग, दानधर्म, करून कंठीं नाम स्थिर झालें तर ठीक नाहीं तर आयुष्य व्यर्थ जावयाचें. तेव्हां या कोणत्या हि काबाडाचें भरीस न पडतां मी या सर्वांचे तुला जे सार सांगत आहे तें मनीं धर. तूं उपाशीं राहून जें धरणें धरतोस तसें करूं नकोस-खुशाल पोटभर अन्न खा-व दिवसभर त्या पांडुरंगाचें चिंतन कर-म्हणजे ज्यानें तें अन्न आपणास दिलें, ते त्याचें त्यास पावेल व आपल्या पदरांत त्या चिंतनाचे फळ पडेल. हा जो देणारा आहे त्याचें नांव विश्वंभर आहे-हा जगाचा आधार आहे. याची सत्ता नाहीं असा रिता ठाव त्रिभुवनांत नाहीं. तेव्हां मला हें एवढेंच हवें-असें म्हणून स्वतःचा संकोच करून, लहान कां होतोस-सर्व ब्रह्मांड एका आपोष्णीनें गट्ट कर-असें पारणें तूं कर व संसारास तूं आंचव-म्हणजे संसारांतून संसाराच्या नांवानें हात धुवून मोकळा हो. हें करण्यास तूं उशीर लावूं नकोस. मी-माझें असें लहानसें घरकुल करून आंधारांत कां सांपडतोस? त्यानें फार कासाविसी होते. तेव्हां आई जशी एखादी गोष्ट लांब झुगारून दिल्यासारखें दाखवून काखेंत ती गोष्ट लपविते-तसें हा पांडुरंग सर्व जगाचा पसारा दाखवून मूळ गोष्ट-वर्माची गोष्ट-आपल्या जवळच लपवून ठेवितो. तेव्हां

      बाप श्रीज्ञानेश्वर माउली यांच्या पुढें मीं तुझी आळी मांडली व त्यांनीं मला जो खाऊ दिला त्या आनंदांत मीं क्रीडा केली. त्याचें फळ म्हणून हें दान माझे हातीं आलें तेव्हां यांत जो तुझा विभाग आहे तो घेऊन तूं आपल्या स्थळास काळ व्यर्थ न दवडतां जा. तेथें ज्ञानेश्वर माउलीच्या नांवानें तूं समुदाय गोळा केलास कीं मी तुमचे व त्यांचे पाय वंदण्यास तेथें येईन. तूं ज्ञानीयांचा राजा, महाराव, तुम्हांस लोक ज्ञानदेव, असें म्हणतात. तेव्हां ज्ञानाचें दान तुम्ही द्यावेंत. हें थोरपण मला कशाला ? माउली, पायीची वहाण पायी असावी हें बरें. मला तुमच्या युक्तीची खोली कोठें साधणार ? तेव्हां तुमच्या पायांवर मला डोई ठेवूं द्या. महाराज, मी माझा अधिकार काय ही गोष्ट लक्ष्यांत न घेतां आलीं तशीं वेडींवांकडीं उत्तरें म्हणजें वचनें बोललों. महाराज तुम्ही सिध्द च आहांत तेव्हां तो अपराध क्षमा करा व बा ज्ञानेश्वरा, या आपल्या पायाच्या सेवकास तेथें च पायीं राखा. या अकरा अभंगांत तुज व्हावा जरी देव । तरी हा सुलभ उपाव असा हा स्वयें अंगें ब्रह्म होण्याचा सुलभ उपाव सांगितला आहे. हा बोध माझ्या बापानें मला जें भातुकें पाठविलें त्या बळानें मीं क्रीडा व त्यांत हे अभंग झाले. तेव्हां ज्ञानेश्वर माउलीनें जो खाऊ पाठविला तो पाठाविला तो कोणता असावा असा साहजिकच प्रश्न उद्भवेल. तो खाऊ हरिपाठ होय. हरिपाठांत ज्ञानेश्वर माउलीनें जो बोध केला, तोच बोध थोडया फार फरकानें या अकरा अभंगांत आहे व तीच गोष्ट पंढरीनाथानें पंढरपुरच्या ब्राह्मणांस ज्ञानोबाच्या मुखानें एक वार सांगितली होती. ही गोष्ट नामदेव रायाच्या तिर्थावळीच्या अभंगांतील शेवटच्या दोन तीन अभंगांवरून स्पष्ट होईल, पंढरीनाथ ज्ञानोबा यांच्याकडे जाऊन जसा धरणेकरी तुकोबांकडे आला तसाच पंढरीच्या ब्राह्मणांस करावयाचा बोध ज्ञानोबांच्या मुखानें होऊन तो हरिपाठांत गोवला गेला त्याचें सार तुकोबांनीं त्या धरणके-यास अकरा अभंगांच्या रूपानें दिलें, अशी या अकरा अभंगांस ज्ञानदेव व नामदेव यांच्या बोधाची बैठक आहे. परंपरा आहे. या अभंगांत सर्व काय सांगितलें याचें थोडें ज्यास्त स्पष्टीकरण करतों. या अकरा अभंगांत सर्व पुस्तकी ज्ञान सांडावयास सांगून देवाचीये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनीया अशी पहिली गोष्ट सांगितली आहे.

      ही गोष्ट ज्ञानेश्वरींत

तेव्हां देवाचीये चाडे आळवावे देवा ।
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मींच म्हणौनि ॥

      म्हणून (अ. ९/३४५) सांगितली आहे व वोस देवभावा पाडोनीयां याचें स्पष्टीकरण जरा पुढें आहे.

मग मीची डोळा देखीला । जीहीं कानीं मीच आइकिला ।
मीचि मनीं भावीलां । वानीलां वाला ॥ ३५५ ॥
सर्वांगें सर्वांठायी । नमस्कारिलांमीचि जिहीं ।
दान पुण्यादीकी जें कांहीं । तें माझीयाचि मोहरां ॥ ३५६॥
जिहिं मातेंचि अध्ययन केलें । जे आंत बाहेरि मियांचि धाले ।
जयांचें,जीवीत्व जोडलें । मज चि लागी ॥ ३५७॥
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्हीं हरिचे भुषावया लागीं ।
जे लोभी जगीं । माये नि लोभें ॥ ३५८ ॥
जे माझोनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम ।
जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥ ३५९ ॥
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडे जयाचेनि मंत्रे ।
ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥ ३६० ॥
ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे ।
मग मरणीं आणिकी । जातील केवीं ॥ ३६१ ॥

      ग्रंथाध्ययन केलें, वेदपठण केलें, तीर्थयात्रा केल्या तर त्यानें अंगीं अहंकार उत्पन्न व्हावयाचा, ज्ञानीयांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठीमागे ।- तेथें देवाचीये चाडे आळवावे देवा ही गोष्ट भेटावयाची नाहीं. पंडित झालास तर शब्दांचें पांडित्य करशील, एका शब्दाचे दहा अर्थ सांगशील व विद्वान् म्हणून तुझी वाहवा हि होईल पण ती विद्वत्ता अंगे ब्रह्म व्हावयाचें वर्म तुझ्या हातीं देणार नाहीं. तूं यज्ञयाग केलेस तर तुला दीक्षित असें म्हणतील. पण ज्ञानेश्वरींत म्हटल्याप्रमाणें तें पुण्याच्या नांवानें पाप केल्यासारखें होईल. ती गोष्ट तुला श्रीहरीच्या पायावर नेऊन घालणार नाहीं. तूं गाणें शिकलास तर नव्या नव्या ताना घेशील. हाव भाव करून गाशील हि; त्यानें तुझी प्रसिध्दी हि होईल-पण ती गोष्ट तुला जीवाच्या जिव्हाळयाची ओळख करून देणार नाहीं-तूं धन कुबेरासारखें मिळविलेस-तरी त्यांतील एक कवडी हि तुझ्याबरोबर येणार नाहीं. राज्य मिळविलेस तर जेथें देवादिकांचे अवतार उरले नाहींत तेथें तुझा काय पाड ! या सर्व गोष्टी व येथें न सांगितलेल्या अनेक गोष्टी हि तुझ्या देहभावाच्या कल्पना वाढवितील पण त्यांपैकीं कोणती हि गोष्ट तुला 'जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें.' हें सांगणार नाहीं. ती गोष्ट मी तुला अभदीं सुलभ करून सांगतों कीं :-

देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभावा पाडोनियां ।

      अशा त-हेनें तुझ्या मनास दुसरा कसला हि वेध न लागतां तुझ्या सर्व देहभावांस एकीएक गोविंद गोविंद हा एवढाच वेध राहिला-म्हणजे साहजीकच तूं म्हणशील कीं :-(सं. ७३४)

॥ येणें मुखें तुझें वाणी गुणनाम । तेंची मज प्रेम देई देवा ॥ १ ॥ २४३४(शा)
॥ डोळे भरुनीयां पाहे तुझे मुख । तेंची मज सुख देई देवा ॥ धृ ॥
॥ कान भरूनीयां आईके तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥ २ ॥
॥ वाये रंगीं टाळी नाचैन उदास । हे देई हातांस पायां सुख ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चींतुं त्यासी ॥
व असें होण्यास्तव सहजच तूं म्हणशील कीं, (पं. ७५६)
॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ १ ॥ ७५६ (शा)
॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ धृ ॥
॥ तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ २ ॥
॥ मना तेथें धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ४ ॥

       अशा एकविधतेंत व उत्कटत्वांत कोणाच्या हि तोंडून एकच शब्द बाहेर पडणार व तो असणार कीं (सं. ७३५)

॥तूं माझा मायबाप । सकळ वीत्त गोत । तूंची माझें हीत । करितां देवा ॥१॥

॥ धृ ॥ तूं माझा देव । तूं माझा जीव । तूं माझा भाव । पांडुरंगा ॥ धृ ॥

२४३५ (शा)

॥ तूं माझा आचार । तूं माझा वीचार । तूं चि सर्व भार चालवीसी ॥ २ ॥
॥ सर्व भावें मज । तूं होसी प्रमाण । यैसी तुझी आण । वाहातुसे ॥ ३ ॥
॥ तुका म्हणे तुज । वीकला जीव भाव । कळे तो उपाव । करी आतां ॥ ४ ॥
॥ गोविंद गोविंद मना बैसलीया छंद ॥ २३२७ (शा) ९४७ (सं)
॥ ज्याचें जया ध्यान । तेंच होय त्याचें मन ॥ २३२८ (शा) ९४८ (सं)

       हे दोन अभंग या अकरा अभंगांचें सार आहे. याच मार्गानें जाऊन श्री ज्ञानेश्वर माउलीनें म्हटलें कीं,

॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप । पदरीं आलें पुण्य माप ॥
॥ मन हें धाले मन हें धालें । पूर्ण विठ्ठल चि झालें ॥

      सर्व संतांचा हि हाच अनुभव असल्यामुळें सार सार सार विठोबा नाम तुझें सार असें संतांच्या सर्व शिकवणीचें सार काढून तुकोबांनीं त्या धरणे-याचे हातीं दिलें. हेतु हा कीं, त्याच्या वाणीवर विठ्ठल नामाचा उच्चार ठेवून दिला कीं, तें लहानसें रोप असलें तरी त्याचा वेल गगनापर्यंत जाऊन भिडावा. परंतु हा बीड येथील ब्राह्मण. देशपांडया, विश्वास, हें मुख्य, भांडवल बरोबर घेऊन आला नव्हता. त्यास एका क्षणांत चमत्कार होऊन त्याचे तोंडीं संस्कृत भाषा यावयास हवी होती. त्यास या मराठी अभंगांची प्रतीति पहावी अशी हि बुध्दि सुचली नाहीं. तो ते अभंग टाकून गेला. त्यानंतर कोंडभट लोहकरे या नांवाचा एक ब्राह्मण तुकोबांकडे आला, त्यानें ते अभंग व त्याबरोबर तुकोबांनीं ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेलें श्रीफळ (नारळ) दिलें तें घेतलें. त्या नारळांत त्यास जडजवाहीर सांपडून त्याचें दैन्य फिटलें. व हे अभंग पाठ करून त्यास सर्व ज्ञान झालें, तो शिवछत्रपतींच्या दरबारीं हुद्यावर चढला अशी कथा महिपतीबोवांनीं वर्णिली आहे. असो, ती कथा बाजूस ठेवून आपण येवढेंच पहावयाचें कीं या अकरा अभंगांत तुकोबारायांनीं स्वयें अंगेंची ब्रह्म होण्याची युक्ति सांगितली आहे. हीच युक्ति त्यांनीं स्वतः अनुभवानें सिध्द केली होती. नुसत्या नामानें त्यांचें सर्व सांग झालें होतें.

॥ नामाचिया बळें कैवल्य साधन । उगेचि निधान हातां चढे ॥

      असा स्वतःचा अनुभव होता. तोच सुलभ उपाय त्यांनीं या अकरा अभंगांत सांगितला आहे. ऐके रे जना (पं. ११४२) या अभंगाचा शेवटचा चरण खालीलप्रमाणें आहेः-

॥ तुका म्हणे अनुभवे । आम्ही पाडीयलें ठावें ११४२ (शा)
॥ आणीक ही दैवें । सुख घेती भावीकें ॥

      तेव्हां जे दैववान व भावीक असतील ते या शिकवणीचा अनुभव घेतील. या अकरा अभंगांत संतबोधाचा गाभा तुकोबारायांनीं महाराष्ट्राच्या हातीं दिला आहे. बुडता हें जग न देखवे डोळां-व त्या जगाच्या हिताचा कळवळा त्यांस येई तेव्हां ज्ञान म्हणजे काय व त्याचा विहार कसा-व त्यामुळें व्यवहार कसा करावा ही शिकवण अभंगांतून ठिकठिकाणीं सांठविलेली या भिजल्या वहींत आढळते.

टीप : शा - शासकीय गाथा, सं - संताजी गाथा , पं - पंडीत गाथा

 
 

६. गृहकलह